आजपर्यंत वेगवेगळ्या ऋतुंमध्ये, अनेक वेळा तोरणा किल्ला पाहण्याची संधी मिळाली. प्रत्येक ऋतुमध्ये तोरण्याचे वेगळेच रुप बघावयास मिळते. तोरणाच काय, सह्याद्रीतील प्रत्येक किल्ला ऋतुमानानुसार रुप पालटतो. या वर्षी मात्र ह्या रुप पालटण्याच्या प्रक्रियेचा साक्षीदार होण्याची संधी मला मिळाली.

राजगडावरुन दिसणारा तोरणा किल्ला
निसर्गशाळेच्या विविध सहलींच्या माध्यमातुन, पर्यटकांमध्ये निसर्गाकडे पाहण्याचा एक विशिष्ट दृष्टीकोन देण्याचा प्रयत्न नेहमीच केला जातो. निसर्गातुन, मोकळ्यामैदानातुन चालताना, पायवाट सोडुन चालु नये, कारण पायवाट नसेल तर आपण आपल्या पायाखाली पाने, फुले, वेली, गांडुळ, बेडुक आदींना चिरडण्याची भीती असते. ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टीपासुन ते अगदी पर्यावरण संरक्षण संवर्धनात आपापल्या पातळीवर, आपापल्या परीने काय योगदान देता येईल इथपर्यंत माहीती साध्या, छोट्या संभाषणातुन पर्यटकांना सुचवली जाते. अनेकदा अमराठी (प्रसंगी परदेशी देखील) पर्यटक देखील अशा विविध सहलींमध्ये सहभागी होतात. अशा पर्यटकांना सह्याद्री, सह्याद्रीतील संस्कृती, भुगोल आणि त्या सोबतच इतिहासाविषयी देखील माहीती आम्ही देण्याचा प्रयत्न करीत असतो.
कालच्या पदभ्रमणाच्या सुरुवातीलाच, निसर्गचक्रातील एक बदल, अगदी गाड्या पार्क केल्यावर लगेचच जाणवला. तो म्हणजे बदललेले वारे. शिवकाळात एका इंग्रज वकीलाने तोरण्याविषयी माहीती लिहीताना त्यास गरुडाचे घरटे असे संबोधले आहे. तर मग ह्या गरुडाच्या घरट्यात घोंघावणारा वारा असणारच. हे घरटे समुद्रसपाटीपासुन अंदाजे चार हजार सहाशे फुट उंचीवर आहे. एवढ्या उंचावर वाहणारा वारा देखील तितकाच खमक्या आहे. पावसाळ्यात हा वारा पश्चिमेकडुन पुर्वेकडे वाहताना आम्ही अनुभवलाय. ह्या वा-याचा अनुभव घ्यायचा असेल तर किल्ल्यावर चढताना रेडे पट्ट्यावर थोडे थांबावे. तसा वारा सगळीकडेच असतो.पण रेडे पट्ट्यावर हा वारा किल्ल्याच्या सोंडेला धडकुन अजुन वर उभारी घेतो. व नेमके पायवाटेवरच आपल्याला ह्या वा-याचा आनंद घेता येतो.
रेडे पट्ट्यापासुन पुढे उभी चढण सुरु होते. कडा अंगावर येतो. ही वाट आपणास कोठी दरवाज्यातुन गडावर घेऊन जाते. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये, मुरुमाच्या रेती मुळे व मातीतुन मोकळ्या झालेल्या लहान मोठ्या खड्यांमुळे नवख्या माणसास जरा अवघड जाते. आमच्या ग्रुपमध्ये देखील काही नवखे होतेच. त्यामुळे आमचा वेग मंदावला होता. रेडे पट्टा सोडल्यावर घोंघावणारा वारा देखील मागे, खालीच राहतो. गुरुत्वाकर्षाच्या विरुध्द दिशेने, पुणे परीसरातील सर्वात उंच पर्वत चढताना दमायला होते. प्रत्येक श्वास-प्रश्वासागणिक शरीरातुन अशुध्दी बाहेर पडत असते. पायवाटेच्या उजवीकडे, भट्टी वागद-या कडील दरीची भीती केव्हाच संपलेली असते. श्वासाची गती वाढलेली असते. आकाशातुन सुर्याची भट्टी डोंगर द-यांसहीत आपल्या अंगा-प्रत्यंगास भाजुन काढीत असते. अंग घामाघुम झालेले असताना , अचानक एखादी वा-याची हलकी झुळुक आलीतर जणु सह्याद्रीनेच पुढे येऊन मला मिठित घेतले की काय असे वाटते. सह्याद्रीला त्याच्या लेकराची काळजी आहे. व त्याला थोडा दिलासा देतो. ही वा-याची झुळुक तापलेल्या, घामाघुम झालेल्या अंगावर हलकेच थंडावा आणते.
