पर्यावरण हा शब्द आपल्या कानी पडला की काही जण थोडं थबकतात, काही जणांच्या भुवया थोड्या उंचवतात, काही जणांचे कान अजुन जास्त सतर्क होतात तर काही जणांना काहीही समजतच नाही काय ऐकलं ते म्हणजे नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे असे काही जणांच्या बाबतीत घडत असते. 
यातील तुम्ही कोणत्या प्रकारचे पर्यावरण प्रेमी आहात ?

एक –  ज्यांना पर्यावरण शब्द उच्चारताच त्याच्या सोबत आपोआपच मनात येणारे विचार, पर्यावरणास निर्माण झालेले धोके, त्या धोक्यांपासुन होणारे मनुष्यजीवनावर  आणि पर्यायाने धरतीमातेवर होणारे दुष्परिणाम, हे सर्व उमगतं किंवा आठवत ; असे ‘पर्यावरण’ शब्द माहीती असलेले लोकांची संख्या आताशा वाढत आहे.  पण हे लोक कृतीशुण्य असतात. यांना आपण काळजीवाहु पर्यावरण प्रेमी म्हणुयात.

दोन – काही लोक असे असतात की जे आपापल्या परिने पर्यावरणासाठी जेवढे जमेल तेवढे काम करीत असतात. यांची काम करण्याची पध्दत तशी पाहता खुपच विस्कळीत असते. पर्यावरण विषय म्हणजे ही संकल्पना यांना थोडी थोडी उमगायला लागलेलीच असते तोवर यांना साक्षात्कार होतो आणि अशा प्रकारचे लोक संपुर्ण संकल्पना समजुन घेण्याआधीच कधी जमेल तसे तर कधी झपाटुन कामाला लागतात. यांना कधी झाडे लावणे म्हणजेच पर्यावरण रक्षण वाटते तर कधी प्लास्टिक न वापरणे किंवा तशी जनजागृती करणे म्हणजे पर्यावरण रक्षण आहे असे वाटते. अशा  लोकांकडून कधीकधी न कळत पर्यावरणाला खुप मोठा धोका देखील निर्माण होऊ शकतो , उदा – सरसकट झाडे लावण्याच्या अट्टहासापायी, दिसली मोकळी मैदाने की लावा झाडे असे करताना या लोकांमुळे अनेकदा गवताळ माळरानांची इकोसिस्टम म्हणजे परिसंस्था देखील नष्ट झाल्या आहेत. सरसकट प्लास्टिक ला विरोध म्हणजे पर्यावरणाच काम असा काहीसा यांचा कार्यक्रम असतो.  यांना कायम असे वाटते की त्यांना जे समजले आहे ते , तसे केल्यानेच पर्यावरणाच रक्षण होईल.  यांना आपण अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले कृतीशील पर्यावरण प्रेमी असे म्हणुयात.

तीन – काही लोक  असे असतात की पर्यावरण रक्षण, संवर्धन यातले त्यांना समजत काहीच नाही, आणि समजुन घ्यावे असेही त्यांना अजिबात वाटत नाही. तरीही हे लोकं दर पावसाळ्याच्या सुरुवातीस त्याच त्या ठिकाणी जाऊन वृक्षारोपणाचे फोटो काढुन घेतात, संधी मिळालीच तर पर्यावरण या विषयावर मारे आवेशात भाषण देखील ठोकतात. हे लोक कधीही मागील वर्षी लावलेल्या झाडांची वाढ कशी झालेली आहे हे पाहण्यासाठी जात नाहीत. किंबहुना त्यांना पक्की खात्री असते की मागील वर्षी लावलेले झाड जगलेले नसणारच. असे जे लोक आहेत यांना आपण संधीसाधु पर्यावरण प्रेमी म्हणुयात.

