Watch full video of our recent one-day hike to Kokandiva. This area is hardly 75 kms from Pune, to west.

मी कोकणदिवा …

मला आजही आठवतय, जीवा एकदा, ढोरं घेऊन, कावल्या घाटापर्यंत आला होता. लहान होता तो तेव्हा, साधारण १४-१५ वर्षांचा असेल. त्याच्या ढोरांमध्ये एक अवखळ वासरु होतं. एकदा का त्या वासराने शेपुट वर केले की, मग त्याला ना दिशेचे भान राहायचे ना दशेचे. घाटातुन, ते वासरु थेट पळत सुटल, कड्याच्या दिशेला. जीवा सुध्दा धावला पाठोपाठ. वासरु, खडी चढाई चढुन, थेट माझ्या, गुहेपाशी असलेल्या पाण्याच्या टाक्यापाशी आलं. तहानलेल असाव बहुधा ते. टाकं अस काही तासुन बनवय की वासराला काही केल्या पाणी पिता येईना, त्यामुळे ते तिथेच मागे पुढे करु लागल. इतक्यात माथ्यावरुन खाली आलेल्या पाईकांनी, वासराला पाहील आणि पकडुन ठेवलं. जीवा सुध्दा पोहोचलाच तितक्यात.

जीवानं असे पाईक, धारकरी पहिल्यांदाच पाहीले इतक्या जवळुन. थोडा थबकलाच तो. आणि त्यातच वासरु सुध्दा त्यांच्याच हातात. ४-५ जण होते ते. प्रत्येकाचे शरीर जणु, पोलादाला विरघळवुन, बनवलेले आहे की असेच बलदंड होते. त्यातला त्यात एक जणाचे थोडे पोटसुध्दा सुटले होते. आणि तोच पाईक, पुढे आला आणि दरडावुन जीवा ला विचारले,”कारं पोरा, तुझच हाय का हे घोरं?, आन इकत्या वर पतुर कस येतय, का डुलका घेत हुता की काय रं?”

जीवाची तारंबळ उडाली. एरवी त्याच्याशी अशा खड्या आवाजात कोणी बोलत नाही. “व्हय व्हय” अस म्ह्णुन त्याने वासरु पकडण्यासाठी हात पुढे केला. तितक्यात तो गडी आणखीच उखडला, व ओरडला,”गुरांकनी आल्यावर झोपतो व्हय रं बिट्या !!!” जीवाला चुक समजली, आणि “नाय बा!” म्हणुन कानाला हात लावुन, तसाच उभा राहीला.

सगळे धारकरी, मोठमोठ्याने हसु लागले. त्यातला तो, पोट सुटलेला, पण, भारदस्त गडी, पुढे येऊन, जीवाच्या पाठीवर हात ठेउन बोलला,”लका, घाबरु नग! गुर ढोरच ती, आणि अशी उधळणारच, पण आम्ही हित नसतो तर, पाण्यासाठी घो-यानी मारली असती ना उडी टाक्यामदी.. गाव कणच तुझ?”

“सांदुशी चा हाये जी”, जीवा बोलला!

“आर व्वा गड्या! आन कुणाचा तु?”

“रामजी पाटलाचा हाये मी”, जीवा.

“अबबब”, आपल्या बाकीच्या चौघा साथीदारांकडे पाहत पाईक ,”आर हा तर सरखेल” , सरखेल शब्दावर जरा जास्तच जोर देत, ”राम पाटलाचा ल्योक आहे.” तसच पाठीवरचा हात काढुन पाईकाना, जीवाचा हात हातात धरुन, त्याला बसायला सांगितलं, आणि दोन घास खाऊ घालुन, कातळातल्या टाक्याच पाणी वासराला आणि जीवाला, असे दोघांनासुध्दा पाजल.

आता या गोष्टीला वीसेक वर्षे लोटली असतील. जीवा एव्हाना भारदस्त मर्द मावळा रांगडा गडी झाला होता. माझ्या अंगाखांद्यावर खेळुन लहानाचा मोठा झालेला जीवा, आता नाईक झाला होता. स्वराज्याचे कारभारी पिंगळेंनी स्वःत मानाची वस्त्रे देऊन जीवा सर्कले ला जीवाजी सर्कले “नाईक” केले.

