आकाशातील चित्तरकथा ब्रह्महृद्याची

उत्तर आकाशात अगदी ठळक पणे दिसणा-या दोन महत्वाच्या ता-यांपैकी एक आहे ब्रह्महृद्य तर दुसरा आहे अभिजीत. पैकी अभिजीत हा तारा उन्ह्याळात दिसतो तर ब्रह्महृद्य हिवाळ्यात सांयकाळी ७ च्या सुमारास अंधार पडताना दिसण्यास सुरुवात होते. आधुनिक खगोलशास्त्रामध्ये या ता-याला कॅपेला (Capella) असे म्हंटले जाते.

खरतर हा एक तारा नसुन यात दोन तारे आहेत. हा द्वैती म्हणजे जुळे तारे आहेत व यातील दोन्ही तारे एकमेकांभोवती फिरत असतात. यांना एकमेकांभोवती फिरण्यासाठी १०४ दिवस लागतात. तुर्त आपण या दोहोंना एकच तारा असे म्हणुयात.

तर ब्रह्महृय हा तारा ज्या तारकासमुहाचा भाग आहे त्याचे प्राचीन भारतीय खगोलींनी ठेवलेले नाव आहे प्रजापती. यास हल्ली सारथी या नावाने देखील ओळखतात. प्रजापती तारकासमुहातील सर्वात तेजस्वी व सर्वात मोठा दिसणारा व प्रत्यक्षात असणारा तारा म्हणजे ब्रह्महृद्य होय.

मनुष्यास दिसणा-या तारांगणामध्ये सर्वात तेजस्वी ता-यांच्या क्रमवारीत या ता-याचा वरुन सहावा क्रमांक लागतो इतका तो ठळक आहे.

ब्रह्महृद्य तारा/ प्रजापती ओळखायचे कसे?

तुम्हाला रोहीणी नक्षत्र ओळखता येत असेल तर रोहीणी ता-याच्या बरोब्बर खाली साधारणपणे दोन घरे , किंचित डावीकडे तुम्हाला सर्वात तेजस्वी तारा दिसेल तो म्हणजे ब्रह्महृद्य. तुम्हाला पुनर्वसु नक्षत्र माहिती असेल तर पुनर्वसुच्या अर्धा घर वर, डावीकडे दिसणारा सर्वात तेजस्वी तारा म्हणजे ब्रह्महृद्य. याला ओळखण्याची आणखी एक सोपी पद्धत म्हणजे ईशान्य आकाशातील सर्वात तेजस्वी ता-यांचा काटकोन त्रिकोण बनवणे. यातील पहिले दोन तारे ओळखण्यास अगदी सोपे आहेत. पहिला तारा म्हणजे मृगनक्षत्रातील सर्वात तेजस्वी तारा (बेटेलगुज) , दुसरा तारा म्हणजे रोहीणी नक्षत्रातील सर्वात तेजस्वी तारा याला ९० अंशाचा कोन दिला तर तिसरा तारा म्हणजे ब्रह्महृद्य. बेटेलगुज व रोहीणी यांच्या पासुन (खाली) डावीकडे असणारा सर्वात तेजस्वी तारा म्हणजे ब्रह्महृद्य होय.

या तारकासमुहाचा वा ता-याचा उल्लेख अनेक प्राचीन संस्कृत्यांनी केलेला आहे. प्राचीन भारतीय खगोल व ज्योतिषामध्ये मुळ नक्षत्र पट्ट्यातील २७ किंवा २८ नक्षत्रांशिवाय उल्लेख केलेल्या मोजक्याच नक्षत्रांमध्ये या नक्षत्राचा उल्लेख आहे. नक्षत्रातील मुख्य तारा प्रजापतीचे हृद्य म्हणुन पाहिले गेले. प्रजापती म्हणजे आदीब्रह्म.

याच्याच २७ कन्या म्हणजे २७ नक्षत्रे होत. या २७ कन्या म्हणजेच चंद्राच्या २७ पत्नी होत. सुर्य, चंद्र तथा आपल्या सुर्यमालेतील सर्व ग्रह याच २७ नक्षत्रांच्या पट्ट्यातुन तथा आसपास प्रवास करताना भासतात. आधुनिक खगोलातील ecliptical path म्हणजेच क्रांतीवृत्त देखील थोड्याफार फरकाने याच प्रमाणे भासते. तर या २७ नक्षत्रांपैकी नसले तरीही भारतीय खगोलींनी या तारकासमुहाचा उल्लेख केलेला आढळतो.
सुर्यसिद्धांत या खगोलीय ग्रंथामध्ये ब्रह्महृद्याबाबतील खालील श्लोक येतो.

