गुलाबी थंडी आणि आपण दोघे

couple romantic camping near pune

हेमंत ऋतुचे आगमन झाले आहे. हेमंत ऋतु म्हणजे बोचरी थंडी आणि अश्विन कार्तिकातील उष्मा आणि पौष फाल्गुनातील बोचरी थंडी यांचा संधीकाळ. अगदी आपणास समजेल असे सांगायचे झाले तर हेमंत ऋतु म्हणजे ऑक्टोबर हिट व वर्षाच्या शेवटी पडणा-या कडाक्याच्या थंडीचा संधीकाळ. या ऋतुमध्ये सर्वत्र आल्हाददायक व मन प्रसन्न करणारे वातावरण असते. आपली पृथ्वी सुर्यापासुन नेहमीपेक्षा दुर गेलेली असते व त्यामुळे तापमानात (विशेषतः आपल्या भागात) कमी होण्यास सुरुवात झालेली असते. याच वेळी अगदी भरदिवसादेखील अंगावर सुर्यप्रकाश पडला तरी तो तापदायक वाटत नाही. सुर्याची किरणे अगदी सोनेरी वाटु लागतात. आणि अंगावर येणारी वा-याची झुळुक “शराबी” वाटु लागते. याच पार्श्वभुमीवर एका प्रियकराचे त्याच्या प्रियसीस लिहिलेले हे अनोखे..

Photograph by Sachin Jain at Nisargshala Campsite

couple romantic camping near pune

प्रिये

आज मला ‘आपली’ आठवण आली. ‘आपण’ त्यावेळी एका वेगळ्याच विश्वात मदमस्त फिरत होतो. आठवतय का तुला?
पश्चिमेला सुर्य मावळत असताना सुर्याची किरणे अंगावर घेत, व मध्यम थंड हवेच्या लहरी अंगावर घेताना, आपण जर नितांत सुंदर, झुळु झुळु वाहणा-या एखाद्या नदीच्या काठावर बसलो असु तर सोबतीला कोण असावयास हवे असे वाटते?

अर्थात “तु” हवीस सोबतीला. दोघे भिन्न असलो तरी मावळतीच्या त्या केसरी रंगामध्ये, अंगावर पडणा-या त्या सोनेरी सुर्यकिरणांच्या आणि मध्यम थंड हवेच्या लहरींनी दोघे, निःशब्द अशा एका अनामिक मनोमिलनाद्वारे एकत्वाचा अनुभव तर घेत नव्हतो ना? तो मावळतीचा केसरी रंग, ती सोनेरी किरणे आणि ती मध्यम थंड हवेची झुळुक यांच्या सान्निध्यात “तु” आणि “मी” या सगळ्यांनी जो माहोल बनेल त्याला गुलाबी थंडी म्हणत असतील कवी लोक. बरोबर ना?

मागील वर्षी आपण दोघे गेलो होतो अशाच गुलाबी थंडी मध्ये, आठवतय का तुला?

त्या गुलाबी थंडीमध्ये द्वैत नव्हते. तिथे “मी” नव्हतो आणि “तु” देखील नव्हतीस. तिथे माझे-तुझे ही नव्हते, तिथे चुक आणि बरोबर असे ही काहीच नव्हते. तिथे क्षुद्र अहंकाराला जागा नव्ह्ती, तिथे होती फक्त गुलाबी थंडी. या गुलाबी थंडी मध्ये आपण होतो. आपल्या ‘आपण’ असण्यामध्ये ‘मी’ संपुन गेला होता आणि ‘तु’ देखील. चांगले-वाईट या व्यवहाराच्या पलीकडे, फक्त भावनांची अभिव्यक्ति होत होती आणि ती देखील निसर्गात. कुठे? या गुलाबी थंडी मध्ये!

या भावनांना शब्द नसतात बर का! शब्दात सांगताच येत नाही या भावना. आणि या गुलाबी थंडी मध्ये या भावना सांगाव्यात तरी का? गरजच नाही. सांगणारा आणि ऐकणारी दोघेही एकच तर आहेत. मनात खुप मोठी पोकळी तयार होते. या पोकळीच्या अल्याड उत्कंठा असते, कुतुहल असते, अनामिक पीडा असते, हे मिलन घडुन आल्याचे समाधान असते, हे क्षण संपणार तर नाहीत ना! अशी भीती असते. आणि एक वेळ येतेच की ‘आपण’ या उत्कंठा, कुतुहल, पीडा, समाधान, भय या सा-यांना मागे ठेवुन, नकळतच एका अलौकीक प्रवासास निघतो. हा प्रवास कुठे ही जाण्यासाठी नाहीये. प्रवास सुरु झाल्यावर समजते की या प्रवासाची कधीही सुरुवता झालेली नाहीये व याचा शेवट ही होणार नाही. आणि होणार असेल तर होऊच नये शेवट याचा. हा प्रवास–सहप्रवास म्हणजे त्याच पोकळीची दर्शनी बाजु, जी कधी कधी डोळ्यांतुन अश्रुंना देखील वाट मोकळी करुन देते. कसली व्यथा वेदना दुःख आहे म्हणुन अश्रु ओघळत नाहीत तर भावविभोर मनःपटलावर गुलाबी थंडीमुळे जे रोमांच आलेले असतात त्या सुखद, हव्याहव्याशा अनुभुती ची अभिव्यक्ति म्हणजे ते अश्रु होत. तु व मी मिळुन आपण दोघे. पण आता तिथे तु नव्हतीस आणि मी देखील नव्हतो. तिथे आहोत फक्त ‘आपण’ होतो. आणि या पोकळीच्या अंतरंगात गेल्यावर समजले की खरतर आपल्याला ‘आपण’ असण्यासाठी शरीर व किंबहुना या मनाची देखील गरजच नाहीये. हे दोघे ही अडसर आहेत आपल्या ‘आपण’ होण्यातील. प्रत्येकाने आयुष्यभर असंख्य कल्पंनाना मनात साठवुन ठेवलय. जगण्याच्या कल्पना विचार यांनी प्रत्येकाची मने इतकी कलुषित झालेली आहेत की आता हे मन अडसर वाटु लागावे. निरागसता प्रत्येकाने घालवली. मी घालवली होती आणि तु देखील. पण त्या गुलाबी थंडी मध्ये पुन्हा एकदा अनुभव आला आपल्या ‘आपण’ असण्याचा.

चल जाऊयात पुन्हा, त्या गुलाबी थंडीमध्ये, माझ्या ‘मी’ आणि तुझ्यातील ‘तु’ संपवुन ‘आपण’ होण्यासाठी! येशील ना?

तुझाच
XXXXXXXXXXX

Facebook Comments

Share this if you like it..