मावळातील रानभाज्या – ओळख, गुणधर्म व पाककृती

रानभाज्या का खाल्या पाहिजेत?
शेती किंवा निगा न करता निसर्गत:च उगवलेल्या भाज्यांना रानभाज्या म्हणतात.या मुख्यत्वेकरून जंगलात (रानात), शेतांच्या बांधावर, माळरानात येतात. निसर्गात लागवड न करता या वनस्पती येताात. त्यामुळे या वनस्पतींमध्ये खनिजे महत्त्वाची मूलद्रव्य व अत्यंत उपयोगी रसायने असे घटक आढळतात . यांत अनेक औषधी गुणधर्मही असतात त्या आवर्जून खाल्या जातात. जंगला लगतचे लोक आजही त्यांचे पारंपरिक अन्न म्हणून जंगलातील वनस्पतींचाच वापर करतात. ऋतूनुसार त्यांना या भाज्या सहज उपलब्ध होत असून त्यांच्या जुन्या पिढीतील भाज्यांचे हे ज्ञान नव्या पिढीतही कायम असून या वनस्पती त्यांच्या दैनंदिन खाद्यान्नातील अविभाज्य घटक आहेत.
वेगवेगळ्या ऋतुंमध्ये वेगवेगळ्या भाज्या आपणास रानावनांत खावयास मिळतात. गोड, आंबट, तिखट अशा वेगवेगळ्या चवींच्या या भाज्या ओळखता मात्र आल्या पाहिजे. यातील अनेक वनस्पती औषधी आहेत. स्थानिक परंपरागत ज्ञानाप्रमाणे विविध वनस्पतींचा उपयोग विविध विकारांवर जखमांवर केला जातो. उदा कोळ्याचा मका नावाचा एक कंद पावसाळ्यात फुलतो. अगदी मक्यासारखाचा पण बहारदार दिसणा-या या मक्याचा कंद विंचवाचे विष उतरवण्यासाठी वापरतात.
कोळ्याची मका / सापकांदा

कोळ्याची मका – विंचु उतरवण्यासाठी याचा कंद वापरतात

काटे कळक बांबुच्या कोवळ्या कोंबांची भाजी

बांबु ही अतिशय महत्वाचे गवतवर्गीय वनस्पती आहे. बांबुच्या हजारो प्रजाती जगभरात आहेत. भारतात देखील शेकडो प्रजाती आहेत. आणि महाराष्ट्रात देखील पुष्कळ आहेत. बांबुच्या कोवळ्या कोंबांची भाजी करण्यासाठी सर्वप्रथम कोणत्या प्रजातीच्या कोवळ्या कोंबांची भाजी केली जाऊ शकते हे माहिती असणे खुप गरजेचे आहे. हे ज्ञान एक तर प्रयोगशाळा तपासणीतुन मिळेल अथवा पारंपारिक पिढ्यानपिढ्यांच्या ज्ञानाच्या झ-यातुन मिळेल. आपल्याकडे मिळणा-या सर्वच बांबुच्या कोंबांची भाजी होऊ शकत नाही कारण बहुतांश प्रजातींमध्ये सायनाईडचा अंश असतो. आज आम्ही सांगणार आहोत महाराष्ट्रात पुर्वी सर्वत्र असलेल्या व मागील काही दशकांत दुर्मिळ होत चाललेल्या काटे कळक या बांबुच्या कोंबाच्या भाजी विषयी. बांबुची ही प्रजाती ओळखण्यास अतिशय सोपी आहे. ज्या बांबुला काटे असतात ती बांबुची जात म्हणजे काटे कळक, आहे ना सोप्प?

तर या बांबुच्या कोवळ्या कोंबांची भाजी निसंशय बनविता येते व खाण्यास सुरक्षित तर आहेच सोबत आरोग्यासाठी अनेक फायदे देणारी देखील ही भाजी आहे.

शास्त्रीय नाव – Bambusa arundinacea (बाम्बुसा एरुन्डिनेशिया)

कूळ – pooceae (पोएसी)
स्थानिक नाव – कासेट, काष्ठी, कळक
संस्कृत नाव – वंश, शतपर्वा, तृणध्वज.
हिंदी नाव – बांस
गुजराती नाव – वान्स
इंग्रजी नाव – स्पाईनी थॉनी बाम्बू

बांबू ही वनस्पती गवत कुळातील असून, तिचे आयुष्य शंभर वर्षे आहे. बांबू ही वनस्पती तिच्या जीवनक्रमात शंभर वर्षानंतर एकदाच फुले-फळे देते व नंतर बांबू पूर्णपणे वाळून जातो.

 • ही वनस्पती भारत, श्रीलंका व म्यानमार देशात आढळते. भारतात गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळच्या जंगलात बांबू नैसर्गिकपणे वाढतो. काही ठिकाणी या वनस्पतीची लागवडही करतात. गवा व हत्ती हे वन्यप्राणी बांबूची पाने अगदी आवडीने खातात, हे त्यांचे मुख्य खाद्य आहे.
 • महाराष्ट्रात ही वनस्पती प्रामुख्याने, कोकण व पश्‍चिम घाट परिसरात तसेच खानदेश व विदर्भात सुध्दा आढळते.
 • विशेष म्हणजे या प्रजातीचा उपयोग केवळ भाजी अथवा बांबुचे फोक यासाठी मर्यादीत राहिलेला नसुन, योग्य पद्धतीने केलेली लागवड , जैविक कुंपण म्हणुन देखील वापरता येते. आम्ही निसर्गशाळा येथे काटे कळकाचे जैविक कुंपण तयार केले आहे.

बांबूचे इमारती व कागदनिर्मितीसाठी व्यापारी मूल्य आहे. सोबतच ही वनस्पती औषधी गुणधर्माचीही आहे.

