Camping near Pune

Camping new Pune - Trek to Rayling Platuea

Camping near Pune

Trek to Rayling Plateau near Pune

रायलिंग पठार

रायलिंग पठारावर उभं राहिल्यावर कुठेतरी गडकोटांची स्पंदनं जाणवू लागतात. सह्य़ाद्रीचे रौद्र पुढय़ात उभे राहते. लिंगाण्याचे अलौकिक रूप आणि रायगडाचे दर्शन इथूनच घडते. हे सारे पाहताना भान हरपायला होते. इथला भन्नाट वाऱ्याचा झोत अंगावर घेताना स्वत:च्याही अंतरीची खूण पटत जाते.

महाराष्ट्राचे दोन मानबिंदू असणाऱ्या तोरणा-राजगडाच्या मावळतीला असलेला एक अभेद्य कडा. पुणे अन् रायगड जिल्ह्याच्या सीमेवर. सीमा कसली, ही तर सह्याद्रीच्या असामान्य रौद्रत्वाची परिसीमाच! या कडय़ावर उभं राहिलं की पुढय़ात उभं असतं सह्याद्रीचं शिविलग! त्याच्याच मागे आपल्याला नकळतपणे नतमस्तक व्हायला लावणारं एक ‘शिवमंदिर’! गिर्यारोहक नवखा असो वा कसलेला, निसर्गप्रेमी असो व निसर्गाशी अपरिचित, कोणत्याही मराठी मनाची तार क्षणार्धात झंकारावी आणि या रांगडय़ा सह्याद्रीशी त्याचं नातं कायमचं जुळावं, असं हे ठिकाण, म्हणजेच रायलिंग पठार!
देश आणि कोकणला जोडणाऱ्या अनेक घाटवाटा आहेत. पुणे जिल्ह्यातल्या वेल्हा तालुक्याच्या पश्चिमेलाही अशाच दोन घाटवाटा रायगड जिल्ह्यात उतरतात. सिंगापूर आणि बोराटा अशी या नाळेंची अगदी लोभस नावं. त्यांच्यापर्यंत पोहोचायला मात्र पुण्याहून सुमारे सत्तर किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. पुण्याहून नसरापूर माग्रे वेल्हय़ाच्या दिशेने निघालो की डावीकडे राजगडाचं प्रसन्न दर्शन होतं. वेल्हा जवळ येताना ते गरुडाचं घरटं म्हणजेच तोरणगडही नजरेत भरतो. त्याला दंडवत घालत वेल्हय़ात दाखल व्हायचं. चहा-नाश्ता, भोजनाची व्यवस्था होणारं या मार्गावरचं हे शेवटचं ठिकाण. वेल्हय़ातील हा थांबा उरकायचा आणि भट्टी माग्रे पासली गावाकडे आपला प्रवास सुरू करायचा. तोरण्याच्या भेदक अशा घोडेजीन-विशाळा टेपाडाला मागं टाकून घाटमाथ्यावर आलो की साधारण नर्ऋत्येला सह्याद्रीचं अफाट साम्राज्य पसरलेलं दिसतं. रायरेश्वर, कोळेश्वरापासून ते पार महाबळेश्वर मधुमकरंदगडापर्यंतची अनेक गिरिशिखरं साद घालू लागतात. हे सह्यवैभव भान हरपून डोळय़ांत सामावून घ्यायचं आणि घाट उतरून पासली गावात दाखल व्हायचं. पासलीपासून केळदघाट चढून केळदिखडीत पोहोचलं की मोहरीपर्यंतचा दहा किलोमीटरचा प्रवास सुरू होतो. या प्रवासातही सह्याद्री त्याचं विलक्षण अंतरंग मोकळेपणानं उलगडून दाखवतो. उजवीकडे तोरण्याचा संपूर्ण आकार नजरेत भरतो आणि त्यानं राजगडाच्या दिशेनं पुढे केलेला मत्रीचा हातही. डावीकडे कांगोरी, मकरंदगड, प्रतापगड आणि आंबेनळी घाटही सुरेख दर्शन देतात. या वाटेवरचं एकलगाव मागे पडतं आणि एका वळणावरून रायगड आणि िलगाण्याचं जे काही रूप नजरेत भरतं त्यासाठी शब्दच थिटे पडावेत. खोल तुटलेलं ते टकमक टोक, तो भवानी कडा, तो रेखीव नगारखाना आणि श्रीकृष्णाच्या मुकुटातल्या मोरपिसासमान भासणारं ते जगदीश्वराचं शिवालय..! असं वाटतं, की सरळ जाऊन नि:शब्दपणे उभ्या असलेल्या रायगिरीच्या कडय़ांना बिलगावं आणि त्यांनीही या लेकराला अलगदपणे कडेवर उचलून घ्यावं. नजर हटत नाही, मन भरत नाही, पण घडय़ाळाचे काटे आडवे येऊन सांगतात की पुढे अजून कितीतरी सुंदर असं काहीतरी आहे.
मोहरी गावात पोहोचलो की त्या गावाचं स्थान नेमकं लक्षात येतं. सह्याद्रीच्या चारही बाजूंनी वेढलेल्या कडय़ांच्या प्रदेशात मोहरीच्या दाण्यासमान असलेलं हे छोटंसं मोहरी गाव. इथंच एखाद्या घरी पाठपिशव्या टाकायच्या आणि  सरळ पश्चिमेकडे चालू लागायचं. वाट मळलेली, तसंच िलगाणा सतत समोर दिसत असल्यानं चुकण्याचा प्रश्नच नव्हता. अध्र्यापाऊण तासांच्या या प्रवासात डावीकडे सिंगापूर आणि बोराटा नाळीही आपलं अस्तित्व जाणवून देतात. सरतेशेवटी आपण रायिलग पठारावर येऊन दाखल होतो आणि क्षणभर डोळय़ांत पाणीच तरळतं. शब्द सुचत नाहीत, कारण ऊर भरून आलेला असतो. काय म्हणावं सह्याद्रीच्या या अपूर्व किमयेला! किती धन्यवाद द्यावेत हेच उमगत नाही. लिंगाण्याच्या त्या मूíतमंत देखणेपणावर जीव ओवाळून टाकावासा वाटतो. रायगडावरून जगदीश्वराच्या गाभाऱ्यातले पवित्र मंत्रोच्चार कानी पडू लागतात आणि आपल्याला तिथंच स्वत:ची ओळख विसरायला होतं. रोजचं रहाटगाडगं विसरावं अन् त्या सह्याद्रीच्या चरणी अर्पण होऊन जावं. उजवीकडे गायनाळ, निसणीची वाट, खानूचा डिगा, वारंगीचा कणा डोंगर, कोकणदिवा आणि कावळय़ा-बावळय़ाची खिंड ज्या रूपात समोर येते ते सारंच अवर्णनीय! खाली रायगड जिल्ह्यातील पाने अन् दापोली ही छोटीशी गावं, वाळणकोंडीच्या डोहाचा प्रदेश, काळ नदीचं पात्र अन् छत्री निजामपूरचं धरण दिसू लागतं. समोरच्या िलगाण्याच्या पोटात एक छोटेखानी गुहा दिसते अन् त्याचं आभाळ भेदून गेलेलं शिखरही. त्याच्या डोळे फिरवणाऱ्या वाटेशी सलगी करावी ती या मातीतल्या मावळय़ांनच! त्याच्या अस्मानी माथ्यावर एकदा तरी पाऊल ठेवावं आणि मनोमन स्वाभिमानाची अभेद्य तटबंदी उभारावी. रायिलगाच्या पठारावरून त्याच्याकडे बघताना हीच तर स्वप्नं पाहायची. आयुष्यातलं सर्वोच्च स्थान गाठण्याचीच स्वच्छंद गगनभरारी घेण्याची!
रायिलग पठारावर उभं राहिल्यावर कुठेतरी गडकोटांची स्पंदनं जाणवू लागतात. त्या भन्नाट वाऱ्याचा झोत अंगावर घेताना स्वत:च्याही नकळत अंतरीची खूण पटावी अन् उत्तरांना पडलेले प्रश्नही कसे अलगद सुटावेत. इथल्या शांततेशी काही काळ बोलावं आणि आयुष्यातली आपली सारी दु:खं इथून खाली कायमची फेकून देऊन मोकळं व्हावं. रायगडावर चिरविश्रांती घेणाऱ्या त्या युगपुरुषाला इथूनच दंडवत घालावा आणि त्याच्या तेजाचा अंश घेऊन इथंच आपल्या भटकंतीचा समारोप करावा.

 

Share this if you like it..