…आकाशदर्शन नक्की कशासाठी?

निसर्गशाळा येथे आकाशदर्शन चे कार्यक्रम सुरु होताहेत. या मोसमातील पहिला कार्यक्रम आपण आयोजित केला आहे शनिवारी म्हणजे दिनांक १९ नोव्हे २०२२.
आपले आकाशदर्शन कार्यक्रम अनेकांना आवडतात. आणि हळुहळु आपण पाहतोय की तसा काहीसा दुर्लक्षित असलेला हा विषय किंवा समाजातील एका विशिष्ट वर्गासाठीच असणारा हा विषय आताशा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचतोय. तरीही इतक्या वर्षांच्या माझ्या अनुभवातुन मला दोन अगदी भिन्न टोक दिसली आहेत,  आणि समजत गेले की अनेकांना अद्याप हे ठाउकच नाही की आकाशदर्शन नक्की कशासाठी? 

शिल्पा इंगळे या प्रोफेशनल फोटोग्राफर ने निसर्गशाळा येथुन काढलेला आपल्या आकाशगंगेचा फोटो

पहिले म्हणजे समाजातील एक वर्ग आकाशदर्शन, तारे, तारांगण याविषयी अजुनही अनभिज्ञच आहे. असे काही असते असे त्यांच्या गावी अजिबातच नसते. अश्या लोकांसाठी सुर्य उगवल्यावर आणि घराच्या छताच्या बाहेर आल्यावर, जेवढा वेळ बाहेर आहे तेवढाच वेळ जो उन्हाचा चटका बसतो त्यामुळे सहज आकाशाकडे लक्ष जाते त्यावेळी दिसते तेवढेच काय ते आकाश किंवा जेव्हा ढग दाटुन येतात आणि दिवसाही अंधारल्यासारखे होते तेव्हाच काय यांना आकाश नावाची गोष्ट आहे याची जाणिव होत असावी, हो असावी असे म्हणण्याचे कारण असे की मनुष्य निर्मित जटील समाज रचनेच्या आणि आर्थिक नफा नुकसानीच्या पलीकडे यांची विचार करण्याची क्षमता अजिबातच नसते आणि असे असुनही त्यांच्यात ‘या’ पलीकडे विचार करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये यावी यासाठी जाणिवपुर्वक प्रयत्न कुठेही होताना दिसत नाहीत. हे आपल्या समाजव्यवस्थेचे आणि शिक्षणप्रणालीचे खुप मोठे अपयश आहे. पर्यटनाच्या नावाखाली सर्रास निसर्गाचा -हास सुरु आहे, यात -हास करणारे हवशे गवशे नवशे पर्यटक तर असतातच सोबतच रीसॉर्ट्सचे मालक शहरी पर्यटकांना आकर्षित करणयसाठी खुपच झगमगाट, जंगी पार्ट्या, कर्णकर्कश्श डिजे लावतात. अनेक रीसॉर्ट्स चालकांना निसर्गातील अगदी साधा इटीकेट म्हणजे प्लास्टीक / काचेचा कचरा पुन्हा शहरात न्यायचा असतो याचे भानच नसते. अर्थात हा खुपच मोठा विषय आहे. तुर्त विस्तार भयास्तव  लिखाणाला आकाशदर्शन पुरतेच मर्यादीत ठेवुयात. शहरातुन निसर्गात आलेल्या पर्यटकांना तोच तो लाईटच्या माळांचा झगमगाट दाखवणे, मोठमोठाले प्रकाशझोत दाखवणे यात खरतर रीसॉर्ट्स चालकांचा मुर्खपणाच दिसतो. निसर्गाने जे मुक्तहस्ताने दिले आहे, चक्क मोफत दिले आहे त्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांना प्रेरीत केले तर विनाखर्च खुप चांगला युएसपी ठरु शकेल त्यांच्या रीसॉर्ट्स साठी. पण या पैशाने श्रीमंत असलेल्या निर्बुध्द लोकांना ही साधी डील समजत नाही कितीदा जरी सांगितली तरी. जर खरच एखादा रीसॉर्ट्स चालक उत्सुक असेल त्यांच्या रीसॉर्ट् मध्ये असे काही करण्यासाठी तर आम्ही त्यांना निशुल्क मदत करु शकतो.