हुतभुग्ब्रह्महृद्यौ वृषे द्वाविंंशभागगौ ॥
अष्टाभिः त्रिंशता चैव विक्षिप्तावुत्तरेण तौ ।
सुर्यसिद्धांत हा प्राचीन भारताचा खगोलातील एक अतिशय सखोल माहिती उध्दरणे व आकडेवारी सहीत असलेला ग्रंथ आहे. हा ग्रंथ म्हणजे खगोलाची निव्वळ ओळख असा नाहीये तर यामध्ये खुपच जास्त खोलात जाऊन निरीक्षणे नोंदवलेली आढळतात. खगोलातील तुटपुंजे ज्ञान घेऊन या ग्रंथाचा अभ्यास करता येऊ शकत नाही. तुम्ही तज्ञ खगोली असाल तरच तुम्हाला या ग्रंथाचा व त्यातील खगोलीय ज्ञानाचा ठाव लागेल. या पुस्तकाचे प्राचीनत्व किती आहे या विषयी मागील वर्षीच एका तरुण भारतीय अभ्यासकाने सविस्तर माहिती वैज्ञानिक कसोट्यांच्या आधारावर दिलेली आहे. यांच्या अभ्यासानुसार सुर्य सिध्दांत हे पुस्तक १२००० वर्षांपुर्वी लिहिलेले आहे. असो या लेखामध्ये आपण सुर्यसिध्दांत या पुस्तकाच्या बाबतीत खोलात जाण्याची गरज नाहीये. पुन्हा कधीतरी या ग्रंथाबाबत आपण सविस्तर माहिती मराठी मधुन घेऊयात.

तर प्राचीन भारतीय खगोलींना ज्या प्रमाणे ब्रह्ममंडळ माहिती होते त्याच प्रमाणे रुढींच्या आधाराने ब्रह्महृद्य हा तारा जनसामान्यांमध्ये देखील पुजिला जायचा.

ब्राझिल मधील मुळनिवासी म्हणुन संबोधले जाणारे बोरोरो संस्कृतीच्या लोकांनी या नक्षत्रामध्ये एक सुसर पाहिली. अर्थात सुसरच का तर ब्राझिलच्या वर्षावनांमध्ये मगरी सुसरींचे प्रमाण जास्त आहे व आकाशातही त्यांना तत्सम प्राणी दिसला नाही तरच नवल. मेसोअमेरिकन मुळ संस्कृतीमध्ये देखील या तारकासमुहाविषयी माहिती असल्याचे दिसते. मार्शल आयलंड बेटावरील आख्यायिकांमध्ये ऑरिगा म्हणजे त्यातील ब्रह्महृद्य या ता-याविषयी असे सांगितले जाते की यच्चयावत सर्वच ता-यांची जी माता आहे तिचा सर्वात मोठा/थोरला मुलगा डुमूर हा Antares म्हणजेच ज्येष्टाचा तारा आहे व सर्वात लहान/धाकटा तारा (/तारकासमुह)  Pleiades (कृत्तिका) होय. आणि सर्वच ता-यांची माता म्हणुन बोट केले  जाते ते म्हणजे Capella कडे म्हणजेच ब्रह्मह्र्द्य कडे.

पश्चिम आशियातील टायग्रिस, युफ्रेटीस नदीच्या काठावरील प्राचीन मेसोपोटेमिया च्या लोक या तारका समुहास GAM म्हणजेच बाकदार तलवार म्हणायचे. नंतरच्या काळात वाळवंटातील भटक्या (अरबी)  टोळ्यांनी आकाशातील तारकासमुहांना प्राण्यांची नावे दिली. त्यामध्ये सारथी या समुहाचे नाव शेळ्यांचा कळप असे झाले.