चार – या विषयाकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करणारे आणि डोळेझाक करुन आपल्या ग्रहगोलास सातत्याने इजा पोहोचवणारे संख्येने कमी जरी असले तरी ते त्यांचे काम खुप नेटाने, प्रामाणिकपणे आणि मनापासुन करीत आहेत. हे लोक नक्की कोण असतात बरे? तुमच्या आजुबाजुला शोधा सापडतील. ते कधी लॅंड माफीया बनुन येतात आणि डोंगरच्या डोंगर भुईसपाट करतात, का तर शहरातील यांच्या ग्राहकांना जमीन पसंत पडली पाहिजे . कधी हे दारुची फॅक्ट्रीवाले बनुन येतात आणि जलस्रोत प्रदुषित करतात. कधी बिल्डर बनुन येतात आणि जैविक अधिवास, निसर्ग , स्थानिक झाडं झुडपं नष्ट करुन सिमेंटची जंगलं उभारतात. कर्णकर्क्कश आवाजात डीजे लावुन कधी येतात तर कधी शिल्लक राहिलेल्या प्राण्यांच्या तोकड्या अधिवासात जाऊन त्यांची शिकार करतात. कधी झाडा-झुडपांची तर कधी प्राण्यांची, प्राण्यांच्या शिंगाम्ची, चमड्याची तस्करी करतात. पण यांच कन्विक्शन जबरदस्त असतं, काहीही कराव लागलं तरी चालेल, प्रसंगी कायदा मोडावा लागला, चोरी करावी लागली , अगदी मुडदे पाडावे लागले तरी चालेल पण हे लोक त्यांच्या ध्येयापासुन सहसा हटत नाहीत. पर्यावरणाला ओरबाडण्यावरच यांच्या सुखाच्या, समृध्दीच्या कल्पना अवलंबुन असतात. पर्यावरण प्रेमीला एकवेळ पर्यावरणाचा विसर पडेल पण प्रकारच्या लोकांना पर्यावरणाचा, निसर्गचक्राचा , प्राण्यांच्या स्थलांतरांचा, झाडांना फुलोरा येण्याचा, फळधारणा होण्याचा, निष्पर्ण होण्याचा, गवती मैदान वाळुन जाण्याचा कधीच विसर पडत नाही, कारण त्यांना नेमक माहित असतं की कधी कुठे काय कराव म्हणजे आपला स्वार्थ , आपला कार्यभाग साधेल. पर्यावरणाविषयी यांना देखील खुप माहिती असते, पर्यावरण हे लोक कोळुन प्यायलेले असतात. यांना आपण स्वार्थी पर्यावरण प्रेमी म्हणुयात.

पाच – या विषयातील आपणास सर्वच्या सर्व कळते, समजते अस मनापासुन मानणारा एक वर्ग आहे. तुम्ही कधी यांना भेटलात तर हे तुम्हाला त्यांच्याकडील ज्ञानाने अक्षरशः उजळुन टाकतील. त्यांचे ज्ञान पाहुन तुमचे डोळे दिपुन जातील. प्रत्येक समस्येच्या मुळाशी जाण्याची यांची वृत्ती असते. समस्येचे मुळ कारण काय आहे ते शोधुन काढण्यात हे निष्णात असतात. ज्याप्रमाणे कारणे शोधतात तसेच यांच्याकडे प्रत्येक समस्येवर तितके प्रभावी आणि कारगर असे उत्तर देखील असतेच. यांच्या नावाने एखाद दोन शोध निबंध अथवा थोरली पुस्तके देखील छापलेली असतात, ते लेखक देखील असतात. यांचेच एखाद दोन व्हिडीयो पाहुन पहिल्या प्रकारातील काळजीवाहु पर्यावरण प्रेमी तयार झालेले असतात तर ज्यांनी थोड अधिक वाचलं असेल ते अर्ध्याहळकुंडाने पिवळे झालेले कृतीशील पर्यावरण प्रेमी तयार होतात. म्हणजेच काय पर्यावरण प्रेमी तयार करण्याची क्षमता यांच्या साहित्यामध्ये, लिखाणात , बोलण्यात असते.हे लोक तुम्हाला सहसा एखाद्या पर्यावरण परिषदे मध्ये भेटतील किंवा एखाद्या दुरचित्रवाणीवाहिनी वरील एखाद्या मुलाखतीमध्ये भेटतील. यांच्या नावापुढे कदाचित डॉ अशी पदवी देखील तुम्हाला दिसु शकेल. यांना आपण या लेखामध्ये काही नामाभिधान देण्याची गरज नाही. हे पर्यावरण तज्ञ म्हणुन सर्वत्र परिचयाचे असतात. यांनी लिखाण आणि भाषणे याशिवाय काय केलेलं असत हे मात्र कुणालाही कधीही समजत नाही. संख्येने तस पाहिलं तर खुपच कमी असतात हे लोक, पण यांचा प्रभाव सामान्य जनांवर खुपच जास्त होत असतो व तो दिर्घकाळ टिकतो देखील. सरकार आणि प्रशासनास सल्ले देण्याचे काम देखील हे लोकं करीत असतात.

सहा – पर्यावरण तज्ञांच्या सल्ल्यानुसार धोरणं राबवणे, ती धोरणे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे, क्रमांक एक व दोन प्रकारातील लोकांना प्रोत्साहन देणे, तसेच क्रमांत चार मधील लोकांना रोखणे अशी कामे ज्यांनी करणं अपेक्षित आहे असा हा वर्ग म्हणजे प्रशासकीय सरकारी अधिकारी, सरकारी अमंलदार, सरकारी नोकरदार, जनतेने कर रुपाने दिलेल्या पैश्यातुन गलेलठ्ठ पगार घेणारे शिक्षक….. दुर्दैवाने यांना ‘ढोंगी पर्यावरण प्रेमी’ असा शब्द वापरावा म्हंटल तरी ते अयोग्य आहे कारण पर्यावरण प्रेमाचे ढोंग देखील या लोकांना करता येत नाही. पर्यावरण वाचले पाहिजे, स्थानिक जैवविविधता, वनस्पतीवैविध्य रक्षिली गेली पाहिजे, तिचे संवर्धन झाले पाहिजे, असे यांना अजिबात म्हणजे अजिबात वाटत नाही. ज्या आत्मविश्वासाने (कनविक्शन) क्रमांक चार मधील लोकं पर्यावरणाचे अपराध करतात तितकं कनविक्शन जर या प्रशासकीय यंत्रणेने दाखवले तर अनेक समस्या पटापट सुटतील. पण आपलं दुर्दैव असे की यांचा मतलब असतो तो केवळ लाचखोरीद्वारे मलई मेवा खाण्याशी. पर्यावरणाशी यांचे काहीही देणेघेणे नसते. पर्यावरणाचा सर्वात मोठा अपराध कोण करीत असेल तर ते पांढरपेशी लोक अस त्याच उत्तर आहे.  माझ्या माहितीतील केवळ दोन शिक्षक वरील वर्णनास अपवाद आहेत. आणि माझ्या माहितीत असलेल्या, कधीतरी मी भेटलो आहे अश्या सरकारी अधिकारी, कर्मचारी लोकांची संख्या कित्येक हजारांत आहे.

सात – ज्यांना ख-या अर्थाने पर्यावरण हा विषय समजला आहे, असे लोकं पर्यावरण रक्षणासाठी म्हणुन खास काही करु जात नाहीतच. पर्यावरण रक्षण हा वेगळा विषय त्यांच्यासाठी नसतोच. त्यांच जीवनयापनच ते अश्यापध्दतीने बदलतात की त्यांच्या जगण्यातील कोणत्याही कृतीने, कर्माने पर्यावरणास, निसर्गास, प्राणीमात्रांस, किटकिटकांस कसलाही बाधा येत नाही किंवा कमीत कमी बाधा येईल याकडे त्यांचा कटाक्ष असतो. एक अमुक तमुक काम केलं म्हणजे पर्यावरणासाठी काम केलं असा तोकडा , अर्ध्या हळकुंडाचा विचार त्यांचा नसतो. ते जीवन जगत जातात निसर्गाच्या नादात, निसर्गाच्या कुशीत, निसर्गाला अनुसरुण आणि कधीतरी कुठेतरी पृथ्वीवरील एखादा छोटासा भाग, एखादा छोटासा तुकडा ते सदाहरीत करुन टाकतात. एखाद्या तुकड्यावर इकोसिस्टम म्हणजे जैवपरिसंस्था नांदु लागते ती अश्या माणसांमुळे. पर्यावरण रक्षणाच्या यांच्या कल्पनेत डोळ्यांना न दिसणा-या सुक्ष्म जिवाणुंना देखील स्थान असते तर अशी परिसंस्था पुनश्च स्थापित करण्यापुरतीच ती काय मनुष्याची आवश्यकता असते , एकदा का तो भग्न झालेला भुभाग आपल्या प्रयत्नांने पुनः जैविक दृष्ट्या श्रीमंत झाला तर मनुष्याने त्याच इकोसिस्टमचाच भाग होऊन, इकोसिस्टम मधील इतर घटकांसोबत परस्परावलंबित्व भाव अवलंबुन जीवन जगत रहावे, आणि हळुवार कृतज्ञतेने याच मातीत राख होऊन मिसळुन जावे. या लोकांना प्रसिध्दीचे आकर्षण नसते, यांना डॉक्टरेट अथवा डि. लिट. कुठल्याही विद्यापीठातुन मिळवण्याची इच्छा नसते त्यांच जीवन स्वच्छंदीपणे निसर्गाच्या कुशीत बागडणा-या एखाद्या पक्ष्यासारखेच उन्मुक्त असते. दुर्दैवाने अश्या लोकांची संख्या खुप म्हणजे खुपच कमी आहे. लोकसंख्येच्या मानाने नगण्य आहे. आणि एवढं करुनही वर त्यांचा मी अमुक तमुक केलं असा कसलाही आविर्भाव नसतो. अशी माणस देवदुर्लभ असतात. या प्रकारच्या माणसांची संख्या वाढवण्यावर भर दिला गेला पाहिजे. अशा माणसांची उदाहरणे समाजात घालुन दिली पाहिजेत. संपत्ती श्रीमंती पैसा अडका या द्वारे माणसाच्या मोठेपणाचे मुल्यमापन न होता ते त्याच्या साधेपणातुन झाले पाहिजे, कुणी किती झाडे जगविली याद्वारे झाले पाहिजे, कुणी किती सुक्ष्म जीव वाचवले, जगवले, जोपासले याद्वारे झाली पाहिजे.  

