आकशातील चित्तरकथा – धनुर्धर

अर्धे शरीर म्हणजे कमरेपासुन वरचा भाग माणसाचा आणि त्याच्या खालील अर्धा भाग घोड्याचा, अशी वैशिष्ट्येपुर्ण शरीररचना असलेले एक पात्र तुम्ही नार्निया या हॉलिवुड चित्रपटात पाहिले असेल. हॉलिवुड ने अशा पध्दतीने प्राचीन साहित्यातील अनेक ग्रीक, युनानी, रोमन देवीदेवतांना सिनेमांमध्ये तरी मुर्त रुप दिले आहे. सिनेमांमधील अनेक कथा या मुळ प्राचीन साहित्यामधुनच घेतलेल्या असतात किंवा त्यात थोडेफार बदल केले जातात.

अशाच एका प्राचीन ग्रीक साहित्यातील वैशिष्ट्यपुर्ण योध्दा वीराविषयी आपण आज माहिती करुन घेणार आहोत.

या प्रकारच्या प्राण्यास सेंटॉर असे म्हंटले गेले आहे प्राचीन ग्रीक कथांमध्ये. सेंटॉर म्हणजे अर्धे शरीर मनुष्याचे व अर्धे घोड्याचे. जशी मनुष्य, देव प्रजात मानली जायची तशीच सेंटॉर नावाची एक प्रजातीच मानली गेली आहे. या प्रजातीमधील सर्वात हुशार, प्रगल्भ म्ह्णुन प्रसिध्द असणार सेंटॉर म्हणजे कायरन किंवा कायरॉन (Chiron). 

सर्व सेंटॉर प्रजाती त्यांच्या जंगलीपणा विषयी प्रसिध्द होते. मद्यपी, वासनांध, दारु पिऊन गोंधळ घालणे हा  सेंटॉर प्रजातीचा नेहमीचा उद्योग असायचा. परंतु कायरन मात्र या सर्वापासुन भिन्न होता. त्याचे बालपण देखील सेंटॉर प्रजातीपासुन लांब व्यतीत झाले. तो बुध्दीमान, तर्क करणारा, सुसंस्कृत, प्रेमळ स्वभावाचा होता. याचे कारण म्हणजे कायरन हा क्रोनस या आकाशीय पिंड व समुद्र कन्या यांचा पुत्र असल्याचे ग्रीक पुराणांमध्ये लिहिले आहे. त्यामुळेच त्यामध्ये सामान्य सेंटॉर पेक्षा वेगळे गुणविशेष होते.

एक कथा असेही म्हणते कायरन आणि –हीया पती पत्नी असुन ते आकाशीय पिंड देवता असतात. –हीया एक असमाधानी पत्नी असुन, सदैव ईर्ष्या, वाद विवाद, भांडणे यामध्येच लिप्त असायची. तिच्यापासुन स्वःतची सुटका करुन घेण्यासाठी कायरन ने स्वःतला सेंटोर मध्ये रुपांतरीत केले. पुढे त्याने जेसन या एका राजघराण्यातील, परंतु पिडीत युवकाचे गुरुपद स्वीकारले. जेसन ची कथा देखील रोचक आहे. जेसन ला त्याच्या वडीलांचे साम्राज्य, की जे चुलत्याने बळकावलेले असते, ते पुन्हा प्राप्त करायचे असते व वडीलांच्या फसवणुकीबद्दल चुलत्याचा बदला घ्यायचा असतो. चुलता जेसन ला एक अट घालतो व एका अशक्य प्राय कामगिरीवर पाठवतो. ही कामगिरी असते सोनेरी लोकर आणण्याची. चुलता अशक्य कामगिरी देतो व म्हणतो की तु जिंकलास तर राज्य तुला मिळेल आणि हरलास तर तुला मृत्यु मिळेल. या जेसनला सोनेरी लोकर आणण्यासाठी खुप प्रवास, युध्दे करावी लागणार असतात. प्रवास सुखरुप व न चुकता करता येण्यासाठी कायरन त्याला आकाशातील धनुर्धर म्हणजेच सॅजिटेरीस व सेंटॉरस या तारकासमुहांचा उपयोग करुन दिशा ज्ञान देतो.

