कावल्या बावल्या खिंडीतील रणसंग्राम – भाग ४

Jivaji Sarkale and Godaji Jagtap

मी कोकणदिवा, स्वराज्याचा साक्षीदार आणि रक्षक!

जिवाजी व त्याच्या साथीदारांसाठी काळ जणु पुढे सरतच नव्हता. जिवाजी आणि त्याचा गट प्रत्यक्ष खिंडीपाशी होते. एवढ्यात जिवाजीला त्याची एक चुक समजली.

शत्रुची संख्या किती आहे याचा नीटसा अंदाज नसताना, जिवाजी ने त्याच्या फक्त तीनच मावळ्यांना पहिला वार करण्यासाठी तैनात केले होते. शत्रु संख्या अगदी सकाळ इतकी जरी असेल तरी फक्त तिघांनी हे काम करणे म्हणजे प्रत्यक्ष खोल दरीमध्ये उडी मारुन स्वःत मरण्यासारखेच होते. जिवाजी हे देखील माहित होतेच की तीन असो व सगळेच्या सगळे म्हणजे १० जण असोत, बलाढ्य शत्रु पुढे ते देखील कमीच पडणार. पण जिवाजीला शत्रुला हरवायचे नवह्तेच मुळी. शत्रुला फक्त अडवुन धरायचे होते. व तेही अजुन फक्त एखादा प्रहर.

अत्यंत वेगाने संदेशांची देवाणघेवाण झाली आणि रणनीती बदलली गेली. सगळेच्या सगळे पहिली तुकडी जिकडे तैनात होती त्याच दिशेला सरसावले. प्रत्येकाने आपापल्या जागा हेरल्या व मिळुन शत्रुला कंठस्नान घालण्यासाठी वाट पाहु लागले.

एवढे सगळे घडले अगदी थोड्याच कालावधीत. एवढ्या वेळात गनिम देखील जिवाजीच्या बाणाच्या टप्प्यात आला. अत्यंत घनदाट अशा रानात कोणता मावळा कुठे दबा धरुन बसलाय हे मावळ्यांखेरीज इतर कुणालाच समजणे शक्य नव्हते.

एवढ्यात जिवाजी हल्ला करण्याचा इशारा केला. सर्वप्रथम सु सु करीत बाण सुटला तो हरजीचा. तीर मारणे सकाळपेक्षा आता खुपच सोपे होते. कारण सकाळी शत्रु एकामागुन एक अशा रांगेत होते सुरुवातीस. आता ते आडव्या ओळीत होते. काम सोपे होते. एकामागुन एक तीर सुटत होते आणि गनिम आरडाओरडा करीत जमेल त्या झाडा झुडपामागे लपण्याचा प्रयत्न करीत होते. शहाबुद्दीन च्या सैन्याला आतादेखील समजेना की बाणांचा जो पाऊस पडतोय तो कोणत्या दिशेने येतोय. प्रतिहल्ला करणे सोपे नव्हते. कारण एवढ्या घनदाट झाडी-झुडुपांमध्ये दडुन बसलेले मावळे नक्की कुठे आहेत हेच त्यांना समजेना. जायबंदी होऊन शत्रुचे सैनिक जमिनीवर पडत होते, काही लपण्याचा प्रयत्न करीत होते तर काही बाण लागु नये म्हणुन स्वःतहुनच खाली बसुन हात वर करीत होते.