 • बांबूचे मूळ, पाने, बिया, कोवळ्या खोडाचे कोंब व वंशलोचन औषधात वापरतात.
 • बांबू खोडांच्या पेऱ्यात तयार होणारे वंशलोचन थंड, पौष्टिक आणि कामोत्तेजक म्हणून वापरतात. हे कफ, क्षय आणि दम्यात अत्यंत उपयोगी आहे. हे उत्तेजक व ज्वरशामक म्हणूनही गुणकारी आहे. यामुळे कफरोगातील त्वचेचा दाह कमी होतो व कफातून रक्त पडत असल्यास ते बंद होते.
 • बांबूच्या मुळांचा रस भाववर्धक आहे. त्याची साल पुरळ बरे होण्यासाठी उपयुक्त आहे. बांबूचे बी रुक्षोष्ण असून स्थूलांसाठी आणि मधुमेहींच्या आहारात उपयुक्त आहे.
 • बिया कोमोत्तेजक व संसर्गरक्षक म्हणून उपयोगी आहेत.
 • बांबूच्या कोवळ्या कोंबाचा किंवा कोवळ्या पानांचा काढा गर्भाशयाचे संकोचन होण्यासाठी बाळंतपणात देतात. यामुळे विटाळ पडतो व विटाळ स्राव नियमित होतो.
 • गुरांना अतिसारात बांबूची पाने व काळी मिरी मिठाबरोबर देतात.
 • बांबूच्या कोंबापासून बनविलेले पोटिस, व्रणातील किडे काढण्यासाठी वापरतात.
 • कोवळ्या कोंबापासून तयार केलेले लोणचे व कढी अपचनात उपयुक्त आहे. यामुळे भूक व पचनशक्ती वाढते.
 • कोवळे कोंब कुटून सांधेसुजीत बांधतात.
 • कोवळी पाने दालचिनीबरोबर वाटून कफातून रक्त पडत असल्यास देतात.

बांबूच्या भाजीचे औषधी गुणधर्म

बांबूच्या कोवळ्या खोडांच्या कोंबाची भाजी करतात. अगदी मांसल, मऊ कोंब भाजीसाठी वापरतात. बाळंतपणात नाळ पडून गेल्यानंतर गर्भाशयाची पूर्ण शुद्धी होण्यासाठी ही भाजी बाळंतिणीला देतात. तसेच स्त्रियांचा विटाळ साफ होत नसल्यास ही भाजी गर्भोत्तेजक म्हणून द्यावी, यामुळे मासिक पाळी साफ होते.

 • बांबू ही खूपच तंतुमय वनस्पती आहे, शिवाय ती क्षारयुक्तही आहे, यामुळे या भाजीतील तंतू व क्षार शरीराला मिळतात.

आम्ही अगदी कालच काटे कळकाची भाजी बनविली. ही भाजी कशी बनवितात, कशी निवडतात, कशी साफ करतात य विषयी सर्वच माहिती तुम्हाला खालील व्हिडीयोत पहावयास व ऐकावयास मिळेल.


मुरटाची भाजी

जुलै महिन्यात पावसाचा जोर खुपच जास्त असतो आणि त्याच वेळी घनदाट वर्षारण्यामध्ये मुरटाची भाजी नावाची एक अप्रतिम भाजी मिळते. वरकरणी नेच्यासारख्या दिसणा-या या वनस्पतीच्या कोवळ्या शेंड्यांची भाजी केली जाते.  मी खाल्लेल्या रानभाज्यांमध्ये मला सर्वात जास्त आवडलेली रानभाजी हीच. दुर्दैवाने माझ्या कडे या भाजीचे फोटो आता नाहीयेत. जेव्हा कधी हे फोटो मिळतील तेव्हा नक्कीच एक सविस्तर लेख या भाजीवर लिहिन.

पाथरी / पथरीची भाजी

मावळातील रानभाज्या

हि भाजी सर्वत्र आढळते. नुसतीच मावळ भागात नाही तर विदर्भ मराठवाड्यात देखील ही भाजी विपुल प्रमाणात पावसाळ्यात उगवते. पतरी,  पात्र अशा विविध नावांनी हिला ओळखले जाते. किडनी , मूत्र संबंधित व्याधीसाठी उपयुक्त . तसेच पुरुषत्व , जोम वाढवते असा देखील समज स्थानिकामध्ये आहे.
सुदृढ व्यक्तींनी कच्ची खावी . अशक्त, रुग्ण व्यक्तींनी 3/4 पानांचा मिक्सरमध्ये अथवा वाट्यावर वाटुन रस करून सकाळी प्यावा. मुगडाळ टाकून कोरडी भाजी छान होते .पावसाळ्यात मोकळ्या जागेत, डोंगर उतारावर, निच-याच्या जागेमध्ये ही भाजी उगवते.

टिप…. अशाच आकाराची पाने असलेल्या वनस्पती कडवट & विषारी पण आहेत .  नेहमी खाणारे / ग्रामीण भागातील पारखी व्यक्तींकडून खातरजमा करून मगच खावी .


निसर्गशाळा विषयी जाणुन घेण्यासाठी इथे क्लिक करा 
निसर्गशाळा ही एक कॅम्पसाईट आहे पुणे शहराच्या पश्चिमेला वेल्हे तालुक्यात. हल्लीच्या काळात सु्टटीच्या दिवशी रीसॉर्ट्स मध्ये फिरण्यासाठी जाणे अगदी सामान्य गोष्ट झाली आहे. या मध्ये आपणास मुख्यत्वे करुन सुट्टीचा आनंद घ्यायचा असतो. पण या आनंदासोबतच निसर्गातील विविध घटकांशी अगदी जवळीक साधता आली तर? जर नियंत्रित प्रकारचे व प्रशिक्षित मार्गदर्शकांच्या देखरेखीखाली धाडसी खेळाची मजा देखील घेता आली तर? किमान नागरी सुविधा व कमाल नैसर्गिक वातावरण म्हणजेच निसर्गशाळा कॅम्पसाईट, पुणे. अधिक माहितीसाठी ९०४९००२०५३ या मोबाईल वर संपर्क साधा!

शेंडवेलाची (चाई) भाजी

खरतर या वेलीचे नाव शेंडवेल नाहीये. याला म्हणतात चाईचा वेल. पण पुण्याच्या पश्चिम भागात सर्रास शेंडवेल हेच नाव प्रचलित आहे. या वेलीच्या प्रत्येक घटकाची रुचकर भाजी बनविली जाते. लुसलुशीत कोवळे शेंडे की जे पावसाळ्याच्या सुरुवातीस येतात याची भाजी खुपच छान होते. मी स्वतः ही भाजी खाल्ली आहे. खाली फोटो पहा. वेलीच्या शेंड्यांव्यतिरिक्त याच्या फुलांची की ज्याला चाईचा मोहोर असे म्हणतात व कंदांची देखील भाजी केली जाते. पण फुले/मोहोर पावसाळा संपताना मिळतात.

भाजी कशी करणार

फोटो मध्ये दिसत आहे त्याप्रमाणे हे शेंडे तोडुन आणावेत. किड वगैरे असे प्रकार नसतातच मुळी. पण माती बगैरे लागली असेल तर भाजी धुवुन घ्यावी. नंतर बारीक चिरुन वाफलुन घेऊन अथवा हाटुन देखील भाजी करता येते.

