निसर्गशाळेच्या आकाशदर्शन कार्यक्रमामध्ये मी ब्रह्मांडाचा पसारा किती आहे हे समजुन सांगण्यासाठी सुरुवात सुर्य आणि पृथ्वी यांच्यापासुन करतो. हे अंतर किती आहे याचा अंदाज एकदा सर्वांना आला की मग मी यालाच अनुसरुन पुढील अंतरे किती किंवा किती अफाट आहेत हे एकेक करुन सांगतो. यात आजपर्यंत मी सर्वात लांब किती व कोण हे समजण्यासाठी देवयानी या दिर्घीकेचा उपयोग करतो किंवा उन्हाळ्यामध्ये सोम्ब्रीरो या दिर्घीकेचा उपयोग करतो. कारण या दोन्ही दिर्घीका मी लोकांना दुर्बिणीतुन दाखवु शकतो. जे डोळ्यांना दिसतं ते दाखवल्यावर आणि त्याविषयी माहिती सांगितल्यावर ती लगेच समजते. अर्थात आकडेवारी मध्ये मी हुशार नाहीये आणि आकाशदर्शन समजताना आकडेवारी लक्षात राहिलीच पाहिजे असेही काही नाही. कोण किती वेळ या छंदासाठी, पॅशन साठी देत आहे त्यावर अवलंबुन आहे तुम्ही आणि आकडेवारीशी एक्मेकांना किती ओळखतात. पण त्याहीपेक्षा महत्वाचे काय आहे तर ते म्हणजे या ब्र्ह्मांडांच्या महाविस्ताराची कल्पना यावी, जेव्हा आपण आकाशदर्शन करतो तेव्हा.
आकाशदर्शन आनंदासाठी करणा-यांपैकी मी आहे. त्यामुळे आकडेवारीतील अचुकता मला कधीही महत्वाची वाटली नाही. असे असले तरीही कुणीतरी, यापुर्वी अशी आकडेवारी सिध्द केली आहे म्हणुनच ढोबळ मानाने का होईना आपल्यासारख्यांना वास्तवाचा थोडा तरी अंदाज येतो. ही आकडेवारी येते कशी? तर या आकडेवारी निश्चितीसाठी अनेक वर्षांची निरीक्षणे, नोंदी , चिंतन इ ची आवश्यकता असते. हे करण्यासाठी खुप धैर्य अंगी असणे आवश्यक असते. काही लोक त्यांच्या कामाचा भाग म्हणुन हे करतात तर काही लोक निव्वळ आवडीपोटी अशी निरीक्षणे आणि नोंदी करतात. माझ्या माहितीमध्ये भारतीय वायुसेनेतील एक निवृत्त अधिकारी आहेत की जे अनेकदा निसर्गशाळा येथे निरीक्षणांसाठी येत असतात. ते रात्र रात्र भर झोपत नाहीत आणि केवळ निरीक्षणे आणि नोंदी करीत आपला छंद जोपासतात.
याच निरीक्षणांचा आणि नोंदींचा आणखी एक प्रकार साधारण २००० साली अमेरिकेतील न्यु मेक्सिको मध्ये झाली. यामध्ये खुप मोठ्या प्रमाणात छायाचित्रे टिपण्यासाठी यंत्रणा उभारली गेली. आकाशातील केवळ एखाद्याच छोट्या भागाला लक्ष्य करुन त्या भागाचे जितके दुर-दुरचे फोटो काढता येतील तितके काढण्यास सुरुवात झाली. यात छायाचित्रांसोबतच भौतिकशास्त्रातील रेडशिफ्ट नावाच्या एका संकल्पनेचा वापर देखील केला गेला. नव्हे अजुनही सुरु आहे. २००९ साली छायाचित्रे टिपणारा कॅमेरा बंद झाला आणि स्पेक्ट्रोस्कोपिक रेडशिफ्ट सर्व्हे मात्र अजुनही म्हणजे अगदी आजपर्यंत सुरु आहे.

या यंत्रणेतुन दररोज खुप मोठ्या प्रमाणात छायाचित्रे आणि रेडशिफ्ट सर्व्हे डेटा तयार होऊ लागला. यंत्रणा अद्ययावत होत गेली. यातुन आकाशातील मीन राशीच्या दिशेला, मागे दुर, खुप खुप दुर, आपण आकड्यांमध्ये कल्पनाही करु शकणार नाही इतक्या दुर, उघड्या डोळ्यांनी पाहु शकणार नाही तरीही महाकाय अश्या अवकाशीय पिंडांचा नकाशा तयार झाला . त्या नकाशाला स्ट्राईप ८२ म्हणजे सोप्या भाषेत ८२ क्रमांकाचा आकाशाचा पट्टा असे म्हणतात. आणि काही वर्षांपुर्वी हा माहितीचे महाभांडार जगभरातील विद्यापीठे, संशोधन केंद्रे, खगोल अभ्यासक, विद्यार्थी यांना खुले केले गेले. जगभरातील अभ्यासक हा डेटा वापरतात, अभ्यास करतात. हा डेटा वापरुन अनेक कॅटलॉग तयार करण्यात आले आहेत आणि खगोल शिकणा-यांना देखील हा डेटा जगभरात खुपच महत्वाचा ठरत आहे.
आपल्या पुण्यातील आयुका व आयसर या दोन संस्थांनी देखील या डेटा वर संशोधन करायच ठरवलं. त्यांनी मीन राशीच्या दिशेच्या आकाशाच्या डेटावर अभ्यास करण्यास आणि त्याची निरीक्षणे करण्यास सुरुवात केली. यात रेडशिफ्ट हा महत्वाचा घटक होता.
आपण आकाशात जेव्हा पाहतो तेव्हा आपणास तारे दिसतात उघड्या डोळ्यांना. तेही केवळ असेच तारे दिसतात की ज्यांची प्रकाशमानता जास्त आहे. कमी प्रकाशमानतेचे तारे जसे आपल्या सर्वात जवळील प्रॉक्सिमा सेंटॉरी तारा, जवळ असुनही दिसत नाही कारण तो खुपच फिकट असा आहे. पृथ्वी आणि इतर ग्रह यांना धरुन ठेवण्याच काम सुर्यमाला करते, सौरमाला हे एक परफेक्ट वैश्विक यंत्र आहे. यात कोणत्याही ग्रहाची गती कमी वा अधिक किंवा चुकीची आहे असे अजिबात नाही. त्यामुळे कित्येक करोडो वर्षे सौरमाला अव्याहत पणे गतीमान आहे. सुर्य या परफेक्ट यंत्राचे इंजिन आहे असे आपण म्ह्णु शकतो. तसेच आपणास जेवढे तारे दिसतात ते सारे च्या सारे एका आणखी मोठ्या यंत्राचा भाग आहेत, अगदी आपला सुर्य देखील. ज्याप्रमाणे ग्रह सुर्याभोवती फिरतात अगदी त्याचप्रमाणे सारेच्या सारे तारे देखील फिरत आहेत. पण कशाभोवती? तर एका केंद्राभोवती ज्यास अभ्यासक कृष्णविवर म्हणजे ब्लॅक होल म्हणतात. हे जे मोठे यंत्र आहे ज्याचे केंद्र कृष्णविवर आहे त्यास आपण आपली आकाशगंगा म्हणतो. आपली आकाशगंगा खुप मोठी आहे. आकाशगंगेत १०० अब्ज तारे आहेत असा प्राथमिक अंदाज आहे. आपल्या सुर्य या १०० अब्ज ता-यांपैकी एक अगदी साधारण तारा आहे. पृथ्वी हे जसे एका ग्रहाचे नाव आहे, सुर्य हे जसे एका ता-याचे नाव माणसाने ठेवले आहे तसेच आकाशगंगा देखील नावच आहे एका दिर्घीकेचे. दिर्घीकेला इंग्रजीमध्ये गॅलक्सी म्हणतात. जसे ग्रहाला शेजार असतो ग्रहाचा, ता-याला ता-याचा तसाच गॅलक्सी ला गॅलक्सीचा असतो. आपल्या आकाशगंगा या गॅलक्सीची शेजारीण गॅलक्सी आहे देवयानी म्हणजेच ॲंड्रोमेडा ही गॅलक्सी. ज्याप्रमाणे सौरमालेत ग्रह गुरुत्वाकर्षणाने बांधलेले आहेत, गॅलक्सीमध्ये तारे बांधलेले आहेत तसेच अनेक गॅलक्सी देखील एकमेकांशी गुरुत्वाकर्षाने बांधलेल्या आहेत. व त्या सा-याच्या सा-या , ज्याप्रमाणे एका गॅलक्सी मध्ये तारे गतीमान आहेत ; अगदी तश्याच अनेक गॅलक्सी एका किंवा परस्पर गुरुत्वाकर्षाणाने गतीमान आहेत. अश्या एकमेकांशी गुरुत्व बलाने बांधलेल्या गॅलक्सींच्या गटाला ग्रुप ऑफ गॅलक्सीज किंवा गॅलक्सी ग्रुप म्हणतात. म्हणजे एकमेकांच्या शेजारीण असणा-या या गॅलक्सींना आपण एकत्रित पण गॅलक्सी परिवार म्हणु शकतो. असे अनेक गॅलक्सी परिवार जर परस्पर गुरुत्व बलाने बांधलेले असतील तर त्यास इंग्रजीमध्ये गॅलक्सी क्लस्टर म्हणतात. हे समजण्यासाठी आपण यास गॅलक्सीचे गाव म्हणु शकतो ज्यात अनेक गॅलक्सी परिवार असतात. अशी गॅलक्सींची अनेक गावे जेव्हा एकमेकांत मिसळतात तेव्हा तयार होते गॅलक्सी सुपर क्लस्टर. समजण्यासाठी आपण यास गॅलक्सींचे महानगर म्हणुयात की ज्यात अनेक गॅलक्सी गावे एकमेकांशी जोडलेली आहेत. खुप खुप लांबुन जर कुणी या ब्रह्मांडाकडे पाहु शकेल तर त्यास हे ब्रह्मांड एखाद्या कोळ्याने विणलेल्या जाळ्यासारखे दिसेल. जाळ्याच्या दो-या तयार करताना जो एकेक बिंदु जोडला जाईल तो एकेक बिंदु म्हणजे ही गॅलक्सीचे सुपर क्लस्टर होय. यावरुन विचार करु शकतो की किती अफाट आहे हे ब्रह्मांड. ते इतके अवाढव्य आहे की त्याची सुरुवात कुठे होते आहे शेवट कुठे होतो कुणालाही थांगपत्ता अजुनही नाही.
तर मुद्दा असा आहे की भारतातील, पुण्यातील वर सांगितलेल्या दोन संस्थांनी एकत्रित पणे जयदीप बागची या शास्त्रज्ञाच्या नेतृत्वाखाली , मीन राशीच्या दिशेला , खुप दुरस्थ आकाशात असेच एक सुपर क्लस्टर म्हणजे गॅलक्सींचे महानगर शोधले. हे शोधण्यासाठी त्यांनी एसडीएसएस च्या डेटाचा वापर केला. या सुपर क्लस्टर मध्ये आजपर्यंत ४३ गॅलक्सी क्सस्टर म्हणजे गॅलक्सींची गावे आहेत. एकेका गावात अनेक गॅलक्सी परीवार आहेत, एकेका परिवारात अनेक गॅलक्सी आहेत, एकेका गॅलक्सी मध्ये असंख्य तारे आहेत, ता-यांभोवती असंख्य ग्रह असलेच पाहिजेत. हे सुपर क्लस्टर पृथ्वीपासुन ४०० करोड प्रकाशवर्षे
जयदीप बाग्ची आणि त्यांच्या टीमने केलेले हे संशोधन प्राचीन भारतीय नदी सरस्वती आणि आधुनिक भारतातील ज्ञान आणि संगीताची देवता सरस्वतीला समर्पित केलं. त्यांनी या गॅलक्सी सुपर क्लस्टरचे नाव सरस्वती सुपर क्लस्टर असे ठेवले. त्यांच्या या शोधास जागतिक मान्यता देखील मिळाली असुन सरस्वती सुपर क्लस्टर हे नाव आता जागतिक खगोल-विश्वात रुढ झाले आहे.
सरस्वती सुपर क्लस्टर आतापर्यंत सापडलेल्या सर्वात मोठ्या खगोलीय पिंडांपैकी एक पिंड आहे. होय इतका महाकाय असुनही हा ‘एक’ पिंड आहे, की ज्यामध्ये अनेक गॅलक्सी क्लस्टर्स , प्रत्येक क्लस्टर मध्ये अनेक गॅलक्सी ग्र्प, प्रत्येक ग्रुप मध्ये अनेक गॅलक्सी आहेत. एवढे असुनही तो एक पिंड आहे. तो जर एक पिंड मानला त्या पिंडाच्या परिभाषेतील ब्रह्म्मांड कसे असेल?
© हेमंत ववले, निसर्गशाळा
Share this if you like it..