ही झाली पहिली बाजु की ज्यामध्ये आकाशदर्शन कशाशी खातात हे अद्याप माहितीदेखील नाही असे लोक आहेत.

उघड्या डोळ्यांना निसर्गशाळा येथुन दिसणारे ग्रहगोल

दुसरी बाजु अशी आहे की अतिउत्साही हौशी पालक वर्ग. निसर्गशाळेच्या आकाशदर्शन कार्यक्रमाची माहिती अशा पालकांना मिळाली तर आवडीने हे लोक चौकशी साठी फोन करतात. यांनी विचारलेल्या प्रश्नांमध्ये एक त्यांच्याद्रष्टीने अतिमहत्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे टेलोस्कोप आहे का तुमच्याकडे? मग त्यातुन शनी ग्रहाच्या रिंन्ग्स दिसतील ना? ज्युपिटर दिसेल ना? चंद्रावरील विवरे दिसतील ना? हे प्रश्न विचारण्यामागे हेतु असा असतो की आपल्या कुटूंबाला, विशेषतः मुलांना हे सर्व पाहता यावे. हेतु चांगला आहे निःसंशय. पण हे करीत असताना हे पालक मुलांच्या अपेक्षा इतक्या वाढवुन ठेवतात की ही मुले आकाशदर्शन कार्यक्रमाला न येता इस्त्रो अथवा नासाच्या एखाद्या मोहिमेवर चालली असावीत अशा रीतीने येतात. कित्येकदा येण्यापुर्वी ही मुले, मंडळी इंटर्नेट वर फोटो पाहुन येतात आणि मग आकाशदर्शन कार्यक्रमास आले की यांचा पुर्णपणे भ्रमनिरास होतो. कारण असे हे लोक फक्त टेलोस्कोप मधुन काहीतरी भव्य दिव्य पाहण्यासाठी आलेले असतात , त्यांच्या स्मरणात आधी पाहिलेले फोटो असतात आणि टेलिस्कोप मधुन पाहिलेले दुरस्थ पिंड आणि स्मरणातील फोटो यामध्ये सरस काय अशी तुलना होऊन मग पाहिलेले फोटोच भारी होते आणि आकाशदर्शनातील दॄश्ये मग त्यांना तितकीशी प्रभावित करीत नाहीत. यात दोष कुणाचाही नाहीये खरतर. पण आकाशदर्शनाचा मुळ हेतुच लक्षात न आल्याने असे प्रकार होतात. मग या मुलांना पुढे जाऊन आकाशदर्शन अथवा खगोल या विषयात रुची राहिली नाही किंवा निर्माणच झाली नाही तर त्यात नवल ते काय?
आकाशदर्शन नेमके कशासाठी करायचे हे या अतिउत्साही नव अभ्यासकांना देखील ठाउक नसते. काही जण मला प्रश्न विचारतात की तुमच्याकडे मोठ्या स्क्रीन वर ग्रह, तारे, तारकापुंज दाखवता का? मला खरतर उत्तर देऊच नये असे वाटते अशा प्रश्नांना पण शेवटी प्रश्न येतो हाताच्या आणि पोटाच्या गाठीचा म्हणुन नम्रपणे ‘नाही’ असे सांगतो व हे सांगितल्यावर पलीकडचा उत्साह एखादी दुखद बातमी मिळाल्यावर कमी व्हावा तसा एकदम कमी होतो. मला सांगा स्क्रीनवर पाहण्यासाठी घरे आहेत, शाळा आहेत, थियेटरं आहेत शहरात सगळ आहे, पण शहरात जे नाही, जे केवळ निसर्गातच आहे ते पाहण्यासाठी आपण निसर्गात गेल पाहिजे ना ? त्यांना स्क्रीन हवी असते, प्रोजेक्टर हवा असतो.. पण त्यांना फोनवर या विस्तीर्ण आकाशाची भलीमोठ्ठी स्क्रीन, काळा कभिन्न पडदा इथे आहे, आणि फक्त इथेच आहे हे समजावुन सांगण्याचा वेळ व त्यांनी ऐकण्याइतपतचा त्यांचा संयम दोन्हीही नसतात.

