ट्रेक मध्ये वाट चुकते तेव्हा वाट लागते

लेण्यांपासुन पुढे ठाणाळे गावाच्या दिशेला जी पायवाट जाते त्या वाटेने जायला सुरुवात केली खरी आम्ही पण एका नाल्यातुन, वाट जिथे खाली उतरण्यास सुरुवात करते तिथेच असलेली, डावीकडे, थोडीशी वर चढणारी व आम्हाला सवाष्णी घाटात घेऊन जाईल ती वाट मात्र कुठेच दिसली नाही.  अगदी मायक्रो स्कॅनिंग सुरु होते, सगळ्यांचे सुरु होते तरीदेखील वाट सापडेचना. याच जंगलात आम्ही एवढे मोठी कोळ्यांची एक ना अनेक जाळी पाहिली की एखादा मनुष्य देखील सहज त्यात अडकावा. केवळ हॉलिवुडच्या सिनेमांमध्ये पाहिलेली अशी कोळ्यांची जाळी व ते भले मोठे कोळी पाहणे म्हणजे या ट्रेकची खरी मजा होती.

जाळ्याचे व कोळ्याचे फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा

आम्ही खाली उतरण्यास सुरुवात केली ठाणाळे गावाकडे. आम्हाला वाटत होते की अजुन थोडे उतरुन गेले की पुढे कुठेतरी आम्हाला डावीकडे वर चढुन, धनगर वाड्यापाशी पोहोचणारी वाट सापडेल, पण तसे होण्याची चिन्हे काही दिसत नव्हती. दोन तास होत आले होते आणि गाव जवळपास असण्याच्या देखील काहीच खाणाखुणा दिसत नव्हत्या. अरविंद एकदोन वेळा म्हणालाच की अरे चला माघारा जाऊ आणि वाघजाई घाटाने पुन्हा वर चढुन तेलबैल गाव गाठुयात. पण आता आम्ही ब-यापैकी खाली उतरलो होतो हे स्पष्ट दिसत होतो. त्यामुळे मी थोडे रेटुनच म्हणालो की जाऊ आपण गावात, कुणाला तरी विचारु आणि मग ठरवुयात काय करायचे ते.

माझे मत चुकीचे तर नाही ना? याच विचारात मी पुढे पुढे सरसावत होतो. मला आमचा वीस वर्षापुर्वी केलेला घनगड – तेलबैल – सवाष्णी घाट – सुधागड ट्रेक ची आठवण आली. त्या ट्रेक मध्ये आम्ही तेलबैलाच्या खिंडीत दुपारचे जेवण करुन पुढे सवाष्णी घाट मार्गे सुधागड दिशेने निघालो. घाटाची सुरुवात तेव्हा सापडली होती. आणि पाय-या, रचलेल्या दगडी इत्यादी मुळे आम्ही आता थेट सुधागड पोहोचणार अशा आविर्भात निघालो होतो खरे , पण झाले होते तेव्हा उलटेच. कातळ कडा सोडुन खाली जंगलात उतरलो आणि त्या घनदाट जंगलातील फसव्या रानवाटा, ढोरवाटा व माकडवाटांच्या जाळ्यात अडकुन, रात्रीच्या दहा वाजेपर्यंत जंगलातच अडकलो . मिट्ट काळोख, किर्रर किर्र रातकिड्यांचा आवाज, वटवाघळं तर मध्येच एखाद्या कोल्ह्याची कोल्हे कुई ऐकु येऊ लागली. त्यावेळी आम्ही धाडसी निर्णय घेतला होता, तो म्हणजे जंगलातच, गर्द झाडीमध्येच मुक्काम करायचा. ती रात्र भयानक व भयावह होती असे मला त्यावेळी माझे जे सोबती होते त्यांनी सांगितले दुस-या दिवशी कारण एक मला सोडले तर बाकी कुणालाच झोप लागली नव्हती. मी त्या जंगलात देखील, चढउताराच्या जागेवर देखील गाढ झोपु शकलो होतो. पण बाकिच्यांची जिरली होती. त्यावेळचे माझे जे सोबती होते ते पुन्हा कधीही माझ्यासोबत ट्रेकला आले नाहीत.या ट्रेकमध्ये मुक्काम करायची वेळ आलीच तर जंगलात तरी नको म्हणुन मी झपाझपा पाऊले मळलेल्या पायवाटेवर टाकीत होतो. अंधार पडण्यापुर्वी सुरक्षित जागा गाठणे व स्थानिकांकडुन माहिती घेणे हा माझा हेतु होता. आणि अचानक मला माझ्यापासुन पुढे साधारण पाचच फुट अंतरावर थोडी सळसळ जाणवली. एका मोठ्या झाडाचा बुंधा मध्ये असल्याने मला त्या क्षणाला सळसळ झाली ती जागा दिसली नाही. मी त्याच गतीमध्ये होतो, आणि अजुन एक पाउल पडले तसे मला सापाचे शेपुट दिसले. भुरकट- तपकिरी रंगाचे, अगदी स्पष्टपणे चमकणारे. पुढच्या पाऊलाला मला जे दिसले ते पाहुन मात्र माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. धस्स झालं. पोटात भीतीचा गोळा आला. मी जे पाहिले तो म्हणजे एक साधारण सोळा सतरा फुटांचा, पोटरीच्या जाडीचा भुजंग होता. फना जमिनीवर पासुन एखादा फुटच वर घेऊन, तो सपकन नजरेआड नाहीसा झाला होता. त्याचा वेग इतका जास्त होता की माझ्या झपाझप चालण्याच्या गतीमधील फक्त दिडच पावलांमध्ये मला तो दिसला. पण भीतीचा गोळा मात्र पुढचे दोनेक तास तरी राहिला. अजुनही मला ते चित्र आठवले की भीती वाटतेच. मी फुरसे, घोणस तसेच अनेक बिनविषारी साप पकडले आहेत व व्यवस्थित त्यांना दुरवर सोडले देखील आहे. प्रत्येक वेळी भीती वाटतेच, पण काळजी घेऊन मी तसे केले. अचानक एका चिंतेत असताना, विचारात असताना, गतीत असताना समोर असा भुजंग दिसावा हा अनुभव अंगावर काटे आणनारा होता.

