साहसाचे वेड की वेडे साहस?

आज आता इतक्या वर्षानंतर 1979 घटनेचे पुन:स्मरण होण्याचे कारणही तसेच आहे.

 काही दिवसापूर्वीच गोरख-मच्छिंद्र भ्रमंतीत एका अनुभवी गिरीभ्रमंती करणाऱ्या तरुणाचा झालेला दुर्दैवी अंत .

त्या निमित्ताने झालेल्या स्नेह्यांच्या चर्चेतून आनंदाने ( पाळंदे ) लिहिण्याविषयी सुचविले.

 यातून कोणी काही शिकावे, घ्यावे असा हेतू नाही, पण माझ्या तरुण मित्रांना सावध करावे असे मात्र मनापासून वाटल्याने हा लेखनप्रपंच.

1979 सालचा जानेवारी महिना.

काही महिन्यापूर्वी सिंहगडाचा तानाजी कडा सहकार्‍यांसोबत चढून आलो होतो. त्या काळी उपलब्ध असणारी मोजकीच का होईना,दोर कॅरेबिनर सारखी साधने हाती होती .तानाजी कड्याचा सुरुवातीचा भाग कातळ चढाईचा आणि नंतर मात्र घसारा– मातीचा, पण कमी कोनातील चढाईचा आहे.

एकमेकांच्या सहाय्याने केलेली ती चढाई सोप्या श्रेणीतील वाटली. त्या क्षणी एक किडा चावला,
“आपण एकट्याने कधी तरी हा कडा चढून यायचेच”
ठरविले आहे ते योग्य की अयोग्य, याची चिकित्सा करण्याचे भान असणारे तेव्हाचे वय नव्हते. काही काळानंतर घडलेल्या घटनांतून ते भान आले आणि आता इतक्या वर्षानंतर, 
तर ” आयुष्यातील तो एक मूर्खपणाच होता ” हे मी मान्यच केले आहे.

माझ्या नोकरीतील साप्ताहिक सुट्टी दिवशी म्हणजे, सोमवारी मी तानाजी कड्याच्या पायथ्याशी सकाळी लवकर दाखल झालो होतो. पावसाळा संपून काही महिने झाले होते. थंडीचे दिवसही अंतिम चरणात होते. हवेत सुखद गारवा होता. रात्री गडावर मुक्कामास असल्याने (तोच तो मेहता बंगल्याचा व्हरांडा–) झोप छान झाली होती. कड्याच्या पायथ्याशी लवकर येता आले होते. गडाची पश्चिमेकडील बाजू असल्याने कातळकडा लवकर तापत नाही, याचा फायदा घेत थंडगार कातळात बोटे रुतवत कडा चढायला सुरुवात केली. एकट्याने प्रस्तरारोहण करू नये, ते वेडे धाडस आपण करीत आहोत, याची किंचितशी अपराधी बोच मनावर दडपण आणत होती. खूप सावधपणाने कातळकडा चढून आलो. आता सुरु झाला होता, मातीच्या घसाऱ्याचा भाग. कातळकडा चढून आल्यानंतर किंचितसे उजवीकडे सरकत, त्या घसाऱ्यावर जाता येते. मग मात्र खडक,कातळ नाही. फक्त मातीचा घसारा .सुमारे पन्नास एक फुटाचा मातीचा घसारा. कमी कोनातील चढाईचा भाग पार करून तटबंदीला लागत, मग परत डावीकडे ,तटबंदी उजव्या हाताला ठेवीत वर सरकत एकेठिकाणी गडात प्रवेश करता येतो. तो पूर्ण मार्ग डोळ्यापुढे होता.

थरारक प्रसंग

मातीच्या घसाऱ्याला  लागलो. पण काही पावला नंतर लक्षात आले ,पाय ठेवला की मोकळी झालेली माती भसभसा खाली येतेय. पुन्हा पुन्हा प्रयत्न करूनही वर सरकता येत नव्हते. (अगदी याच कारणाने दोन वर्षांपूर्वी मी व आनंदाने मनसंतोष (आंबोली जवळचा ) गडाच्या चढाईचा केलेला अयशस्वी प्रयत्न आठवला.) दोन पावले वर तर चार पावले खाली, असा त्या मोकळ्या मातीतील चढाईचा प्रकार व्हायला लागला.

