पावसाळी रानफुलांच्या निमित्ताने…

तुम्ही जर कधी पावसाळ्यात गडकिल्ले भटकंती केली असेल, अथवा ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये तुम्ही कधी सह्याद्रीच्या घाट रस्त्याने गेला असाल तर कदाचित तुम्हाला सह्याद्रीच्या पावसाळ्यातील पुष्पोत्सवाची पुसटशी कल्पना आहे असे म्हणावे लागेल. मी पुसटशी म्हणतोय ते एवढ्यासाठी की एका वर्षाविहारात अथवा एकदा घाटरस्त्याने गाडी चालवत जाऊन सह्याद्रीच्या पुष्प भांडाराची खरोखर केवळ पुसटशीच कल्पना येऊ शकते. याचे कारण असे आहे सह्याद्रीचे हे पुष्पभांडार असीम आहे. हे पुष्पभांडार इतके समृध्द आहे की काही वनस्पती, रानफुले अगदी केवळ काही तासांसाठीच फुलतात तर काहींचे आयुर्मान काही दिवसांचे असते. त्यामुळे नेमके आपण निसर्गात जातो तेव्हा त्या त्या वनस्पती बहरलेल्याच असतील याची शाश्वती नसतेच मुळी.

असो पण एकदा का होईना जर तुम्ही सह्याद्रीच्या फुलांचा बहर पाहिला असेल तर तुम्हाला स्वर्गसुखाचा अनुभव आला असेल यात मुळीच शंका नाही. पण मित्र-मैत्रिणींनो सह्याद्रीवरील या फुलांचा बहर काय केवळ सौंदर्याचा आस्वाद मानवाने घ्यावा म्हणुनच नसतो बर का! सह्याद्रीची आपली स्वतःची एक परिस्थीतीकी म्हणजे इकोसिस्टीम आहे. या योजने मध्ये निसर्गातील प्रत्येक घटक आपापले कार्य अगदी न चुकता जसे करणे गरजेचे आहे तसे करीत असतो. कधी काळी मनुष्य देखील याच योजनेचा एक भाग होता. निसर्गचक्रामध्ये ढवळाढवळ मनुष्य करीत नसे. निसर्गातुन जेवढे गरजेचे आहे तेवढेच काय तो घ्यायचा. व ते घेताना देखील निसर्गाचे शोषण होणार नाही याची काळजी घेतली जायची. ही काळजी कशी घ्यावी याचे ज्ञान एका पिढी कडुन पुढच्या पिढी कडे देण्याची अलिखित अशी योजना होती, योजना असली तरीही ती अगदी सहज होती.

केना नावाची एक गवतवर्गीय वनस्पती सह्याद्रीत या दिवसांत फुलली आहे. हे फुल खुपच सुंदर दिसते. काही दिवसांपुर्वी मी असाच एका डोंगरावर भटकंती करीत असताना गाई-गुरे चरताना पाहिली.  चरताना गाय जे खात होती ते काही निवडुन घेत नव्हती. एका घासात जे काही गवत जीभेत धरता येईल तेवढे ती घेत होती. तिच्या प्रत्येक घासात गवतासोबतच सोनकी, जांभळी चिरायत व केना हे देखील ती खात होती. या केना वनस्पतीच्या पानांची भाजी पुर्वापार मावळातील लोक करीत आले आहेत. केना अतिसारावर उपयोगी आहे. याची भाजी खाल्ली तर घशाचे दुखणे, खवखवणे कमी होते. डोळ्यांचे व त्वचेचे विकार कमी होण्यास या भाजीच उपयोग होतो. काविळीवर उतारा म्हणुन देखील याच्या पानांचा रस वापरला जायचा. भाजलेल्या ठिकाणी याच्या पाने ठेचुन लावल्यास जखम लवकर भरुन येते. मुळे पोताच्या आरोग्यावर लाभदायक आहेत. साप चावल्यास देखील याच्या पानांचा रस पाजला जायचा कारण हे उत्तम रेचक आहे.  याच्या फुलांपासुन पुर्वी रंग देखील बनविला जायचा. तर मित्रांनो एवढी औषधी वनस्पती आपले पुर्वज भाजी करुन तर खायचेच पण गाईने खाल्ल्यामुळे तिच्या दुधातुन देखील या वनस्पतीच्य औषधी गुणधर्मांचा उपयोग मनुष्यास व्हायचा. गाई-गुरे अशा कितीतरी रानफुलांच्या वन्स्पतीं खातात. पुर्वी माणसाला गाई-गुरे सांभाळण्यात पैसा महत्वाचा नसायचा म्हणुन घरी दुध-दुभते व त्यासोबतत निरामय आरोग्य देखील असायचे. पण आता सर्वकाही पैशात मोजण्याचा संस्कार नव्या शिक्षण पध्दतीने केल्याने पैशाच्या परिभाषेतच नफा-तोटा यांचा विचार करुन गाई-गुरे सांभाळणारे व त्यांना रानावनांत चरायला घेऊन जाणारे अगदी नावालाच शिल्लक राहिले आहेत.

सह्याद्री मध्ये येणारा हा रानफुलांचा बहर निसर्गाच्या महान योजनेचा भाग आहे. आपण कधीकाळी या योजनेचा भाग होतो. पण आता आपण केवळ दर्शक राहिलो आहोत.