आणखी एक ग्रीक परंपरा येते, त्यामध्ये आकाशातील धनुर्धर म्हणजे सेंटोर नसुन सटायर नावाचा एक विचित्र प्राणी दाखवला आहे. या प्राण्यास घोड्यासारखी शेपटी व घोड्यासारखेच कान असतात. याचे एक वैशिष्ट्ये असे की हा याचा पौरषावयव नेहमीच उत्तेजित आहे असे सांगण्यात येते व तशाच प्रकारच्या वर्णनावर आधारीत त्याच्या प्रतिमा , मुर्त्या देखील बनवलेल्या आहेत. हा सटायर म्हणजेच आकाशातील धनुर्धर असुन, तो धनुर्विद्येचा देवता मानला गेला आहे. धनुर्विद्येचा शोध त्यानेच लावला. यासाठी त्याने झिऊस देवाकडे साकडे घातले की त्याला आकाशामध्ये स्थान दिले जावे जेणे करुन तो सर्वांना धनुर्विद्येचे प्रशिक्षण आकाशातुन देत, जोपर्यंत ब्रह्मांड आहे तोपर्यंत देत राहील.

भारतामध्ये , भारतीय ज्योतिषींनी यास धनुर्धर असे न पाहता फक्त धनु असे पाहिले. भारतात या राशीस धनु राशी म्हंटले गेले आहे. या राशीमध्ये दोन नक्षत्रांचा (२७ वैदीक नक्षत्रांपैकी) समावेश केला जातो. पुर्वाषाढा व उत्तराषाढा. पुढच्या वर्षी आपण या दोन्ही नक्षत्रांविषयी अधिक माहिती घेउयात.

धनुर्धर किंवा धनु आकाशामध्ये ज्या दिशेला आहे, ती दिशा, तो भाग आकाशातील सर्वात जास्त तारे असणारा भाग आहे. धनुर्धराच्या बरोबर मागे, खुप दुर आकाशगंगेचे केंद्र स्थान आहे. यालाच गॅलॅक्टीक सेंटर असे म्ह्ंटले जाते.

 

आकाशाचा हा भाग निहारीका (नेब्युला) असंख्य छोटे मोठे ता-यांनी भरलेला दिसतो. आपली सौरमाला, आकाशगंगेच्या केंद्राभोवती फिरते आहे. ते आकाशगंगेचे केंद्र धनुर्धराच्या मागे, खुप दुरवर आहे.

हे गॅलॅक्टीक सेंटर नैऋत्य आकाशात पाहण्याची संधी अजुन फक्त एक महिनाभरच आहे या वर्षी. ते ही सुर्य मावळ्यानंतर लगेचच.

आकाशामध्ये या दिवसांत, म्हणजे नोव्हेंबर मासात, जर आपणास धनुर्धर पाहायचा असेल तर, आपणास नैऋत्य (दक्षिण-पश्चिम) दिशेला, सायंकाळी सात वाजे नंतर पहावे लागेल. वृश्चिक मावळल्यानंतर त्याच्या शेपटातील ता-यांच्या थोडेसे वर, डावीकडे आपणास आकाशातील धनुर्धर दिसेल.  रात्री नऊ पर्यंतच आपण धनुर्धर पाहु शकतो.

आधुनिक खगोलशास्त्र यास चहाची किटली म्हणुन पाहते. तरीही नाव मात्र जुनेच म्हणजे सॅजिटेरीयस हेच वापरले जाते.

उगवताना धनुर्धर पाहायचा असेल तर जानेवारी फेब्रुवारी पर्यंत वाट पहावी लागेल. जानेवारी फेब्रुवारी मध्ये रात्री अकरानंतर हा उगवताना दिसतो. जेव्हा धनुर्धर आग्नेयेला उगवतो त्याच सुमारास पश्चिमेला वृषभ मावळतो. त्यामुळेच यास वृषभहारी असे ही म्हणतात.

 

 

 

Facebook Comments

Share this if you like it..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *