कावल्या बावल्या खिंडीतील रणसंग्राम – भाग ३

मी कोकणदिवा, स्वराज्याचा साक्षीदार आणि रक्षक!

खिंड लढवायला पुन्हा निघालेले जिवाजी आणि त्याचे नऊ साथीदार, एवढ्या बिकट प्रसंगामध्ये देखील, त्या घासभर चटणी भाकरी व माझ्या कड्यातील थंडगार पाण्याने पुनश्चः ताजेतवाने होऊन आपापला मोर्चा सांभाळायला निघाले. एव्हाना सकाळच्या प्रहर संपण्याकडे आला होता. ऊन मी म्हणत होते.

जिवाजीच्या टोळीतील एकाचे नाव हरजी टोळकर. जिवाजीचे व बाकीच्या आठ जणांचे गाव सांदोशी तर हरजी टोळकर हा एकटाच गडी गारजाई पाड्यावरचा. घाटमाथ्यावरच राहणा-या हरजीला घाटमाथा, घाटवाटा, ढोरवाटा, माकडवाटा सगळ अगदी तोंडपाठ. त्यामुळे या वेळी जिवाजी ने हरजीला माझ्या पोटाशी असलेल्या कालकाई मातेच्या देव्हा-यापाशी पाठवला. ज्याप्रमाणे मला पुर्वेकडील गनिमाच्या हालचाली दिसत होत्या त्याप्रमाणे हरजीला देखील त्या दिसत होत्या. देवीच्या स्थानापाशी एका झाडावर चढुन हरजी थांबला. हरजीचे काम होते गनिमाचा अंदाज घ्यायचा. गनिम संख्येने किती आहे याचा अंदाज घेऊन तशी वर्दी बाकी साथीदारांना द्यायची.

बाकी राहिलेल्या नऊ जणांची ३ गटात विभागणी करुन जिवाजी प्रत्येकास एकेक जागा पक्की करुन दिली. खिंडीच्या तोंडापासुन पुर्वेकडे म्हणजे देशाच्या दिशेला काही अंतरावर पहिली ३ जणांची तुकडी, वेगवेगळ्या झाडा-धोंड्यांवर दबा धरुन बसली. दुसरा गट छोट्या डुब्या लपुन बसला व तिसरा गट, ज्यामध्ये जिवाजी स्वःत होता, हा गट टाळदेवापाशी म्हणजे अक्षरशः खिंडीतुन उतरण्यास सुरुवात केली लगेचच, खिंडीच्या दोन्ही बाजुस एकेक जण व आणखी थोडे खाली, चौकी पाशी एक जण अशी विभागणी जिवाजी ने केली. डुबा म्हणजे कावले खिंडीच्या पलीकडचा छोटा डोंगर. म्हणजे माझ्या आणि छोट्या डुब्याच्या मध्ये खिंड आहे. या छोट्या डुब्यासारखे आणखी चार डुबे आहेत व ते छोट्या डुब्याच्या पश्चिमेला एका पाठोपाठ एक असे सलग पसरले आहेत. पाच पांडवाचे वास्तव्याने पावन झालेले हे पाच डुबे. त्यातील सर्वात छोटा डुबा म्हणजे खिंडीला लागुन असलेला.

आज सकाळी झालेल्या दंगली मध्ये आणि इथुन पुढे होणा-या दंगली मध्ये खुप मोठा फरक असणार हे मला स्पष्ट दिसत होते. तसेच जिवाजी ला सुध्दा ते दिसत होतेच. शत्रु ला मात्र अद्याप म-हाट्यांची संख्या किती असावी याचा अंदाज आलेला नव्हता असेच मला वाटले. कारण गनिमाकडुन जी दुसरी तुकडी आली ती देखील साताटशे लोकांची असावी. या घनदाट जंगलामध्ये पायवाटेने एकट्याने चालणे अवघड आहे, तिथे एवढी मोठी फौज सशस्त्र निघाली. घाट वाट इतकी बिकट की या वाटेने कसे बसे एकच माणुस चालु शकतो पण यांनी तसे एकापाठोपाठ एक चालणे सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये केले होते. व त्याचेच दुष्परीणाम म्हणुन त्यांचे शेकडो लोक पडले, जायबंदी झाले होते. त्यामुळे माणकोजी पांढरेच्या सल्ल्यानुसार, सुरुवातीपासुन साताठ-साताठ लोकांची फळी करुन ही फौज खिंडीच्य दिशेने निघाली. त्यांची गती खुपच कमी होती कारण त्यांना चालण्यापुर्वी जंगल साफ करावे लागत होते. डोंगर उतारांवरुन झाडे तोडताना, घसरुन पडुन, थकुन त्यांची पहीली झाडे तोडणारी फळी अगदी १०-१५ पावलांवरच बदलली जात होती. शहाबुद्दीन खानाला म-हाट्यांच्या ताकतीचा आणि संख्येचा अजुन ही अंदाज आलेला नव्हता. गारजाई पाडा सोडल्यावर लगेचच जी वाट घाटाकडे जाते त्या वाटेने हे सैन्य निघाले. जेव्हा ते पहिल्या डोंगराला वळसा घालुन, खिंडीच्या माथ्यावर आले तेव्हा त्या झाडीतील त्या सैन्याची हालचाल जशी मला स्पष्ट दिसली तशी कालकाई देवीच्या स्थानापाशी दडुन बसलेल्या हरजी टोळकरास देखील दिसली. हरजीने ठरलेल्या सांकेतिक, वानरांच्या आवाजात संदेश दिले. संदेश पोहोचल्याचे उलटे आवाज घेऊन हरजीने ती जागा सोडली. त्याला आता गाठायचे होती पहिल्या तिघांची तुकडी; जी खिंडीच्या तोंडापासुन पुर्वेकडे म्हणजे गारजाई वाडीच्या दिशेला असलेल्या घनदाट जंगलात लपुन बसली होती.

 

हरजी ला कालकाई देवी पासुन खाली घाटाकडे उतरणा-या वाटेने जाता येणे शक्य नव्हते. कारण ती वाट जिथे उतरते ती जागा शत्रुच्या अगदीच जवळ होती. शत्रु अगदी थोड्याच वेळात तिथपर्यंत पोहोचेल असा अंदाज बांधुन, हर जी सरळ सोट उतारावरुनच खाली उतरता झाला. त्या उतारावर त्याला स्वःतचा वेगही आवरता येईना. पण उंचच उंच झाडांच्या बुंध्यांना धरुन धरुन तो झपाझप पावले टाकीत होता. मध्येच एखादा करवंदीचा किंवा आळुचा काटा त्याच्या शरीरात घुसे. काटे लागुन लागुन धोतर, कोपरी टरटर फाटण्याचे आवाज त्याच्या कानावर येतच होते. सकाळच्या दंगली मध्ये त्याच्या ब-याच जखमा झाल्या होत्या. पण या जखमा शत्रुच्या वाराने नव्हत्या झाल्या. त्या झाल्या होत्या रानातील काट्याकुट्यांमुळे, दगडधोंड्यांमुळे. तरीही थांबणे, काय लागलय हातापायाला ते बघणे अजिबात होत नव्हते. पानगळ झालेली असल्याने अहिन, पळस, पांगारा, असाना सारख्या वृक्षांखालुन चालताना पानांचा आवाज देखील करकर असा येत होता. सरळ सोट कडा संपुन हरजी थोड्या कमी उताराच्या तरीही घनदाट अशा जंगलात पोहो्चला. क्षणभर थांबुन त्याने शांततेचा अनुभव घेतला. श्वास घेतला. आता त्याच्या कानावर गनिमाच्या हालचालींचे आवाज येऊ लागले. त्यांच्या कु-हाडींचे, झाडाच्या फांद्या पडण्याचे, आरडण्याचे-ओरडण्याचे आवाज हरजीच्या कानावर स्पष्ट येत होते. हरजी ने मग पहिल्या तुकडीस सांकेतिक भाषेत आवाज दिला. प्रतिसादाचा आवाज आला. हरजी ला उमगले की आता पहिल्या तुकडीतील गडी आणि गनिम दोघे विरुध्द दिशांना अगदी एक समान अंतरावर होते. हरजी ने आता साथीदारांच्या दिशेने पटापट पावले टाकायला सुरुवात केली. चालता चालताच अंदाज घेतला साथीदार कुठे कुठे असावेत याचा आणि स्वःतसाठी एक जागा हेरली. मुख्य घाटवाटेपासुन वर, अगदी भाला-तीराच्या अंतरावर हरजी थांबला. शहाबुद्दीनची ही तुकडी हळु हळु पुढे सरकत असली तरी ती सरकत होती. सुर्याची किरणे देखील जखमी होऊन खाली जमिनीवर पडतात की काय असे वाटावे इतक्या गर्द जंगलांत आता थोड्याच अंतरावरुन, फक्त गनिमाच्याच हालचालीचा आवाज येत होता. कोणत्याही क्षणी हाणामारीला सुरुवात होणार होती.