असे हे दोन्हीही अगदी दोन भिन्न टोकाचे लोक पहायला मिळतात. यांना हे माहितीच नसते की आकाशदर्शन नक्की कशासाठी करायचे?

खगोल छायाचित्रकारीचा छंद असलेला अमेया निसर्गशाळा येथे सप्तर्षीचा फोटो काढताना

माझ्या लहानपणी मी दिवसाउजेडी जसा रानावनात हिंडलो, बागडलो, तसाच चंद्रप्रकाशातील रात्री शेतात फासं लावण्यासाठीही गेलोय व चंद्राच्या प्रकाशात पाहिलेल्या त्या गव्हाच्या शेताचे चित्र अजुनही माझ्या मनःपटलावर इतके रेखीव व रंगीत आहे की मला त्या फाश्याच्या बारीक तारा अजुनही स्पष्ट दिसताहेत. तसेच काळ्याकुट्ट रात्री शेजारच्या गावच्या यात्रेला पायी जाताना , लाखो ता-यांच्या चादरीखाली संतोष भुमकर, देवीदास ववले आणि मी रस्त्याने चालत चालत गप्पा मारत जात आहोत हे चलचित्र मला स्पष्ट दिसते आहे. एकदा सपकाळ सरांसोबत मी अजीवलीच्या देवराई परीसरात होतो. रात्री एका कौलारु घराच्या, शेणाने सारवलेल्या अंगणात पथा-या टाकुन आम्ही पाठ टेकवुन आकाशाकडे पाहात होतो. सरांनी आकाशाकडे बोट करुन स्वाती दाखवली, चित्रा दाखवली आणि मग म्हणाले ती बघ तिकडे, दुर, क्षितिजाच्या अगदी जवळ ‘सारीका’…मी शोधण्याचा खुप प्रयत्न केला पण मला काही सारिका दिसली नाही तिथे. थोड्या वेळाने मला समजलं की सर दाखवतात ती तारका बाह्याकाशात नसुन माझ्या हृद्याकाशात कधी मंद तर कधी अतीतेजाने चमचमत होती. किशोरवय ते, सरांनी बरोबर हेरले होते. प्रसंग जशाच्या तसा आजही डोळ्यासमोर आहे. आणि त्यावेळी ख-याखु-या आकाशातील त्या स्वाती , चित्रा, रोहिणी आदी तारका देखील मनात कायमच्या घर करुन राहिल्या.

निसर्गशाळेचे टीम मेंबर रोहित पटवर्धन यांनी इथुन टिपलेला आकाशगंगेचा एप्रिल महिन्यातील फोटो

