
मित्राच्या मुली अत्यंत उत्साहामध्ये वृक्षारोपण करताना
रविवारी माझी दोन्ही मुले आणि मी, माझ्या एका मित्राच्या जमिनीवर झाडे लावण्यासाठी गेलो. तो मित्र, त्याचे संपुर्ण कुटुंब देखील होते. मित्राने या मोहीमेसाठी टिकाव, घमेल, फावड आदी सर्व औजारे व काही रोपे देखील खरेदी केली. पाऊसकाळ संपल्यानंतर देखील पाण्याशिवाय जगतील अशा रोपांची निवड आम्ही केली. हे सगळे घेऊन आम्ही गेलो प्रत्यक्ष जागेवर वृक्षारोपण करण्यासाठी.
माझा मोठा मुलगा ११ वर्षांचा व धाकटा ७ वर्षांचा आहे. मित्राच्या दोन मुली त्या देखील अशाच वयोगटातील आहेत. सर्वांनी कामाचे वाटप केले. कुणी खड्डे खोदायचे, कुणी माती बाजुला ओढायची, कुणी रोपे गाडीपासुन आणुन, त्याची प्लास्टीक पिशवी काढुन रोप लावायचे व शेवटी कुणीतरी माती सारुन शेवट करायचा.
आम्ही तर उत्साहात होतोच, पण आमच्या पेक्षा जास्त उत्साहात होती आमची मुले. काय करु आणि काय नको अशी त्यांची अवस्था झाली. मध्येच मुले म्हणायची आम्ही खड्डे खोदतो, फावड्याने माती ओढतो. त्यांना ते काम जमणार नसले तरी मी त्यांच्या हातामध्ये औजारे देत होतो व त्यांना कामाचा अनुभव देखील देत होतो.
असे करीत आम्ही २५-३० झाडे लावली. शंभर एक आंबा व जांभळाच्या बिया देखील लावल्या. थोडे पाणी शिल्लक होते ते देखील मोजक्या झाडांना दिले. मग, अंधार पडता पडता आम्ही भोजनाचा आनंद घेतला. आम्हाला अजुन जास्त अंधार पडायची वाट पहायची होती कारण मुलांना काजवे दाखवयाचे होते.
रात्री साडे आठ पर्यंत आम्ही तिथेच थांबलो. भरपुर काजवे पाहिले. आणि परतीचा प्रवास करुन, घरी आलो.हा दिवस होता वटपोर्णिमेचा. आणि आम्ही वडाची १०-१२ रोपे, फांद्या देखील लावल्या होत्या याच दिवशी.
वाटेने येताना, पावसाच्या हलक्या सरी येत होत्या अधुन मधुन. मुलांशी गप्पा ही सुरुच होत्या प्रवासात. आणि माझ्या मनात देखील माझा माझ्याशीच संवाद सुरु होता.
दिवसेंदिवस निसर्ग-पर्यावरणाची वाट लागत आहे. कुठे सुके दुष्काळ तर कुठे ओले दुष्काळ. केवढी मोठी संकटे मनुष्यापुढे आ-वासुन उभी आहेत. ही संकटे कोणत्याही क्षणी मनुष्यास गिळुन टाकतील, नष्ट करतील. नुसता मनुष्यच नष्ट होईल असे नाही तर संपुर्ण पृथ्वीच विनाशाच्या दिशेने प्रवास करीत आहे. खगोलशास्त्राप्रमाणे पृथ्वीच काय पण सुर्य व आकाशगंगा हे देखील कधी ना कधी नष्ट होणार आहेतच. पण सध्या पृथ्वीवर विनाशाचे जे तांडव सुरु आहे, ज्या समस्या आहेत त्या बहुत करुन मानवनिर्मित आहेत. या मानवनिर्मित समस्या सोडविणार कोण?
निसर्ग वाचवायचा असेल तर वनसंपदा वाढवली पाहिजे. वनसंपदा वाढवायची असेल तर झाडे लावली पाहिजेत. असलेली झाडे जगविली पाहिजेत. वणवे थांबवले पाहिजेत. मग प्रश्न येतो, ”पण हे करणार कोण?” इथे या प्रश्नाचे उत्तर “मी तरी नाही करणार !” असे मिळते. भलेही कुणीही असे उत्तर देऊदेत नको पण सांप्रत उत्तर हेच आहे. प्रश्न अनुत्तरीतच आहे.
