हेमंत व शिशिर ऋतुंमध्ये तारे अधिक तेजस्वी का दिसतात?

मागील काही आठवड्यांमध्ये मी सोशल मीडीया वर काही फोटो पोस्ट केले. हे फोटो माझ्या मोबाईल ने टिपलेले असुनही त्यात आकाशातील तारे नक्षत्रे अगदी स्पष्ट दिसत आहेत. फोटो काढुन पाहिल्यावर मलाच प्रश्न पडला की कसे इतके स्पष्ट फोटो येताहेत व तारे इतके तेजस्वी फोटोंमध्ये सुध्दा कसे काय दिसताहेत?

एक आठवड्यापुर्वी काढलेला फोटो , वर आकाशामध्ये मृगनक्षत्र दिसत आहे.अधिक चांगले दिसण्यासाठी मोबाईलची ब्राईटनेस जास्तीत जास्त वाढवा

मला प्रश्न पडला तसा इतरांना देखील पडला प्रश्न. अनेकांना वाटले की फोटोग्राफीचे काही विशेष कौशल्य असेल हेमंत कडे त्यामुळे जमले असेल इतके चांगले फोटो काढणे. पण तसे काही नाही. असे फोटो कुणीही काढु शकते. तारे मुळातच अधिक तेजस्वी दिसताहेत आकाशामध्ये त्यामुळे फोटो मध्ये सुध्दा ते दिसणारच!

हेमंत (गुलाबी थंडीचे दिवस) आणि शिशिर (कडाक्याच्या थंडीचे दिवस) ऋतुंमध्ये सुर्य सायंकाळ आणि रात्रीच्या आकाशामध्ये तारे अधिक चमकताना दिसतात. तेच आपण उन्हाळ्यामध्ये पाहिले तर तारे इतके जास्त तेजस्वी दिसत नाहीत. याचे कारण काय असेल?

हा निव्वळ योगायोग किंवा पृथ्वीच्या वातावरणातील धुळ व प्रदुषणाचा प्रभाव नाहीये बरका! यामागे कारण आहे. व हे समजुन घेण्यासाठी आपणास थोडे ब्रह्मांड दर्शन करावे लागेल. त्यासाठी आधी खालील फोटो पहा.

आपल्या आकाशगंगेचे एक चित्र.

एकुण या चित्रामध्ये आपणास पंख्यांच्या पात्यांसारखे काहीतरी दिसत आहे. किंवा एखादे गतिमान चक्राचा फोटो असावा असे आपणास वाटु शकते. यात एक लंबवर्तुळाकार अधिक तेजस्वी व प्रकाशमान केंद्र दिसते आहे. हे लंब वर्तुळाकार केंद्र म्हणजेच आपल्या आकाशगंगेचे केंद्र. एखादे गतिमान चक्र असावे असे आपणास वाटले असेल तर असे वाटणे म्हणजे नुसता भास नाहीये. तर खरोखरी आपली आकाशगंगा गतिमान आहे. व पंख्याच्या पात्यांप्रमाणेचे केंद्रस्थानामधुन उगम पावलेली ही पाती (पात हा शब्द मी योजला आहे) बहिर्गामी वक्र होत जातात. एकुण आठ अशी पाती असुन त्यापैकी मोठी पाती चार आहेत. इंग्रजी मध्ये या पात्यांस स्पायरल आर्म असे म्हणतात. आता वरील चित्र पुन्हा एकदा पाहुयात.

यात सुर्य दाखवलेला आहे. प्रत्यक्षात वाचकांना समजण्यासाठी सोपे जावे या हेतुनेच केवळ त्या जागी एक पिवळा ठिपका दाखवलेला आहे. तो ठिपका म्हणजे आपला सुर्य नाही.वरील चित्रामध्ये असंख्य छोटे ठिपके दिसत आहेत. त्यातील छोट्यात छोटा ठिपका जो आपणास दिसेल अगदी तेवढाच आकार आपल्या सुर्याचा आहे. पण पिवळा ठिपका फक्त समजण्यासाठी वापरला आहे हे लक्षात असु द्यावे. तर आपल्या सुर्याची जागा आकाशगंगेमध्ये कुठे आहे हे एव्हाना आपल्याला समजले असेल. आपली पृथ्वी व इतर ग्रह या चित्रामध्ये दिसत नाहीत इतके ते नगण्य आहेत.

आकाशगंगेच्या केंद्राचा भाग आधी सांगितल्या प्रमाणे अधिक तेजस्वी आहे. या केंद्र भागी सतत नवनवीन ता-यांचा जन्म होत असतो. सोबतच यात अवकाशीय धुळ आणि वायुचे मेघ मोठ्या प्रमाणात आहेत. उन्हाळ्यामध्ये आपणास जे आकाश दिसते त्या मागे आकाशगंगेचे केंद्राचा भाग येतो की जो अधिक तेजस्वी आहे. आपली आकाशगंगा १ लक्ष प्रकाशवर्षे लांबी रुंदी ने पसरलेली आहे. आणि तिचे केंद्र आपल्या पृथ्वीपासुन अंदाजे २५ हजार प्रकाशवर्षे इतके दुर आहे. केंद्र भागी असलेल्या अवकाशीय धुळीमुळे आपणास हे केंद्र स्थान दिसु शकत नाही. म्हणजेच सर्वाधिक प्रकाशित केंद्र स्थान आणि अब्जावधी ता-यांच्या एकत्रित प्रभावामुळे रात्रीचे आकाश धुकट दिसते. व या धुकट पणामुळे त्या काळात म्हणजेच उन्हाळ्यात आपणास नेहमी दिसणारे तारे देखील फिकट दिसतात.

या उलट हिवाळ्यात आपणास रात्रीचे जे आकाश दिसते ते आपल्या आकाशगंगेच्या केंद्राच्या विरुध्द दिशेचे असते. त्यामुळे आपण आकाशगंगेच्या बाहेरच्या दिशेला पाहत असतो. केंद्रभाग व केंद्रभागाच्या अवतीभवती व पलीकडील ता-यांच्या प्रकाशाचा प्रभाव या दिशेला जाणवत नाही. व त्यामुळेच हेमंत व शिशिर ऋतुंमध्ये तारांगण अधिक तेजस्वी व प्रकाशमान दिसते (अगदी आकाशामध्ये चंद्र असताना देखील).

आमच्या लेखांचे अपडेट्स मिळवण्यासाठी सब्स्क्राईब करा किंवा ९०४९००२०५३ या व्हॉट्सॲप नंबर वर लेख नोंदणी असा मेसेज नावासहीत पाठवा.

जानेवारी २०२१ मधील आमचा आकाशदर्शन कार्यक्रम १६ तारखेला आहे. त्या विषयी अधिक जाणून घेण्यासाठी कृपया इथे क्लिक करा

Facebook Comments

Share this if you like it..