तेवढ्यात त्यांच्याच एका अधिका-याने मोठमोठ्याने आवाज देत सर्वांना सावध केले. मागची फळी पुढे आली. पुढे येतायेताच त्यांनी तीर-कमान सज्ज केले होते. पण नेम कुठे धरायचा हेच त्यांना समजेना. जंगलाच्या या भागात उतार थोडा कमी होता. अजुन थोडे पुढे जाता आले तर उतार अजिबातच नव्हता. त्यामुळे गनिमाच्या सैन्यातील अधिका-याने अजुन पुढेपुढे जात राहण्याचे आज्ञा सोडली. सोबतच त्याने अनेक तिरंदाजांना त्याच जंगलात पसरवुन पुढे धाडले. जिवाजी व त्याच्या साथीदारांच्या समोर आता आव्हान उभे झाले होते. गनिम विखुरलेला असलेल्या आता तीर मारणे सोपे नव्हते. आणि मारले तरी नेमका नेम बसेलच याची खात्री नव्हती. पण शत्रुच्या या नीतीमुळे, शत्रुला पुन्हा एकदा म-हाठा तिरंदाजांच्या जागा शोधणे सोपे होणार होते. आणि झाले देखील तसेच. आता बाणांचा वर्षाव उलट दिशेला म्हणजे मावळे ज्या ज्या दिशांना होते त्या त्या दिशांना सुरु झाला. मावळ्यांच्या लपण्याच्या जागांचा अंदाज जरी शत्रुला येत होता तरी नक्की जागा कोणत्या हे मात्र त्यांना समजत नव्हते. कारण म-हाटे जागा बदलत होते.  त्यामुळे गनिमाचे सगळेच्या सगळे बाण वाया जात होते.

हे जंगल एकविसाव्या शतकात किती घनदाट आहे हे खालील व्हिडीयो मध्ये पाहता येईल, 
कल्पना करा त्याकाळी काय अवस्था असेल? निबिड अरण्यच असेल तेव्हा !! )

शत्रुचे तिरंदाजांच्या मा-याच्या टप्प्याच्या बाहेर, मागे सरकण्याशिवाय मावळ्यांकडे पर्याय उरला नव्हता. त्याप्रमाणे इशा-यांची देवाण घेवाण होऊन सर्व जण मागे सरकले. आता जंगलातील हा भाग ब-यापैकी सपाट होता. इथे केलेल्या हालचाली शत्रुला लगेच समजणार. पण आता रणनीतीमध्ये बदल करणे गरजेचे होते. शत्रुला समजणार नाही अशा जागा शोधुन शत्रुची वाट पाहणे, दबा धरुन बसणे व संधी मिळताच समशेरींनी हल्ला चढवणे. एकदम हल्ला चढवणे. कल्लोळ करणे.

आणि ती वेळ देखील आलीच. शहाबुद्दीन चे तिरंदाज जंगलामधुन पुढे पुढे सरकत होते आणि त्यांच्या मागोमाग बाकीचे सैन्य एकापाठोपाठ एक अशा आडव्या ओळींमध्ये पुढे धपाधप पावले टाकत होते. समोरासमोरची लढाई होणार आता. शत्रुच्या रक्ताची तहान लागलेल्या त्या समशेरी उसळल्या. प्रत्येक श्वासामध्ये शंभु राजांच्या हत्येचा बदला घेण्याचा हुंकार होता. सर्वांनी अगदी बेंबीच्या देठापासुन मोठ्याने गर्जना केली!

हर हर महादेव ; हर हर महादेव; हर हर महादेव…….

प्रत्येकास जणु हरेक महादेव, म्हणजे मी महादेवच आहे असा कहीसा साक्षात्कार झाला. विनाशाचा देव आदिदेव महादेवच, एक नव्हे तब्बल १० महादेव राक्षसासम गनिमावर कोसळले.

दहा जणांचा आवाज एवढा मोठा व प्रलयंकारी होता की शत्रुला वाटले की शे-दोनशे म-हाट्यांनी हल्ला केला. आणि तो ही जंगलात. मावळे जंगलातील लढायांमध्ये जगात भारी. आधीच शत्रुपक्षातील सैन्याने मावळ्यांचे विविध पराक्रमांविषयी ऐकले होते व त्यात मावळे असे त्वेषाने अंगावर आला म्हंटल्यावर गनिमांना पळता भुई थोडी झाली.

अचानक झालेली युध्दगर्जना! कुणी मोठ्या दगडामागुन समोर येऊन तलवारीने कापाकापी करतोय, कुणी एखाद्या झाडावरुन खाली उडी घेऊन सपासप तलवार चालवतोय तर कुणी अचानक करवंदीच्या झुडुपातुन वाघाने बाहेर झेप घ्यावी तशी झेप घेऊन शिकार करु लागला. काय होत आहे हे शत्रुपक्षाला समजेना. तिरंदाज जे पुढे होते त्यांना देखील बाण मारता येईना कारण बाण मारला व त्यांच्या सैनिकांस लागला तर काय?

रक्ताच्या चिळकांड्या झाडा-झुडुपांवर, झडलेल्या, वाळलेल्या त्या पानांवर, सह्याद्रीच्या काळ्या कातळावर, आणि लाल मातीवर उडत होत्या. तलवारी सलग १०-१५ वार केल्यावर हातातील सारी ताकत संपते. अशात तलवारीने जर एखाद्याच्या शरीराचा आरपार ठाव घेतला तर ती तलवार तशीच रुतुन राहते. व ती तलवार बाहेर काढणे, तलवारीने वार करण्यापेक्षा ही जास्त ताकतीचे व कौशल्याचे काम होय. त्यामुळे जिवाजी आधीच सर्व सुचना नीट दिल्या होत्या. तलवार अशी मारायची ती काढताना त्रास होऊन शक्तिक्षय कमी व्हावा. मावळ्यांच्या तलवारीच्या वारांमध्ये प्रचंड अचुकत होती. ते मांड्या आणि नडग्यांवर घात करुन क्षणार्धात भुतासारखे लुप्त व्हायचे. व दुस-या एखाद्या शत्रु सैनिकासमोर प्रकट होऊन पुन्हा तेच करायचे. असे केल्यामुळे जखमी झालेल्या शत्रुला जागचे हलता येत नव्हते. व मागुन येणा-यांच्या वाटेत देखील अडथळा बनत होते.

मावळ्यांचे ध्येय होते शत्रुला अडवायचे. रोखुन धरायचे पण किती वेळ?

म-हाठ्यांचे कापाकापीचे सत्र सुरुच होते. एकेका मावळ्यामध्ये शंभर हत्तीचे बळ आले होते. आता थांबणे होणार नव्हते. नवीन प्रदेश, जंगल असे सगळे विपरीत असल्याने शत्रु पुरता गांगरुन गेला. जरी संख्येने ते अधिक होते तरी काही मोजके सोडले तर प्रतिकार अजिबात झाला नाही. मावळ्यांना देखील जखमा झाल्याच. जसा एकेक गनिम जमिनीवर कोसळत होता तसा मावळ्यांचा त्वेष कित्येक पटींनी वाढत होता. एवढ्या हलकल्लोळामध्ये सगळेच्या सगळे मावळे जशी योजना झालेली आहे, जशा सुचना जिवाजी कडुन मिळाल्या अगदी तशाच पध्दतीने झुझत होते. त्यातील पहिला नियम होता, स्वःतचा जीव वाचवुन, समोरच्या कमीत कमी ताकतीचा वापरुन करुन पाडायचे. दुसरा नियम होता, अचानक हल्ला करणे व वार करुन लागलीच गुडुप होणे.

इकडे शहाबुदीन च्या अधिका-याने मात्र उलटाच डाव रचला. तिरंदाज व त्यांच्या मागे सैनिकांची फळी पुढे पाठवण्यास सुरुवात केली. इकडे हाणामारी सुरु होतीच.

जिवाजीला शत्रुचा हा डावपेच समजला. आता पुन्हा माघार घ्यायची की घाबरलेल्या शत्रु ला कापित रहायचे? पण कापणार तरी किती लोकांना? काही अंदाज नव्हता. आणि यांना कापित बसले तर खिंडीपर्यंत शत्रु पोहोचणार! आता या क्षणी माघार घेऊन खिंडीच्या दिशेने पळायचे म्हंटले तरी शत्रु पाठलाग करणारच. आणि जंगलात जरी गुडुप झाले तरी शत्रु खिंडीकडे जाणारच. प्रसंग मोठा बाका होता.

जिवाजीला निर्णय करायचा होता. काय करायचे?

शब्दांकन

हेमंत सिताराम ववले,

निसर्गशाळा, पुणे

Facebook Comments

Share this if you like it..