आता आम्ही डोंगर मातीची चढाई संपवुन, कातळ कड्याच्या पायथ्याशी आलो. आता गड अगदी टप्प्यात आला होता. कातळकड्याची चढण सुरु होण्यापुर्वी, डावी हाताला, कातळातुन झिरपणारे पाणी वेगवेगळ्या कड्या कपारीतुन खाली ठिबकते. तेथे, कुणीतरी, वरुन खाली येणारे सर्व पाणी, एका लोखंडीपाईप मध्ये जमा करुन एक पाण्याची धार तयार केली होती. सर्वांनी पाणी प्यायले. कातळातुन झिरपत येणारे पाणी अतिशय थंड व मधुर होते.
कोकण दरवाज्याच्या बुरुजावरुन घेतलेला बुधला माचीचा फोटो.
जसे आम्ही कोठी दरवाजातुन गडावर दाखल झालो तसे आणखी बदल जाणवला. तो म्हणजे गडावरील स्वच्छता. आम्ही गडाच्या द्वारातच होतो तितक्यात तेथे आणखी एक ग्रुप गडा खाली उतरण्याच्या तयारीत होता. त्यात वीसेक लहान मुल आणि ३-४ तरुण होते. त्यातील एक तरुण मुलांना पैकी एका कडे पाहुन त्याला विचारीत होता की तुमचे गणशिक्षक कुठे आहेत. एवढ्या वरुन मला समजले की हा नुसत्या पर्यटकांचा जथ्था नसुन हे तर कार्यकर्ते मंडळी आहेत. त्यांची थोडी फीरकी घ्यायचे ठरवले. मी त्यांना विचारले, “तुमचा कचरा कुठय? कचरा नाही ना केला गडावर तुम्ही?” त्यावर त्यातील एक कार्यकर्ता सांगु लागला की ते सगळे मिळुन ५०-६० जण आहेत. व ते कचरा करण्यासाठी आलेले नसुन गडावर साफसफाई करण्यासाठी आलेले आहेत. मी “बर बर”, म्हणुन गुगली टाकली, “तुम्ही ते हाप चड्डी वाले का?”. ह्या प्रश्नावर बाकी सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले. उत्तर कोण देणार हे त्यांनी एकमेकांशी न बोलताच ठरवले. त्यांच्यातील आणखी एक चुणचुणीत तरुण, थोडा पुढे येऊन “हो” म्हणाला.
मी, “बर बर…असु दे. काही काही हाप चड्डीवाले चांगले असतात, की जे अशी किल्ले साफ सफाईची कामे करतात.”
तो तरुण, “तस नाही काका(हल्ली काकाच म्हणायला लागलेत ब-यापैकी अनोळखी तरुण देखील. लहान मुलांनी काका म्हंटले तर ठिक आहे, पण तरुण देखील…वय व्हायला लागलय आता) . सगळेच हाफ चड्डीवाले चांगले असतात. आता तुम्हीच बघा की हे सगळे कार्यकर्ते, मुले, स्वयंसेवक वेळ, श्रम आणि स्वतचा पैसा खर्च करुन इथपर्यंत येऊन गड साफ करतात. आणि यात कसलाही स्वार्थ नाहीये यांचा ”
माझ्याकडे देखील वेळ कमी असल्याने मी जास्त फिरकी घेण्यच्या फंदात न पडता, त्यांना रामराम करुन आम्ही मेंगाई देवीच्या मंदीराकडे निघालो. तेवढ्यात आणखी एक ग्रुप मला भेटला. तो देखील खाली उतरत होता. ह्या ग्रुप मध्ये सगळे हिंदी भाषिक तरुण मुले होती. मी त्यांना ही हटकले व कच-या विषयी विचारणा केली. त्यांनी तर लगेच पाठीवरची सॅक खाली काढुन त्यातील त्यांचा स्वतःचा कचरा दाखवला व मला आश्वस्त केले की ते लोक कचरा पुण्यापर्यंत नेऊन त्यांच्या घराच्या आसपासच्या कचरा पेटीतच टाकणार.
मेंगाई देवीच्या मंदीरापाशी आम्ही झाडाखाली थोडा आराम आणि खाऊ पिऊ केल. अमराठी पर्यटकांना किल्ला दाखवणे, त्याचा इतिहास सांगणे हे तर चढाईला सुरुवात केल्यापासुन सुरुच झालेले होते. आता वेळ आली होती ती किल्ल्यावरील वेगवेगळी ठिकाण दाखवण्याची. सगळा गड फिरुन त्यांना दाखवला.
कोकण दरवाजाच्या आतील भाग. इथे तटाचे नवीन बांधकाम दिसत आहे.
आम्ही कोकण दरवाज्या ने उतरुन बुधल्या ला जाऊन आलो. येताना अचानक एक पर्यटकाने आश्चर्याने मला समोरील टेहाळणी बुरुज दाखवीत उत्साहात म्हणाला, “ सर ये तो सही मे हाथी ही है!! वॉव, अनबीलीव्हेबल!!!” असे म्हणत तो ग्रुप मधील सर्वांना त्याला दिसलेला हत्ती दाखवु लागला. आणि ते होते ही खरेच. आमच्या समोर हत्तीच होता. पण हा हत्ती तयार केला होता शिवाजी राजांच्या हरहुन्नरी मावळ्यांनी. एका कातळालाच हत्तीच्या तोंडाचा आकार देण्यात आला आहे. त्या कडे नीट पाहील्यावर समजते की त्या हत्तीच्या तोंडाला कान आणि दात देखील होते. पण आता ते कान आणि दात नीटसे दिसत नव्हते. नीट निरीक्षण केले तरच ते दिसतात. आणखी बारकाईने पाहीले तर समजते की हा दगडाचा डोंगर मुळातच ह्या आकाराचा नव्हता. पण कारागीरांनी आकार पाहुन त्यास हत्तीच्या मुखासारखे केले होते. कातळावर छन्नीचे घाव अजुनही दिसत आहेत. वर ते काही पाच दहा फुट उंचीचे हत्तीचे मुख नव्हते. १०० फुटापेक्षा जास्त उंच असे ते विशाल हत्तीचे मुख. पडलेले कान, दात, कपाळ, डोळे, आणि सोंड अगदी स्पष्ट पणे दिसत आहे. आपण कधी तोरण्यावर गेलाच तर आवर्जुन हे हत्तीमुख पहाच. यास हत्ती माळ असे सध्या म्हणतात. मला असे वाटते की माळ असा नंतरच्या काळात त्या नावाचा अपभ्रंश झाला असेल. ह्या हत्तीमुखाच्या माथ्यावर एक माळा आहे. हत्तीच्या अंबारी च्या समोर, माहुत ज्या ठिकाणी बसतो अगदी त्याच ठिकाणी एक टेहळणी बुरुज आहे. व बाल्कनी/माळा सदृश्य अशा या ठिकाणी पोहोचण्यासाठी देखील वीसेक फुटाचा भुयारी मार्ग आहे. कित्येक वर्षापुर्वी तोरण्यावर आम्ही आलेलो. तेव्हा असा माळ किंवा माळा, आणि हाअ भुयारी मार्ग दिसला नव्हता. कारण हा मातीने गाडला गेला होता.
हत्ती माळ/ माळा
हत्ती माळ्याला जाण्यासाठीचा भुयारी मार्ग
या किल्ल्यास शिवाजी महाराजांच्या पुर्वी शैव पंथाच्या कोण्या राजाने १२ व्या शतकाच्या आसपास बांधल्याचा अनुमान आहे. महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन नवीन बांधकामे, बुरुज, तटबंद्या असे बांधले. त्यापुर्वी या किल्ल्यास प्रचंडगड म्हणत. प्रचंडगड नाव देण्यामागे कारण ही तसेच आहे. आकाशाला गवसणी घालणा-या ह्या डोंगरालाच जणु तटबंदी आणि बुरुजांची वेसण घालुण त्यांची वाढणारी उंची थांबवण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. दुहेरी तटबंदी ह्या गडाला देखील आहे. विषेशतः बुधल्या कडे जाताना , कोकण दरवाज्याच्या पुढे लगेचच, पुर्व आणि पश्चिमेकडे आणखी दोन दरवाजे आहेत. पैकी एक भट्टीत उतरतो व दुसरा मेट पिलावरे कडे. ह्या किल्याच्या चहुअंगांनी अनेक मेट होते. मेट म्हणजे दौलतीच्या रक्षणासाठी सदैव सिध्द असलेल्या सशस्त्र सैनिकांच्या छावण्या. ह्या सा-या छावण्या सध्या स्वतंत्र गावांमध्ये रुपांतरीत झालेल्या आहेत. मरळ, कोकाटे, जोरकर, गाडे, देवजीरकर आदी मंडळी गड राखायची. संभाजी राजांच्या अमानुष हत्ये नंतर, औरंगजेबाने गड किल्ले ताब्यात घेण्याचे सत्रच सुरु केले. अनेक किल्ले मोगलांनी हस्तगत केले. पण तोरणा त्यांना काही केल्या जिंकता येईना. कोकाटे, मरळ, शिळीमकर, जोरकर, गाडे, धुमाळ इत्यादींनी गड राखता येईल तेवढा राखला. मोगलांच्या दररोज नव्या दमाच्या फौजा येत. गडाला चार ही बाजुंनी वेढा पडलेला होता. तरीही आपले मावळे चार ही बाजुंनी टोळधाड यावी तशी येऊन मोगलांचे लचके तोडायची. गडाला रसद पोहोचणे कठीण झाले. अखेरीस गड पडला. मोगलांना मिळालेल्या ह्या कडव्या प्रतिकारामुळे हा गड घेणे दुरापास्त होऊन बसले होते. म्हणुन औरंगजेबाने ह्या किल्ल्याचे नाव बदलुन फुतुलगेब असे केले होते. पुढे पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला पुन्हा मराठांच्या ताब्यात आला.
गेल्या दोन वर्षात ह्या किल्ल्यावर संवर्धानाचे काम अतिशय जोरदार सुरु आहे. मेंगाई मंदीर, महादेवाचे मंदीर, तट, बुरुज इत्यादींचे बांधकाम झालेले दिसले. आणखी ही बरेच काम सुरु आहे. शेसव्वाशे मजुर किल्ल्यावर काम करीत आहेत. हे काम करताना ते सिमेंट ऐवजी चुनखडीचा वापर करताना दिसले. माहीत नाही की हे केलेले नुतनीकरण, डागडुजी कितपत टिकेल, पण हे ही नसे थोडके.
हा किल्ला पुर्ण नीट पाहण्यासाठी किमान एक पुर्ण दिवस पाहीजे तुमच्या कडे. सोबतीला किल्ल्याची माहीती असलेला कुणी जाणकार असेल तर दुधात साखर समजा.
आम्ही पुर्ण किल्ला फिरुन, पाहुन पुन्हा परतीचा मार्ग पकडला. रेडे पट्ट्याजवळ पोहोचल्यावर काळी मोठमोठी, प्लास्टीक कच-याने भरलेली, ८ पोती पाठीवर लादुन उतरताना उरलेली हाफचड्डी गॅम्ग सुध्दा दिसली. आता पुन्हा पोटात कावळे ओरडायला लागले होते.
हीच ती हाफचड्डी गॅंग
आम्ही पायथ्याशी येऊन सर्वात आधी भाऊ कदमांच्या तोरणा विहार ह्या प्राचीन उपहार गृहामध्ये मिसळीवर ताव मारला व पुण्याचे दिशेने प्रवास सुरु केला.
Khup sundar mahiti.
फोटो खुपच छान आहे आणि माहीतीसुध्दा