माझ्या सह्याद्रीच्या भटकंतीमध्ये अनेकविध अनुभव घेण्याचे भाग्य लाभले. सह्याद्रीची प्राचीनता आणि जैवविविधता सांप्रत अधिक चर्चिली जाते. सोबतच सह्याद्रीतील शिवाजी राजांचे अभेद्य किल्ले, द-या, डोंगर, विविध प्राचीन आणि आधुनिक घाट सर्वांनाच भुरळ पाडत असतात. सह्याद्रीने चालुक्य, यादव, माऊली, तुकाराम महाराज, शिवाजी महाराज, या सर्वांनाच मोहीत केलेले दिसते.
“वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती” म्हणत एकांताचा वास निसर्गाच्या सानिध्यात घेताना “आपुलाची वाद आपणासी” अशी स्वःतच्या अंतर्मनास साद घालणारे तुकोब्बा राय असो किंवा सह्याद्रीच्या कड्याकपा-यांतुन वाहणा-या जलप्रपातांच्या घळयांतुन साधना करणारे समर्थ रामदास असोत, किंबहुना सगळ्याच संत महंतांस या सह्याद्रीने, या निसर्गाने आकर्षित केलेले आपणास दिसते आहे.

Tukaram, a saint poet of Maharashtra, sang songs of harmony with Nature.
गुणसंपन्न सह्याद्री
सह्याद्रीचे शौर्य अभेद्य किल्ल्यांच्या रुपात आजही विद्यमान आहे. प्रत्येक किल्ला, त्याच्या अवतीभवतीचे गावे, गावागावातील माणसे, लढवय्ये, मावळे, हवालदार, भालदार, धारकरी, हारकरी, किल्यावरच्या बाजारपेठा. पायथ्याची गावे, गावागावातील विविध इतिहास, कथा, दंतकथा काही ज्ञात तर काही अज्ञात. आपणास एकच हिरकणी माहीत आहे. पण अशा अनेक हिरकण्या ह्या सह्याद्रीने पाहील्या असतील. अनेक बहादुर मर्द मावळे गावागावात, वस्त्यावस्त्यांमध्ये असतील.
सदोदीत उन वारा पाऊस यांचा मारा अंगावर झेलत सह्याद्री एखाद्या तपस्व्याप्रमाणे अढळपणे उभा आहे. तो अविचल आहे. तो निर्विकार आहे. कसल्याही बाह्य व्यवधानांचा परीणाम त्याच्या तपश्चर्येवर होत नाही. म्हणुनच की काय सह्याद्रीची विरक्ती त्याच्या विविध बौध्द लेण्यांतुन कोरली गेली आहे.

Hemant Vavale…At one of his explorations of Sahyadri at Gopya ghat of Velhe.
असंख्य प्राणीमात्रांस अभय देणा-या सह्याद्रीची एकात्मता त्याच्या अंगाखांद्यावर वाढलेल्या जैवविविधतेमध्ये आहे. सह्याद्रीचा रुद्रावतार त्याच्या काळ्याकभिन्न कातळकड्यांमध्ये आहे.
सह्याद्रीचे मातृत्व त्याच्या कड्या कपा-यांतुन उगम घेणा-या शेकडो नद्यांमध्ये आहे, ज्या पुढे जाऊन फक्त जलवाहीन्या न राहता जीवनवाहीन्या बनतात. किमान हजारेक नद्यांचा उगम सह्य रांगामध्ये होतो. काही पुर्व वाहीन्या तर काही पश्चिम वाहीन्या आहेत. शहरांना पिण्यासाठी पाणी, पाणी साठे, जलविद्युत प्रकल्प, शेतीसाठी धरणे, बंधारे, कालवे हे सर्व सह्याद्रीच्याच जीवावर आहे.

Indian roller @ Nisargshala
सह्याद्रीचे पितृत्व त्याच्या अंगाखांद्यावर हजारो लाखो वर्षे आनंदाने खेळणा-या बागडणा-या असंख्य प्राणीमात्रांच्या पालनपोषणामध्ये आहे. मागे एका लेखामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे सह्याद्रीमध्ये आढळणा-या एका बेडकाची जात साडे आठशे लाख वर्षापुर्वीची मानली जाते. व ही जात फक्त सह्याद्रीमध्येच आहे. आणि हा पुरातन काळ म्हणजे या पृथ्वीतलावर मानव नावाच्या प्राण्याची उत्पत्ती होण्याआधीचा काळ आहे. संशोधकांचा कयास जर प्रमाण मानला तर, आपणास माहीत असलेल्या या ज्ञात जीवास सह्याद्रीने कित्येक लाखो वर्षे सांभाळले आहे हे स्पष्ट दिसते.
प्राचीन भारतीय संस्कृतीचा आधार सह्याद्री
ह्यासोबतच सह्याद्रीच्या कुशीत भारतीय संस्कृतीची छाप अगदी डोंगर द-यात असणा-या वाड्या-पाड्यावर देखील पहावयास मिळते. आपल्याकडे एक म्हण आहे, की भाषा दर पाच मैलांवर बदलते. भाषा बदल म्हणजे सांस्कृतिक वेगवेगळेपण हे नक्कीच. असे हे वेगळेपण आपणास बारा मावळांत पहावयास मिळते. ही बारा ही मावळे सह्याद्रीच्या कुशीतच आहेत. हे वेगळेपण विशिष्ट प्रसंगी पहावयास मिळते. एक उदाहरण सांगतो इथे. आमचे कडे एखाद्या व्यक्तिच्या और्ध्वदैहीक आचारांमध्ये एका दगडास( खडा ) विशेष स्थान आहे. याला जीवखडा असे म्हणतात. आता जीवखडा नावाची संकल्पना बाराच्या बारा मावळांत म्हणजे महाराष्ट्रातील सह्याद्री मध्ये वसलेल्या डोंगरद-यात राहणा-या लोकांत आहे. पण त्यात थोडे थोडे भेद आहेत. जसे काही ठिकाणी हा खडा मरणोपरांत दहा दिवस घराच्या बाहेर टांगुन ठेवतात तर काही ठिकाणी तेरा दिवस. काही ठिकाणी हा खडा घराच्या आढ्याला आतुन टांगतात तर काही ठिकाणी हा खडा भिंतीला असेलेल्या खुंटीला टांगतात. तर सांगायचा मुद्दा असा की वेगळेपण असले तरी जीवखडा संकल्पना मात्र सगळीकडे दिसते. कुणी शिकवले असेल बरे ह्या मावळ भागातल्या म्हणजेच डोंगरद-यात वाड्यावस्त्यांमध्ये लोकांस हे कर्मकांड? हे कर्मकांड योग्य की अयोग्य हा वेगळा विषय आहे. पण एकसुत्रता सर्वत्र दिसुन येते. नुसतीच सह्याद्रीमध्येच आहे असे नाही तर संपुर्ण भारतात ही सांस्कृतिक एकसुत्रता दिसते आपणास.
विकृती, प्रकृती आणि संस्कृती
विकृती, प्रकृती आणि संस्कृती ह्या तीनही संकल्पना तशा एकाच मुल तत्वावर आधारीत आहेत. व ते मुल तत्व म्हणजे निसर्गनियम होय. वेगवेगळ्या संदर्भात ह्या संकल्पनांची उकल करता येईल. दोन तीन वर्षापुर्वी आमच्या घरच्या झाडाचे आंबे उतरवायचे काम सुरु होते. मी झाडावर चढलो होतो व टिपुन एकेक आंबा काढत होतो. झाडाच्या एका फांदीला आता शंभरेक आंबे शिल्लक होते. इतक्यात आई म्हणाली आता बास झाले. राहीलेले आंबे झाडाला तसेच राहुदे. मी का असे न विचारताच झाडावरुन खाली उतरलो. व आंबे पिकवण्याची आढी लावुन झाल्यावर आईला विचारले झाडाला आंबे ठेवायला का सांगितलेस तु मला? त्यावर आई म्हणाली की आपण सगळेच्या सगळे आंबे काढायचे नसतात. झाडावर येणा-या पक्षांना प्रसंगी प्राण्यांना खाण्यासाठी हे आंबे असेच ठेवायची पध्दत पुर्वापार असेल खेड्यापाड्यात. यात संस्कृती पाहायला मिळते. सर्वच्या सर्व आंबे काढणे व ते खाणे किंवा विकणे ही विकृती आहे. व जेवढी भुक आहे तेवढेच आंबे काढुन खाणे ही प्रकृती आहे. पण या एका प्रसंगात संस्कृतीची खुण दिसते. ही संस्कृती देखील सह्याद्रीचे अंगभुत वैशिष्ट्य आहे. एखादा समाज किती सुसंस्स्कृत आहे हे पाहण्यासाठी त्या समाजात कोणत्या चालीरीती आहेत, कोणत्या कला कौशल्यांना त्या समाजात स्थान आहे , समाजात कोणते छंद जोपासले जातात , त्या त्या समाजात संगीत, लेखण वाचन आदी विषयी कितपत ज्ञान आहे , या सर्वांवर त्या त्या समाजाचा सुसंस्कृतपणा किती उच्च दर्जाचा आहे हे समजते. भुमीस माता म्हणणारा आपला हा मावळातला समाज सांस्कृतिक दृष्ट्या अभ्यासाचा एक स्वतंत्र विषय आहे. आपल्या विविध चालीरीतींच्या मागे एक विज्ञान आहे. मी दहावी मध्ये असताना माझे इंग्रजीचे शिक्षक श्री गुलाबराव सपकाळ सरांनी मला एक अप्रतिम पुस्तक वाचण्यासाठी दिले. प्रा. सौ कांचनगंगा गंधे यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचे नाव ही भारी्च आहे. “आपले वृक्ष आपली संस्कृती”.

वटपोर्णिमा is a highly logical and ecological festival celebrated across India
यात आपल्या विविध सणवारांमध्ये चालीरीती प्रथांमध्ये वापरल्या जाणा-या विविध वृक्ष वेलींचे सांस्कृतिक तसेच वैज्ञानिक महत्व त्यांनी सण व वृक्ष वार सविस्तर लिहिले आहे. म्हणजे आपल्या संस्कृतीला वैज्ञानिक आधार आहे व तो अगदी दुरदुर्गम अशा डोंगरद-यात राहणा-या आमच्या सह्याद्रीवासीयांना माहीत देखील होता. कोणत्याही संस्कृतीचे आणखी एक महत्वाचे अंग असते. ते म्हणजे सहजीवन. आधुनिक पाश्चात्य लेखक स्टीफन कॉव्हे याने त्याच्या एका सुपसिध्द पुस्तकात Interdependence is higher value than Independence असे तत्व मांडुन त्या तत्वास कॉर्पोरेट जीवनात यशाची गुरुकिल्ली असे म्हंटले. जाती पाती आणि उच्चनीच असा ओंगळवाणा वाटणारा प्रकार म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन वर म्हंटलेल्या परस्परालंबित्वाचे एक विकृत रुप आहे. जात हा शब्दास कारकुनी महत्व येण्याआधी आपल्याकडे बलुतेदार नावाची व्यवस्था कित्येक हजारोवर्षे वृध्दींगत होत गेली. त्याचे एक उदाहरण मला अगदी दोन तीन वर्षापुर्वी मोसे मावळ खो-यात फिरताना दिसले. बलुतेदारी संपली. पण काही ठिकाणी ती अजुन आहे. मी एकदा, पानशेत वरसगाव हुन मोटारीतुन मुठा खो-याकडे येत होतो. तसा हा भाग ही दुर्गमच. अजुन ही तासनतास ह्या रस्त्यावर एखाददुस-या वाहनापेक्षा जास्त काही दिसत नाही. तर या प्रवासात, कोंढुर गावाजवळ, एक व्यक्तिने माझ्या गाडीला हात केला व लिफ्ट मागीतली. उंचीने साडेचार ते पाच फुट उंच थोडासा जाड, गव्हाळ, पांढरा पायजमा, सदरा आणि टोपी घातलेला हा माणुस या गावातीलच असणार असे मला वाटले व माझा तर्क बरोबर निघाला. गाडीत बसल्यावर त्यांच्याशी गप्पा झाल्या. त्यात त्यांच्या मुलांचे इंजिनियरींग वगेरे शिक्षणाविषयी समजले. ते कुटुंब सध्या पुणे शहरात राहते. मी त्यांना विचारले की इतक्या उशीरा कसे काय निघालात पुण्याकडे तर ते म्हणाले की ते ज्ञाती ने न्हावी आहेत व गावात जोंधळे घ्यायला आले होते. दर शनिवारी व रविवारी ते गावी येतात व गावातील लोकांची दाढी डोकी (हजामत) करतात. त्यांच्याकडे स्वतची शेती नाही. पण ह्या बलुतेदारीतुन त्यांना त्या वर्षी २८ अठ्ठावीस पोती भात, तेवढीच ज्वारी मिळाले. व त्यांच्या जन्मापासुन त्यांना व त्यापुर्वी त्यांच्या वाड वडीलांना देखील ही बलुतेदारी होती. पुर्वी त्यातीलच काही विकुण मसाले,तेल, कपडे आदी विकत घेत. म्हणजे गावातील गावकी मध्ये प्रत्येक घटकास सामावुन घेण्याची क्षमता होती व त्या प्रत्येक घटकाच्या पालनपोषणाची जबाबदारी समाज घेत होता. असेच पुर्वी इतर बलुतेदारांचे ही असायचे. व संस्कृतीच्या ह्या खाणा खुणा सह्याद्रीच्या कानाकोप-यात आज ही पहावयास मिळतील.
सह्याद्रीच्या प्रगल्भ व अतीश्रीमंत संस्कृतीचा पुरावा
अंदाजे सहा सात वर्षापुर्वी मी हिरडस मावळात काही कामानिमित्त गेलो होतो. तिथे मला आश्चर्य चकीत करणारा असा सह्याद्रीच्या प्रगल्भ व अतीश्रीमंत संस्कृतीचा पुरावाच मिळाला. तिथे एक गोपाळ भेटला. गोपाळ हे त्याचे नाव नव्हते तर त्याच्या कामावरुन त्याला व त्याच्या सारख्या अनेकांना पडलेले नाव होते. हा गोपाळ गायीं पाळणाराच होता. व त्याही पुढे जाऊन गोपाळकृष्णासारखा एक पावा म्हणजे बासरी देखील घेऊन डोंगरावर गायींना चारत होता. वीसएक गायी, काही बैल, वासरे, गो-हे असा पन्नास एक जनावरांचा कळप त्याच्या मागेपुढे चरत फिरत होता. त्याच्या डोक्यावर पांढरी टोपी होती . अंगावर साधी मळकी कपडे होती. व आणखी एक विशेष घोंगडी की जिला जागोजाग घुंगरांनी सजवले होते अशी घेउन स्वतला पाउस व थंडीपासुन वाचवुन गायींना चारत होता. त्याच्या पाव्याला देखील घुंगरं लावली होती. त्याचे नाव गाव विचारले नाही. पण त्याच्याकडुन हे समजले की मावळात अशा प्रकारचे गोपाळ गावोगाव असत. यावरुन सह्याद्रीच्या कुशीतील एकेकाळच्या श्रीमंत संस्कृतीचे पुसटशे दर्शनच आम्हाला घडले. निसर्गात गायींना चारण्यासाठी घेऊन जाणे व बासरी वाजवणे, संगीत साधना करणे, निसर्ग व स्वतच्या गायी यांच्याशी एकात्मभाव स्थापित करणे हा तर हेतु नसेल ह्या गोपाळांचा?
हा गोपाळ पावा वाजवताना त्याचे चित्रीकरण मी करु शकलो. तुम्ही सुध्दा बघा व ऐका.
दुःखाची गोष्ट अशी की आपण आपले हे वैभव गमावुन बसलो आहोत. येत्या काही दशकांमध्ये, मला जशा खाणाखुणा दिसल्या त्यादेखील दिसणार नाहीत.
असो. सह्याद्रीविषयी आणखी ही बरेच लिहिता , बोलता येऊ शकेल. विस्तारभयास्तव इथे विराम घेतो. तुम्हाला सह्याद्री मध्ये भटकंती करताना असे अनुभव आले असतील तर अवश्य इथे कमेंट करा तसेच ही पोस्ट शेयर देखील करा.
आमच्या लेखांविषयी त्वरीत अलर्ट मिळवण्यासाठी तुमचा इमेल ॲड्रेस टाकुन सबस्क्राईब करा किंवा आमचे फेसबुक पेज लाईक करा.
धन्यवाद
श्री हेमंत ववले,
निसर्गशाळा, पुणे
2 thoughts on “सह्याद्री आणि गोपाळांची संस्कृती”