चाईच्या मोहोराची भाजी


पावसाळा संपताना याच वेलांना वरील प्रमाणे मोहोर येतो. या मोहोराची म्हणजेच फुलाची भाजी देखील खुप रुचकर तसेच आरोग्यदायी असते. अगदीच जंगलात जाऊन देखील तुम्हाला हा मोहोर मिळविता आला नाही तरी मावळ पट्ट्यातुन गणपती नंतर दिवाळीच्या आसपास प्रवास करताना तुम्हाला रस्त्याच्या कडे असे मोहोर विकणारे  म्हणजेच चाईचा मोहोर विकणारे दिसतील. यांच्या कडुन आवर्जुन विकत घ्या व खालील पाककृतीप्रमाणे भाजी बनवुन खा.
साहित्य – चाईची फुले म्हणजेच मोहोर, कांदे, लसुण, हिरव्या मिरच्या,हळद, तिखट, मीठ, तेल, जिरे आणि मोहरी

भाजी कशी करणार

मोहोर पाण्यामध्ये धुवुन घ्या. मग त्यातील केवळ फुलेच अलगद काढुन घ्यावी. देठ घेऊ नयेत. मग वाफलुन घेऊन, थंड होऊ द्यावे. थंड झाल्यावर यातील पाणी पिळुन काढावे, थोडे चाळणी मद्ये ठेवुन नितळु द्यावे. मग नेहमी प्रमाणे (बाकी सर्व साहित्य वापरुन) फोडणी देऊन व्यवस्थित शिजुन द्यावी.


अंबाडी – लाल अंबाडी

महाराष्ट्रात सर्वत्र आढळणारी ही रानभाजी स्वादिष्ट आहे. गावोगाव शेताच्या बांधांवर देखील पुर्वी या भाजीचे तांडे दिसायचे. गेल्या काही दशकात विषारी रासायनिक खतांनी या भाजीचा बिमोड केल्यासारखे झाले आहे. घाटमाथ्यावर मात्र अजुन ही ही भाजी सापडते.

“विदर्भात अंबाडी ल लक्ष्मी चे प्रतीक मानतात. अंबा म्हणजे लक्ष्मी पूर्वी प्रतेक घरात थोडी तरी अंबाडी वाळवून साठवून ठेवण्याची पद्धत होती वर्षभर ती वापरत असत धार्मिक कार्यक्रमात नैवद्य त अंबाडीची भाजी आर्जून असायची .भंडाऱ्यात अंबाडी भाजी चने घुग्ऱ्या.घरी गायी,म्हशी अस्याच्या ,गाय व्याल्या नंतर जार पडन्या करिता चना डाळ आणि अंबाडी भाजी गायी स खावू घालत. अंबाडी चे पानाच्या भाकरी,भाजी पाणाची चटणी,बियांची चटणी, लाल बोंडी ची चटणी बियांचे तेल आणि शेवटी अंबाडीच्या झाडाचं ताग आणि त्याचे दोर ,दोऱ्या अंबाडी पासून करत असत. अंबाडीची हिरवे पान उकडून हिरव्या मिरच्या मिक्स करून वाटतात छान चटणी होते  “, धनंजय मिसाळ यांचेकडुन मिळालेली माहिती.
विदर्भात अंबाडीच्या भाजीच्या भाकरी पण करतात.हिरवा मिरचीच्या ठेच्यासोबत खूप छान लागतात.
भाजी पाण्यात शिजवून घ्यायची.ते पिठात मिसळायचे. खूप वर्षांपूर्वी दुष्काळात गरिबांना ज्वारी वगैरे धान्य मिळायचे नाही.त्यामुळे त्यात अंबाडीची शिजवलेली भाजी मिसळून कमीत कमी पिठात जास्तीत जास्त भाकरी.असे करून पुरवायचे.कधी कधी नुसतीच अंबाडीची भाजी खाऊन वेळ काढायची.  तामिळनाडूमध्ये अंबाडीच्या पानांची चटणी आवर्जून आहारात असते. कशी करतात माहीत नाही.अंबाडी मेंदूसाठी फार चांगली.बुद्धिवर्धक आहे. अंबाडीच्या लाल बोंड्यांची चटणी,सरबत, जेली तर फारच उत्तम.पण लाल बोंड्यांची अंबाडी वेगळी असते.त्याची पाने वापरताना मी बघितले नाही. – डॉ अरुण मानकर यांजकडुन मिळालेली माहिती.

चिचारडी

चिचार्डे – रानभाजी

वेल्हे भागात, आमच्या कॅम्पसाईटवर सहज सापडणारी ही राज-फळ भाजी , ग्रामीण लोकांच्या मते मधुमेहाच्या इलाजासाठी वापरली जाते. मी स्वःत एक दोनदा चिचार्डीचीच्या फळांची भाजी खाल्ली आहे. कच्चे फळा देखील खाल्ले तरी चालते. याची चव थोडी कडवट असते पण चांगले वाफलुन घेऊन लपथपीत किंवा नुसती फ्राय भाजी केली तरी स्वादिष्ट लागते. याची भाजी करायची आणखी एक पध्दत आहे. हिरवी मिरची व लसूण घालून ठेचुन घेऊन तव्यावर परतून तव्यावर परतुन घ्यायची. ठेचा देखील केला जातो.

करटुले / फांगळा

रानभाजी करटुली / काटवेल / कंटोले

कर्टुली ही ,रानभाजी आहे.कारल्याच्या जातकुळीमधली आहे पण कङू नसते .यालाच रानकारलीसुध्दा म्हणतात. मंङईमधे सहज उपलब्ध नसते.पावसाळी मोसमातच येते. शक्यतो नैसर्गिक स्वरूपातच चांगली लागते,कमीत कमी मसाले वापरुन याची भाजी करावी.

साहीत्य :-

 कर्टुली, भाजलेल्या दाण्याचे कूट, फोङणीसाठी तेल,मोहरी,हीग,हळद,  मीठ,मिरची पावङर, काळा मसाला(ऐच्छीक), ओले खोबरे , कोथंबिर

कृति:-

सर्वात आधि कर्टुली स्वच्छ, भरपूर पाण्यात धुवून नंतर गोल किंवा चौकोनी फोडी करून चिरून घ्यावीत. चिरलेली भाजी तेलाची फोङणी करून त्यावर टाकून थोङी परतून घ्यावी व पाण्याचा हबका मारून अथवा ताटलीवर पाणी ठेवून वाफवावी.वाफून मऊ झाल्यावर त्यात मीठ, तिखट, मसाला घालावे व नीट हलवून परत एक हलकी वाफ आणावी .

तयार भाजी एका बाऊल मधे काढून वरून खोबरे कोथबिर घालावे.

