आकाशातील चित्तरकथा – विंचु व त्याची नांगी
पावसाने सगळी धरती न्हाऊन निघाली आहे. धुळींचे लोट अजुन बनायला सुरुवात व्हायची आहे. पृथ्वीभोवतीच्या वातावरणात नेमक्या याच कारणाने ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यांमध्ये खुपच स्वच्छता असते. या कालावधीमध्ये अगदी फिकट असणारे व एरवी न दिसणारे दुरस्थ छोटे तारे देखील आपण नुसत्या डोळ्यांनी पाहु शकतो.
या दिवसांमध्ये व पुढचे अगदी काहीच दिवस दिसु शकणारे पहिले नक्षत्र म्हणजे वृश्चिक. वृश्चिक म्हणजे विंचु. याला मी आकाशातील विंचु असे देखील म्हणतो. हे नक्षत्र कसे पहायचे हे समजल्यावर तुम्हाला आकाशातील हा विंचु , प्रत्यक्ष विंचवासारखाच दिसेल. हे नक्षत्र कसे पहायचे याविषयी या लेखामध्ये पुढे सविस्तर माहिती मिळेलच.
आपल्या भागातुन, सध्या सायंकाळी ७ च्या सुमारास दक्षिण दिशेला, क्षितिजीच्या थोडेसे वर, अंधारत असताना या नक्षत्रातील तारे चमकु लागतात. व पुढ्चे २ ते अडीच तासच आपण हे नक्षत्र आकाशामध्ये पाहु शकतो. नंतर हे मावळते. खालील आकृतीमधील इंग्रजीमध्ये Scorpius असे लिहिलेले जे आडवे झालेले नक्षत्र दिसते आहे तेच वृश्चिक नक्षत्र होय.

चित्र स्पष्ट दिसत नसेल तर फोनचा ब्राईटनेस वाढवा. वृश्चिक राशी – या दिवसांमध्ये (ऑक्टोबर मध्यापर्यंत) वृश्चिक दक्षिण गोलार्धात, क्षितिजाच्या वर सायंकाळी अगदी थोड्या वेळापुरताच दिसतो.
एक महत्वाची गोष्ट सर्वात आधी आपण समजली पाहीजे. ती म्हणजे, भारतीय खगोल शास्त्रामध्ये राशींची संकल्पना नव्हती. भारतीय कालगणनेसाठी आकाशातील विविध तारकासमुहांना नावे देऊन एकुण २७ नक्षत्रे योजली आहेत. कालांतराने ग्रीक ज्योतिष शास्त्राचा प्रभाव पडुन, तीन ते चार नक्षत्रांच्या समुहास “राशी” असे म्हंटले गेले.
वृश्चिक राशी म्हणजेच आकाशातील विंचु देखील एकुण साडे तीन नक्षत्रांचा समावेश होतो. यातील पहिले विशाखा (हे एक चतुर्थांश इतकेच आहे वृश्चिक राशीच्या माथ्यामध्ये), अनुराधा (हे पुर्ण नक्षत्र आहे या राशीमध्ये) व ज्येष्टा (पुर्ण नक्षत्र) व शेवटी मुल किंवा मुळ नक्षत्र (हे देखील पुर्ण नक्षत्र आहे या राशीमध्ये) आहे.

अकिरा फुजी नावाच्या एका जापानी खगोल शास्त्रज्ञाने घेतलेला हा फोटो. यात आपली आकाश गंगा व थोडेसे डावीकडे वृश्चिक देखील दिसत आहे. हा फोटो हाय क्वालिटी मध्ये पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
वृश्चिक आकाशामध्ये कसा दिसतो याच्या सविस्तर माहिती पाहण्याच्या आधी आपण या चित्राच्या मागील आकाशातील चित्तरकथा काय काय आहेत हे पाहु.
या तारकासमुहाविषयी एक गमंत अशी की जगभरातील सगळ्या संस्कृत्यांनी या तारकासमुहाकडे विंचु” म्हणुनच पाहिले. भारतात विविध प्रांतांत यास विविध नावे दिली गेली आहेत. आलि, कौर्प्य किंवा कौर्पि अशी ही नावे आहेत. प्राचीन अरबी खगोल अभ्यासकांनी यास अल-अकरब (अर्थ विंचु) असे नाव दिले. प्राचीन युनानी, ग्रीक, रोमन या तारकासमुहास स्कॉर्पियो किंवा स्कॉर्पियस (अर्थ विंचु) असे म्हणतात. चीन लोक यास “तिएन हे” असे म्हणतात. याचा अर्थ स्वर्गातील विंचु असा आहे.
आधी सांगितल्या प्रमाणे राशी विभाजन किंवा १२ राशींची कल्पना, मुळ भारतीय कल्पना नसल्याने या तारका समुहाशी निगडीत कसलीही कथा भारतात किंवा प्राचीन भारतीय साहित्यामध्ये किंवा वेद, उपनिषदांमध्ये अथवा पुराणांमध्ये आढळत नाही.
प्राचीन ग्रीक, युनानी, रोमन साहित्यामध्ये स्कॉर्पिअस ची कथा ओरायन (मृगनक्षत्राचे इंग्रजी नाव) संदर्भात येते. ओरायन चा वध स्कॉर्पियन म्हणजे विंचवाने केला असा काहीसा प्रकार आहे. ओरायन हा एक शिकारी देव होता व पृथ्वीवरील सर्वच्या प्राणीमात्रांची शिकार करुन तो सर्व प्राण्यांना संपवणार अशा प्रकारची वल्गना त्याने केल्यानंतर पृथ्वी देवीने , जिला गैया असे म्हंटले जाते, त्या देवीने विंचवाला आज्ञा केली की तु ओरायन ला मार. त्यानुसार विंचु ओरायनचा पाठलाग सुरु करतो.
दुसरी एक कथा सापडते. आर्टेमिस नावाची आणखी एक देवता असते. ती देखील शिकारी असते. ओरायन असा दावा करतो की तोच सर्वोत्तम शिकारी आहे. आर्टेमिस ला हे सहन होत नाही व ती विंचु सोडते ओरायन ला मारण्यासाठी.
तिसरी कथा अशी ही आहे की, अपोलो (अर्टेमिस चा भाऊ) ओरायनच्या अशा दाव्यामुळे खुप क्रोधित होतो व विंचवाला आज्ञा करतो की तु जाऊन ओरायनचा पराभव कर. युध्दात ओरायनचा पराभव होतो. ओरायन मृत्युला पावतो. त्यानंतर अपोलो विंचु व ओरायन या दोघांनाही स्वर्गात स्थान देतो. पण एकमेकांचे शत्रु असल्याने या दोघांनाही विरुध्द दिशेला स्थान देतो. त्यामुळे आकाशमध्ये जर ओरायन दिसत असेल तर विंचु दिसत नाही. दोन्हीपैकी एकच तारका समुह आकाशामध्ये दिसतो.
या तारकासमुहा विषयी आणखीही खुच रोचक, मनोरंजक व वैज्ञानिक माहिती पुढच्या लेखात आवर्जुन वाचा.
आपला
हेमंत ववले
निसर्गशाळा, पुणे
आगामी कार्यक्रम
[print_vertical_news_scroll s_type=”classic” maxitem=”5″ padding=”10″ add_link_to_title=”1″ show_content=”1″ delay=”60″ height=”200″ width=”100%” scrollamount=”1″ direction=”up” ]
खुप छान माहिती