एकदा मी साल्हेर सालोटा असा ट्रेक करण्यासाठी गेलो होतो. साल्हेर गडाच्या पायथ्याला, एका शाळेच्या भव्य प्रांगणात आम्ही पहाटे साडेतीनच्या सुमारास पोहोचलो. दहा बारा तासांच्या प्रवासाने थकलो होतो. सकाळी गाव जागा होण्याआधी आवराआवर करुन गडचढाईला सुरुवात करायची होती. गाडीतुन पाय खाली ठेवला , आळस देण्यासाठी दोन्ही हात ताणले गेले आणि मान नकळत आकाशाकडे वळली तसे डोळ्यांसमोर वर भले मोठे तारांगण दिसले, आणि हे देखील वाटले क्षणभर की या तारांगणातील एकेक तारा हाताने धरुन खाली घ्यावा, त्याला खालुन वरुन, डावीकडुन उजवीकडुन फिरवुन फिरवुन न्याहाळावा, डोळे भरुन पहावा आणि पुन्हा अलगद होता तिथे ठेवुन द्यावा. इतकं ते आकाश आणि तारे जवळ होते. मी तेव्हा जे आकाश पाहिले तसे अजुनही पाहिलेले नाही पुन्हा. धावपळ होती , घाई होती म्हणुन पाचेक मिनिटं मी आकाश न्याहाळत राहिलो आणि मग झोपण्यासाठी पथारी टाकली हा विचार करुन की उद्या गडावरुन निवांत पाहीन. पण तो ‘उद्या’ काही आलाच नाही कारण ट्रेक खुपच थकवणारा होता, वीसेक किमीची चढाई उतराई बारा तासांत आम्ही केली होती आणि साल्हेर गडावर निवांत होताच आले नाही पण त्याच तारांगणाखाली , तारांगणाकडे पहात पहात गाढ झोपण्याचा भन्नाट अनुभव मात्र घेतल होता.

हिंदुतान टाईम्स या दैनिकाने निसर्गशाळेविषयी केलेल एक आर्टीकल

तर विषय असा आहे की आकाशदर्शन कशासाठी करायचं. अर्थात टेलीस्कोप वगैरे नको असे माझे म्हणने अजिबात नाही. शक्य असेल तर वापर केलाच पाहिजे. पण त्याही पेक्षा महत्वाचे आहे उघड्या डोळ्यांनी ता-यांनी गच्च भरलेल्या आकाशाला न्याहाळणं. असे केल्याने, वारंवार केल्यानं आपण या महान अशा, विस्तीर्ण अशा, आदी अंत नसलेल्या, सदैव गतिमान असणा-या, सदैव परिवर्तनशील असणा-या, तरीही सदैव वर्तमान असणा-या, लाखो करोडो तारे तारकांनी भरलेल्या अंतरीक्षाचा, महान विश्वाचा आपण एक अगदी छोटा, क्षुल्लक असा, अनुल्लेखणीय असा, काहीही महत्व नसलेला असा अगदी छोटा भाग म्हणजे केवळ एका धुळीच्या कणाइतकेही आपले अस्तित्व क्षुल्लक आहे असे आपणास समजते ते केवळ आकाशदर्शनामुळे. आपले क्षुल्लक असणे समजले तरीही आपणास आनंद होतो ही किमया आहे आकाशदर्शनाची. विश्वाच्या जटील कोड्याचे उत्तर शोधण्यासाठी बुध्दी मारे उड्या मारते, काय असेल, कसे असेल, कशी सुरुवात झाली असेल, कधी कसा कुठे शेवट होईल, शेवट होईल की नाही, काय होईल, असे होईल की तसे होईल..असे अनेक प्रश्न डोक्यात येऊ लागतात, त्यांची उत्तरे मिळवण्यासाठी धडपड केली जाते, विचारांचा अगदी हलकल्लोळ होतो, काहुर माजते डोक्यात..पण गम्मत याची इतकी न्यारी की हा हलकल्लोळ देखील आपणास अनामिक शांततेचा अनुभव देत असतो.
मग जन्माला येऊ शकतात कविता, लेख, संगीत, मनुष्यनिर्मित जगातील एखाद्या जटील समस्येचे समाधान, आणखीही बरेच काही. पण त्यासाठी आवश्यकता आहे काळोखाची आणि काळोखाच्या पडद्यावर चमचमणा-या लाखो करोडो तारे तारकांची, तारांगणाची, आवश्यकता आकाशदर्शनाची.

हेमंत ववले

निसर्गशाळा

निसर्गशाळा येथे असलेला १० इंची डोब्सोनियन, ट्र्स ट्युब टेलीस्कोप
Facebook Comments

Share this if you like it..