अडचणीत सापडलो आहोत, ही तीव्र जाणीव झाली.गडाचा हा कोपरा तसा निर्मनुष्य असल्याने, त्यातही सोमवारी आणखीनच कमी गर्दी,(गेले ते दिवस,त्या वेळी सिंहगडावर येणारी डोकी मोजता यायची,आता सिंहगडावर आहे की तुळशी बागेत आहे,हेच कळत नाही ) मदतीसाठी कितीही ओरडलो असतो तरी उपयोग होणार नाही, कडा परत उतरून खाली जाणे हे तर कोणत्याही साधनांशिवाय, मार्गदर्शकां शिवाय अधिकच धोक्‍याचे, आणि घसाऱ्यावरून वरुन खाली पडलो, तर किमान दोन-तीन दिवस तरी कोणाला माझा (म्हणजे मृत देहाचा) पत्ताही लागणार नाही याची खात्री, प्रेतागारातील गारठ्यासारखी सरसरून मेंदूत पोहोचली. काही क्षण तरी मेंदूला मुंग्या आल्या. एकाच वेळी अनेक शक्यता आणि प्रश्नांचे भाले वर आले.

श्री दिलिप निंबाळकर

श्री दिलिप निंबाळकर काकांची एकुणच भटकंती, डोंगरयात्रा पन्नाशीची आहे. पुण्यात ट्रेकिंगची सुरुवात करणा-या , सुरक्षित, जबाबदार ट्रेकिंग चा पाया घालुन देणा-या, अख्खा सह्याद्री , बहुधा सर्वच गडकिल्ले पायाखाली घालणा-या काही मोजक्याच भटक्यांमध्ये निंबाळकर काकांचा समावेश आहे. त्यांचाच हा लेख आपण वाचीत आहोत.

जीवघेण्या प्रसंगी नक्की काय केले पाहिजे?

यावेळी सुदैवाने म्हणा की काही वर्षापूर्वी प्रतापगडाच्या पायथ्याशी अशाच एका प्रसंगातून सुटका करून पार झाल्याचा अनुभव गाठीशी असल्याने, एक चांगली गोष्ट माझ्याकडून झाली. ती कशी आणि का झाली हे नक्की सांगता येत नाही. कदाचित अशा वेळी अदृश्‍य असणाऱ्या सहाव्या इंद्रियाची जागृती यास कारण झाली असावी किंवा अस्तित्व राखण्याच्या मूलभूत प्रेरणेने मी बचावात्मक कृती म्हणूनही असेल, मी कमालीचा शांत, स्थिर, स्तब्ध झालो.

 परिणामी परिस्थितीचे मी पूर्णतः आकलन करू शकलो. पहिल्यांदा काय करायचे नाही, याची ठाम जाणीव मेख ठोकल्या सारखी मनात रुतली.

विजय महाजन,हा माझा प्रस्तरारोहणातील गुरु आणि स्नेही. त्याच्याबरोबर सराव करीत असतानाचे त्याचे एक वाक्य मेंदूत कोरले गेले होते तो म्हणायचा, “any eager, hasty action on the rock, will take you to the death only

ते आठवले आणि मी कमालीचा सावध झालो. आता जे काही करायचे ते अत्यंत सावध पणाने पुरेपूर विचार करूनच प्रत्येक कृती प्रत्येक पाऊल टाकले गेले पाहिजे हे स्वतःला बजावले सुदैवाने माझ्या हाती भरपूर वेळ म्हणजे पूर्ण दिवस होता.

असे का होतय याचा मी विचार केला. पावसाळा संपून बरेच महिने झाले होते. सलग पावसाने माती दबलेली, थोडी घट्ट बसलेली असते.पावलांनी खाली घसरण्या इतकी त्यावेळी सुटी, मोकळी झालेली नसते. आता मात्र ऊन,वारा यांनी त्या तीव्र उतारावरील माती इतकी मोकळी झालेली होती की वाऱ्यानेही  ती उडत होती. यात भर पडत होती ती तीव्र उताराची. माती खाली घसरण्याचा वेग, सपाटीच्या तुलनेने उतारावर खूपच अधिक असतो. ते थांबवणे माझ्या हाती नाही, ही वस्तुस्थिती स्वीकारल्यानंतर आता मी काय करू शकतो, काय केले पाहिजे, तर यातून मार्ग काढता येईल हे प्रश्न मी मलाच शांतपणाने विचारले.( तेव्हाही आणि आता इतका काळ गेल्यानंतरही माझा ठाम विश्वास आहे, की त्या प्रसंगी केवळ शांत डोक्याने विचार केल्यानेच अपघात टळला होता.)

प्रशिक्षण कामी येतेच

आपण नेहमी वर चढत जात असताना बहुतेक वेळा दोन पावलातील अंतर ( उभ्या दिशेने आणि आडव्या दिशेने ही ) सारखेच असते.