मी जे काही पाहिले व मला जे काही वाटले ते इतर कुणाला केवळ शब्दांच्या मदतीने सांगणेच मी करु शकत होतो, पण इतर कुणालाही समजले नसेलच याची खात्री मला होती कारण त्यांनी प्रत्यक्षात त्या विशाल सरपटणा-या जीवाला पाहिले नव्हते. बाकी सदस्यांनी माझा तो सर्पानुभव ऐकला व सोडुन दिला. मी मात्र अजुन जास्त चिंतेत. ध्येय होते गाव गाठणे. वाटेत एक दोन ठिकाणी डावीकडील दांडवर चढणा-या वाटा लागल्याही. त्या वाटांनी थोडे पुढे जाण्याचा प्रयत्न देखील केला पण काही अंतर पुढे जाऊन त्या वाटा जंगलात नाहिशा झालेल्या. म्हणुन, कसलाही धोका पत्करायचा नाही असे एकमताने ठरवुन आम्ही पुन्हा मळलेल्या वाटेला लागलो.

बाकी सदस्यांनी होकार दिला. साधारण तीन तासाची उतराई करीत आम्ही ठाणाळे गावात पोहोचलो व एका घरात माहिती घेण्यासाठी आवाज दिला. एक स्थानिक माणुस स्वतःला स्थानिक गाईड आहे असे सांगत आमच्या जवळ आला व आम्हाला सवाष्णी घाटाने घाटमाथ्यावर पोहोचण्याचा मार्ग दाखवण्यास तयार झाला. पैशाची तोडपाणी केल्यावर, अजिबात वेळ न दवडता आम्ही त्याच्या पाठोपाठ, त्या दांडाला वळसा घालुन, दांडाच्या पलीकडील बाजुने वर चढण्यास सुरुवात केली. इतर वेळी पायवाटा नागमोड्या असतात जेणेकरुन चढ अंगावर येत नाही व दमछाक कमी होते. पण हे महाशय जरा जास्तच उत्साही होते व आमच्या कडे पाहुन त्यांना बहुधा असे वाटले असावे की हे तगडे गडी आहेत व सहज त्याच्या पावलावर पाऊल ठेवुन येतील मागोमाग. पण त्याने नागमोडी वळणाची वाट कधी सोडली व सरळ सोट चढ चढण्यास सुरुवात केली हे कळलेच नाही. त्याने शॉर्ट कट ने आम्हाला धनगर पाड्यापाशी नेतो आहे असे सांगितले. आमच्या तील एक सदस्याची कढी थोडी पातळ झाल्याने मी मागेच , त्या सदस्यासोबत हळु हळु चढत होतो. अरविंद व शहाजी त्या माणसासोबत थोडे पुढे, हाकेच्या अंतराच्याही पुढेपुढे चालत, चढत होते. साधारण एक तास चढल्यावर आम्ही जिथे आलो तिथे पोहोचताच आम्हाला समजले की आम्ही पुन्हा त्याच वाटेला लागलो ज्या वाटेने आम्ही गावात उतरलो होतो. आम्हाला असे अजिबात अपेक्षित नव्हते. म्हणजे खाली उतरताना डोंगराचा जो दांड आम्ही डाव्या हाताला ठेवला होता व त्याच दांडाच्या पलीकडील बाजुने वर चढणे अपेक्षित होते. आम्ही ज्या वाटांनी उजवीकडे चढण्याचा प्रयत्न केला होता त्यापैकी एका वाटेने पुन्हा आम्ही चढण्यास सुरुवात केली. पुढे पुढे जंगल अजुनही घनदाट होत होते. पाय ठेवायलाही जागा नव्हती. स्थानिक माणुस मात्र आम्हाला पटकन सवाष्नी घाटवाटेवरील धनगर पाड्यावर घेऊन जातोय असे सांगुन आमची फरफट करीत होता. सायंकाळचे पाच वाजले होते. पायपीट आता आठ किमी पेक्षाही जास्त झाली होती. ज्याची कढी पातळ झाली होती तो आता त्याची स्वतःची पाठीवरची पिशवी देखील वागवण्यास तयार नव्हता. त्याचे एकेक पाऊल जड झाले होते. सर्वांच्याच अंगातुन घामाच्या धारा आणि गरम वाफा येऊ लागल्या. पिण्याचे पाणी कधीही संपेल अशी स्थिती निर्माण झाल्याने, पाण्याचे राशनिंग सुरु केले म्हणजे पाणी जपुन वापरणे किंवा अजिबात पाणी न पिणे जोपर्यंत पुढे कुठे पाणी मिळत नाही तोपर्यंत. अजुन एक तास चढुन, ते ही सरळ सोट चढाईवरुन, कसल्याही नसलेल्या वाट नसलेल्या जंगलातुन; आम्ही अखेरीस त्या धनगर पाड्याशी पोहोचलो. पाहतो तर धनगर पाडा ओसाड पडलेला. अर्ध्याच भिंती काय त्या शिल्लक होत्या व संपुर्ण परिसर उम्चच ऊंच गवताने आच्छादलेला होता. तिथे पोहोचल्यवर लक्षात आले की आम्हाला ठाणाळे लेण्यापासुन या धनगर वाड्यावर येणारी वाट का सापडली नाही ते. कारण गेली अनेक वर्षे हा वाडा असाच ओसाड होता. त्यामुळे इथुन खाली जंगलात जाणारी ढोर वाट व पायवाट पुर्णपणे जंगलात विरुन गेली आहे. त्यातच निसर्ग चक्री वादळामुळे अनेक मोठमोठाले वृक्ष समुळ खाली पडलेत. वावर अजिबात नसल्यानेच आम्हाला ती वाट सापडली नाही. हे आता लक्षात आले. त्यामुळे कुणी ठाणाळे लेणी- सवाष्णी घाट असा ट्रेक योजित असेल तर त्यांनी काळजी घ्या. या जंगलात दुरदुर पर्यंत माणसांचा वावर नाहीये. वावर तर सोडाच पण साधा चॉकलेट, बिस्किटाच्या पुड्यांचे, गायछाप तंबाखु अथवा गुटख्याची मोकळी पाकिटे, मोकळ्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या असा एकही मागमुस आम्हाला आढळला नाही.

