मला अमर व्हायचय, आम्हाला अमर व्हायचय, आमचा जन्म झाल्याय पण आम्हाला मृत्यु नकोय अशी कामना खरतर कुणी करणार नाही. याचे कारण असे की आपण ज्या पद्धतीने सुख व दुख या दोंहोंचा अनुभव करतोय, विशेषतः त्यातील दुःखच जास्त असते. त्यामुळे सहसा अशी कामना साधारण मनुष्याने करणे तितकेसे संभव नाही. पण ज्यांच्याकडे नावालाही दुःख नाही, दारिद्र्य नाही, चिंता नाही , अमाप संपत्ती आहे, शक्ति आहे, सत्ता आहे अशांना अमरत्वाचे स्वप्न दिवसा पडले तर त्यात नवल ते कसले. अशीच स्वप्ने देव आणि दानव , सुर व असुर अशा दोन्ही प्रजातींना पडली. दोघेही मग पोहोचले ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाने त्या दोघांनी ही अमरत्वाचे गुपित सांगितले.
महासागराच्या तळाशी तुम्हाला अमृत सापडेल. त्यासाठी महासागराला ढवळावे लागेल. दही जसे आपण ढवळते अगदी तसेच. त्यातुन मग शेषनागाला दोरखंडांसारखे वापरुन व मैनक पर्वताला लाकडासारखे वापरायचे ठरले. देवासुरांमध्ये भांडणे जरी असली तरी एकत्र आल्याशिवाय, मिळुन काम केल्याशिवाय सागर मंथन करता येणे शक्य नव्हते हे लक्षात येऊन त्यांनी सागर मंथनास सुरुवात केली. मंथनातुन अनमोल रत्ने, जडजवाहिर, खनिजे द्रव्य बाहेर येऊ लागले. सर्वात शेवटी अमृत कलश मिळाला. देवांना या कलशातील अमृत असुरांना द्यायचे नव्हते. त्यामुळे विष्णु ने मोहिनी रुप घेऊन सर्व असुरांना मोहित करुन टाकले. देवासुरांच्या दोन रांगा करुन तिने दोघांमध्ये अमृत वाटण्याचा प्रस्ताव ठेवला. दोघांना तो मान्य झाला. मोहिनी ने प्रथम देवांच्या रांगेपासुन सुरुवात केली. असुर मोहित झालेले होते. देवांची रांग संपेपर्यंत अमृत शिल्लक राहणार नाही याची त्यांना जाणिव अजिबात नव्हती. तिच्या अनुपम सौंद्र्यावर भाळलेले असुर आशाळभुत नजरेने फक्त तिच्याकडेच पाहत राहिले. असुरांतील एक असुर स्वरभानु मात्र सजग होता. त्याला हा सगळा प्रकार काय घडत आहे समजले व त्याने हुशारीने पटकन देवांच्या रांगेमध्ये जाऊन बैठक मांडुन ‘आ’ केले. अमृताचा एकच थेंब त्याच्या तोंडात पडला. तो थेंब गळ्यातुन खाली उतरण्याच्या आधीच चंद्रदेव व सुर्य देव यांनी मोहिनीला स्वरभानुची हकिकत सांगितली. मोहिनीने स्फुर्तीने स्वरभानुचे शिर धडापासुन वेगळे केले. पण तो पर्यंत उशिर झालेला होता. अमृत शरीरात देखील पोहोचले होते. त्यामुळे शिर व धडाचे तुकडे जरी झालेले होते तरी शिर वेगळ्या ठिकाणी व धड वेगळ्या ठिकाणी जिवंत होते. शिर मग राहु, च्या रुपाने राहिले, अजुन ही आहे तर धड केतुच्या रुपाने ओळखले जाते. स्वरभानु मात्र त्याच्यावर झालेल्या अन्यायाला सुर्य देव व चंद्रदेव यांनाच जबाबदार धरुन युगानुयुगे तो बदला घेण्यासाठी सुर्य व चंद्राला गिळण्याचा प्रयत्न करतो. पण राहु ला धड नसल्याने गिळलेला सुर्य अथवा चंद्र थोड्याच वेळात पुन्हा आकाशात स्थिर होतो. राहुने गिलंकृत केलेले सुर्य चंद्र मात्र आपण हजारो वर्षे सुर्यग्रहण व चंद्रग्रहणाच्या रुपात पाहत आलो आहोत.
