मागच्या पंधरा दिवसात कुमकरांच्या घरी दररोजच जावे लागले होते. एकदा त्यांनी अळंबी खाऊ घातली होती. दुस-या वेळी देखील त्यांनी संकोचुनच विचारले की सर तुमच्यासाठी आणखी एक वशाट ठेवलय राखुन रानातलं. खाणार का?
रानातल काहीही असो शाकाहारी भाज्या असोत वा मांसाहारी जिन्नस असोत, हे खायला मिळणे म्हणजे एक पर्वणीच. आणि चालुन आलेली संधी सोडायचा करंटेपणा अजुन तरी आपल्याला माहित नाही ब्वा ! वशाट पदार्थ काय आहे? कोणता प्राणी आहे हे माहित नसतानाच व माहित करुन घ्यायची वाट न बघता मी सरळ होकार दिला. व खुर्चीवर बसुन वाट पाहु लागलो.
मागच्या वेळी जसा वाटी भरुन रस्सा व त्या रश्श्यात अळंबी होती तसेच काहीतरी या वेळीही असेल असा विचार करीत वाट पाहणे सुरु झाले. विमल बाईंनी चुलीवर भाजी गरम केली. व वाटीत भरुन वाटी माझ्या समोर ठेवली. यावेळी वाटीमध्ये रस्सा नव्हता. घेवड्याच्या आकाराचे काहीतरी, वाटीभरुन, सुके, मसाल्यामध्ये मस्त वाफलुन घेतलेले. मी आधी चमच्याने दाबुन पाहिले तर तो जिन्नस अगदी व्यवस्थित शिजलेला आहे की नाही हे तपासुन पाहिले.
जाणीवपुर्वक , मी खाणार असलेला पदार्थ काय आहे हे न विचारताच मी एक चमचा भरुन घेतला, व अलगद घास घेतला. दाताखाली चावण्याचे कष्ट अजिबात येत नव्हते. दाताखाली एक एक तुकडा आला की हळुवारपणे तो विलग होऊन जीभेवर विरघळतोय की काय इतका स्निग्ध व मऊ पदार्थ मी पहिल्यांदाच खात होतो. या चवीची तुलना कशाशी करावी हे मला अजुन ही सुचत नाही. एक वेगळीच व भन्नाट चव मी चाखत होतो.
पुर्ण वाटीवर ताव मारुन झाल्यावर, तोंड पुसतच मी दाजींना विचारले. “आता सांगा काय होत हे?”
दाजी – “खुबे”
वाव !!!!
आम्ही रॅपेलिंग करताना, धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहात, शेवाळलेल्या खडकाला चिकटलेले गोगलगाय सदृश्य प्राणी थोडे काळसर, करड्या रंगाचे मी नेहमी पाहिलेले होते. आणि त्यांनाच खुबे म्हणतात व तेच मी नुकतेच खाल्ले होते.
भाऊ मरगळेची ती फेसबुक पोस्ट पाहुन त्यावेळीच हा प्रकार खाण्याची इच्छा झाली होती. व माझी ही इच्छा पुर्ण देखील झाली.
टिप – खातेवेळी मोबाईल जवळ नसल्याने फोटो काढता आले नाहीत. काही फोटो भाऊ मरगळे यांनी टिपलेले तर पहिला फोटो गिर्यारोहक मित्र सचिन नायडु याने टिपलेला आहे.

सचिन नायडु ने टिपलेला फोटो दिनांक – २० जुन २०२०
अप्रतिम