जेव्हापासुन मनुष्य या योजनेमधुन बाहेर पडला, त्रयस्थ झाला, केवळ दर्शकच झाला तेव्हापासुन मनुष्याकडून सह्याद्रीच्या या श्रीमंतीचे शोषण सुरु झाले आहे. हे शोषण अवैध उत्खणनातुन सुरु आहे. असे उत्खणन अनेक कारणांनी सुरु आहे. कुणीतरी जमिनीचे खरेदीविक्री करणारे व्यावसायिक, त्या त्या जमिनी अधिक सपाट दिसाव्यात म्हणुन सर्रास बुलडोझर फिरवुन सह्याद्रीच्या या रानफुलांच्या, गवतांच्य, झुडूपांच्या, वेलींच्या समुळ नायनाटास, समुळ उच्चाटनास कारणीभुत होतात. तर कुणी फार्म हाऊस बांधण्याच्या नादात डोंगरउतारांना सपाट करतात. असे केल्याने माती वाहुन तर जातेच पण तिथला निसर्ग देखील स्थलांतरीत होत असतो. स्थानिक जाती-प्रजातीच्या झाडा-झुडूपांना समुळ काढुन परदेशी अथवा त्या त्या भागाशी तादात्म्य नसलेली झाडे लावल्याने देखील निसर्गाचे अपरिमित नुकसान होत असते. सह्याद्रीच्या संरक्षणासाठी सम्वर्धनासाठी ज्याप्रमाणे वृक्षलागवडीची गरज आहे तसेच गवताच्या माळरानांची देखील आवश्यकता आहे. त्यामुळे सर्रास सगळीकडे झाडे लावलीच पाहिजे असे ही नाही. पर्यावरण संरक्षण, संवर्धन हा तस पाहता हल्ली खुप मोठा विषय झाला आहे. या विषयात लोक डॉक्टरेट मिळवितात. म्हणजेच काय तर पुर्वी जे ज्ञान एका पिढीकडुन दुस-या पिढीकडे सहज हस्तांतरीत व्हायचे ते आता विद्यापीठांतुनच मिळते व तेही सर्वांना नाही.  किती ना विरोधाभास हा. काय आपण खरोखरी प्रगती केली आहे की आपण आधुनिकतेच्या नावाखाली घरातील डॉक्टरेट चे ज्ञान व आचरण संपविले आहे. सर्वांनी यावर विचार करणे आवश्यक आहे.

हल्ली सह्याद्रीतील या रानफुलांच्या बहराचे, पुष्पोत्सवाचे खुपच जास्त कौतुक आहे. आणि का असु नये बरे? ज्या योजनेचा मनुष्य कधीकाळी एक घटक होता त्या योजनेचे आता आपण फक्त दर्शक बनुन राहिलो आहोत. शहरातील लोकांना याचे खुपच जास्त अप्रुप असते. तेवढे कौतुक गावाकडील लोकांना, मुलांना नसते. ग्रामस्थांना ओढ असते शहरी जीवनशैली जगण्याची. त्यांना कौतुक असते या फुलांचे फोटो काढण्यासाठी येणा-या पर्यटांकांच्या झगमग कपड्यांचे, आलिशान गाड्यांचे, गॉगल्सचे, कॅमे-यांचे. निसर्गाचा हा ठेवा ज्यांनी जपला पाहिजे ते निसर्गाच्या या महान भांडारापासुन मनाने व काहीसे शरीराने देखील कधीच दुर निघुन गेले आहेत. सह्याद्रीचे हे पुष्पवैभव प्रत्येक गावागावात, प्रत्येक वाडीवस्तीवर जरी मुबलक असले तरी त्याविषयी आत्ताच्या पिढ्या उदासिन आहेत. हे वास्तव आहे. खरतर सह्याद्रीच्या द-याखो-यात असणा-या शाळांमध्ये , गावातील वयस्कर लोकांकरवी निसर्गसंस्काराचे शिक्षण देणे सुरु केले पाहिजे. आणि करण्यासाठी कसल्याही आयोगाच्या शिफारशीची गरज नसावी. हा लेख वाचणा-यांस, लिहिणा-यास जर याचे महत्व पटले असेल तर स्थानिक पातळीवर आपण हा प्रपंच सुरु केला पाहिजे. सह्याद्रीतील प्रत्येक शाळा निसर्गशाळा झाली पाहिजे. जर कुणा शिक्षकांना, ग्रामस्थांना या संदर्भात काही मदत, माहिती, कार्यपध्दती हवी असेल तर आम्ही सदैव तत्पर आहोत.

कदाचित एवढे सगळे वाचता वाचता तुमच्या एव्हाना हे लक्षात आले असावे की अशा लेखांना, विचारांना प्रसारीत करायचे असेल तर ते शहरातील वाचकांपर्यंत जेवढे पोहोचतील त्यापेक्षा जास्त ग्रामीण भागातील वाचकांपर्यंत पोहोचविले पाहिजेत.

निसर्ग, पर्यावरण यांचे संरक्षण-संवर्धन ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आपापल्या परीने आपण ती पार पाडली पाहिजे.

सह्याद्रीच्या रा रानफुलांचे दर्शन पुनः एकदा घ्या फोटो सफरीतुन..

Facebook Comments

Share this if you like it..