 पण आता येथे तसे करून चालणार नाही, हे लक्षात आले. कारण आधीच्या पावलानी मोकळ्या झालेल्या मातीवर ,वरच्या पावलाची माती थांबणार तरी कशी ?त्यासाठी डाव्या– -उजव्या पायातील आडवे अंतरही वाढवावे लागेल. थोडी,शक्य असेल तर नागमोडी चाल ठेवावी लागेल, खालच्या पावलाच्या बरोबर वर, नंतरच्या पावलासाठी जागा करायची नाही, हे तंत्र वापरले तर माती इतक्या वेगाने खाली घसरणार नाही, असा अंदाज बांधून तसे करत गेलो.

 येथे मला नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ मौंटेनीरिंग मधील घोटविलेल्या तंत्राचा फायदा नक्कीच झाला .

 ही सारी प्रक्रिया वेळखाऊ होती पण सुरक्षित मात्र नक्कीच होती.          

         दोन-तीन पावला नंतर, करतो आहे ते बरोबर असल्याची खात्री झाली, आणि मग आत्मविश्वास बळावला. मग इतर कसलाही विचार न करता मित्र, काळ, वेळाचे गणित सारे विसरून हाताने  पावलांसाठी मातीचा खोलवर कप्पा करणे, त्यात पाऊल भक्कमपणाने स्थिरावल्यानंतर पुढचे पाऊल टाकणे, पुन्हा तेच,पुन्हा तेच असे करीत राहिलो. एव्हाना सूर्य माथ्यावर आला होता. घामाच्या धारा सुरु झाल्या. कमालीच्या व्यग्रतेने, आपल्याला यातून सुखरूपपणे बाहेर पडायचे आहे हा जप करीत ,घसारा चढून एकदाचा तटबंदीला लागलो.

पाण्याचे घोट घेत, चढून आलेला घसारा न्याहाळला. आडवे पार करायचे अंतर फार नाही आणि तेथील मातीही तितकीशी मोकळी झालेली नाही, हे लक्षात आले. तरीही कमालीच्या सावधपणाने ते अंतर पार करून बुरूजात आलो. मगच सुटकेचा निश्वास सोडला. बराच वेळ तसल्या उन्हातही पडून राहिलो. आपण काय वेडेपणा केला होता, 

या शरम जाणिवेतूनच स्वतःला दोष देत, एक शपथ घेतली, ‘ एकट्याने प्रस्तरारोहण– अगदी दहा फुटांचे असले तरीही– करणार नाही’ .

नंतरच्या आयुष्यात तो निश्चय,ती शपथ कधीही मोडली नाही.

एकट्याने करायची भ्रमंती थांबली नाही प्रस्तरारोहण मात्र  एकट्याने कधीही  केले नाही.तो आनंद मित्रांसोबत भरपूर घेतला.  

माझ्यापुरते हे प्रकरण, हा वेडेपणा गोठला गेला होता. पण याची दाहकता पुढच्या काही दिवसातच जाणवली आणि परत एकदा मी मनातल्या मनात का होईना स्वतःवर भरपूर आसूड ओढून घेतले.

माझ्या त्या प्रसंगानंतर, महिन्याभराच्या आतच, प्रसिद्ध लेखक विद्याधर पुंडलिक यांचा मुलगा, अश्विन पुंडलिक (तो एक उत्तम खो-खोपटूही होता )त्याच्या सहकार्‍यांसह तानाजी कडा चढत असताना खाली पडला आणि त्यात त्याचा दुःखद अंत झाला.

 तो सगळाच प्रकार दुर्दैवी होता.त्याचे अननुभवी  सहकारी, का झाले, कसे झाले, दोष कोणाचा आणि बरेच काही,या चिकित्सा बर्‍याच दिवस होत राहिल्या.

 इतरांच्या दृष्टीने त्याला काही ही अर्थ असेल-नसेल ,पण त्या कुटुंबासाठी,तो मोठा आघात होता.

 एक उमदा तरुण खेळाडू, त्याच्या कुटुंबाचे सर्वस्व असणारा असा युवक अकाली गेला होता, हे सत्य तेवढे बाकी राहिले.

 विद्याधर पुंडलिकांच्या लेखनाचा मी चाहता होतो. प्रत्यक्ष परिचय मात्र नव्हता. पण त्या घटनेनंतरचे, त्यांचे असणे एक काळोख पर्वच ठरले. ते मला व्यंकटेश माडगूळकर यांच्याकडून कळाले.

 व्यंकटेश माडगूळकरांचा आणि माझा परिचय पुणे आकाशवाणी केंद्रात, जाणे-येणे असल्याने होता. अश्विनचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर, व्यंकटेश माडगूळकर ( तात्या ),त्यांचे स्नेही असलेल्या पुंडलिक सरांना भेटून आले होते. डेक्कन जिमखान्यावरील कॉंटिनेंटल पुस्तकाच्या दुकानाबाहेर माझी आणि त्यांची भेट झाली .