टिप:-

कर्टुली भरपूर पाण्यात नीट धुवावीत.त्याच्या काट्यामधे माती रहाण्याची शक्यता असते.व भाजी खाताना तोङामधे खर  लागते.चिरल्यावर फक्त जून व कङक बियाच काढाव्यात . सर्वच काढू नयेत.

फांजी/फाश्या

सरता आषाढ आणि श्रावणात फुलणारी ही वेलवर्गीय वनस्पती “फांजी” या नांवाने ओळखली जाते. याचे काहीतरी औषधी गुणधर्म असलेच पाहिजेत, त्याशिवाय काय ग्रामीण भागात आवर्जून या वेळी याची भाजी करून खातात? याचे औषधी गुणधर्म काय आहेत हे कळू शकले नाही.

भाजी कशी करणार –

१५-२० पाने बारीक चिरुन घ्यावीत . त्यामध्ये बाजरीचे पिठ थोडे गव्हाचे पिठ थोडे तांदुळ पिठ व चवीनुसार मिठ मसाला कांदा बारिक चिरुन त्याचे लंब गोल गोळे करुन आळुच्या वडिसारखे वाफवुन घ्यावेत . नंतर तेलामध्ये फ्राय करुन खान्यास घ्यावेत . शरिरातील गर्मि कंट्रोल करन्यास मदत होते . पोट साफ राहते .
मी स्वतः या सीझन मध्य दोन ते तीन वेळा खाल्ली आहे . छान लागते .

गरजफळ/मटारु

मटारु म्ह्णजेच हवेतील बटाटे, यास गरजफळ असेही म्हणतात

वेल्हे परीसरात मला याचे कंद नदीकाठावर , नदी पात्रामध्ये अनेकदा आढळले. स्थानिक लोकांना याविषयी फारसे माहित नव्हते. नंतर कधीतरी इंटरनेट वर याविषयी वाचनात आले. याची भाजी अजुन खाल्ली नाही मी. पण कोकणात सर्रास याची भाजी खाल्ली जाते. कोकणात याला करांदा/कारिंदा म्हणतात. भाजून खातात बटाट्यासारखा. पण काही वेळा कडू असतो. आधी थोडा तुकडा चावून बघा.

भारंगी

भारंगीची झुडपे डोंगरउतारावर, खुरट्या जंगलात नदीनाल्यांच्या काठावर, शेतात सर्वत्र आढळतात. पावसाळ्याच्या अखेरीस भारंगीस फुले, फळे येतात. मुळांच्या सकर्सपासून व बियांपासून भारंगीची लागवड करता येते. या पावसाळ्यात (२०२१) मी स्वतः पानांची भाजी करुन खाल्ली.

भारंगीचे मूळ ज्वर किंवा कफ असलेल्या रोगात देतात. कफ जास्त वाढल्याने होणारा दमा, खोकला या विकारांत भारंगमूळ प्रामुख्याने वापरतात. सर्दी व घशातील शोष यावर भारंगमूळ सुंठ अथवा वेखंडाबरोबर देतात.
– दम्यावर भारंगमूळ ज्येष्ठमध, बेहडा व अडुळसाची पाने यांचा काढा करून देतात.
भारंगीच्या पानांची भाजी दमा होऊ नये म्हणून आजही कोकणात वापरतात. याच्या कोवळ्या पानांची भाजी चवीला रुचकर असते. सर्दी, खोकला, ताप, छाती भरणे या विकारांत या भाजीचा उपयोग होतो.
– पोट साफ होण्यासाठीही ही भाजी उपयुक्त ठरते. कारण ती पाचक आहे.
– पोटात कृमी झाल्यास पाने शिजवून, त्यातील पाणी गाळून प्यावे. पोट जड असणे, तोंडाची चव गुळचट असणे, तोंडात चिकटा जाणवणे, सकाळी उठल्यावर डोळ्यांभोवती किंचित सूज जाणवणे, अनुत्साह, हवेच्या बदलाने सर्दी होणे, कफ घट्ट होणे, अशा वेळी भारंगीच्या पानांची भाजी हिंग व लसणाची फोडणी देऊन बाजरीच्या भाकरीबरोबर खावी.
– भारंगीच्या फुलांचीही भाजी करतात.

भारंगीच्या पानांची भाजी –

भारंगीची कोवळी पाने (देठ काढून टाकावेत.) अर्धी वाटी चिरलेला कांदा, 5-6 लसूण पाकळ्या ठेचून घ्याव्यात. मीठ, तिखट, गूळ, तेल, हिंग, मोहरी, हळद इ. कृती – जास्त तेलावर कांदा-लसूण परतून घ्यावे, त्यावर चिरलेली भारंगीची पाने घालावीत. झाकण ठेवून वाफ काढावी. पाण्याचा थोडा हबका मारावा. तिखट, मीठ, हळद, थोडा गूळ व हिंग घालून शिजवून उतरवावे. भारंगीची भाजी कडू असल्याने शिजवून पाणी काढून करतात.

भारंगीच्या फुलांची भाजी –

साहित्य – दोन वाट्या भारंगीची फुले, एक वाटी चिरलेला कांदा, मूगडाळ, तिखट, मीठ, गूळ, तेल, मोहरी, हळद, हिंग इ.
कृती – फुले चिरून घ्यावीत व 2-3 वेळा पाण्यातून पिळून घ्यावीत. यामुळे कडवटपणा निघून जातो. तेलाच्या फोडणीत कांदा परतावा. त्यात मूगडाळ नुसती धुऊन घालावी. मग चिरलेली फुले घालावीत, परतावे. मग तिखट घालावे. मंद गॅसवर परतावी. प्रथम फुलांमुळे भाजी जास्त वाढते. नंतर शिजून कमी होते. पूर्ण शिजल्यानंतर मीठ घालावे. नंतर गूळ घालून परतून उतरावे. गुळाऐवजी साखर वापरू शकता. बेसन पेरूनही भाजी छान लागते. भाजलेले डाळीचे कूट, तीळ भाजून पूड, खसखस, किसलेले खोबरे घालूनही भाजी चवदार बनविता येते.

चिवळी

घोळ, चिवळ रानभाजी

रानावनात, शेतात, बांधांवर अगदी मुबलक प्रमाणात आढळणारी ही आणखी एक लज्जतदार भाजी आहे. चिवळी , रानघोळ किंवा खाटेचौनाळ अशा वेगवेगळ्या नावांनी ही भाजी ओळखली जाते विविध प्रदेशांमध्ये.

ही भाजी कर्करोग प्रतिबंधक आहे असे काही संशोधनातुन समोर आले आहे. मुळव्याधावर देखील या भाजीचा चांगला उपयोग होतो.

लज्जतदार भाजी कशी करणार?

