अग्निशिखांचा पळस

हि गोष्ट हजारो वर्षांपुर्वीची आहे. एक कमनीय राजकुमार, योध्दा, प्रेमी त्याच्या प्रिय पत्नी सोबत विंध्यपर्वताच्या वनातील येऊन दाखल झाले. शेकडो योजने अनवाणी पायी प्रवास करुन ते अत्यंत थकले होते. त्याची ती सुकांता तरुण पत्नी शारीरीक कष्टामुळे थकली जरी होती तरी तिच्या घामाने माखलेल्या चेह-यावरील तेज कमी झाले नव्हते. अचानक ते दोघेही जंगलातील अनुपम सौंदर्य पाहुन आश्चर्य चकीत झाले. त्या दृश्यावरुन त्यांची नजर हटत नव्हती. हजारो वृक्ष जणु जळत आहेत व आपल्या प्रत्येक शिखेतुन अग्नीच्या शिखा हळुवार बाहेर पाठवित आहे की काय असे वाटत होते. हे दृश्य पाहुन तो नायक अर्थातच सुकुमार राम या दृश्याविषयी सीतेस सांगताना जे शब्द वापरतो, त्या शब्दांनी जंगलातील हे अधिकच सुंदर झाले. तो म्हणाला,

आदिप्तानिव वैदेहि
सवर्त: पुष्पतान्नगान
स्वै: पुष्पै: किंशुकान्पश्य
मलिन: शिशिरात्यये

“हे सिते, हे मैथिली, या वसंतात पळसाच्या त्या वृक्षांनी जणु फुलांचे उत्तरीयच परिधान केले आहे असे वाटते. फुलांनी पुर्ण बहरलेला या वृक्षाने जणु अग्निशिखांनाच धारण केले आहे असे वाटते आहे.”

महाकवि वाल्मिकींनी त्यांच्या अजरामर महाकाव्यात केवळ एक कथाच, एक चरित्रच वर्णिल नाही तर वन-पुष्पसंपदा देखील ग्रंथित केली आहे. रामायणातील पळसाच्या वनाचा व त्याच्या फुलांचा हा उल्लेख प्राचीन आहे. त्यांच्या पश्चात अनेक कवी जसे महाकवि कालिदास व जयदेव यांनी देखील त्यांच्या चिरंतन काव्यरचनांना पळसाच्या अग्निपुप्षांचा साज चढवलेला दिसतो.

त्याही गतकाळातील मानता येईल असा उल्लेख ऋग्वेदामध्ये आढळतो पळसाचा. जसे पळसाची फुले व पळसाच्या काठीचा विधीपुर्वक बनविलेला दंड. हाच दंड मौजिबंधनात वापरला जातो भारतामध्ये आज ही वापरण्याची पंरपरा आहे.

पळसाच्या फुलांच्या पाकळ्या जणुकाही कामदेवाच्या बोटांची नखेच आहेत व त्याच अनकुचीदार नखांनी कामदेव कामातुर प्रेमी युगलांच्या हृदयांनाच जणु व्यथित करीत आहे; अशा शब्दांत उत्कलप्रदेशातील (आजचा ओरीसा) आणखी एक महाकवि जयदेव गोस्वामी यांनी पळसाच्या पाकळ्यांचा उल्लेख केला आहे. हे वर्णन गीत गोविंदम या काव्यरचनेमध्ये येते. आणि राधा व कृष्णाच्या अकल्य, अतर्क, अवर्णनीय, अलौकिक प्रेमाचे वर्णन करताना वरील प्रकारे पळसाकडे पाहण्याची एक नवीनच दॄष्टी आपणास देत आहेत. आणि जर तुम्ही पळसाच्या त्या नाजुक कळ्यांना नीट पाहिले असेल तर तुम्हाला जयदेव गोस्वामींनी दिलेली उपमा सार्थच वाटेल.

मृगमदसौरभरभसवशंवदनवदलमालतमाले।
युवजनहृदयविदारणमनसिजनखरुचिकिंशुकजाले॥

भारतातील प्रख्यात शास्त्रीय गायक डॉ बालमुरलीकृष्णा यांनी गायियेले गीतगोविंद तुम्हाला नक्कीच आवडेल.