मी कोकणदिवा. मला गनिमाच्या हालचाली स्पष्ट दिसत होत्या. गनिमांची ही तुकडी थोडी बेसावधच होती. कारण सकाळच्या प्रहरी त्यांना म-हाट्यांनी खिंडीच्या तोंडापाशी गाठले होते. त्यामुळे त्यांना या वेळी देखील असेच वाटले की म-हाटे खिंडीपाशीच वाट पाहत असतील. पण इकडे जिवाजी व त्याच्या पाईकांनी शत्रुच्या दिशेने पुढे जाऊन पुन्हा ‘पहिला वार’ करण्याचा घाट रचला होता.

भाले-बरशे, ३ ते ४ डझन भर तीर व कामठं आणि तलवार असे हत्यारबंद हे चार मावळे शत्रुवर आघात करणार होते.

प्रत्येका समोर लक्ष होते ते फक्त आणि फक्त शत्रुच्या रक्ताने या घाटाला, या सह्याद्रीला अभिषेक करण्याचे.

प्रत्येकाच्या मनात प्रचंड खद खद होती. प्रचंड राग होता. बदला घेण्याची आंत्यंतिक इच्छा होती.

चारच दिवसापुर्वी हरजी जेव्हा माझ्या कड्याच्या पोटातील गुहेमध्ये आला तेव्हा त्याला जिवाजी नाईकाकडुन एक गुज पण अत्यंत धक्कादायक समजले.

“शंभु राजांचा घात केला औरंग्यानी !”

हे शब्द कानावर पडल्यावर हरजीवर जणु आभाळ कोसळले होते. पायाखालची जमिन निसटु लागली. त्यांच्या अंगाचा थरकाप झाला आणि देहातुन तप्त ज्वाळा बाहेर पडताना, देह जळताना ज्या काही वेदना होत असतील अगदी तशाच वेदनांच्या अतिरेकाने तो चित्कारु लागला होता. स्वराज्य पोरकं झाल का नाही ते हरजी माहीत नव्हत, पण हरजी ला एक मात्र साक्षात्कार झाला तो म्हणजे हरजी स्वःतच पोरका झाला. त्या बातमीने हरजीला अन्नपाणी गळ्याखाली जाईना झाले होते. सारखा तोच विचार त्याच्या मनात यायचा. शंभुराजांचा औरंग्याने घात केला. घात केला.

संभाजी महाराजांची हत्या

संभाजी महाराजांची हत्या

गेल्या चार दिवसांपासुन हरजी असाच तापलेला होता. त्याचा गाव, घरदार कधीच रानावनात आश्रयाला गेले होते कारण शहाबुद्दीन नेमका त्याच्याच वाडीत तळ ठोकुन बसला होता. आणि सोबत होता माणकोजी पांढरा. कित्येकदा हरजीला वाटायचे की कशाला घाटात किंवा खिंडीत शत्रुची वाट पहायची. थेट हल्ला करायचा शत्रुच्या तळावरच आणि त्या शाबुद्दीन व माणकोजीला त्यांच्याच राहुटीत गाठुन ठार मारायचे. मेलो तरी बेहत्तर! पण….

पण नाईक जो हरजी पेक्षा दहाएक पाऊसकाळे जास्त पाहिलेला असल्याने, आणि रायगडावरुन आलेल्या योजनेप्रमाणेच शत्रुला अडवणे कसे जास्त महत्वाचे आहे हे पटल्याने हरजी इतके दिवस शांत होता. पण हा शांतपणा केवळ स्वराज्याच्या शिरस्त्यामुळे होता. तो नसता तर हरजी शत्रुच्या तळावर एकटाच तुटुन पडला असता आणि लुप्त झाला असता. आणि त्याला ते मरण देखील मोक्षापेक्षा भारीच वाटले असते. पण तसे होणार नव्हते, हरजी मरणार नव्हता, हरजी गनिमास मारणार होता, छिन्नभिन्न करणार होता, रक्त बंबाळ करणार होता, शत्रुला स्वःतच्या हाताने कापणार होता.

हेमंत सिताराम ववले,

निसर्गशाळा, पुणे

Facebook Comments

Share this if you like it..