१) चिवळीची भाजी नीट निवडून घ्या. अगदी पानं पानं घ्यायची गरज नाही. पण त्याची मूळं काढून टाका आणि फक्त कोवळे देठ ठेवा.

२) नंतर ही भाजी स्वच्छ धुवून घ्या. धुतल्यावर जराशी कोरडी करून बारीक चिरून घ्या.

३) कढईत तेलाची फोडणी करा. त्यात हिंग घाला. त्यावर कांदा घालून मध्यम आचेवर कांदा चांगला मऊ होईपर्यंत शिजू द्या.

४) कांदा शिजत आला की लसूण-मिरचीचं वाटण घाला. ते परता.

५) खमंग वास आल्यावर हळद आणि मूगडाळ घाला आणि त्यावर भाजी घाला. नीट हलवून घ्या.

६) त्यात तिखट आणि मीठ घाला. परत हलवून घ्या आणि झाकण ठेवून भाजी शिजवा. मूगडाळ हलकी शिजवा फार गाळ करू नका.

ही भाजी गरमागरम ज्वारीची भाकरी, एखादी खमंग चटणी, कच्चा कांदा आणि ताक असं बरोबर घेऊन खा. उत्तम लागते.

अनमोल बहुगुणी केना

तुमच्या शेतात, बांधावर, बागेत, ट्रेकला गेले असता गडांवर, डोंगरावर, दरीखो-यात अगदी कुठेही पावसाळ्यात सहज व आपोआप उगवणारी ही वनस्पती म्हणजे एक दुर्लक्ष झालेला सह्याद्रीचा एक अनमोल असा ठेवा आहे.
शास्त्रीय नाव – Commelina Benghalensis असे आहे तर महाराष्ट्रात सर्वत्र केना याच नावाने ओळखली जाते. फोटो पाहुन तुम्ही ही सहज ओळखु शकता. तुमच्या भागात जर या वनस्पतीला अन्य कोणत्या नावाने ओळखत असतील तर अवश्य सांगा कमेंट मध्ये.

छायाचित्र – हेमंत ववले, स्थळ – निसर्गशाळा परिसर, वेल्हे

पावसाळ्यात अगदी ऑक्टोबर अखेर पर्यंत भरपूर मिळते.ही वनस्पती जमिनीवर पसरते.जिथे डोळे आहेत तिथून मूळे फुटतात. याची फुले लक्ष वेधुन घेतात.
ही वनस्पती मे अखेरीस दिसायला लागते.आपण ही वनस्पती नक्की पाहिली असणार.परंतु हीच ती हे सर्वना माहीत असेल असे नाही.ऑक्टोबरअखेर पर्यंत दिसते,नंतर हळू हळू दिसेनाशी होते. पाणी घातले तर कशी बशी नाइलाजाने जगते.पुन्हा पुढील पावसाळ्यात तिचे आगमन होते.

कोवळी पाने व खोड याची भाजी केली जाते. ही पाने इतर भाजीच्या पानांमध्ये मिक्स करून भाजी केली जाते. जेव्हा तुम्हाला भाजी अगर भजी करायची असतील तेव्हा भाजी खुडून घ्या.त्यामुळे झाडाला भरपुर फूट येते. हिच्या पानांची भजी करतात. भजी फार रुचकर लागतात.टंब फुगतात.तेल राहात नाही.बेसन पीठ फार कमी लागते. दुष्काळी भागात ही वनस्पती खाद्य म्हणून वापरली जाते.

ही वनस्पती म्हणजे जीवनसत्त्वे व खनिजे यांचा खजिना आहे. हिचे सेवन केल्यामुळे तुम्ही निरोगी राहता. सर्व आजार तुमच्यापासून लांब पळून जातात. जनावरांना चारा म्हणून पण हिचा वापर केला जातो.त्यामुळे जनावरे दूध जास्त देतात.केना

या वनस्पतीचे औषधी उपयोग खालील प्रमाणे आहेत

 • पानांचा रस अतिसारावर उपयोगी आहे.
 • या भाजीच्या सेवनामुळे घसा खवखवणे, दुखणे कमी होते.
 • डोळ्याचे व त्वचेचे विकार कमी होण्यास मदत होते.
 • हिची भाजी खाण्याने किंवा रस पिण्याने काविळीची तीव्रता कमी होते
 • ही वनस्पती उत्तम रेचक म्हणून उपयोगी पडते.
 • त्वचेची जळजळ कमी होते
 • भाजलेल्या ठिकाणी पेस्ट करून लावल्यास जखम भरून येण्यास मदत होते.
 • पाय दुखत असतील तर पानांचे पोटीस करून बांधावे.
 • मुळाचा रस सेवन केल्यास पोटविकार कमी होतात.
 • सर्पदंशावर या वनस्पती चा रस लावल्यास त्रास कमी होतो.
 • कावीळ,ताप, डोके दुखणे यावर उपयोग होतो.फुलांचा रस डोळ्याच्या विकारावर वापरला जातो
 • फुलापासून पुर्वी देखील रंग बनवला जायचा.

या व्यतिरिक्त अन्य देखील असंख्य भाज्या रानावनात आहेत, आपले वनवासी बांधव आजही या भाज्यांचा उपयोग करतात. इथुन पुढे जमेल तसे जमेल तेव्हा नवीन माहिती मिळाल्यास इथे शेयर करीत राहील.

टाकळा

टाकळा ही एक बहुगुणी वनस्पती आहे. हिला बहुगुणी म्हणण्याचे कारण असे की या वनस्पतीचे सर्व भाग उपयोगी आहेत.ही वनस्पती आयुर्वेदिक औषधे करण्यासाठी वापरली जाते.

टाकळा रानभाजी

वनस्पतीचे नाव :- टाकळा
Cassia tora हे तिचे शास्त्रीय नाव. ही एक पावसाळ्यात मिळणारी रानभाजी आहे. हिला तखाटा या नावाने देखील ओळखले जाते. १९ व्या शतकात रानभाज्या खाण्याचे प्रमाण खूप होते.या भाज्या नैसर्गिकरित्या खूप उगवलेल्या असायच्या.लोक आवडीने खात असत. वाढते शहरीकरण व जंगलाचा ह्रास यामुळे या भाज्या दुर्मिळ होत चालल्या आहेत.याचं संवर्धन होण्याची गरज आहे.हा आपला अमुल्य ठेवा आहे. नवीन पिढीला या रानभाज्याची फारशी माहिती नाही.माहीती करून घ्यायला हरकत नाही.
टाकळा ही वनस्पती प्रामुख्याने पावसाळ्यात उगवते. ही भाजी पडीक किंवा ओसाड जमीन, शेतात, बागांमध्ये, जंगलात, रस्त्याच्या कडेने कुठेही वाढते. ही भाजी साधारण एक ते दोन फुटांपर्यंत उंच वाढते. याला पिवळसर रंगांची फुलं येतात. पान द्विलिंगी असून रात्रीच्या वेळी ती मिटतात. ही पानं लांबट-गोल किंवा अंडाकृती असतात. काळसर किंवा करडया रंगाच्या शेंगा असून त्यांचं टोक आडवे कापल्यासारखं असते.मात्र आवरण कठीण असते. या वनस्पतीचा वास उग्र असतो.