स्थानिक माणुस म्हणजेच फाटे काका धनगर वाड्यापासुन पुढे चालताना जरा जास्तच उत्साही झाला होता व त्याची अपेक्षा होती की इथुन पुढे पटापट चालावे. सुर्य मावळला होता. सात वाजुन गेले होते पण अजुनही अंधार पडला नव्हता. धनगर पाडा काहीसा पठारावर असल्याने व उतारावर जेवढी दाट झाडी आहे तेवढी दाट इथे नसल्याने अद्याप इथे उजेड होता. पुढील वाट देखील अशीच मोकळ्या मैदानातुन असावी अशी प्रांजळ, भोळी अपेक्षा करीत आम्ही पुन्हा फाटे यांच्या मागोमाग चालु लागलो. पाचेक मिनिटांवरच फाटे काका पुन्हा गोंधळात पडलेले आम्हाला दिसले. पायवाट सरळ जाताना दिसत होतीच तरीही काय माहिती का म्हणुन त्यांना शंका आली की वाट चुकली आहे. त्यांनी मळलेली समोर जाणारी वाट सोडुन , डावीकडे सरळ कड्याकडे जाण्यासाठी वाट आहे असा अंदाज बांधित पायवाट सोडली व कड्याकडे , पुन्हा गर्द झाडीमधुन चालु लागले. आमच्याकडे आमहे डोके वापरण्याचा पर्याय नव्हता व अशा वेळी म्हणजे अंधार पडतोय, घनदाट जंगल आहे अशा वेळी स्वतःचे शहाणपण स्वतःजवळच ठेवावे असे मलाही वाटले. फाटे काकांच्या मागोमाग चालणे ही आता अवघड होऊन गेले. चालणे राहिलेच नव्हते ते आता. दोन चार पाऊले टाकली की जमिनीवर बसुन अथवा रांगत रांगत, स्वतःतचा काट्याकुट्यांपासुन बचाव करीत चालावे लागायचे. जिथुन चढायला सोपे दिसेल तिथुन काका चढत होते. ते वयस्कर जरी असले तरी चपळ व काटक होते. पायात केवळ साधी स्लिपर घालुन ते आमचे नेतृत्व करीत होते. एकीकडे त्यांचे कौतुक तर दुसरीकडे आम्हाला अजुन अडचणीत आणले म्हणुन काहीसा क्रोध अशी घालमेल सर्वांच्या मनात सुरु असावी. अर्थात आमच्यापैकी कुणीच त्यांना काहीच बोलले नाही जेणेकरुन त्यांना वाईट वाटु नये. त्यांची मनस्थिती जर चांगली राहिली तरच आमची सुटका शक्य होती. सुटका? हो, कारण एव्हाना मला खात्री झाली की आम्ही अडकलो आहोत. मला पुन्हा तोच सवाष्णी घाटाचा ट्रेक आठवला. मला दुस-या दिवशी म्हणजे शुक्रवारी कॅम्पसाईट वर लवकर पोहोचणे आवश्यक होते कारण कोजागिरीचा कार्यक्रम ठरलेला व तीसेक लोकांनी नावनोंदणी देखील केली होती. त्यामुळे आज या जंगलात अथवा अगदी पर्याय नाही म्हणुन पुन्हा ठाणाळे गावात  मुक्काम करणे अजिबात परवडणारे नव्हते. त्यातही ठाणाळे गावाकडे जाणारी वाट सापडली तरच तो मुक्काम सुरक्षित नाहीतर जंगलातच, पाण्याशिवाय मुक्काम करण्याची वेळ येते आहे की काय असेच वाटले.

आधीच्या रात्री जंगलात चुलीवर पनीर मसाला बनवताना

फाटे काका, अजुन वर वर चढत होते. वाट तर अजिबातच नव्हती. पण आमची मात्र चांगलीच वाट लागत होती. एका ठिकाणी तर आमच्यातील कढी पातळ झालेला कार्यकर्ता, एका टप्प्यावर चढताना कोसळलाच, त्याच्या खाली मागोमाग मी उभा होतो. तो कोसळला तसा सरळ माझ्याच पाठीवर लॅंड झाला. कसलीही इजा, दुखापत झाली नाही. आता दाट झाडीतुन, काटेरी जाळ्यांतुन चालताना पायाखालचे काहीच दिसत नव्हते. त्यामुळे प्रत्येकाच्या हाती टॉर्च आली व एक हात या टॉर्च मध्ये अडकला व वर चढणे अजुन अवघड होऊ लागले. चढता चढता आम्ही कड्यापाशी पोहोचलो. वाट नव्हतीच, आमची वाट लागलेलीच आणि आता फाटे काकांची देखील फाटलेली त्यांच्या देहबोली व बोलण्यावरुन समजुन आले. त्यांनीच हातपाय गाळले. आम्ही इतके वर चढलो होतो की आता आम्हाला घाट माथा दिसत तर होता पण तिथे जायचे कसे समजत नव्हते. कड्याच्या डावीकडे, उजवीकडे, खाली , वर कुठेही वाट तर नव्हतीच, पण साधे पाऊल टाकता येईल अशी जागाही नव्हती. आम्ही असेच वाळलेल्या, तुटलेल्या झाडांच्या आधाराने स्वतःला सावरुन बसलो. फाटे काका म्हणु लागले की आता माघारी फिरुयात. आमच्याकडे त्यांचे ऐकण्यावाचुन कसलाही पर्याय नव्हता. आम्ही पुन्हा त्याच दाट झाडीतुन, उतरु लागलो. उतरु नाही खरेतर, घरंगळत, ढुंगण खाली टेकवत टेकवत आम्ही खाली खाली येऊ लागलो. उतरताना मात्र आम्ही एकमताने पुन्हा ठरवले की उतरताना आपण थोडे थोडे डावीकडे चलुयात. साधारण अजुन एक तास आम्ही असेच धडपडत खाली खाली आलो. माझ्या मोबाईल वरील मॅप दाखवत होता की आम्ही त्याच त्याच भागात बराच वेळ फिरत होतो. येउन जाऊन तिथेच येत होतो हे फक्त मला समजत होते कारण मी स्त्रवा या ॲप मध्ये हाईक रेकॉर्ड करीत होतो. मी आता थोडा पुढे सरसावलो व अरविंदला देखील माझ्या पुढे घातले. काका मागे चालत होते. आम्ही डावीकडे उतरत राहिलो व काय आश्चर्य आम्ही एका पायवाटेला लागलो. आता आम्हाला थोडे हायसे वाटले. आता ही वाट सोडायची नाही व जिथे जाईल तिकडे जायचे. अरविंदचा विचार होता की आपण माघारी जाऊन, पुन्हा ठाणाळे लेणी मार्गे घाटमाथ्यावर जायचे. पण हा पर्याय खुपच अवघड होता. आम्ही आतापर्यंत अंदाजे १२ किमीची पायपीट केली होती. कुणामध्येच त्राण उरलेले नव्हते.