शेळ्यांचा कळप हे नाव प्राचीन ग्रीक लोकांनी या समुहास दिलेल्या नावाशी जुळणारे आहे. ग्रीक पुराणांमधील अथेन्स या शहराचा नायक एरिक्थओनियस ला या तारकासमुहाशी जोडले आहे. अथेना नावाच्या देवीने अगदी बालक असल्यापासुन याचा सांभाळ केला. चार घोड्यांच्या रथाचा शोधकर्ता म्हणुनही एरिक्थओनियसला ओळखले जाते. अशाच एका रथाचा उपयोग एका युध्दात त्याने शत्रुला पराभुत करण्यासाठी केला आणि विजयी झाला. देवाधिदेव झिऊस ने मग प्रसन्न होऊन एरिक्थओनियस ला स्वर्गात म्हणजेच आकाशात स्थान दिले. ग्रीकोरोमन पुराणांत आकाशातील तारे-तारकासमुहांचा संबंध विविध गोष्टींच्या रुपाने पुराणांतील पात्रांशी जोडलेला दिसतो.

आता आपण पाहुयात या ता-या विषयी तसेच तारकासमुहा विषयी रोचक अशी खगोलीय माहिती.

वर सांगितल्याप्रमाणे प्रजापती/सारथी म्हणजे ऑरीगा या तारकासमुहातील सर्वात तेजस्वी तारा म्हणजे ब्रह्महृद्य. हा तारा दृश्य विश्वातील वरुन सहाव्या क्रमांकाचा प्रखर तेजस्वी तारा आहे. याचे पृथ्वीपासुनचे अंतर अंदाजे ४३ प्रकाशवर्षे इतके आहे. हा खरतर एक तारा नसुन दोन म्हणजे द्वैती (binary star system) तारा आहे. द्वैती तारा दोन तारे एकमेकांभोवती सातत्याने फिरत आहेत. ज्याप्रमाणे आपल्या सुर्याभोवती सारे ग्रह फिरतात त्याच प्रमाणे हे दोन तारे एकमेकांभोवती प्रदक्षिणा घालीत राहतात. अशाच एका जुळ्या ता-याविषयी आपण आणखी एका लेखात माहिती घेतली, आहे का लक्षात? अरुंधती वसिष्ट, बरोबर ना? अरुंधती वसिष्ट विषयी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

कॅपेला म्हणजेच ब्रह्महृद्य हा तारा आपल्या सुर्यापेक्षा १२ आकाराने मोठा असुन तो १६० पट जास्त तेजस्वी आहे.

ऑरीगा मध्ये कॅपेला हा काही एकच जुळा तारा नाहीये. एप्सिलोन ऑरीगा हा देखील एक जुळा तारा असुन तो ग्रहणकारी (Eclising binary stars) देखील आहे. उघड्या डोळ्यांना एकच दिसत असला तरी प्रत्यक्षात दोन आहेत व ते एकमेकांभोवती प्रदक्षिणा घालित आहेत. या ता-यापासुन येणा-या प्रकाशामध्ये होणा-या बदलावरुन समजते की छोटा तारा मोठा तारा व पृथ्वी यांच्या मधोमध आला आहे. अर्थात ही निरीक्षणे म्हणतो तितकी सोपी नसतात. या तारकासमुहत Haedi  नावाचा तारा देखील असाच ग्रहणकारी आहे. थीटा ऑरीगा हा देखील आणखी एक जुळा तारा आहे याच तारकासमुहामध्ये.

युरोपातील थॉमस ॲण्डरसन या अभ्यासकाने याच तारकासमुहामध्ये एक विस्फोट पाहिला. परसबागेतुन आकाशनिरीक्षण करीत असताना थॉमस ला ऑरीगा मध्ये एक तारा दिसला तो १८९१ च्या शेवटास. आकाशाच्या त्या भागा्चे निरीक्षण तो करीतच राहिला पुढील काही आठ्वडे. पण त्याला या ता-याची प्रखरता वाढल्याचे जाणवले. म्हणुन त्याने पुनःपुन्हा पाहिले तर खरच प्रखरता वाढली असल्याची त्याची खात्री झाली. पुढे स्कॉटीश खगोल वैज्ञानिकांकडे त्याने ही माहिती पोहोचवली. त्याच्याच पुढच्या आठवड्यात त्या स्फोटाचे निरीक्षण spectroscopic चा वापर करुन करण्यात आले. spectroscopic  चा असा वापर करुन पाहण्यात आलेला पहिला स्फोट म्हणजे T-Auriga. T कदाचित थॉमस या नावाच्या पहिल्या अक्षरावरुन आहे . मागील अख्खे शतक या स्फोटाची प्रखरता कमी कमी होत गेली. आता हा स्फोट खुपच फिकट झालेला आहे तो ही केवळ मोठ्या दुर्बिणीतुनच दिसतो.

या तारकासमुहाचे आणखी एक वैशिष्ट्यं आहे ते म्हणजे यात सौर माले सारख्याच ग्रहमाला आहेत. HD 40979  या ता-याभोवती एक ग्रह गतिमान आहे. या ग्रहाचे नाव HD 40979  b असे ठेवले आहे. उघड्या डोळ्यांनी दिसण्याच्या मर्यादेच्या अगदी थोडासाच बाहेर हा तारा आहे. साधारण आपल्या सुर्याइतक्याच आकाराचा, प्रखरतेचा हा तारा असुन ग्रह मात्र आपल्या गुरु पेक्षा तिप्पट मोठा आहे आकाराने. हा ग्रह त्याच्या ता-याभोवती एक प्रदक्षिण साधारण २६३ दिवसांत पुर्ण करतो. या शिवाय ऑरीगा तारकासमुहात अन्य पाच असे तारे आहेत की ज्यांच्या भोवती ग्रह फिरत आहेत.

आपल्या आकाशगंगेला एक केंद्र आहे व त्या केंद्राभोवती आकाशगंगेतील सर्वच तारे फिरत आहेत, अगदी आपला सुर्य देखील; हे तर आपणास माहित आहेच. पण आज कदाचित थोडीशी नवीन माहिती घेऊ आपण. या केंद्राच्या बरोब्बर विरुध्द दिशेला म्हणजेच ऑरीगा तारकासमुहात मध्ये Galactic Anticenter आहे. आपल्या सुर्यापासुन, आकाशगंगेचे बाहेरची कड याच दिशेला सर्वात जवळ आहे. याच पट्ट्यात अनेक विस्तृत तारकापुंज आहेत. प्रत्येक तारकापुंजामध्ये हजारोंच्या संख्येने तारे आहेत. यापैकी अधिक प्रभावशाली असलेले open clusters म्हणजे M36, M37 व M38. हे तारकापुंज आपण दुर्बिणीतुन पृथ्वीवरुन, अंधा-या भागातुन पाहु शकतो. या शिवाय ऑरीगा मध्ये अजुनही चार ओपन क्लस्टर्स आहेत.

ऑरीगा तारकासमुह यातुन उदभवणा-या, अनिश्चित उल्का वर्षावासाठी देखील प्रसिध्द आहे. कार्ल क्लेरेंस कियेस नावाच्या शास्त्रज्ञाने शोधलेल्या धुमकेतुला त्या शास्त्रज्ञाचेच नाव दिले गेले आहे. त्याने हा धुमकेतु १९११ मध्ये शोधला. पुढे या तारकासमुहातुन १९३५ साली उल्का वर्षाव झाला. पुढचे ५० वर्षे उल्कावर्षाव झालाच नाही. तर १९८६ , १९९४ मध्ये उल्कावर्षाव झालेला आढळला. शेवटचा उल्कावर्षाव २००७ साली झाला. ताशी १०० उल्का त्याही निळ्या-हिरव्या रंगांच्या छटा असलेल्या वर्ष २००७ मध्ये, पुर्व अंदाजानुसार पाहिल्या गेल्या. दरवर्षी २८ ऑगस्ट ला हा वर्षाव सुरु होतो व एक सप्टेंबर ला सर्वात जास्त होतो.  डिसेंबर ११ ते २१ जानेवारी या कालावधीत एक , जानेवारी ३१ ते फेब्र २३ दुसरा, तर सप्टें २२ ते ऑक्टो २३ या काळात तिसरा असे आणखी तीन उल्का वर्षाव देखील या तारकासमुहातुन दिसतात. पण हे तीन उल्का वर्षाव तुलनेने खुपच कमी उल्का पडण्याचे असतात.

ही झाली आपली ब्रह्महृद्याची आकाशातील चित्तरकथा।

वाचत रहा अशाच आकाशातील चित्तरकथा निसर्गशाळा वेबसाईट वर. खगोलविज्ञानातील रंजक, रोचक वैज्ञानिक माहिती मिळविण्यासाठी खालील व्हॉट्सॲप नंबर वर ‘लेख नोंदणी’ असे लिहुन तुमचे नाव लिहुन पाठवा म्हणजे वेळोवेळी तुम्हाला अद्यतने प्राप्त होत राहतील.

कळावे

आपला

हेमंत ववले, निसर्गशाळा

९०४९००२०५३

Facebook Comments

Share this if you like it..