उपयोग
 • Leaves are reported to have antirheumatic properties.
 • Decoction of leaves is used as an excellent laxative.
 • Seed Powder is used in Ayurvedic Medicines
 • याच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते.फक्त पानांचीच नाही तर शेंगाचीही भाजी करतात.
 • भाजी पचायला हलकी, उष्ण,तिखट व तुरट असते.
 • सर्व प्रकारच्या त्वचारोगांमध्ये ही वनस्पती अतिशय उपयुक्त आहे.
 • भाजी किंवा बियांचा लेप वाटून तो त्वचाविकारावर लावावा.उपयोग होऊ शकतो.
 • पाने आणि बियांमध्ये कायझोजेनिक आम्ल असून ते त्वचाविकारावर अतिशय गुणकारी आहे.
 • त्वचा जड झाल्यास ही वनस्पती खाल्ल्याने विशेष उपयोग होतो.
 • याशिवाय इसब, ॲलर्जी, सोरायसिस, खरूज यासारखे त्वचाविकारही कमी होतात.
 • लिंबाच्या रसात मुळे उगाळून ती गजकर्णासाठी वापरतात.
 • पानांचे भाजीच्या रूपात सेवन केल्याने पोटातील कृमी नष्ट होतात असे म्हणतात.
 • दात येणा-या लहान मुलांना ताप येतो. अशा वेळी टाकळ्याच्या पानांचा काढा त्यांना दिल्याने तापावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
 • पित्त, हृदयविकार, श्वास, खोकला आदी विकारांवर पानाचा रस मधातून द्यावा. आराम पडतो.
 • टाकळ्याची भाजी ही मुळात उष्ण असल्यामुळे शरीरातील वात आणि कफदोष कमी होण्यास मदत होते.
 • या भाजीचे वरचेवर सेवन केल्याने शरीरात अतिरिक्त मेद कमी होण्यास मदत होते.
 • पचायला हलकी, तुरट आणि मलसारक आहे.
 • पावसाळ्यात शरीराला सुटणारी खाजही कमी होते.
  तेव्हा या बहुगुणी रानभाजीचा शोध घ्या.तुम्ही जिथे राहता त्या भागात नक्की मिळेल.

टाकळ्या विषयीची माहिती व फोटो श्री. वसंत पाटील यांचेकडुन मिळाले. त्यांचे शतशः आभार! त्यांचा मोबाईल क्रं. – 9371629799

भाजी कशी बनवावी

भाजी-जून जुलैमध्ये एकदोन वेळेस आवश्य खावी.“मेथीच्या भाजीसारखीच टाकळ्याची भाजी करतात किंवा आपल्या आवडीनुसार भाजी बनवू शकता.टाकळा हि औषधी तनभाजी असल्याने त्यात साधे मसाले(हिरवी मिरची तेल,मीठ) घालून भाजी बनवावी.”, जिजाबाई भांगरे.

वाघाटी

त्वचाविकार, कफ, वात, पित्त, भगंदर, लघवी अडकणे, इ . अनेक विकारांपासून मुक्तीसाठी वाघाटी बहुमोल उपयुक्त आहे

शास्त्रीय नाव – Capparis zeylanica (कॅपेसिस झिलेनिका)
कुळ – Cappariaceae (कॅपेरिसी)

वाघाटी रानभाजी

वाघाटी रानभाजी

वाघाटी रानभाजी

वाघाटी या वनस्पतीला ‘गोविंद फळ’ ‘वाघोटी’ अशीही स्थानिक नावे आहेत. इंग्रजीत वाघाटीला ‘थॉर्नीकॅपर ब्रश’ असे म्हणतात. वाघाटीच्या मोठ्या झाळकट काटेरी वेली असतात. कोरड्या व दमट हवामानात जंगलात, डोंगर उतारावर, शेताच्या कुंपणावर वाघाटीच्या वेली सर्वत्र आढळतात.
खोड व फांद्या – गोलाकार, फांद्या अनेक, पसरणाऱ्या पांढऱ्या दाट लोमानी युक्त.
पाने – काटेरी, साधी, एकाआड एक, लांबट-गोल ३.५ ते ६.० सें.मी. २ ते ३.७ सें.मी. रुंद टोकदार, वरून तकतकीत खालील बाजू फिकट, लोमयुक्त. पानांवरील लोम दाट, पिवळसर -पांढरे. जोड उपपर्ण काटेरी. काटे टोकदार, वाकडे, चपटे, कठीण, जोडीने असतात. काटे वाघाच्या नखांसारखे असल्यानेच या वनस्पतीला ‘वाघाटी़’, ‘व्याघ्रनखी’ अशी नावे पडली आहेत. पानाचे देठ १ ते १.२ सें.मी. लांब लोमयुक्त.
फुले – पांढरी, शोभिवंत, द्विलिंगी, नियमित, पानांच्या बगलेत एकांडी किंवा जोडीने येतात. फुले ३.७ ते ५.० सें.मी. व्यासाची. फुलाचा देठ २.५ ते ५.० सें.मी. लांब लोमयुक्त. पुष्पकोष चार दलांचा, साधारण अनियमित, लोमयुक्त. पाकळ्या ४, मोकळ्या, वरून केसाळ. पुंकेसर असंख्य, मोकळे, पाकळ्यांपेक्षा लांब, हिरवट -पांढरे; पण लवकरच जांभळे होणारे. बिजांडकोष एक कप्पी. बिजांडकोषाचा देठ पुंकेसरांपेक्षा किंचित लांब.