पण सापडलेली पायवाट सोडणे उचित नव्हते. आम्ही त्या वाटेने खाली उतरत राहिलो. आणि आम्ही पुन्हा त्याच ठिकाणी आलो जिथे काकांनी ही  ढोरवाट म्हणुन ही वाट सोडुन सरळ वर कड्याकडे चढण्याचा निर्णय घेतला होता. या वाटचुकीमध्ये आमचे दोन तास गेले होते. वाटेला लागल्यावर काकांना देखील पुन्हा हुरुप आला. ते म्हणु लागले की हीच वाट सवाष्णी घाटाला चढते. चला आपण वर जाऊयात. आम्ही पुनःपुन्हा खात्री करण्यासाठी प्रतिप्रश्न विचारले तर काका पुन्हा थोडे गोंधळुन गेले. ते म्हणाले की वाट हीच आहे पण पुढे जर वाट नसेल तर तुम्हालाच वाट काढावी लागेल व तुम्ही असे करण्यस तयार असाल तर आपण जाऊयात वर. आमच आधीच बॅंड वाजलेलं. त्यामुळे आम्ही आता अजिबात धोका पत्करण्यास तयार नव्हतो. काकांना म्हणालो आता तुम्ही पुढे चला व वाट जिथे उतरेल तिथे घेऊन चला आम्हाला. अरविंदचाच पर्याय आता जास्त भरवशाचा वाटत होता. उतरत असताना, काकांचा आत्मविश्वास अजुन वाढला व त्यांना खात्री झाली की हिच वाटा सवाष्णी घाटाकडे चढते. अरविंदने निर्वाणीचे विचारले व त्यावर देखील काका म्हणाले की हीच वाट वर जाते. मग अरविंद ने निर्णय घेतला की वर जायचे. आता आम्ही ती वाट पुन्हा उलटी वर चढण्यास सुरुवात केली. चढण जरी असली तरी आता ती सरळ चढण नव्हती. थोडी नागमोडी असल्याने चढणे थोडे सुसह्य झाले होते. पाण्याची माझ्याकडे केवळ अर्धीच बाटली शिल्लक होती, व अरविंदकडे एक पुर्ण बाटली. पाण्यावर पहिला अधिकार होता ज्याची कढी पातळ झाली त्याचा. वाट तर सापडली व मळलेली देखील होतीच. एकाच तासात आम्ही पुन्हा कड्याला लागलो. कड्याला पोहोचलो तसा मला एक चॉकलेटच मोकळ पाकिट दिसलं. आता मला पक्की खात्री झाली की हीच वाट. मागील चार तास नुसतेच चालत , चढत, घाम गाळत होतो व पाण्याचा एकही थेंब पिलेलो नव्हतो. त्यामुळे कड्यापाशी मझ्याकडील अर्धी पाण्याची बाटली काढली व घोट घोट सर्वांनी पाणी पिले. काका आता अजुन खुलले होते. इथुन पुढे चढण्यास आता फार वेळ लागला तरी आम्ही आता वर पोहोचणारच याची खात्री झाली. थोडा वेळ आराम करुन आम्ही पुन्हा वाटेस लागलो. पाचच मिनिटांमध्ये आम्हाला कोरिव पाय-या दिसल्या. आणि आमच्या सुटकेवर शिक्कामोर्तब झाले.

कड्याशी पोहो्चल्यावर झालेले समाधान

कळावे

हेमंत ववले

निसर्गशाळा, पुणे

Facebook Comments

Share this if you like it..