निसर्ग आवडतो, झाडे लावली पाहिजेत, जगवली पाहिजेत हे सगळे सर्वांना माहित आहेच. यात नवीन काहीच नाही. कधीकधी या सर्व समस्यांकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोण देखील वेगवेगळा असु शकेल. व त्यावरील उपाययोजनांच्या संकल्पना देखील वेगवेगळ्या असु शकतील. तसेच प्रत्येकाच्या याबाबतीतील प्रेरणा देखील वेगवेगळ्या असु शकतील. कुणाला झाडांच्या गर्द सावलीमध्ये बसायला आवडते, तर कुणाला घनदाट जंगलांमधुन चालावयास आवडते. कुणाच्या संवेदनशील कवि मनाला निसर्गाच्या सहवासात असताना पंख फुटतात तर कुणाला आध्यात्मिक शांती व समाधानाचा अनुभव येतो. सगळ्या जगाच्या रहाटगाडग्यात, जिथे फक्त आणि फक्त व्यवहार होतात, देवाण घेवाण होते तिथे फक्त आणि फक्त झाडेच आहेत की जे मनुष्यास आणि एकुणच निसर्गास फक्त आणि फक्त देतच राहतात. आपल्या प्रत्येक नात्यांमध्ये अंतिम हेतु आहे मला काय मिळेल? माझा काय फायदा? माझ्यासाठी कुणी काय-काय केले? आणि जर कुणी खरच तुमच्यासाठी काही करीत नसेल तर आपोआपच तुम्ही त्याच्यासाठी काहीही करणे सोडुन द्याल. यात कोणत्याही व्यक्तिचा दोष नाहीये. एक व्यक्ति म्हणुन ‘मी’ जितका माझ्या स्वार्थाचा, माझ्या फायद्याचा विचार करतोय, तितकाच एक ‘समाज’ म्हणुन ‘मी’ (म्हणजे मी देखील समाज आहे) माझ्या (म्हणजे समष्टीच्या) स्वार्थाचा विचार करीत नाही. आपली एकंदरीत संस्कृतीच (civilisation) व्यक्तिकेंद्रीत झालेली आहे. या नवसंस्कृतीमध्ये माझ्या सुखा-समाधाना खेरीज अन्य काहीही महत्वाचे नाही, अशी शिकवण पावलापवलावर अधोरेखीत केली जात आहे. नागरी व्यवस्था व्यक्तिकेंद्रीत आणि व्यक्ति झालाय सुख-सोई, उपभोग केंद्रीत! आणि ह्या उपभोगाचा आधार आहे पैसा!
निसर्गाच्या अन्नसाखळीमध्ये मनुष्य सर्वोच्च स्थानी आहे असा जो आविर्भाव सध्या रुढ झालेला आहे त्यातुन आपल्या सामाजिक मनामध्ये एक गैरसमज रुढ झालाय. तो म्हणजे मनुष्य या वसुंधरेचा मालक आहे. व त्यातुनच सर्व प्राकृतिक संसाधनांचे शोषण करण्याची जणु स्पर्धाच निर्माण झालेली आहे. आणि हे मागील काहीशे वर्षांत झालेले आपण पाहतोय. वस्तुथिती मात्र वेगळीच आहे. प्रत्यक्षात मनुष्य या वसुंधरेचा, या धरणीमातेचा, या भुमातेचा पुत्र आहे. पुत्र कधीही शोषण करीत नाही. तो दोहन करतो. असे घडण्याचे कारण काय असेल?