सुर्य ग्रहणाचा सर्वात प्राचीन उल्लेख आढळतो तो म्हणजे ऋग्वेदामध्ये. त्यानंतर देखील अनेक पुराणांमध्ये सुर्यग्रहण अथवा चंद्रग्रहणाचे उल्लेख आढळतात. रामायण महाभारतामध्ये देखील सुर्यग्रहण व चंद्रग्रहणाचे उल्लेख आढळतात. कदाचित ग्रहणांचे हे उल्लेख, इतके प्राचीन उल्लेख फक्त भारतामध्येच सापडतात. त्याही अलीकडील एक उल्लेख बॅबिलोनियन संस्कृतीमधील एका मृत्तिकेवर आढळला आहे. भारतात ज्याप्रमाणे सुर्यग्रहण व चंद्रग्रहणावरुन श्रध्दा-अंधश्रध्दा होत्या तशा सा-या जगात होत्या. त्याचप्रमाणे पाचव्या शतकातील गणितज्ञ आर्यभट्ट यांनी ज्यापधद्तीने ग्रहणांची वैज्ञानिक मिमांसा करुन, गणिते मांडुन हे सिध्द केले की ग्रहणे ही पृथ्वीच्या अथवा चंद्राच्या सावलीमुळे होतात. आर्यभट यांनी तर पुढे जाऊन येणा-या ग्रहणांची भाकिते करण्यासाठी एक पध्दतीच विकसित केली. ती पध्दत आज ही पंचांग कर्ते वापरीत आहेत. अशा पद्धतीने भाकिते मांडणे बॅबिलोनियन संस्कृतीमध्ये देखील व्हायचे. बाकी सर्वत्र ग्रहण म्हणजे अशुभ शकुन अश्याच रुपात त्यांच्याकडे पाहिले जायचे. आजही भारतात देखील ग्रहणांच्या बाबतीतील अवैज्ञानिक दृष्टीकोनच जास्त दिसतो.
असो.
गम्मत अशी आहे की येत्या काही दिवसांमध्ये आपणास चक्क दोन ग्रहणे दिसण्याची शक्यता आहे. पहिले सुर्यग्रहण आहे ते २६ डिसेंबर २०१९ रोजी. यातही अधिक आनंदाची बाब अशी की भारतातुन देखील हे ग्रहण दिसणार आहे. अगदी पुर्ण ग्रहण म्हणजे खग्रास ग्रहण पाहण्याची संधी भारतीयांना मिळत आहे. दक्षिण भारतातील एका विशेष भुभागाच्या पट्ट्यातुन आपण हे खग्रास म्हणजे पुर्ण कंकणाकृती ग्रहण पाहु शकतो. व अन्य भागातुन हे खंडग्रास म्हणजे पार्शल ग्रहण दिसणार आहे. उत्तर भारतातुन हे दिसणार नाही. खाली दिलेल्या यादीतील शहरांमधुन हे ग्रहण कंकणाकृती दिसेल. आणि अनेक जणांसाठी ही त्यांच्या आयुष्यातील कदाचित शेवटची संधी असु शकेल कंकणाकृती सुर्य ग्रहण पाहण्याची. त्यामुळे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तुम्ही चक्क दक्षिण भारत पर्यटनासाठी जरी घराबाहेर पडलात तरी चालण्यासारखे आहे.
- मेंगुलुरु Mangaluru, Karnataka, India
- कासरगोड Kasaragod, Kerala, India
- थलसरी Thalassery, Kerala, India
- कलपेट्टा Kalpetta, Wayanad, Kerala, India[3]
- कोझिकोड Kozhikode, Kerala, India
- उटकमुंड Ootacamund, Tamil Nadu, India
- पलक्कड Palakkad, Kerala, India
- कोईंबतुर Coimbatore, Tamil Nadu, India
- इरोदे Erode, Tamil Nadu, India
- करुर Karur, Tamil Nadu, India
- डिंगिगुल Dindigul, Tamil Nadu, India
- शिवगंगा Sivaganga, Tamil Nadu, India
- तिरुचिरापल्ली Tiruchirappalli, Tamil Nadu, India
- पुदुक्कोत्ताई Pudukkottai, Tamil Nadu, India
महाराष्ट्रामधुन आपणास खंडग्रास ग्रहण दिसणार आहे. हे ग्रहण (खंडग्रास) पाहण्यासाठी विशेष ठिकाणी जाण्याच्या आवश्यकता नाही. तुमच्या घराच्या छतावरुन, एखाद्या मोकळ्या मैदानावरुन देखील तुम्ही हे पाहु शकता. सुर्यग्रहण पाहताना घ्यायची काळजी काय आहे ते देखील थोडक्यात समजुन घेऊ.
सूर्य ग्रहण पाहताना डोळ्यांच्या सुरक्षेसाठी आवरण चढविणे गरजेचे आहे. विशिष्ट प्रकारचे सोलर फिल्टर असणारा गडद रंगाचा गॉगल ग्रहण पाहताना घालावा, किंवा एखाद्या जुन्या एक्स-रे फिल्म मधून सूर्य ग्रहण पाहावे.
भारतामधुन कंकणाकृती व खंडग्रास ग्रहण कुठून दिसेल हे खालील व्हिडीयोमध्ये पहा.