…..मी दोन काटं खाल्ल्यात कळकीच

Portrait of life and wisdom

“काही तरीच बरका ! तुमच वय ९० वर्षे असणे शक्यच नाही”, रामा धनगराला मध्येच थांबवत मी जरा मिश्किलपणे म्हंटले. त्यावर रामा धनगर थोडा थबकला. आता त्याच्या पुढे प्रश्न होता की कस काय पटवुन द्यायचे की त्याचे वय ९० ची आसपासच आहे असे.

पश्चिमघाटाच्या घाटमाथ्यावर भोर्डी गावात आम्ही दोन वर्षापुर्वी बांबु(मेस जातीचा) ची लागवड केली. रविवारी पर्यटकांची पुण्यात रवानगी केल्यावर मी आणि सुनिल सिंगापुर रोड कडे फेरफटका मारुन, बांबुंची वाढ कशी आहे ते पाहण्यासाठी आमच्या जागेत गेलो. सगळ्या शिवारात फेरफटका मारुन झाला. वाटेने पुन्हा चढ चढुन सिंगापुर रोड ला येण्यासाठी थोडी चढण होती. त्यामुळे आमचा वेग कमी थोडा मंदावला. तेवढ्या गावातुन आमच्या शेतापर्यंत आलेल्या पायवाटेने एक वयोवृध्द हळु हळु वर येताना दिसले. जुन्या थोरल्या माणसांशी बोलणे, गप्पा मारणे म्हणजे एक पर्वणीच असते माझ्या साठी. मी चालण्याचा वेग आणखी कमी केला. व त्या माणसास जवळ येउ दिले.

एरवी स्थानिकांशी संभाषणाला सुरुवात मी करीत असतो. पण ह्या माणसाने स्वतःच आवाज देऊन आम्हाला थांबवले. मग काय बोलत बोलत एका झाडाच्या सावलीपाशी येऊन आम्ही तिघांनी ही बुडं टेकवली. रामभाऊं वेगवेगळ्या रोचक गोष्टी सांगु लागले. ज्ञातीने ते धनगर आहेत म्हंटल्यावर आवर्जुन आम्ही “गवळी धनगर हाये बरका” असे गवळी शब्दाला अधोरेखित सुध्दा केले. रामभाऊंची तब्येत ठिक नव्हती. औषध घेण्यासाठी पांढरी (पांढरी म्हणजे लगत चे गावठाण) वर गेले होते. धनगर समाज पश्चिम घाटमाथ्यावर ठिकठिकाणी वस्ती करुन शेकडो वर्षे राहात आहे. शिवाजी महाराजांच्या काळात राबत्या असणा-या सगळ्याच्या सगळ्या किल्ल्यांच्या उशाला, दांडांवर धनगरांची वस्ती होती. व त्या स्वराज्याच्या शक्तिकेंद्रांना दुधा-तुपाने धष्टपुष्ट करणारे धनगर, इतिहासाने जरी दुर्लक्षिले असले तरी त्यांचे योगदान अभुतपुर्व आहे हे तर्कबुध्दीने सांगता येते.

रामभाऊ पुन्हा सुरु झाला, “ तुला कळकी म्हायीत हाये का?”, मी “हो” म्हणालो.

“मग आता बघ मी सांगतो तुला मी नव्वद वरसाचा कसा काय आसन ते. मी कळकीचे दोन काटे खाल्लेत. कळकीला काटा किती वरसांनी येतो म्हायतीये का तुला?” , मी मान हलवुन नाही असा नकार देऊन “कळकीचा काटा म्हण्जी काय बाबा?” , असे विचारले.