शहरेच काय तर हल्ली गावांकडेही पाणी नळ योजनेद्वारे येत आहे. स्वच्छ, शुध्द पाणी घरात मिळणे हा प्रत्येक नागरीकाचा हक्कच आहे. हे स्वच्छ शुध्द पाणी मिळविण्यासाठी करावे काय लागते? तर पाणीपट्टी भरली की झाले? या स्थानिक स्वराज्य संस्था अशा योजनांद्वारे पाणीपुरवठ्याची सोय करताहेत त्यांना देखील जलस्त्रोत पुनर्भरणासारख्या चिंता सतावताना दिसत नाहीयेत. कारण यासाठी मोठ-मोठी धरणे आधीच बांधुन ठेवली आहेत. आणि नसतील तर अशा धरणांची रचना होताना भविष्यात दिसेल सुध्दा. या धरणांतील पाणीसाठा करुन ठेवण्याची क्षमता देखील दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. याचे कारण म्हणजे धरण-क्षेत्रात होणारा पर्यावरणाचा –हास. या –हासाची मुख्य कारणे आहेत वणवे आणि वृक्षतोड. वणव्यांमुळे जमिनीची धुप मोठ्या प्रमाणात होते व मोकळी झालेली माती पावसाच्या पाण्यासोबत धरणात येऊन साचते. अशा मातीचे म्हणजेच गाळाचे अक्षरशः डोंगरचे डोंगर धरणांमध्ये दिसताहेत. धरणातील गाळ उपसण्याचे कार्य देखील कमी प्रमाणात का होईना सुरु आहे. अनेक सामाजिक संस्था, कृषिखाते, सामाजिक-पर्यावरन कार्यकर्ते हे काम करीत आहेत. त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच. कारण या जल-समस्या जशी सर्वांना आहे तशी यांनादेखील आहे. पण बाकी कुणीही या कामासाठी वेळेचे व श्रमाचे दान करीत नाही, हे लोक करतात. पण गाळ उपसल्याने खरच का आपल्या समस्यां सुटणार आहेत? तर नक्कीच नाही. आज गाळ उपसला की पुढच्या आणखी पाच-पन्नास वर्षांमध्ये गाळ पुन्हा साचणारच. आणि तो असाच साचत राहील. हे थांबवायचे असेल तर पावसाच्या पाण्यासोबत होणारी मातीची धुप थांबवली पाहीजे. व ही धुप थांबवायची असेल तर वणवे लावणे अजिबात बंद केले पाहिजे. पण हे करणार कोण? सामाजिक वनीकरण खात्याने या संदर्भात चालु वर्षी एक स्तुत्य पाऊल उचचले आहे. वन संरक्षणासाठी १९२६ ही एक हेल्पलाईन सुरु करुन, वणव्यांविषयी माहिती देण्याचे आवाहन नागरीकांस केले. यामुळे लागलेला वणवा, जो पुर्वी संपुर्ण डोंगर जाळुनच शांत व्हायचा तो सध्या किमान तास-दोन तासांत तरी विझवला जातो. हे ही नसे थोडके. पण हे थोडके प्रयत्न खरच खुप तोकडे आहेत. मी स्वतः या उन्हाळ्यात वीसेक वणव्यांची वर्दी हेल्पलाईन ला दिली. प्रत्येक वेळी त्वरीत प्रतिक्रिया व कार्यवाही करीत वणवे विझवले. पण पुन्हा कधी त्या भागात जाणे झाले तर मला ते डोंगर जळुन गेलेलेच दिसले. म्हणजेच काय तर जे काही प्रयत्न सुरु आहेत ते पुरेसे नाहीयेत हेच इथे अधोरेखीत होत आहे.
तुम्ही म्हणाल पाण्याच्या नळापासुन सुरु केलेला उलटा प्रवास वणव्यांपर्यंत कसा काय गेला! मला या सा-यातुन हे सांगायचे आहे की सामान्य माणुस ज्याला नळाद्वारे पाणी मिळते आहे, त्याला जल-स्रोत संवर्धन,संरक्षणाच्या बाबतीत काहीही माहित नसते. आपण शालेय अभ्यासामध्ये जे काही, प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी घोकंपट्टी केलेली असते ती निव्वळ कुचकामाची आहे. पाणी वापरकर्त्याचा या जलचक्राशी काहीही संबंध आजकाल राहीलेला नाही. व त्यातुनच वर मी विचारलेल्या “पण हे करणार कोण?” या प्रश्नाचे उत्तर “मी तरी नाही करणार !” असे मिळते. भलेही कुणीही असे उत्तर देऊदेत नको पण सांप्रत उत्तर हेच आहे. प्रश्न अनुत्तरीतच आहे.