तात्या विचारते झाले; “निंबाळकर, हा तानाजी कडा खरंच  कां हो इतका जीवघेणा, अवघड आहे ?काय झाले असेल नेमके अपघाताचे कारण ?” कारण,आणि खरंच असल्या प्राणघातकी छंदास, खेळ कसे समजावे आम्ही?”

आणखीही बरंच काही विचारत होते तात्या.

पुंडलीक सरांच्या त्या कातर झालेल्या स्नेह्यास, म्हणजे तात्यांना मी काहीबाही उत्तरे देत गेलो. पण,यापेक्षा देखील वरचढ मूर्खपणा मी काही दिवसापूर्वीच त्याच कड्यावर केला होता, हे सांगण्याचे धाडस मात्र मला झाले नाही.

आता हे सविस्तरपणे सांगण्याचे कारणही तो  गोरख-मच्छिंद्र गडावरच्या एकट्याच्या भटकंतीत, एका तरुणाने आपला जीव गमावला,ती घटना. त्यातून बरेच चर्चा मंथन होत असताना मी, फक्त वयाचा अधिकार घेऊन काही उपदेश करणार नाही.

पण या क्रीडा प्रकाराविषयी मनस्वी आस्था, प्रेम असल्याने काही गोष्टींची केवळ मित्रत्वाच्या नात्याने आठवण करून देतोय.

खूप सविस्तर विश्लेषण करता येणे शक्य असतानाही थोड्याश्या सूत्र स्वरूपात

1) हा क्रीडा प्रकार प्रेक्षक विरहित आहे तसाच तो स्पर्धा विरहितही आहे.

2) स्पर्धा विरहीत असल्याने फक्त आनंदासाठी, स्वतःच्या सर्वच शारीरिक, मानसिक, वेळ इत्यादी मर्यादा लक्षात घेऊनच याचा आनंद लुटावा. 

 3) प्रसंगी माघार घेणे, सुरक्षितपणे अडचणीतून बाहेर पडणे हेच महत्त्वाचे, शहाणपणाचे आहे. तो कमीपणा मुळीच नाही. 

 4) अडचणीच्या संकटाच्या प्रसंगी जाणीवपूर्वक, ठामपणाने शांत राहून विचार केला तर कितीही मोठ्या अडचणीतून बाहेर पडता येते, हा माझ्या अर्धशतक भराच्या सह्याद्री आणि हिमालयातील भटकंती मधून मिळालेला अनुभव आहे

5) साहस हा या क्रीडा प्रकाराचा आत्मा आहे, पण वेडे साहस नव्हे.

6) एकट्याने जरूर फिरा. त्यातील आनंद काही वेगळाच आहे. पण एकटे असताना प्रस्तरारोहण मात्र अजिबात नाही.

7) अखंड सावधानता स्वतःच्या मर्यादा ओळखूनच यातील आनंद घेण्याचा प्रयत्न करा. एखादा फसलेला ट्रेकही खूप काही शिकवून जात असतो.

 8) केवळ कोणाच्यातरी आधी करायचा म्हणून, हटके मार्गाने करायचा म्हणून, समाज माध्यमांवर झळकण्यासाठी म्हणून ट्रेक अजिबात करू नका. 9)एकट्याने भ्रमंती करायला जाणार असलात तरी किमान एका तरी स्नेह्याला याची कल्पना देऊन जा.

वेडे साहस नकोच

सुरक्षिततेसह साहसाचे वेड असावे,विनाविचार,विना सुरक्षा साधने, वेडे साहस मात्र नकोच.
काही वेळा सुरक्षित साधने वापरत असताही अपघात होतात, पण ते “अपघात “च असतात, जे कोठेही होऊ शकतात.

मान्य आहे, मतमतांतरास येथे भरपूर वाव आहे. पण किमान मर्यादा आपल्या आपणच आखुन घेतल्या,तर हा मनस्वी आनंद देणारा क्रीडाप्रकार बदनाम तरी होणार नाही,याची काळजी आपण नाही घेणार तर कोण घेणार ?
गिर्यारोहण, गिरी भ्रमंती या क्रीडा प्रकाराविषयी मनस्वी प्रेम असल्यानेच हा सारा लेखन-प्रपंच.काहीतरी वेगळे करण्याच्या नादात या  खेळाला बदनाम करू नये एवढीच कळकळ यामागे आहे.

©️ दिलीप नाईक निंबाळकर बावधन पुणे

Facebook Comments

Share this if you like it..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *