मृत्यु, मोक्ष आणि मोक्षकाष्ट

मी नेहमीप्रमाणे रनिंग करुन आलो, घामाघुम झालो होतो त्यामुळे खुपच जास्त उत्साही होतो. आणि अशा वेळी जे काही काम करायला घेतो ते लवकर तर होतेच पण चांगलेही होते असा माझा अनुभव आहे. लॅपटॉप सुरु केला आणि व्हॉट्स ॲपवर एक सुंदर लेख वाचण्यास मिळाला. लेखकाचा नंबर देखील होताच, त्यांचे लेखन व विषय कुतुहलाचा असल्याने व तितकाच सक्षमपणे माडल्याने, त्यांना फोन करुन लेख आवडल्याचे सांगणे मला गरजेचे वाटले. मी फोन केला व माझी भावना व्यक्त केली. आमचे संभाषण दोनतीन मिनिटांतच आटोपणार इतक्यात काहीतरी दुसराच विषय निघाला आणि एक नवीनच आयाम, दालन माझ्या समोर उघडे झाले.

आमचे बोलणे लांबले ते जवळजवळ ५० मिनिटांपर्यंत. फोनवर बोलणे झाले आणि मी मात्र विचारांत पडलो. मनुष्य सर्वस्वी निसर्गावर अवलंबुन आहे हे तर आपण जाणतोच. कितीही मेट्रोपॉलिटन, आधुनिक आपण झालो तरी आपण निसर्गाकडुन फक्त आणि फक्त घेतच आलो आहोत. निसर्गाच्या अन्नसाखळीत मनुष्याची भुमिका केवळ परावलंबी आणि उपद्रवी प्राणी एवढीच आहे. निसर्गातील मधमाशी देखील कायमची संपुष्टात आली, तरी केवळ काही वर्षांतच या पृथ्वीवर वाळवंट तयार होईल कारण अन्नसाखळी तुटेल. असे अनेक जीव, किटक आहेत की ज्यांमुळे ‘जीवो जीवस्य जीवनम’ चा खरा अर्थ समजतो. पण या जीवो जीवस्य जीवनम मध्ये माणुस कुठे आहे बरे? माणसाचे योगदान ते काय, निसर्गाच्या संवर्धनासाठी? उलट आपण जो पर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आपण निसर्गाकडुन नुसते घेतच आहोत, साधा श्वास घेण्यासाठी प्राणवायू देखील आपण व्यवस्थित पुरवू शकलो नसल्याने आपण पाहिले की, आपल्याच देशात तसेच परदेशात हजारो, लाखो माणसे कोरोना काळात मृत्युमुखी पडली. बरोबर ना? मग मला सांगा आपले असणे म्हणजे निसर्गाचे एका अर्थाने नुकसानच ना? आपण वीज वापरतो म्हणजे निसर्गाचे नुकसान, आपण वाहन वापरतो म्हणजे निसर्गाचे नुकसान, आपण वातानुकूलन यंत्रणा वापरतो म्हणजे निसर्गाचे नुकसान, आपण पोल्ट्री उत्पादने खातो म्हणजे निसर्गाचे नुकसान, आपण प्रकाशाचे दिवे वापरतो म्हणजे निसर्गाला अपाय. आपण निसर्गाकडुन सदानकदा केवळ घेतच आहोत किंवा त्याला अपाय तरी करीत आहोत. आपल्या असण्याने आपण एवढे नुकसान करतो तर आपण मेलेले बरे नव्हे का?

तर मित्रांनो, आपले मरणे देखील निसर्गाच्या मुळावर उठले आहे असा साक्षात्कार मला लिमयेंशी बोलल्यावर झाला. माझा मृत्युदेखील निसर्गाकडुन काहीना काही घेतोच आहे, आणि हे काहीना काही म्हणजे असेच काहीतरी फुटकळ नाहीये, तर माझ्या सारख्या एका पुर्ण वाढ झालेल्या व्यक्तिच्या दाहसंस्कारासाठी चक्क दोन मोठाली म्हणजे, किमान पंधरा ते वीस वर्षे वयाची झाडे तोडली जातात व मृत शरीराची राख करण्यासाठी जाळली जातात.

काही माणसे खुपच संवेदनशील असतात, तर काहींच्या गावीही नसते की त्यांच्यामुळे कुणाचे काही नुकसान होत आहे, कुणाला काही त्रास होत आहे, अशा असंवेदनशील माणसांमुळे इतर माणसांना, त्यांचे नातेवाईक, पती-पत्नी, मित्रपरिवाराला दुखः होत असते पण असे आपल्यामुळे दुखः होत असावे अशी पुसटशी कल्पनाही त्यांना नसते, ते आपल्याच मस्तीत आणि प्रौढीत मिरवित असतात. मग अशा माणसांमुळे निसर्गाला काही हानी होत असली तर ती त्यांना कळणे अशक्यच. तुम्ही हा लेख वाचत असाल तर खुप मोठी शक्यता आहे की तुम्ही अशा असंवेदनशील लोकांच्या यादीत नाही आहात. हे लोक सर्रास कुठेही काहीही करीत असतात, अगदी गाडीतुन जाता जाता अन्न पदार्थांचे रॅपर बाहेर भिरकावुन देणे, बिनदिक्कत खरीदारी करताना प्लास्टीकच्या पिशव्यांचा खच करणे आणि त्यांचा पुर्नवापर न करणे, ओला-सुका कचरा वेगळा न करणे, चालताना सहजच किव्वा गम्मत म्हणुन एखाद्या झाडाझुडूपांची फांदी तोडणे असे छोटे छोटे उपद्व्याप नित्याने करणारे जसे आहेत तसेच उत्खनन, वृक्षतोड, नद्या-नाल्यांचे प्रवाह बदलणे, इंधनासाठी जीवाश्म इंधनासाठी मोठमोठे प्रकल्प उभारणे हे सगळे अगदी बिनदिक्कत सुरु आहे व ते ही जाणतेपणी.

मला जेव्हा लिमयेंकडुन हे समजले की एका माणसाला जाळण्यासाठी इतकी मोठी झाडे तोडावी लागतात व असे झाडे तोडणे भारतात सर्वत्र सुरु आहे तर मला धक्काच बसला. आपल्या संस्कृती मध्ये मनुष्य नावाच्या प्राण्याला माणुस करण्यासाठी म्हणुन जे १६ संस्कार सांगितले आहेत त्यातील शेवटचा संस्कार म्हणजे दाहसंस्कार, त्यामुळे अग्निसंस्कार म्हणजे आपल्यासाठी खुपच महत्वाचा विषय होऊन जातो. माझा अंत्यसंस्कार कसा करायचा हे मी कदाचित नाही ठरवु शकत, पण माझे आप्तेष्ट हे ठरवितात.  आपल्या पंरपरेनुसार मृतशरीराला अग्नि देऊन  पंचतत्वामध्ये मोकळे करतात. भारतीय दर्शनांमध्ये पंचमहाभुते, पंचप्राण आदी संकल्पना खुपच प्रगल्भ आहेत. या संकल्पनांची तत्विक बाजु समजुन घेतली तर समजते की आपण केवळ कर्मकांडामध्येच अडकुन पडलो आहोत व तत्वांचा मुळ गाभाच आपण सोडुन दिला आहे. नुसते मृत-शरीर जाळल्याने त्यास मोक्ष मिळतो का? मृत शरीर तर निव्वळ निष्प्राण जड अणुरेणुंचा ढिगच नव्हे का? मग या  निरुपयोगी जड देहास जाळण्यासाठी कशासाठी म्हणुन झाडे तोडायची, निसर्गाची हानी करायची? भारतीय संस्कृती, दर्शने, कर्मकांडे ख-या अर्थाने विकसनशील व कालनुरुप बदलणारी आहेत याची अनेक उदाहरणे आपण आपल्या संस्कृतीमध्ये पाहु शकतो. कित्येक कालबाह्य संकल्पना आपण कधीच सोडुन दिल्या आहेत व कित्येक संकल्पना आपणास अजुनही सोडायाच्या आहेत. अधिक उदात्त व मुळ पंरपरेचा मुळ गाभा न सोडणारे नवविचार प्रवाहात येतील यात शंका नाही.कदाचित आजपासुन शेकडो वर्षांपुर्वी, जेव्हा लोकसंख्या वाढलेली नव्हती तेव्हा अग्निसंस्कारांसाठी अशी झाडे तोडल्याने निसर्गाचे, पर्यावरणाचे नुकसान होत नसायचे. कारण मनुष्य मृत्यु दरापेक्षा जंगल वाढीचा दर जास्त असल्याने हिरवे छत्र कायम रहायचे. आता तसे नाहीये. एकट्या भारत देशाचा विचार केल तर आपणास ऐकुन धक्का बसेल; लिमये सांगत होते की भारतात दर वर्षी सरासरी ९० लाख मृतदेहांना आपणास अग्नी द्यावा लागतो. म्हणजेच वर्षाला एक कोटी ८० लक्ष वृक्षांची कत्तल , भारतात अधिकृतपणे होत आहे. हेच क्षेत्रफळाच्या भाषेत पाहिले तर आपण दरवर्षी अंदाजे १०० वर्ग किमी इतके जंगल केवळ अंतिम संस्कारांसाठी नष्ट करीत आहोत. परदेशी झाडांची लाकडे फारशी उपयोगाची नसतात कारण ती जास्त वेळ जळत नाहीत, जलद जळुन जातात व त्यामुळे मृत शरीर पुर्णपणे जळत नाही. त्यामुळे आपली अस्सल देशी झाडेच, की या पर्यावरणाचा आधार आहेत तीच तोडावी लागत आहेत. प्रत्येक नगरपालिकेत, नगरपरिषदेत तुम्हाला असे लाकडांचे खच दिसतील. असे लाकडांचे खच तुम्हाला दिसत असले तर तुम्ही अजुनही नीट पाहिलेले नाही असे म्हणावे लागेल. मला ते झाडाच्या मृत शरीरांचे ढिग दिसतात. नीट पाहिल्यास समजेल तुम्हाला. अर्थात जोपर्यंत लोकसंख्या कमी होती तोपर्यंत हे ठिक देखील होतेच. मृत शरीर जाळुन विल्हेवाट लावणे कधीही चांगलेच जेणेकरुन रोगराई पसरणार नाही. स्वच्छता राखली जाते. आपल्या संस्कृतीमध्ये तर ‘सावडणे’ सारखी जी पध्दत आहे ती खुपच छान आहे. यामध्ये चिता जळुन झाली की मग दुस-या दिवशी त्या राखेतुन काही अस्थी काढल्या जातात आणि मग राखेचा तो ढिग एकतर वाहत्या पाण्यात अथवा जमिनीत पुरला जातो. नंतर चिता रचलेली जागा शेण-गोमुत्र याद्वारे स्वच्छ केली जाते. हे सर्व करते कोण? तर ज्या माणसाने अग्नी डाग दिला तोच करतो, जो सर्वात जास्त दुःखात असतो त्यालाच हे स्वच्छतेचे काम करावे लागते. स्वच्छता अशा पध्दतीने कर्मकांडामध्ये आपण गुंफली आहे. हल्ली कित्येक ठिकाणी लोक शेण-गोमुत्र इ वापरुन शास्त्राप्रमाणे स्वच्छता करतातच पण जाताना मागे प्लास्टीकचा कचरा सोडुन जातात, नायलॉनचे कपडे, साड्या अशाच त्या परिसरात पडलेल्या दिसतात. त्यामुळे शास्त्रांत असे अधिकृतपणे लिहावे लागेल की प्लास्टीक पिशवीतुन जर कुणी शेण आणले, प्लास्टीक बाटलीतुन जर कुणी गोमुत्र आणले स्मशानात सावडण्यासाठी तुमच्या मयत झालेल्या माणसास मोक्ष मिळणार नाही. असो.

या सर्वांपेक्षा मग विद्युत दाहिनी हा पर्याय खुपच चांगला आहे असे मला वाटले व मी तसे लिमयेजींना बोलुन दाखवले. त्यावर लिमयेंनी मला सांगितले की एकवेळ झाड तोडलेली परवडली पण विद्युत दाहिनी तर याहीपेक्षा अधिक हानिकारक आहे. आपल्याकडे जी  वीज निर्मिती होते त्यापैकी ७०% वीज कोळसा जाळुन बनवली जाते. कोळसा म्हणजे दगडी कोळसा. कोळशाच्या खाणी शोधणे त्यासाठी उत्खणन करणे, वर असलेली जंगले साफ करणे, भुगोल उध्द्वस्त करणे यामुळे पर्यावरणाचे जे नुकसान होते आहे ते कधीही भरुन न येणारे नुकसान आहे. त्यामुळे विद्युत दाहिनी मध्ये अंत्यसंस्कार पुढारलेपणाचे, पुरोगामीपणाचे लक्षण नाही हे समजलो.

हतबल, निरुत्साह आणि अगतिकता मी अनुभवली. मग करणार काय? लिमयेंना देखील असाच प्रश्न काही वर्षांपुर्वी , त्यांच्या वडीलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करताना पडला. अपराधिक भावना त्यांच्या मनात आली. खरतर या जगात अशीही माणसे आहेत की जी इतर ‘माणसांना’ इजा करुन, नुकसान करुन, दुखवून देखील उजळ माथ्याने मिरवितातच, पण लिमये त्या माणसांपैकी नव्हते. दैनंदिन क्रियाकलापामध्ये अडकले असले तरीही त्यांच्या मनातुन चितेसाठी जळणारी झाडे तोडण्यास, जाळण्यास आपणच कारणीभुत आहोत हा भाव सदैव राहिला.

मनुष्य आयुष्यभर मोक्ष मिळविण्यासाठी खटाटोप करतो. पण या सर्व खटाटोपांवर पाणी फिरले जाते जेव्हा त्याच्याच मृतदेहाला जाळण्यासाठी , वृक्षांची कत्तल करावी लागते, हा झाला भावनिक विषय. पर्यावरणाच्या दृष्टीने तर याचे दुष्परिणाम खुपच जास्त आहेत. विद्युतदाहिनी देखील योग्य पर्याय नाही, दफन करणे शास्त्रअसंगत आणि लोकभावनेच्या विरोधी आहे. मग करावे काय.

लिमयेजींनी चक्क मोक्ष देणारे लाकुड कारखान्यात बनविण्याचे प्रयोग सुरु केले. शेतातील कचरा म्हणुन जे जे आहे त्या सर्वांवर प्रयोग सुरु झाले. भाताच पेंधा वापरुन पाहिला, गव्हाची पराली वापरुन पाहिली, उसाचा कच-यावर प्रयोग झाले. कापुस तोडणीनंतर राहिलेल्या कापसाच्या काडांवरील प्रयोग यशस्वी झाला. त्यातही अजुन जास्त सुक्ष्म प्रयोग करीत करीत आज घडीला विजयजी लिमयेंनी पारंपारिक लाकडाला पर्याय देऊ शकणारे , शास्त्राला संगत व लोक भावनेचा आदर करणारे, अस्सल भारतीय लाकुड बनविले व त्याला नाव दिले मोक्षकाष्ट.

मोक्षकाष्ट आणि विजयजी

mokshkast - स्वतः बनविलेले मोक्षकाष्ट हाती घेऊन विजयजी

मोक्षकाष्ट

mokshkast – स्वतः बनविलेले मोक्षकाष्ट हाती घेऊन विजयजी

मोक्षकाष्ट बातमी पुणे

पुण्यनगरी, पुणे

मोक्षकाष्ट बातमी पुणे

सर्वच वर्तमान पत्रांनी या कामाची दखल घेतली आहे

लोकमत ने घेतली दखल

सर्वच वर्तमान पत्रांनी या कामाची दखल घेतली आहे

सकाळ वर्त्ममान पत्राने घेतली दखल

सकाळ

सकाळ वर्तमानपत्राने मोक्षकाष्टची घेतली दखल

विजयजी ठिकठिकाणी मोक्षकाष्ट व पर्यावरण आदी विषयांवर व्याख्याने देतात

व्याख्यान

विजयजी ठिकठिकाणी मोक्षकाष्ट व पर्यावरण आदी विषयांवर व्याख्याने देतात

पर्यावरण अनेक उपक्रमात विजयजी पुढाकार घेत असतात

स्वच्छ भारत अभियान

पर्यावरण अनेक उपक्रमात विजयजी पुढाकार घेत असतात

इच्छा असेल तर काहीही अशक्य नाही. नागपुर शहरात अनेक स्मशानभुमींमध्ये सध्या मोक्षकाष्ट वापरले जाते यामुळे महिन्याला किमान ९०० तर आजतागायत एकुण ३५ हजारांच्यावर झाडांना जीवनदान या प्रकल्पामुळे मिळाले आहे, ही खुप मोठी गोष्ट आहे. प्रत्येक झाड तुटते तेव्हा त्यासोबत त्या त्या झाडापासुन तयार होणारे लाखो करोडो बीज व हजारो रोपे होण्याची संभावना देखील नष्ट होते. रोपवाटीकेतुन घेऊन एक रोप लावणे चांगलेच पण मोठे असलेले एक झाड वाचवणे म्हणजे अप्रत्यक्षरित्या हजारो झाडे लावण्यासारखेच आहे.

लिमयेजींनी केलेला हा सुरुवातीचा प्रयोग होता आणि आता तो बनला आहे एक प्रकल्प. यातुन शेतकऱ्यास नवीन उत्पन्नाचे साधन तर मिळालेच आहे, सोबत गावागावामध्ये असे मोक्षकाष्ट बनविण्याचे कारखाने देखील उभे राहिले, म्हणजे हे एक सक्षम बिझनेस मॉडेल म्हणुन उभे आहे. लिमयेजी म्हणतात किमान दोन लाख लोकांना रोजगार देण्याची क्षमता या उद्योगात आहे. ज्यांना कुणाला असे मोक्षकाष्ट बनविण्याचा उद्योग उभारायचा असेल त्यांच्यासाठी लिमयेजी मार्गदर्शन करण्यास सदैव तत्पर देखील आहेत. आपापल्या भागात जे जे म्हणुन शेतीतील कचरा म्हणुन एक तर जाळले अथवा फेकुन दिले जाते त्या त्या गोष्टीवर प्रयोग करुन मोक्षकाष्ट तयार करण्याचे उद्योग उभे राहु शकतातच.

विजय लिमये

मोबाईल नं – 93260 40204

कळावे आपला

हेमंत सिताराम ववले
Whatsapp – 9049002053
Facebook – www.facebook.com/hemant.vavale

निसर्गशाळा, पुणे

Facebook Comments

Share this if you like it..