आम्हाला अन्नधान्य, फळे, भाज्या जे काही हवे आहे ते सर्व पैसे देऊन मिळते आहे. हे मिळविण्यासाठी पैसे खर्च केले की झाले. एवढाच काय तो सामान्य माणसाचा आणि अन्न-पदार्थांचा संबंध येतो हल्ली. त्यामुळे जसे पाण्याच्या बाबतीत होते तसेच अन्न-धान्याच्या बाबतीत देखील होत आहे. शेतातुन अन्न-धान्य निर्मितीशी आधुनिक सामान्य मनुष्याचा काहीही संबंध नाहीये. इथे जे काही आपण खात आहोत ते केवळ आणि केवळ इंडस्ट्री चे आउटपुट आहे. यात पेस्टीसाईडस व रासायनिक खते, औषधे यांच्या माध्यमातुन आपण विष प्राशन करीत आहोत. हे कुठे तरी थांबले पाहीजे व विषमुक्त, सेंद्रीय शेती करण्यास सुरुवात केली पाहीजे! पुन्हा तोच प्रश्न येतो, ”पण हे करणार कोण?” इथेही या प्रश्नाचे उत्तर “मी तरी नाही करणार !” असे मिळते. भलेही कुणीही असे उत्तर देऊदेत नको पण सांप्रत उत्तर हेच आहे. प्रश्न अनुत्तरीतच आहे.
उन्हाळ्यामध्ये अंगाची लाहीलाही होते. सर्वांना झाडाची सावली पाहिजे असते बसण्यासाठी. उष्मा कधी नव्हे तो इतका वाढलाय की उष्म्याने अक्षरशः हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत. आणि दुष्काळ पडणे आता दुर्मिळ घटना राहिलेली नाही. फळबागा उन्हाच्या तापाने जळुन जाणे, डोलणारी पिके पाण्याअभावी वाळुन जाणे, जनावरांना पाणी व चारा न मिळणे, त्यासाठी सरकारी छावण्या उभारणे हे देखील काही नवीन नाही. अगदी दरवर्षीचे हे चित्र आहे. बातमी मुल्य व क्षणिक हळहळ, यावरुन राजकारण, सरकारला जाब विचारणे या व्यतिरिक्त या घटनांचे आणखी कशातच पर्यवसन होताना दिसत नाही. दुष्काळी स्थितीला सरकार जबाबदार आहे. एवढे बोलुन आपण मात्र मोकळे होतो. यासाठी झाडे लावली पाहिजेत. जी आपोआप जंगलांमधुन उगवत आहेत त्यांना वणव्यापासुन वाचवले पाहीजे. रान-फळे खाल्ली तर बीजदुत होऊन बिया दुर दुर पसरविल्या पाहिजेत. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हा वृक्ष-संस्कार प्रत्येक पिढीमध्ये रुजवला पाहीजे. पुन्हा तोच प्रश्न येतो, ”पण हे करणार कोण?” इथेही या प्रश्नाचे उत्तर “मी तरी नाही करणार !” असे मिळते. भलेही कुणीही ‘असे’ उत्तर देऊदेत नको पण सांप्रत उत्तर हेच आहे. प्रश्न अनुत्तरीतच आहे.
माझ्या अंतर्मनात सुरु असलेल्या या माझ्या माझ्याशीच संवादातुन खुप मोठा प्रश्न माझ्यासमोर दिसला मला. खुप मोठे संकट दिसले. खुप आव्हाने दिसली. ही आव्हाने, समस्या, संकटे माझ्या एकट्यासाठीच आहेत असे नाही. ती सर्वांसाठीच आहेत. आणि जोपर्यंत प्रत्येकास ही संकटे व्यक्तिगत संकटे वाटत नाहीत तो वर प्रत्येकाचे उत्तर वरील प्रमाणेच असेल.
मला पडलेल्या या प्रश्नाचे माझे उत्तर मात्र मला सापडले आहे.
“मी करणार आहे हे ! ”
तुमचे उत्तर काय आहे?
कळावे
हेमंत सिताराम ववले
निसर्गशाळा, पुणे
टिप – आमच्या विविध लेखांविषयी अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप नंबर वर “लेख नोंदणी” असा मेसेज , नावासहीत पाठवा.
व्हॉटसॲप नं. ९०४९००२०५३