आठ – आता आणखी एक वर्ग शिल्लक राह्तो तो म्हणजे पर्यावरण शब्द कानावर पडल्यावर त्यांच्या मनात कसलाच विचार येत नाही असा. आपल्याकडे ९९ टक्के लोकं या प्रकारात मोडतात. यांच्याकडुन पर्यावरणास हानी होत नाही असे नाही, किंवा यांच्यामुळेच खुप हानी होते असेही नाही. अनावधानाने यांच्याकडुन छोट्या प्रमाणात पर्यावरणाची हानी होत असते. उदा – प्लास्टिक च्या पिशव्यांमध्ये कचरा भरुन, जाता जाता गावाबाहेर, रस्त्याच्या कडेला, आपणास कुणी पाहत तर नाही ना याची खात्री करुन फेकुन देणारे हे लोक असतात. आपण केलेल्या या छोट्याश्या चुकीचे परिणाम किती भयंकर होतात याची त्यांना अजिबात कल्पना नसते. त्यांना वाटत की त्यांनी कचरा फेकला आणि कच-यापासुन त्यांची सुटक झाली, पण प्रत्यक्षात हे लोकं एका नवीन गंभीर समस्येला जन्म देत असतात हे त्यांच्या गावी देखील नसते. असेच नदीपात्रात निर्माल्य टाकुन पुण्य कमाविता कमाविता तेच निर्माल्य प्लास्टिक सोबत नदीत फेकणारे नकळत पापाचे धनी होतात हे त्यांचे त्यांनाही समजत नाही. या लोकांनी अशी एकेक छोटी छोटी चुक जरी सुधारली तरी खुप मोठे काम होईल.

या लोकांना हा विषय शिकविण्यास अपयशी ठरला तो म्हणजे आजचा शिक्षक. आजची शिक्षणव्यवस्था. विचार करा ९९% लोकांना पर्यावरण शिकविण्यास आपण अपयशी ठरलो आहोत ही खुपच लाजिरवाणी गोष्ट आहे.

आपण सुशिक्षित झालो खरे पण सुसंस्स्कृत मात्र होऊ शकलो नाही. अडाणी असलेले आपले पुर्वज मात्र झाडा-झुडपांची , नागसापांची, प्राणीमात्रांची पुजा करायचे, देवराया जपायचे. धरतीमातेला पदस्पर्श करण्यापुर्वी तिची क्षमा मागायचे, झाडावरील फळे काढताना झाडाला काही फळे तशीच ठेवायचे हे सगळे करता करता आपले सगळे पुर्वज नकळत का होईना पर्यावरणाच्या काळजी घेणा-या क्रमांक सातच्या प्रकारचे जीवन जगत होते. आणि पुर्वीच्या काळी ९९% लोकं असे जीवन जगायचे.

आज जागतिक पर्यावरण दिवस आहे. या निमित्ताने आपण सर्वांनी थोडं थांबाव, मागे वळुन पहाव, थोडसं पुढे पहावं , विचार करावा आणि समजुन घ्यावं की आपण वरील पैकी कोणत्या प्रकारचे पर्यावरण प्रेमी आहोत हे समजुन, येणा-या प्रत्येक दिवसागणिक अजुन प्रगत पर्यावरण प्रेमी व्हावे.