त्या दिवशी माझ्या हृद्याचे ठोकेसुध्दा जरा जास्तच वाढले आहेत. मला दिसतय, दुरवर, घोळ गावाच्या दिशेने, या सह्याद्रीच्या छाती तुडवली जात होती, त्यामुळे आकाशात धुळ उडत होती. धुळीसोबतच, “अल्लाह हु अकबर” अशा आरोळ्या आणि सह्याद्रीच्या कुशीत हजारो वर्षे राहणा-या मावळी लोकांच्या, बाया बापड्यांच्या किंकाळ्या देखील आसमंतामध्ये पसरत होत्या आणि लुप्त होत होत्या. अल्ला हु अकबर व दिन दिन च्या आरोळ्या आता मला जवळ जवळ ऐकु येऊ लागल्या होत्या.

अजुन सुर्य देखील उगवला नव्हता. पण त्याच्या प्रभेने, संधीप्रकाश बराच, असल्यामुळे वाटा, झाडेझुडपे, डोंगरद-या सगळे पुसटसे का होईना दिसत होते. जीवाजी सरकले नाईक कावल्या घाट चढुन, माझ्या खांद्यावर चढुन, त्या आवाजाच्या दिशेने पाहु लागला. त्याचे डोळे अगदी निरखुन त्या गर्द जंगलामध्ये, माणसांच्या हालचाली पाहत होते तसेच त्याचे कान देखील त्याच दिशेने एकवटुन, आवाज ऐकत होते. त्याच्या कमरेला इखान, डाव्या हातात कामठा, पाठीवर शंभरेक तीर, उजव्या हातामध्ये समशेर होती. जीवाजी तडाखेबंद गडी होता. उंची अंदाजे साडेपाच फुट असेल त्याची. धोतराचा सोगा, आणखी थोडा वर, जेणेकरुन डोंगर-उतारावर पावले टाकायला अडचण येऊ नये म्हणुन, बांधला होता. अंगात कोपरी होती. मनगटात चांगला शेरभर वजनाचा कडा असेल, डोक्यावर मुंडास होत. मुंडाशाच्या खाली त्याचा तो उन्हान भाजुन निघालेला, कणखर, जाड, अभेद्य त्वचा असलेला मर्दानी चेहरा. भाळावर एकदोन पुसटशा आढ्या आणि त्याच्या खाली भेदक, काळेशार डोळे. मिश्यांना जर ताव देईल तर तलवारीसारखे टोक दिसेल, पण घामान माखलेल्या त्याच्या मिश्यांच्या काही केसांच्या शेम्ड्यावर देखील एक दोन थेंब घाम जमीनीवर टपकण्याची वाट पाहत होता. त्याच्या उजव्या काखोटीला कपड्यात गुंडाळलेल्या भाकरी असतील कदाचित.

अचानक जीवाजी, सतर्क झाला. काळ्या तोंडाची माकडे म्हणजे वानरे जसा आवाज काढतात तशाच आवाजात, दोन तीन आवाज त्याने दिले. कावल्या घाटाच्या गर्द हिरव्या झाडीतुन पुन्हा तसेच आठ-दहा आवाज आले आणि त्याने कडा उतरायला सुरुवात केली. त्या वानरांना सुध्दा लजवेल इतक्या जलद गतीने जीवाजी, त्याच गर्द झाडीमध्ये कावल्या खिंडीच्या दिशेने लुप्त झाला.

दिन दिन च्या आरोळ्या आता आणखी जवळ ऐकु येऊ लागल्या. काहीतरी भयानक घडणार याची आता मला जाणीव होऊ लागली होती. गारजाई वाडीतुन, कावल्या खिंडीत येणारी वाट, कधी गर्द झाडी मध्ये हरवते, तर मोकळ्या मैदानात दिसते. गारजाई वाडी पासुन ते खिंडीपासुन अगदी हाकेच्या अंतरापर्यंत माणसांची लांबच लांब रांग खंडीत रुपात, मोकळ्या मैदानातील वाटेमुळे मला दिसत होती.