फळे लांबट-गोल, लिंबाच्या आकाराची, तांबूस, गरयुक्त असतात.
बिया – अनेक, पावट्याएवढ्या, गरात लगडलेल्या. वाघाटीला फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात फुले येतात. वाघाटीच्या कोवळ्या फळांची भाजी करतात. वाघाटीचे मूळ, फळ व फळाचा गर औषधात वापरतात.
वरील वर्णन:- वैद्य कैलास उगले, पंढरपूर
वाघाटीचे गुणधर्म

 • वाघाटी उष्ण उत्तेजक, श्‍लेष्मघ्न, मूत्रजनन, शोथघ्न आणि कफघ्न आहे.
 • वाघाटी पित्तशामक व वातहारक आहे.
 • सुतिका ज्वरात वाघाटीचा काढा देतात.
 • उष्णतेमुळे अंगावर गळवे उठतात त्यावर वाघाटीचे मूळ पाण्यात उगाळून लेप करतात.
 • नाडीव्रण व भगंदरात वाघाटीच्या तेलात वात भिजवून घालतात. त्यामुळे व्रण रुजून येतो.
 • वाघाटीचे मूळ पाण्यात उगाळून समभाग तिळाच्या तेलात उकडतात व त्यापासून वाघाटीचे तेल बनवितात.
 • वाघाटी क्षयरोगावर अप्रतिम औषध आहे. मुलांच्या लाल स्रावावर वाघाटीचे मूळ उगाळून पाजतात.
 • वाघाटीचे फळ कफ, वायू व त्रिदोष यांचा नाश करते.
 • गजकर्ण,इसबगोल, सोरायसिसमुळे हातापायाला पडलेल्या भेगा यावर वाघाटीच्या पानांचा चुरून लेप 7 दिवस लावल्यास गुणकारी ठरतो.

वरील औषधी उपयोग श्री दयानंद स्वामी, PSI, पेनूर यांचेकडून उपलब्ध झाले आहेत.

वाघाटीची भाजी

महाराष्ट्रात आषाढी एकादशीला वाघाटीच्या कोवळ्या फळांची भाजी करण्याची प्रथा आहे. धातू पुष्ट होण्यास ही भाजी उपयोगी पडते. थायरॉईड ग्रंथीच्या कार्यात बिघाड झाल्याने उत्पन्न होणाऱ्या लक्षणात वाघाटी भाजीच्या सेवनाने फायदा होतो.

पाककृती

साहित्य – वाघाटीची कोवळी फळे, कांदा, जिरे, लसूण, हिंग, हळद, तेल इ.
कृती – फळे स्वच्छ धुऊन घ्यावीत. बिया काढून टाकाव्यात. फळे बारीक चिरून घ्यावीत. पाण्यात शिजवावीत. गार झाल्यानंतर चिरलेली भाजी पिळून घ्यावी. कढईत तेल घालून नंतर त्यात कांदा, लसूण घालून ते चांगले परतून घ्यावे. त्यामध्ये पिळून घेतलेली भाजी घालून जिरे, हिंग व हळद घालून भाजी चांगली वाफवावी.

पाककृती :- डॉ प्रशांत भोसले, बारामती
संदर्भ :- रानभाजी लेखक :- राधेश बादले पाटील, लोहदंडतीर्थ पंढरपूर


फोडशी / कोलु

सह्याद्रीचा डोंगर न डोंगर पावसाळ्यात हिरवा होऊन जातो. कधी कधी तर दगड धोंडे, खडक, कातळांवर देखील गवतचे तुरे डोलु लागतात. हि हिरवाई नुसते सौदर्यातच भर पाडते असे नाही. या हिरव्या हिरव्या मखमलीमध्ये अनेक अशा वनस्पती, तृण आहे की जे माणसाच्या सेवनासाठी उत्तम आहे. तुम्हाला कधी डोंगर द-यांमध्ये फोडशी दिसली जरे असेल तरीही असे वाटले नसेल की या गवताच्या पातीची छान भाजी देखील बनवता येते. पाऊसकाळ सुरु झाला की लगेच हे तृण जमिनीतुन वर डोकावते. दोनच आठवड्यांत यास सुंदर पांढरी फुले देखील येतात. फुले आलेल्या पात्यांची भाजी करीत नाही. केवळ कोवळी पातीच वापरतात. देशी, दुर्मिळ वनस्पती अभ्यासक श्री वसंत काळे यांनी फोटोच्या माध्यमातुन फोडशी / कोलु ची भाजी करायची पध्दती सांगितली आहे ती तशीच्या तशी तशी मी येथे देतो. यास सफेद मुसळी असे देखील म्हणतात.


कुरडू भाजी

पाऊस पडायला सुरुवात झाली की लगे्चच रानोमाळ उगवणारी ही रानभाजी, अनेकांना माहीतच नसते. तन म्हणुन यास शेतातुन काढुन फेकले जाते. या वनस्पतीला जेव्हा फुले येतात तेव्हा ती सर्वांचे लक्ष वेधुन घेते. फुलाचा तुरा अगदी कोंबड्याच्या तु-यासारखाच दिसतो. यामुळेच की काय या वनस्पतीस काही ठिकाणी कोंबड-कुरडू असेही म्हंटले जाते. मागील वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला मी एका वनस्पतीच्या पानांचा फोटो काढुन मित्र श्री धनंजय मिसाळ यांना पाठवला व विचारले की कसली वनस्पती आहे. तेव्हा वनस्पती अगदी छोटी होती. पण पाने बहारदार व रसरशीत दिसत होती. मिसाळ सरांनी पानांच्या फोटोवरुन मला याचे नाव सांगितले. सोबत असेही सांगितले की त्यांच्या भागात या वनस्पतीस शिवमोढा असे म्हणतात. मा त्यांनी मला फुलाच्या तु-याचा फोटो पाठवला. मग मात्र ही भाजी कायमचीच लक्षात राहिली. ही अगदी सामान्यपणे सर्वत्र आढळणारी रानभाजी आहे. खालील फोटो पहा म्हणजे तुम्हाला लागलीच समजेल नक्की काय आहे ते..

वनस्पतीच्या कोवळ्या पानांचे फोटो पहा म्हणजे या दिवसांत तुम्हाला ती ओळखता येईल.

कुरडू रानभाजी

कुरडू रानभाजी

भाजी कशी बनविणार

लागणारा वेळ: २० मिनिटे

लागणारे जिन्नस:  ३-४ जुड्या कुरडूची पाने खुडून, धुवून (तिन ते चार पाण्यात धुवावीत), २ कांदे बारीक चिरुन, ४-५ लसुण पाकळ्या ठेचून , २-३ मिरच्या चिरुन , पाव चमचा हिंग , अर्धा चमचा हळद , १ टोमॅटो बारीक चिरुन , पाव वाटी ओल खोबर करडवुन,  चवी पुरते मीठ,  अर्धा चमचा साखर , २ चमचे तेल

क्रमवार पाककृती: भांड्यात तेल गरम करुन लसूण, मिरची फोडणीला टाकावी मग हिंग, हळद, कांदा घालून जरा परतवावे. आता लगेच टोमॅटो आणि कुरडूची चिरलेली भाजी टाकावी. मग झाकण ठेउन जरा शिजू द्यावे. थोड्या वेळाने ढवळून त्यात मिठ, साखर घालावी. परत ढवळून ३-४ मिनीटांनी ओल खोबर घालाव व गॅस बंद करावा