“अरे कळकीला फुलवरा येतो. त्यालाच काटा म्हणत्यात.”  त्याने असे सांगितल्यावर मला थोडा बोध झाला. रामभाऊ बोलतच होता,”माझ्या उमेदवारीच्या दिवसात पहील्यांदा कळकीला काटा आला. त्या टायमाला आमी कळकीच ब्यान गोळा करुन तेच्या भाकरी करुन खाल्ल्यात. ” रामभाऊ जुन्या आठवणीत थोडासा अडकला. “ माझ्या उमेदवारीच्या काळात, मी एक एक मणाच प्वातं, छातीम्होरन , गुडघ बिन वाकवता , पाठणीव टाकायचो. दुधा-तुपाची हाड आमची आण आमच्या बापजाद्यांची. आता बघा नुसत भेसळ हाये अन्नात. आण रानात बी नुसत खत बित टाकुन पिकवलेल दान बी कसदार नसत्यात. आमच्या टायमाला नुसत श्याणखत वापरायचे आम्ही खाचरामदी ! ”

“तर त्या कळकीला काटा यतो ६० वरसांनी, आन मी दोन काटं खाल्ल्यात कळकीच. आता तुच सांग लका मी नवदीचा आसन का नाय ते ?”

बॉल माझ्या कोर्टात टाकुन रामभाऊ, त्याच्या धोतराच्या सोग्याला लागलेली कुसळ काढु लागला. रामभाऊ ची दोन्ही पोर सध्या शहरात राहायला गेली आहेत. घरी फक्त तो आणि त्याची तितकीच वयोवृध्द बायको, असे दोघेच राहत. पोर सोर कधी मधी सणासुदीला येतात पाड्यावर. रामभाऊ कडुन मला अजुनही बरेच काही ऐकायचे होते. माहीतीचा खजिना आहे त्याच्या कडे. पण आमच्या कडे वेळ नव्हता. रामभाऊचा हात हातात घेऊन मी म्हणालो, ”बरुबर हाये! आसन मग तुमच वय ९० वरसं. बाबा निघतो आता. लांब जायचय आम्हाला पुण्याच्या फुड. नंतर कदी मदी यीन गप्पा माराय तुमच्या कड वस्तीला.” आम्ही रामभाऊचा निरोप घेत असतानाच, चालता चालता रामभाऊ ने वाटेतच असलेल्या एका चिचार्डीची वांगी पटापट तोडुन , मुठ-मुठ आमच्या हाती देऊन म्हणाला,” हे खा, भारी असत्यात, कडवट लागतय चवीला पण अवसदी हाये हे”. आम्ही देखील चिचार्डी हातात घेऊन खाल्ली. आणि निघालो मोटारसायकल चालु करुन.

अजुन बरेच काही शिकायला मिळेल रामभाऊ कडुन, पण आता वेळ नव्हता. खरच का वेळ नव्हता आमच्या कडे? खरतर रामभाऊ किंवा त्याच्याच वयाच्या, ह्या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर ज्यांनी दोन दोन कळकीचे काटे, खाल्ले, पाहीले, अशा माणसांकडे वेळ खुप कमी आहे.

सह्याद्रीचे वैभव हळु हळु नष्ट होऊ लागले आहे. वाढता मानवी हस्तक्षेप, भुभागाशी होत असलेला खेळ, फार्म हाऊस प्लॉटस, त्यासाठी रस्ते, ग्राहकांना प्लॉट पसंत पडावा म्हणुन सर्रास अहोरात्र चालणारे जेसीबी पोकलंड, स्थानिक झाड झुडपांचा नाश, प्राणीमात्रांचा नाश हे सगळे आपणास सह्याद्रीच्या विनाशाकडे नेत आहेत.

अशातच अशा जुन्या जाणत्या माणसांकडे असणारे पिढ्यानपिढ्यांचे ज्ञान भांडार त्यांच्या सोबतच लुप्त होईल की काय अशी भीती वाटु लागते. आधुनिक शिक्षण सह्याद्रीच्या संरक्षण संवर्धनात कुचकामाचे ठरले ह्यात संशय नसावा. निसर्गाचे शोषण कसे करता येईल फक्त हेच शिकुन जे जे मिळेल ते ते ओरबाडुन घेणे, हे गेली ७० वर्षे आपण शिकलो व शिकवीत आलो आहोत.

हे पिढयानपिढ्यांचे ज्ञान लुप्त होण्याआधीच ते जपुन ठेवता येईल का? व त्याच ज्ञानातुन सह्याद्रीला त्याचे वैभव पुन्हा देता येईल का?

Portrait of life and wisdom

Portrait of life and wisdom – PC – Hitendra Barse, Sr Lead Computer Game Developer.

 

Facebook Comments

Share this if you like it..