सुर्याने आत्ता कुठे डोके वर काढले. सगळे स्पष्ट दिसायला लागले एव्हाना. कावल्या खिंडीमध्ये, जीवाजी सर्कले नाईकांचे नऊ पाईक, वेगवेगळ्या ठिकाणी दबा धरुन बसले होते. नऊ पाईक आणि त्यांचा अधिकारी म्हणजे नाईक. तो आपला जीवाजी नाईक. जीवाजी ने थोड्या वेळापुर्वे वानराच्या आवाजात जे काही संदेश दिले घेतले, तसे संदेश त्या दहा जणांमध्ये अजुन ही सुरुच होते. ख-या वानरांचा आवाज आणि जीवाजी व त्याच्या पाईकांचा आवाज फक्त मीच ओळखु शकत होतो. बाकी कुणाला समजणार नाही इतक्या बेमालुमपणे त्यांची इशारेबाजी सुरु होती. ते दहाही जण, एकमेकांना दिसत नव्हते. पण मला मात्र त्यापैकी प्रत्येकजण दिसत होता. त्यातील चार जण माझ्या कड्याच्या पोटाशी असलेल्या जंगलात होते. जीवाजी सारखेच त्यांच्या कडे सुध्दा हत्यारे होती. एकेक झाड प्रत्येकाने निवडले होते. कुणी भाकरी झाडाला बांधुन ठेवली होती तर कुणी तशीच काखोटी बांधलेली. प्रत्येकाजवळ तीन-तीन चार-चार भाले सुध्दा होते. सगळेच्या सगळे गडी जीवाजी सारखेच चपळ सडसडीत आणि भेदक होते. प्रत्येक अशा पध्दतीने तयार होऊन बसले होते, की जणु त्यांना कुणी, कधी, काय करायचे आहे हे माहित होते.

  आता माणसांच्या रांगेचे पुढचे टोक, पाईकांच्या तीराच्या टप्प्यात आले. वाट मुळातच अरुंद व दगडधोंड्यांची असल्याने, खडी चढाई असल्याने, त्या माणसांची चालण्याची गती कधीच मंदावली होती. प्रत्येक जण धापा टाकीत, एकेक पाऊन पुढे टाकीत होता. प्रत्येकाकडे तलवारी होत्या, अनेकांकडे भालेसुध्दा होते. त्यांची पायताणे सुध्दा घासुन घासुन जीर्ण झालेली होती. पण ते संख्येने खुपच जास्त होते.

सर्वात पुढे चालणा-या एकाने, बाकीच्यांना थांबण्याचा इशारा केला. त्यांच्या सोबत गावातल एक माणुस सुध्दा होता वाट दाखवायला. वाटाड्याने माझ्या कडे बोट करीत, पिण्याचे पाणी, वर , माझ्या पोटाशी असल्याचे सांगितले. तसे, त्या म्होरक्याने, सर्वांनी पाणी पिण्यास सांगितले. अधाशासारखे पाणी पिले. थोडा वेळ थांबायचे ठरले. तेवढ्या वेळात, त्यांच्यातील वीसेक जण पाण्याची भांडी घेऊन, माझ्या पाण्याच्या टाक्याकडे येण्यासाठी निघाली. पाण्या आणण्यासाठी गेलेले ते हुजरे माघारी येईपर्यंत अंग मोकळे व्हावे म्हणुन सगळे निवांत झाले. तेवढ्यात…

सप सप करीत एकदम दहा बाण त्या घोळक्यात घुसले. कुणाच्या मानेत तीर घुसले, कुणाच्या पोटात तर कुणाच्या छातीत. काय होत आहे हे कळण्याच्या आतच आणखी जास्त बाणांचा मारा सुरु झाला. जीवाजीचे साथीदार, तीन चार वेळा बाण मारला की दुस-या झाडावर चढत होते. बाणांचा जणु पाऊसच सुरु झाला. त्यांच्या स्वःतच्या तलवारी सावरे पर्यंत, शे सव्वाशे लोक जमिनीवर पडुन विव्हळत होते. कुणी त्यांना मागे खेचत होते, तर कुणी ढाली समोर धरण्याचा प्रयत्न करु लागले. त्यातील कुणाला तरी समजले काय होत आहे ते आणि त्याने मोठ्याने आरोळी दिली, “सिवा काफीरोंनो धोका दिया, मारो काटो” तो आवाज सर्वांनीच ऐकला. तलवारी हातात घेऊन पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न त्यानी केला. तलवारी घेऊन सज्ज झाले, पण मारणार कुणाला? शत्रु आहे कुठे?

शत्रु म्हणजेच जीवाजी व त्याचे पाईक. वानरासारखेच एका झाडावरुन दुस-या झाडावर जाऊन, पुन्हा बेमालुम पणे तसाच बाणांचा वर्षाव सुरु करीत. बाणांचा वर्षाव सुरु होऊन, समोरच्याला बाण मारणारांचे ठिकाण समजेपर्यंत, पाईकांनी झाड सोडलेले असायचे, पण बाणांच्या मा-यामुळे त्यांच्या गोटातील, पुढची माणसे मात्र खाली पडत होती, व मागील , जखमी न झालेली माणसे पुढे येऊन मोर्चा सांभाळीत होती. पण मोर्चा नव्हताच तो. ते तर मरण होते साक्षात. आतापर्यंत जीवाजी व त्याच्या साथीदारांनी, शेकडो गनिमांचे रक्ताने सह्याद्रीला अभिषेक घातलेला होता.

गनिमाला एव्हाना म-हाट्यांचा हा कावा समजला होता. त्यांना धड अंदाज ही बांधता येत नव्हता की म-हाटे नक्की आहेत किती दडलेले. तरीही त्यांनी एक योजना बनवली. रांगेत पुढे न जाता, जंगलातुन, जमेलतसे एकाच वेळी ब-याच जणांनी पुढे जायचे. मगोमाग दुसरी फळी, अशा पध्दतीने, त्यांनी जंगल शोधुन म-हाट्यांना टिपुन मारायचे असे ठरवले.  सर्वांच्या नजरा आता समोर होत्या. सुरुवातीस त्या भिन्न दिशांना होत्या. त्यामुळे एवढ्या नजरांपैकी कुणाच्यातरी नजरेला नक्कीच जीवाजीचे पाईक सापडले असतेच. गनिमाचे पारडे जड होऊ लागले होते.

जीवाजी, एका उंच उंबराच्या झाडावर होता. गनिम सावध झाला, व सावध होऊन हल्ला करण्यासाठी निघालाय असे दिसल्यावर जीवाजी क्षणभर चिंतातुर झाला. त्याच्या मनात विचारांचे थैमान सुरु झाले. त्याला दोन दिवस आधी बायकोला तो काय बोलला हे आठवु लागले.

“हे बघ, मी चाल्लोय सोराज्याच्या कामगिरीव. बाळ राज रायगडावर अडकल्यात, आन, पुण्याकडुन शाबुद्दीन खान सात हजार हशम घेऊन, रायगडाला येढा टाकाय निघालाय. आम्ही त्याला खिंडीत गाठुन हाणणारच..पण जर आम्हाला नाय जमल आन तो घाट उतरला तर पयला तो आपल्याच गावात घुसणार आन गाव लुटणार. संगटच ते म्लींच गडी आपल्या बाया-बापड्यांना सुध्दा सोडणार नाय.” जीवाजी चे बोलणे ऐकतानाच त्याच्या बायकोच्या डोळ्यातुन अश्रुंच्या धारा वाहु लागल्या होत्या. पोर नुकतीच कुठ हाताला आलेली, सुना नातवंडांसंग खेळायचे दिवसांची आतुरतेने वाट पहात होती, अन हे काय अघटीत तिच्या वाट्याला आलेले. जीवाजी ने तिच्या डोळ्यातील पाणी पाहुन तिला घट्ट मिठी मारली. तिच्या आसवांनी, जीवाजीची कोपरी ओली झाली एव्हाना.

अचानक, एक बाण सप सप करीत जीवाजीच्या कानामागुन गेला, आणि जीवाजी भानावर आला. जीवाजी कुठे बसलाय हे गनिमाला समजले होते. जीवाजी ला आता स्वःतचा जीव वाचवण्याची लगबग करणे गरजेचे होते. झाड सोडुन, दुसरा आसरा शोधायचा की गनिमावर तुटुन पडायचे?

तेवढ्यात, माझ्या कड्यावरुन, एका पाईकाने एक अतिविशाल धोंडा, गनिमांच्या दिशेने सोडुन दिला. घरंगळत तो नेमका गनिमांच्या त्या तुकड्यांच्या दिशेनेच निघाला. तो धोंडा इतका मोठा होता की वाटेत, एखाद दुसरे झाड जरी आले तरी ते झाड जमिनदोस्त होत होते. गनिमांनी तो धोंडा त्यांच्याकडे येताना पाहिला, ती तडातड पडणारा, वाकणारी झाडे पाहीली आणि मग सुरु झाली त्यांची पळापळ जीव वाचवण्यासाठी. पळताना त्यांना दिशेचे भान राहिले नाही मग. संधीचा फायदा घेत, पाईकांनी पुन्हा बाणांचा वर्षाव सुरु केला. आणि कड्यावरुन येणारा हा एकच धोंडा नव्हता, एका मागुन एक असे डझनभर मोठ मोठे दगड, आता जंगल आणि माणसे मोडीत होते. एकीकडे दगडींचा मारा तर दुसरीकडे बाणांचा मारा, अशा दुहेरी हल्ल्यामध्ये बरेच गनिम पडले, बरेच माघारी पळुन गेले.

जीवाजी व पाईकांना आता थोडी उसंत मिळाली. गनिम दुरवर पळुन गेल्याची खात्री झाल्यावर, वानरांच्या आवाजातील इशारे करुन ते खिंडीच्या खाली, सादुंशीच्या दिशेला एका ठिकाणी जमले, एक सोडुन, तो एक माझ्या कड्यावर, गुहेपाशी येऊन, पाठमो-या शत्रुच्या दिशेने, गारजाई वाडीच्या बाजुला लक्ष ठेवुन उभा राहीला. व सगळ व्यवस्थित असल्याचा संदेश सवंगड्यांना दिला.

एक पाईक म्हणाला,”नाईक, जमल म्हणायच आपल्याला हे काम. पळालं की मुशीलमान बोच्याला बाय लावुन”, सगळेच थकले होते. दहा होते सकाळी आणि अजुनही दहा शाबुत होते. सगळ्यांना तहान लागलेली, भुक लागलेली. तरीही त्याच्या अशा बोलण्याने सर्वांमध्ये एकच हशा पिकला.  

“ बिट्यानो पटापटा दोचार घार खावुन घ्या, अन पुन्ह्यंदा तयार व्हा”, नाईक बोलले.

“का नाईक, गेल की पळुन ते, आता कशापाय थांबायचं?”, पाईक

“लकाओ, इकत सोप हाय व्हय हे काम, शाबुद्दीन खान सात हजार हशम घीऊन आलाय, कमी न्हायीत ते!! ”

नाईकांचे हे बोल ऐकुन , साथीदारांनी डोक्यालाच हात लावला. “नाईक, आन आपण फक्त दहाच? कस जमणार ओ?”

“जमणार, आईची आण हाये आपल्याला, हे जमवावच लागणार..पण तुम्ही घाबरु नका अजिबात”, नाईक बोलले.

“घाबरत नाय नाईक मेलो तरी बेहत्तर पण गनिम घाट उतरता कामा नये, आम त्येंची गर्दी बघता, आपल्याच्यानी नाय जमणार ही कामगिरी, आपण कमी पडणार, अजुक पन्नासेक मावळे तरी पाहिजेत आपल्या”,पाईक

त्या पाईकाच्या खांद्यावर हात ठेवुन नाईक बोलल, “ पन्नास नाय लका, शंभर धारकरी निघालेत आन ते पोचतील कवाबी! ते येईस्तोवर आपल्याला खिंड लढवायची आहे”

एवढे ऐकुन, सगळ्यांनाच दिलासा मिळाला.

नाईक पुढे बोलले,”गोदाजी जगताप त्यांच्या १०० माणसांसोबत, निघालेत, आतातर त्यांनी घाट चढायला सुरुवात बी केली आसल.. ”

तेवढ्या, कड्यावरुन सावधतेचा इशारा, त्या दहाव्या गड्याने दिला!!

मला त्या दहाही जणांची गडबड दिसत होती. दहाव्या पाईकाने देखील तोपर्यंत भाकरी खाऊन, माझ्याचे टाक्यातील थम्डगार पाणी पिऊन घेतले होते. पुढे काय होणार कुणालाच काहीच माहित नव्हते. पहिल्यावेळी गनिम बेसावध होता यावेळी तो सावध असणार! शक्य तेवढी जास्तीची कुमक घेऊन तळावरुन निघणार, धनुष्य, भाले, बंदुका अशी शस्त्रे घेऊन येणार, हे सगळे जसे मला कळत होते, तसेच नाईक व त्याच्या पाईकांना सुद्धा समजत होतेच. गनिम बलाढ्य आहे, आपली बाजु पडकी आहे हे माहित असुन देखील हे दहा जण निघाले पुन्हा “खिंड लढवायला”

Share this if you like it..