आंबोती/अंबुशी

आंबोशी / आंबुती

(आमच्या परसबागेत काढलेला हा फोटो आहे.)
शास्त्रीय नाव – Oxalis corniculata (ऑक्झॅलिस कॉर्निक्युलेटा)
कूळ – Oxalidaceae ऑक्झॅलिडीएसी
आंबुशी या वनस्पतीला ‘आंबुटी’, ‘आंबोती’, ‘चांगेरी’ अशीही स्थानिक नावे आहेत. आंबुशीला इंग्रजीमध्ये इंडियन सॉरेल असे म्हणतात. हे प्रामुख्याने बोरात ओलसर जागी, तसेच कुंड्यांतून वाढणारे तण आहे. हे तण महाराष्ट्रात सर्वत्र आढळते. ही वर्षायू वनस्पती जमिनीवर पसरत वाढते.
खोड – नाजूक गोलाकार पसरत वाढणारे, लोमश. खोडाच्या पेरांपासून तंतुमय मुळे तयार होतात.
पाने – संयुक्त, एकाआड एक, त्रिपर्णी. पर्णिका तीन, त्रिकोणी आकाराच्या, १.२ ते २.५ सें.मी. लांब उलटे हस्ताकृती. तळ शंक्वाकृती, कडा केशयुक्त.
फुले – पिवळी, नियमित, द्विलिंगी, पानाच्या बगलेतून येतात. पुष्पमंजिरी अक्ष ७ ते ८ सें.मी. लांब. अक्षापासून २ ते ५ फुले टोकांवर येतात. पुष्पकोश पाच संयुक्त दलांचा, बाहेरील बाजूस केसाळ. पाकळ्या ५, टोकांकडे गोलाकार, आयताकृती. पुंकेसर १०, यापैकी ५ मोठे, ५ लहान. बीजांडकोश ५ कप्पी.
फळे – बोंडवर्गीय, लांबट-गोलाकार, रेषाकृती, पंचकोनी, लोमश, चंचुयुक्त. बिया अनेक, अंडाकृती, आडवे पट्टे असलेल्या, करड्या-तपकिरी रंगाच्या.

भाजी कशी बनवावी?

कृती १

साहित्य – आंबुशीची पाने, कांदा, लसूण, गूळ, शेंगदाणा कूट, तिखट किंवा ओली मिरची, मीठ इ.
कृती – पाने स्वच्छ धुऊन चिरून घ्यावीत. तेलात कांदा परतून त्यामध्ये लसूण, ओली मिरची चिरून घालणे किंवा तिखट घालणे. थोडा गूळ, शेंगदाणा कूट घालून भाजी परतणे, आवश्‍यकतेप्रमाणे मीठ घालून भाजीला वाफ देणे.

कृती २

साहित्य – आंबुशीची पाने, तूरडाळ (किंवा मूग, मसूरडाळ), दाणेकूट, हिरव्या मिरच्यांची पेस्ट, तेल, डाळीचे पीठ, लसूण पाकळ्या, मोहरी, हिंग, हळद, गूळ इ.
कृती – तेलाच्या फोडणीत लसूण परतून घेणे. आंबुशीची भाजी व डाळ कुकरमध्ये शिजवून, घोटून त्यात डाळीचे पीठ लावावे. फोडणीत भाजी घालावी. वाटलेली मिरची पेस्ट, मीठ, दाणेकूट व गूळ घालून शिजवावी.

कृती ३

साहित्य – चिरलेली आंबुशीची पाने, डाळीचे पीठ, तेल, मोहरी, हिंग, हळद, गूळ, मीठ, तिखट, काळा मसाला, ठेचलेल्या लसूण पाकळ्या, तुकडे केलेल्या लाल मिरच्या इ.
कृती – तेलात फोडणी करून भाजी परतावी. मीठ, तिखट व काळा मसाला घालून दोन वाफा आणाव्यात, नंतर गूळ घालावा. नंतर डाळीचे पीठ घालून ढवळून पाण्याचे हबके देऊन, शिजवून दोन वाफा आणाव्यात. छोट्या कढईत तेलाच्या फोडणीत लसूण व लाल मिरच्या घालून, ही फोडणी भाजीवर ओतावी.


आपणास देखील रानभाज्यांविषयी अधिकची माहिती असेल तर अवश्य पाठवा माझ्या व्हॉटसॲप नंबर वर – 9049002053. विविध रानभाज्यांविषयी माहिती संकलित करुन ठेवल्यास या परंपरागत ज्ञानाचे जतन होईल.

आमच्या विविध लेखांविषयी अपडेट्स मिळविण्यासाठी 9049002053 या व्हॉट्सॲप नंबर वर “लेख नोंदणी” असा संदेश पाठवा

कळावे.

हेमंत सिताराम ववले
निसर्गशाळा, पुणे

Facebook Comments

Share this if you like it..

12 thoughts on “मावळातील रानभाज्या – ओळख, गुणधर्म व पाककृती

  1. अनिता जाधव

   धन्यवाद सर खूप छान माहिती दिलीत आपण.भाजी ओळखण्या पासून ते,ती कशी बनवावी अगदी इंत्यभूत माहिती मिळाली.आपल्या मातीतील अनमोल खजिना आहे.याचे जतन करून त्याचे संगोपन करून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सोपवतांना अभिमान वाटावा.असेच आहे हे सारं.

 1. Pingback: जरा जपुन, खेकडा आहे तो ! - निसर्गशाळा - Camping near Pune

 2. Dipali shinde

  Im a very big fond of raanbhajya.. i specially go hunting them.. this information has helped me to recognise few more vegies around me..thanks a lot

 3. मीना पराग मेहेंदळे

  खुपच सुंदर माहिती. माझ्या ग्रुपसाठी रानभाज्यांवर आधारित एका कार्यक्रमाची आखणी करताना तुमचं हा लेख

  वाचनात आला.

  कुतुहलाने तुमच्या साईट्चिही माहिती वाचली. कोरोंनाचा हा काल संपल्या भेट द्यायची खूप इछा आहे.

  धान्यवाद.

  1. Hemant Post author

   धन्यवाद! अवश्य या. माझा मोबाईल नं. संग्रही ठेवु शकता तुम्ही – ९०४९००२०५३

 4. ज्योती सुभाष पटेल

  खुपच सुंदर माहिती . आताच्या पिढीला ही माहिती फार उपयुक्त आहे . मला वाचनाता फार आनंद झाला . कारण आमच्या भागात हया भाज्यांना वेगळी नावे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *