पावसाळ्यातील दोन वशाट रानमेवे

जंगली अळंबी

मागच्या काही दिवसात मी सलग १५ दिवस कॅम्पसाईट व वेल्ह्याच्या मावळ पट्ट्यात कामानिमित्त मुक्कामी होतो. कॅम्पसाईटवर नवीन शौचालये, एक बहुउद्देशीय हॉल, व स्वयंपाक खोली बांधण्याचे काम युध्द पातळीवर सुरु होते. इतके दिवस मोबाईल फोन, टिव्ही, लॅपटॉप शिवाय घालवणे म्हणजे निसर्गशाळी एकरुप होण्याची एक संधीच होती. गवंडी बिगारी यांच्या सोबतीने पडेल काम करीत मुक्कामीच होतो तिकडे.

दरवर्षी पावसाळ्यात मला पावसाळी रानभाज्या खाण्याची संधी मिळते. या १०-१२ वेगवेगळ्या भाज्या अतिशय लज्जतदार व उच्च पोषणमुल्य असलेल्या असतात. सगळ्याच्या सगळ्या रानभाजांची नावे मला आता नीटशी आठवत नाही. पण मला सर्वात जास्त आवडलेल्या दोन रानभाज्या मला या वर्षी मात्र खाण्यास मिळाल्या नाहीत. पण या वर्षी मला दोन पुर्ण प्रथिने असलेल्या अस्सल मांसाहारी पदार्थ खाण्यास मिळाले.

कुमकर दाजींनी (आमच्या साठी जेवणाची व्यवस्था पाहणारे स्थानिक, आम्ही त्यांना दाजी म्हणुन हाक मारतो इतर गाववाल्यांप्रमाणे) जरा अवघडतच मला विचारले की तुम्ही रानातले वशाट खाता का? तुमच्या साठी खास राखुन ठेवलय आम्ही एक वाटी. रानातले वशाट म्हंटल्यावर मला आधी काही सलजले नाही पण मग वशाट मग कसलेही असु देत मला चालतेच अशी आठवण झाल्यावर व रानातले वशाट म्हणजे नक्की काय हे कुतुहल शमवण्यासाठी हो म्हणालो. एका वाटीमध्ये विमलबाईने (दाजींची पत्नी) ते वशाट आणले. चमचा सुध्दा होता. वाटी माझ्या समोर टेबलावर होती, चमचा वाटीत व रस्सा आणि त्यात काहीतरी दिसत होते. काय होते ते पाहुन समजेना. रस्सा चांगलाच गरम होता. वाफा निघत होत्या त्यातुन.

श्रीगणेशा करण्यासाठी कसल्याही मुहुर्ताची वाट थोडीच बघायची होती इथे! चमच्याने थोडी ढवळाढवळ करुन एक चमचा रस्सा व त्यात ते वशाटाचा एक तुकडा घेतला. आणि तोंडात टाकला. पहिल्यांदा चटका बसला कारण रस्सा अजुन ही चांगलाच गरम होता. चटका विरतो न विरतो तोच मी त्या वशाटाची चव ओळखली. माझ्या लहानपणी बाबुजी (माझे वडील) आवर्जुन डोंगरावरुन, शेतातुन आमच्या आणायचे तेच हे वशाट. अळंबी अर्थात मशरुम.

अ हा हा  काय ती भन्नाट चव! ते वशाट काय आहे ते समजल्यावर मग वाटी पुर्ण रीती झाल्याशिवाय थांबतो तो खवय्या कसला ?

या रानमेव्याला वशाट म्हणजे मांसाहारी समजतात मावळातले लोक. यास भुछत्र असे ही म्हणतात. विमल बाई कडुन (आणि पुर्वी बाबुजींकडुन देखील ऐकले होते) समजले की भुछत्र म्हणजे अळंबी जंगलात अनेक प्रकारच्या येत असतात. व त्या सगळ्याच खाद्य म्हणजे खाण्यास योग्य आहेत असे नाही. यात काही मनुष्यास अपायकारक सुध्दा असतात. जंगलातील कोणत्या प्रजातीची अळंबी खाण्यास योग्य आहे हे माहिती असल्याशिवाय अळंबी खाण्याचा पराक्रम करु नये. अळंबी मध्ये भरपुर प्रोटीन्स असतात. शहरात जी शेती करुन पिकवलेली अळंबी मिळते तिस मात्र शाकाहारी समजले जाते.

मावळपट्ट्यात जुलैचा मुसळधार पाऊस थोडा ओसरु लागला व उन पावसाचा लपंडाव सुरु झाला की पडणा-या पावसाला अळंब्याचा पाऊस असे म्हटले जाते. अळंब्याचा पाऊस म्हणण्यामागचे कारण असे की या दिवसात अळंबी भरपुर वाढते व मुबलक प्रथिने मिळवण्याचा मावळी लोकांचा हा अळंबीचा हंगाम सुरु होतो.

ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात नैसर्गिक अळंबीचा खाण्यात वापर केला जातो. ग्रामीण भागात काबुलभिंगरी-धिंगरी, सात्या, डुंबर सात्या, केकोळय़ा या नावांनी अळंबी प्रसिद्ध आहे. 

जंगली अळंबी

जंगली अळंबी

आयुर्वेदात अळंबीला मोठे महत्त्व आहे. औषधी असणा-या अळंबीत कॅलरीज तसेच प्रथिनेही मोठय़ा प्रमाणात आढळतात. तसेच अळंबी अ‍ॅलर्जी प्रतिबंधक, कोलेस्ट्रॉल प्रतिबंधक व कॅन्सर प्रतिबंधकही असल्यामुळे रुग्णांना तसेच मधुमेहाच्या रुग्णांनाही अळंबीचे सेवन आरोग्यदायी ठरते. अळंबीत व्हिटॅमिन्स, फॅट्स आणि कॅलरीजही आढळतात. व्हिटॅमिन डीचे प्रमाण अळंबीत मोठय़ा प्रमाणात असते.

दुसरा वशाट रानमेवा कोणता ते पुढच्या भागात…

कळावे

Facebook Comments

Share this if you like it..