आकाशातील चित्तरकथा  – सर्प व सर्पधर

stargazing near pune

मानवी स्वभाव म्हणा किंवा मानवी मनाच्या मर्यादा म्हणा ! आपण जे काही नवीन पाहतो त्यास आपल्या पुर्वानुभवाच्या चष्म्यातुनच पाहत असतो. आणि म्हणुनच माणसाला आकाशामध्ये अक्षरक्षः साप दिसले. बर एक किंवा दोन नाही तर चक्क चार साप आकाशामध्ये आहेत असे, अगदी प्राचीन काळापासुन मानवास वाटते आहे. यातील एक तर अगदी महासर्प आहे. आपण या सर्व सापाविषयी यथावकाश माहिती घेणार आहोतच.

आज आपण पश्चिम आकाशातील, सध्याच्या काळात (ऑक्टोबर मास) सांयकाळच्या व त्यानंतर आणखी थोडाच वेळ दिसणा-या एका सर्पाची गोष्ट पाहुयात.

आपण आकाशातील विंचु म्हणजेच वृश्चिक मागील भागात पाहिला. आहे ना लक्षात? या विंचवाच्या डोक्याच्या उत्तर-पश्चिमेला अगदी लागुनच हा सर्प आपणास दिसतो, सध्या आकाशामध्ये चंद्र देखील असल्याने, व अजुनही तो पुर्ण चंद्र नाहीये, त्यामुळे दिवस मावळल्यानंतरचे पुढचे काही तास, नुसत्या डोळ्यांना, थोडासा ताण देऊन किंवा अगदी छोट्या दुर्बिणीच्या सहाय्याने देखील तुम्ही हा सर्प पाहु शकता. हा तारकापुंज खरतर आणखी एका संलग्न तारकापुंजासोबतच दिसतो व पाहिला जातो. हा सोबतच तारकापुंज आहे सर्पधर. त्यामुळे यांकडे जोडी या दृष्टीनेच पाहिले पाहीजे.

Eagle Nebula

गरुड निहारीका

सर्प व सर्पधर एका विस्तृत अशा, गरुडाच्या आकाराच्या वायु ने बनलेल्या ढगाच्या म्हणजेच निहारीकेमध्ये आहे. निहारीका म्हणजे नेब्युला.या निहारीकेला गरुड निहारीका असे म्हणतात कारण तिचा आकार काहीसा गरुडासारखा दिसतो.

आता पाहुयात हे आकाशामध्ये दिसतात कसे ते

stargazing near pune

वरील आकृतीमध्ये डाव्या कोप-यामध्ये, वृश्चिकाचे डोके दिसते आहे. Antares म्हणजे ज्येष्टा देखील दिसत आहे. आकाशातील हा सर्प पाहण्यासाठी आपण विंचवाच्या थोडे उजवीकडे व वर पहावे. या आकृतीमध्ये सर्प व सर्पधर असे दोन्हीही दिसत आहेत. सर्पेन्स असे इंग्रजी मध्ये लिहिलेले दोन गट ओफीक्युअस या तारकासमुहाच्या दोन्ही बाजुस दिसत आहेत. त्यातील एक, म्हणजे उजवीकडचा (उत्तरेचा) भाग जो आहे त्यास सर्पेन्स कापुट असे म्हणतात. हे सापाचे शेपुट  समजले जाते. व ओफीक्युअस च्या डावीकडील (दक्षिणेकडील) थोडेसे वरच्या भागात दिसणारे सर्पेन्स काऊडा म्हणजे सापाचे डोके असे मानले जाते.

व ओफीक्युअस म्हणजेच सर्पधर होय. खालील आकृतीमध्ये पहा सर्प व सर्पधर यांचे मानचित्र/भासचित्र

युनानी साहित्य व आख्यानांमध्ये स्वर्गातील अनेक देवी देवतांचा उल्लेख आढळतो. यातीलच एक म्हणजे अपोलो देव. अपोलो हा देव संगीत, कविता, कला, वाणी, तीरंदाजी, प्लेग, चिकित्सा, सूर्य, प्रकाश आणि ज्ञान आदींचा आदीदेव मानला जायचा. अद्यापही अनेक हॉलीवुड सिनेमांमध्ये आपण हा देव पाहु शकतो. अपोलो च्या अनेक मुला मुलींपैकीच एक ओफीक्युयस म्हणजेच सर्पधर आहे असे मानले जाते. त्यामुळे अर्थात ओफीक्युयस देखील देवच मानला जायचा व त्याची किर्ती वैद्यक शास्त्रामध्ये दिगंत होती. यातच स्वर्गामधील आणखी एक देव प्लुटो. प्लुटोची दुसरी ओळख म्हणजे मृत्युचा देव अशी आहे.

ओफीक्युयस आदीवैद्य समजला गेला व अगदी मेलेल्या मनुष्यास आणि प्राण्यांस देखील जिवंत करण्याची क्षमता ओफीक्युयस मध्ये होती इतका त्याचा लौकिक होता.

अर्थात प्लुटो ला स्वःतच्या अस्तित्वाची भीती वाटु लागली. प्लुटोने मग ज्युपिटर या देवास ओफीक्युयस ला ठार मारण्यासाठी त्यावर वज्र चालवण्याची आज्ञा केली. त्यानंतर ज्युपिटर ने ओफीक्युयस ला आकाशामध्ये स्थापित केले. ओफीक्युयस म्हणजेच सर्पधर, की ज्याच्या दोन्ही बाजुस सर्प आहे. ओफीक्युयस ला सर्पेंटीयेस असे ही म्हणतात.

प्राचीन चीन मध्ये सर्प व सर्पधर यास मिळुन एकच नाव होते. ते म्हणजे तियांशी. तियांशी म्हणजे आकाशातील बाजारपेठ. सर्पाचे जे दोन भाग आपण पाहिले त्यास चीनी लोकांनी बाजरपेठेची संरक्षक भिंत म्हणुन पाहिले व सर्पधर म्हणजे बाजरपेठ.

प्राचीन भारतीय साहित्य किंवा आख्यायिका, दंतकथांमध्ये या सर्प व सर्पधराची कथा न येण्याचे कारण असे असेल की भारतीय खगोल शास्त्रज्ञांनी कल्पिलेल्या २७ (वेदकाळात २८) नक्षत्रांच्या पट्ट्यात हा तारकापुंज येत नाही. अत्यंत प्रगत असणा-या भारतीय खगोल शास्त्रामध्ये पृथ्वी, सुर्य व इतर ग्रहांच्या अभ्यासाने कालनिश्चय करुन कालगणनेची सुत्र मांडली. कदाचित हजारो वर्षांपुर्वी बनवलेली ही सुत्रे आज ही तितकीच उपयोगाची आहेत. त्यामुळे निव्वळ कथा कल्पना विस्तार की ज्याचा खगोलशास्त्राशी काही संबंध नाही अशा गोष्टी भारतीय खगोल शास्त्रामध्ये खुप कमी प्रमाणात आढळतात.

सर्पधर तारापुंज खुप मोठे असुन त्यात असंख्य तारे आहेत. हे तारे खुप दुरवर लुकलुकताना, डोळ्यांना ताण दिला तरच दिसतात. यातील सर्पधराच्या डोके समजला जाणार सर्वात वरचा ता-याची विशेष ओळख आहे.

अमेरीकन शास्त्रज्ञ श्रीमान एडवर्ड बर्नार्ड यांनी सन १९१२ मध्ये, या ता-याचा शोध लावला. त्यामुळे या ता-याला बर्नार्डचा तारा असेच नाव पडले आहे. पृथ्वीपासुन आणि अर्थातच आपल्या सुर्यापासुन जे काही सर्वात जवळचे तारे आहेत, त्यातील हा सहाव्या क्रमांकाचा तारा आहे. तारा म्हणजे आपल्या सुर्यासारखाच अवकाशातील एक घटक. काही शास्त्रज्ञांनी ७०व्या शतकामध्ये, या ता-याभोवती दोन ग्रह असल्याचे म्हंटले. पण या बाबतीत जागतिक शास्त्रज्ञांमध्ये अजुनही मतभेद आहेत. बर्नार्डचा तारा, पृथ्वीपासुन फक्त ६ प्रकाशवर्षे दुर आहे. या ता-याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे मानवास ज्ञात असलेल्या ता-यांमध्ये सर्वात जास्त गतिमान असलेला तारा हाच आहे. खालील व्हिडीयो मध्ये मागील शंभर वर्षांमध्ये या ता-याचा प्रवास किती झाला आहे, अन्य ता-यांच्या तुलनेमध्ये हे पाहता येईल. गंमतीने असे ही म्हंटले जाते की, जर अंतरीक्षातील सर्वच तारे इतके गतिमान झाले तर, या अंतरिक्षाचा चेहरा मोहरा अगदी काही पिढ्यांमध्येच पुरता बदलुन जाईल.

 

सर्पधर तारकापुंजाकडे जागतिक शास्त्रज्ञांचे विशेष लक्ष आहे. पुर्वीदेखील होते. सतराव्या शतकाच्या चवथ्या वर्षात, पश्चिमी शास्त्रज्ञ केपलरच्या एका विद्यार्थ्याने , सर्पधरामध्ये एक नवीन ता-याचा जन्म होताना पाहिले. याला नवतारा किंवा नोव्हा असे म्हणतात. सोबत मागील शतकामध्ये देखील या मंडलामध्ये दोन तीन नवीन तारे पाहण्यात आले.

सर्पधराच्या डावीकडे, थोडेसे वर, सापाचे डोके आहे. या मध्ये दिसणारे चार तारे असुन, बाकी असंख्य लहान तारे आहेत. हे लहान तारे ६०००० पेक्षाही जास्त आहेत. सर्पाचे डोके म्हणजे सर्पेन्स काऊडा हा तारकापुंज पृथ्वीपासुन २७००० प्रकाशवर्षे इतका दुर आहेत.

आकाशातील ही चित्तरकथा तुम्हाला कशी वाटली हे अवश्य कळवा व हा लेख इतरांना शेयर देखील करा.

हेमंत सिताराम ववले

निसर्गशाळा,पुणे

 

Facebook Comments

Share this if you like it..