वर मी अगदी मोजकीच काही नावे दिली आहेत कविंची की ज्यांना पळसाच्या फुलांनी भुरळ घातली व त्याच पळसाच्या फुलांनी या कवि लोकांच्या काव्याला सौंदर्य प्राप्त करुन दिले. शेकडो असे कवि आहेत की ज्यांनी त्यांच्या रचनांमध्ये पळसाला स्थान दिले आहे. यापैकी एक प्रख्यात नाव आहे गुर रविंद्रनाथ टागोर.

वसंतात ही धरती माता जणु एक नवीन अवतारच घेत असते. वृक्षांच्या शिखांना नवीन पालवी फुटते व त्याच शिखांच्या टोकाला फुलांचे गुच्छ देखील लगडतात. नव्या पालवीचा रंग व त्यातच वनात बहरणारा हा पुष्पसंभार धरती मातेला सजवुन टाकतो. अनेकविध रंगांची छटांची ही फुले जणु पृथ्वीच्या गळ्यातील हारच होतात व तिला अजुनही सुंदर बनवितात. कदाचित निसर्गाच्या याच रंगांच्या उत्सवाच्या धरतीवर आपल्या पुर्वजांनी होळी, धुळवड, रंगपंचमी सारख्या रंगारंग सणांना आपल्या संस्कृतीमध्ये स्थान दिले असावे. आपल्या संस्कृतीचे हेच वैषिष्ट्ये आहे की ती निसर्गाला अनुरुप आहे, निसर्गाला पुरक आहे. निसर्गातील अनेकविध घटनांकडे पाहण्याचा दृष्टीकोण आपणास आपली संस्कृती देते. जगातील अन्य क्वचितच सभ्यतांमध्ये क्वचितच असे पहावयास मिळते.

रविंद्रनाथ टागोरांनी त्यांच्या शांतिनिकेतन मध्ये, फाल्गुन महिन्याच्या पोर्णीमेला म्हणजे होळीपोर्णिमेलाच एक नवीनच उत्सव आरंभ केला. आज जगभरातुन हजारो लोक या उत्सवात सहभागी होण्यासाठी बंगालात दाखल होताहेत. सृष्टीच्या तसेच संस्कृतीच्या रंगात रंगुन जाताना मनुष्य मनुष्यातील भेद विरुन जातात. माधुर्य, प्रेम, प्रीती, आपुलकी, जिव्हाळा अशा मुलभुत मानवी, वैश्विक मुल्यांचे जणु जिवंत दर्शनच या उत्सवात होत असते. या उत्सवात टागोराम्च्या स्वतःच्या कवितेचा उपयोग शंभरपेक्षा जास्त वर्षे केला जात आहे. या गीताच्या सुरावर, तालावर , बोलावर आपोआप शेकडो स्त्रीपुरुषांची शरीरे थरकतात. आणि टागोरांनी या काव्यात पळसाचा उल्लेख केला नसेल तरच नवल. या सणात जो रंग वापरला जातो त्या पैकी एक रंग पळसाच्या फुलांपासुन देखील बनवितात.

ओरे गृहोबाशी, खोल द्वार खोल, लागले जो ढोल,
स्थोले, जले, बोनेतओले लागले जो ढोल, द्वार खोल, द्वार खोल
रंग हशि राशि राशि अशोके पलाशे,
रंग नेषा, मेघे मेषा प्रभातो अकाशे,
नोबिन पथय लागे रंग होल्लोल, द्वार खोल द्वार खोल

किती अदभुत आणि मधुर जीवनसंगीत आहे ना हे! मला वाटते तुम्हाला हे गीत पाहण्यास व ऐकण्यास नक्कीच आवडेल. खालील व्हिडीयो अवश्य पहा!

 

बाबा आमटे यांच्या ‘या सीमांना मरण नाही’ या कवितेत ‘ते मोहोर येतील, तेव्हा अंगार भडक होतील पळस; त्या आगीने दिपून जातील प्रासादांचे सारे कळस’ अशा ओळी आहेत. त्या वाचून बाबांना ‘ज्वाला आणि फुले’ या पुस्तकाचे नाव पळसफुलांवरून सुचले असेल, असे वाटते

मोरोपंतांना देखील त्यांच्या कृष्णार्जुन युध्द या काव्यात पळसाच्या या फुलांनी मोहिनी घातल्याचे दिसते. कृष्णाच्या मुखी पळसाच्या रक्त वर्णी नटण्याचे वर्णन खालील ओळींमध्ये दिसते.

रक्त वर्ण नटला पळसाचा
पार्थ सावध नसे पळ साचा

तुम्हाला प्लासीचे युध्द आठवतय का? पलासी असा त्याचा खरा उच्चार होता व इंग्रजांच्या नेहमीच्या चुकीच्या उच्चारामुळे त्याचा प्लासी असा अपभ्रंश झाला. पलासी हे एक ठिकाण आहे की ज्या ठिकाणी हे युध्द झाले होते.याला पलासी असे म्हणायचे कारण असे होते की या ठिकाणी पळसाची झाडे खुपच जास्त प्रमाणात असायची.

नैसर्गिक रंग बनवण्यासाठी या फुलांच्या पाकळ्यांचा उपयोग केला जायचा अजुनही काही भागात तसा उपयग करतात देखील. माझ्या लहानपणी मी देखील पळसाच्या व अनुअ फुलांपासुन रंग बनवण्याचा प्रयत्न केल्याचे मला आठवते आहे.

सुकलेली वाळलेली फुले रंग बनविण्यासाठी वापरतात. भारतात काही ठिकाणी रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळले जातात तर काही भागात पोर्णिमेच्या दिवशी. रंगपंचमीस वसंतपंचमी असे देखील म्हणतात. रंगांचा हा उत्सव आता जवळ येऊ घातला आहे. त्यामुळे पळसाच्या फुलांपासुन नैसर्गिक रंग कसे बनवावेत हे तुम्हाला सांगण्याची वेळ आली आहे. खालील व्हिडीयो मध्ये अवश्य पहा, पळसाच्या फुलांपासुन रंग कसा बनवितात ते!

या व्यतिरिक्त पळसाला आयुर्वेदामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. हजारो वर्षांपासुन पळस आयुर्वेद चिकित्सा पध्दतीमध्ये वापरला जात आहे. चरक संहिता व सुश्रुत संहितेमध्ये पळसाचा उपयोग कोणत्या व्याधी मध्ये कसा केला जातो याविषयी सविस्तर लिहिले गेले आहे. मी या लेखामध्ये पळसाच्या औषधी उपयोगांच्या बाबतीत सविस्तर काही लिहिणार नाहीये. तुर्त खालील व्हिडीयो मध्ये तुम्ही पाहु शकता की आयुर्वेदामध्ये पळसाचे स्थान काय व कसे आहे ते!

रंग बनवणे, खेळणे, औषधे, कविता एवढेच पळसाचे उपयोग नाहीयेत मित्रांनो. या वृक्षाच्या लाकडाचा उपयोग घरबांधणी मध्ये हजारो वर्षांपासुन केला गेला आहे. याच्या तीन प्रजाती आहे. केशरी अथवा लाल पळस, पिवळा पळस व पांढरा पळस, पैकी केशरी व पिवळा पळस मुबलक प्रमाणात आढळतो तर पांढरा पळस लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. पांढरा पळस तंत्र-विद्येमध्ये वापरला जातो असे समजते.

भारताच्या ब-याच भागात या फुलांची भाजी करुन खातात. मध्यप्रदेशातील एका वनवासी समाजामध्ये पानिया नावाची एक विशेष भाकरी केली जाते. ही बनविण्यासाठी पोळपाटावर किंवा समतल पृष्ठभागावर पळसाची पाने अंथरली जातात व मग त्यावर लाटण्याने पोळी लाटली जाते. मग लाटलेल्या पोळीला दोन्ही बाजुंनी पळसाची पाने व्यवस्थित लावली जातात. मग यास गाईच्या शेणापासुन बनवलेल्या गोव-यांच्या आगीवर अथवा निखा-यावर खरपुस भाजले जाते. पळसाच्या पानांचा धुर, तसेच अस्सल गोव-यांच्या धुरावरील या स्मोक्ड पोळ्या/भाक-यां, म्हणजेच पानिया चांगल्याच चवदार होतात.