निसर्गशाळा परिवारातर्फे सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Facebook Comments

Share this if you like it..

Categories:

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हुप्प्या – The Symphony of Emotions
A Team outing with a difference @ Nisargshala
Blog posts & Event Alerts

Recent Articles
 • In Astronomy, STar gazing
  निसर्गशाळा येथे दहा इंच व्यासाचा मुख्य आरसा असलेली दुर्बीण आहे. यातुन आपण गुरुचे उपग्रह पाहु शकतो, गुरु ग्रहावरील वादळ पाहु शकतो, अनेक दुरस्थ तारे, तारकापुंज पाहु शकतो, चंद्र तर इतका सुंदर आणि स्पष्ट दिसतो की त्यावरील खड्डे नसुन महाकाय विवरं आहेत, दया आहेत, त्यांना खोल असे कडे आहेत. एकदा आपल्याकडे एक खगोल निरीक्षक त्यांची १६ इंच व्यासाची दुर्बीण घेऊन आले होते , त्यातुन त्यांनी मला चंद्रावरील अश्याच एका विवराचा कडा दाखवला. हा कडा पाहताना मला हरिश्चंद्र गडावरील कोकणकडा आठवला. लौकरच आपण म्हणजे निसर्गशाळा बारा इंच व्यास असलेली अजुन प्रगत अशी दुर्बीण घेणार आहोत. […]
 • In Environment
  महाराष्ट्राची वीस जुलै ची सकाळ देखील अशीच एक तीव्र वेदनादायी बातमी घेऊन उजाडली. एक अख्खं गाव, चाळीसेक घरांचे एक गाव, दोनेकशे लोकांची वस्ती असलेले एक गाव, आपापल्या घरात रात्रीच्या झो[एत असलेले एक गाव अचानक एका डोंगराखाली दडपले गेले. माळीण पेक्षा या घटनेची तीव्रता जरी कमी असली तरी भौगोलिक दृष्ट्या दोन्ही घटना सारख्याच आहेत. पुर्वी तळीये, रायगडवाडी या दुर्घटना देखील वेदनादायी होत्या. दरड कोसळणे या क्रियापदाने या घटनांची तीव्रता लक्षात येणार नाही. डोंगर कोसळणे असा शब्द प्रयोग आता आपणास करावा लागेल. या घटनांमध्ये अजुन एक साम्य आहे ते म्हणजे डोंगर कोसळताना मातीचे प्रचंड मोठे ढिगारे उताराच्या दिशेने खाली घसरले व शतकांच वारसा असलेल्या वाड्या वस्त्या उध्वस्त झाल्या. मनुष्यहानी झाली. अनेक कुटूंबांचे आधार संपले, जीवाभावाची नाती संपली. […]
 • In Environment
  म्हणजेच काय तर आपला भारत आणी भारतातील प्रत्येक पर्वत (हिमालय अपवाद) तितकाच जुना आहे जितके पृथ्वीचे वय आहे. येथील मातीचा कण न कण असा का झाला याचे कारण या मातीने इतक्या करोडो वर्षाम्च्या अनुभवातुन हे शिकले आहे की या सुर्यमंडलात, या अवकाशात तग धरायची असेल तर त्यासाठी कसे स्वतःमध्ये बदल केले पाहिजेत. […]
 • In Environment
  पर्यावरण हा शब्द आपल्या कानी पडला की काही जण थोडं थबकतात, काही जणांच्या भुवया थोड्या उंचवतात, काही जणांचे कान अजुन जास्त सतर्क होतात तर काही जणांना काहीही समजतच नाही काय ऐकलं ते म्हणजे नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे असे काही जणांच्या बाबतीत घडत असते. […]
 • In Music, Tourism
  मग सुरु झाली संगीत रजनी. गायत्री सप्रे-ढवळे आणि कुमार करंदीकर यांनी रसिक श्रोत्यांना एका वेगळ्याच विश्वात , स्वर्गीय सुखाची रेलचेल असणा-या चंद्रमाधवीच्या प्रदेशात नेण्याचा जणु चंगच बांधला होता जणु. हा प्रवास, चंद्रमाधवीच्या प्रदेशाकडे जाण्याचा हा प्रवास संगीत सुरांचाच नुसता नव्हता बर का ! […]