याच्या फुलांचा मुळ उपयोग आहे परागीभवनासाठी मधमाश्या, पक्ष्यांना आकर्षित करुन घेणे. सोबतच  भारताच्या ब-याच भागात या फुलांची भाजी करुन खातात. मी पुण्याजवळील वेल्ह्यात पळसाच्या बोंडांची भाजी खाल्ली आहे. याच काळात साजरी केल्या जाणा-या महाशिवरात्रीला , पळसाची फुले वाहण्याची देखील परंपरा आहे. फी फुले मात्र झाडाखालुन गोळा केलेलीच असावीत. तोडलेली फुले देवाला आवडत नाहीत.

याच काळात साजरी केल्या जाणा-या महाशिवरात्रीला , पळसाची फुले वाहण्याची देखील परंपरा आहे. फी फुले मात्र झाडाखालुन गोळा केलेलीच असावीत. तोडलेली फुले देवाला आवडत नाहीत. सोबतच पशु-पक्ष्यांसाठी पळसाची फुले खाणे म्हणजे मेजवानीच.

याच्या तीन प्रजाती आहे. केशरी अथवा लाल पळस, पिवळा पळस व पांढरा पळस, पैकी केशरी व पिवळा पळस मुबलक प्रमाणात आढळतो तर पांढरा पळस लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. पांढरा पळस तंत्र-विद्येमध्ये वापरला जातो असे समजते.

आसमी भाषेत यास पोलश म्हणतात तर पलाश, ढाक, टेसु असे हिंदीत म्हणतात. कन्नड मध्ये मुथुगा तर मल्याळम मध्ये मुक्कापुयम, ब्रह्मवृक्ष, चमथा असे ही म्हणतात. मणिपुरी मध्ये पॅंगोंग तर मराठी मध्ये पळस असे संबोधले जाते. बास्टर्ड टीक, फ्लेम ऑफ द फॉरेस्ट, बेंगॉल किनो, पॅरोट ट्री अशी नावे इंग्रजीमध्ये आहेत. बोली भाषेत पळस तर संस्कृतात अग्निशिखा, किंशुक म्हणतात.

जगण्याची सामान्य तत्वे इतरांना सागंताना सहजपणे जुनी जाणती माणसे बोलुन जातात

कुठे ही जा पळसाला पाने तीनच

अशीच म्हण हिंदीत देखील आहे व उत्तर भारतामध्ये ती अनेक राज्यांमध्ये वापरली जाते.

ढाक के तीन पात

एकतर प्राचीन भारतीयांना वृक्षांचे ज्ञान होते हे या वरुन समजते व नुसते ज्ञान होते असे नाही तर हे ज्ञान स्थल-कालांच्या सीमांमध्ये बांधुन नव्हते. भारतीय देशाटन करणारे होते त्यामुळेच तर त्यांना हे माहित होते की कुठे ही गेले तरी पळसाला पाने तीनच असतात.

वैशाखात फुलांच्या पाकळ्या गळुन गेल्यावर या झाडाला शेंगा येतात. शेंगांच्या आत बीज असतात व हे बीज जमा करुन ठेवु शकलो तर आपण आपण योग्य ठिकाणी त्यांचे रोपण देखील करु शकतो. व्यवस्थित सुकलेले बीज, भिजलेल्या टिश्यु पेपरमध्ये गुंडाळून घ्यायचे. नंतर ती गुंडाळी एका हवाबंद करता येईल अशा प्लास्टीक पिशवीमध्ये, तीन दिवसांकरता ठेवावी. तिस-या दिवशी बीजे अंकुरीत झालेली असतील. त्यांनंतर अलगद हे अंकुरीत झालेले बीज, तुम्ही एक माती व शेणखताने भरलेल्या रोप बनविण्याची पिशवीत लावावे. साधारण सातव्या दिवशी रोप तयार झालेले असते.

श्रीरामप्रभुंच्या वनवासात, वने या वृक्षांनी भरलेली व भारलेली होती. या युगात मात्र यांची संख्या कमी होत आहे. हे अस्सल देशी वृक्ष वाढावेत, बहरावेत यासाठी जाणीवपुर्वक प्रयत्न होण्याची गरज आहे.

हेमंत ववले,
निसर्ग शाळा, पुणे
आता पहा, पळसाच्या फुलांचे काही अप्रतिम फोटो.

 

Palash – The flame of forest

 

Facebook Comments

Share this if you like it..

One thought on “अग्निशिखांचा पळस

  1. Pingback: रंग खेळण्यासाठी नैसर्गिक रंग कसे बनवावेत? – निसर्गशाळा – Camping near Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *