निसर्गमित्र – लालासाहेब माने

कोणतेही महान काम तुमच्या हातुन होण्यासाठी तुम्हाला कोणत्याही विद्यापीठातुन पीएच डी घ्यावी लागत नाही. अशी पीएच डी तर सोडाच साधी पदवी, बारावी, दहावी पर्यंत देखील शिक्षण न झालेला एखादा व्यक्ति ध्येयाने पछाडल्याने आणि महानतम कर्म आपल्या हातुन व्हावे म्हणुन गेली जवळजवळ दोन तपे कष्ट उपसत आहे. मनुष्य जन्माने, धनसंपत्तीनेच मोठा होतो असे नाही तर कर्माने देखील तो श्रेष्ठत्व प्राप्त करुन घेऊ शकतो याचे जिवंत म्हणजे आजच्या आपल्या या प्रेरणादायी कथेचे, अस्सल जिंदगीतील नायक आहे. या हिरोची जीवनकथा व त्याचे त्याच्या धेयाप्रती समर्पण पाहिले की तुम्हाला माझ्या या लेखातील पहिल्या वाक्याचे सत्यता पटेल. आपल्या या नायकाचे नाव आहे लाल.

एखाद्या सिनेमातील कथा वाटावी इतकी रंजक, करुण, दुखःद जरी असली तरी ही कथा सत्य आहे. प्रत्यक्ष घडली आहे. सकारात्मक बदल होऊ शकतात, एखादा मनुष्य आंतर्बाह्य बदलु शकतो, तो नुसता स्वतःच बदलत नाही तर त्याच्याकडुन महान असे इहलोकी महान असे काम ही होऊ शकते, त्याच्या कडून अनेकजण प्रेरणा देखील घेऊ शकतात; अशा सा-या शक्यतांना पुन्हा एकदा रान मोकळे करुन देणा-या लालचा जन्म कोल्हापुरातील एका अगदी छोट्याशा खेड्यात झाला.

याचे वडील वनखात्यात रखवालदार म्हणुन केवळ दोन रुपये मजुरीवर नोकरीला होते. त्यामुळे तीन मुलांच्या त्यांच्या संसारात काटेच काटे होते. स्वतःच्या मालकीची शेतजमीन देखील अगदीच कमी असल्याने व कोरडवाहु असल्याने त्यातुन काहीही हशील होत नव्हते. लालच्या जन्मानंतर हे कुटुंब त्यांच्या दानोळी या गावातुन तमदलगे या गावाजवळील वनक्षेत्रात राहण्यासाठी गेले. आपल्या हिरोच्या नकळतच त्याच्यावर इतक्या लहान वयात जंगलांचे संस्कार सुरु झाले.सोबत चौथीपर्यंत शिक्षण देखील याच गावातील शाळेत झाले. सुटीच्या दिवशी वडीलांसोबत जंगलात, वनीकरणात काम करावे लागायचे. त्या काळी रोप बनवण्यासाठी ज्या प्लास्टीकच्या काळ्या पिशव्या मजुरांकडुन मातीने भरुन घेतल्या जात त्याची मजुरी तुम्ही ऐकाल तर थक्क व्हाल. शंभर पिशव्या मातीने भरुन दिल्यावर एक रुपया मजुरी मिळायची. आपला हिरो देखील वडीलांना त्यांच्या कामात मदत करायचा. कधी पिशव्या भरण्यासाठी तर कधी घायतळाची रोपे जमा करण्यासाठी , तर कधी डोंगर उतारावर मातीच्या ताली बांधण्यासाठी. तब्बल चार वर्षे तमदलगे तील जंगलात वास्तव्य करुन हे कुटुंब पुन्हा मुळ गावी आले.

इकडे पाचवीला शाळेत प्रवेश घेऊन शाळेत जाऊ लागलेला लालचे मन मात्र जंगलात रमायचे. त्याला शाळेत जे शिक्षक होते त्यांचे नाव शेडबाळे सर. एकदा शाळेत जायला उशिर झाला म्हणुन शेडबाळे सरांनी मागेपुढे न पाहता लालच्या कानशिलात लगावली. लाल ला हा फटका अगदी वर्मी बसला. त्या दिवसापासुन लाल ने पुन्हा कधीही शाळा पाहिली नाही. जशी त्याने शाळेकडे पाठ फिरवली तसेच शाळेने, शेडबाळे सरांनी देखील कधीही त्याला पुन्हा शाळेत आणण्यासाठी प्रयत्न नाही केला. शेडबाळे सरांमुळे लालची शाळेशी, शिक्षणाशी नाळ तुटली ती कायमचीच.

मग काय लाल बेफान सुटला. प्रत्येक गावात असतात तशी टुकार टवाळ माणसांचा वारसा त्याला मित्रमंडळींमुळे कधी लाभला हे त्यालाच काय पण त्याच्या कुटुंबाला देखील समजले नाही. शिक्षण सुटल्यापासुन वैवाहिक जीवन सुरु होईपर्यंत लाल होत्याचा नव्हता झाला होता. योग्य-अयोग्य, नीती-अनीती यांचा कसलाही विचार न करता मिळेल त्या मार्गाने, जसे जमेल तसे, जितके जमतील तितके पैसे कमाविणे हाच त्याचा नेम होता. गाडी रुळावरुन इतकी फाफलत गेली की लाल आता चक्क दारु गाळण्याचा व्यवसाय करु लागला.

आज इतक्या वर्षांनी जेव्हा लाल ला याबाबत विचारले तर ते म्हणतात की स्वार्थ आणि मोह मनुष्याला माणुसपण सोडुन वागायला नेहमीच प्रेरीत करीत असतात. संयमाचा अभाव, मोठ्यांचा अनादर, कशाचीही परवा न करणे अशा कारणांमुळे नकळतच कधी ते वाममार्गाला लागले ते त्यांचे त्यांना सुध्दा समजले नाही.

लग्न झाले, दोन मुली घरात हसु-रडु लागल्या, खेळु लागल्या. तो काळ पाहता मुलगा व्हायलाच पाहिजे असा हट्ट न करता, एका अर्थने वाम मार्गाला गेलेला लाल मात्र माणुस म्हणुन अजुनही ठाम होता. दोनच मुलींवरच समाधान मानणा-या लालच्या आयुष्याला मात्र पुढे वेगळेच वळण लागणार होते. अनुचित मार्गाचा शेवट नेहमी कुणालाही न आवडणा-या ठिकाणीच होतो. तसेच लालचे देखील झाले. मोठी मुलगी दिड वर्षांची तर छोटी मुलगी फक्त दिड महिन्यांची असताना लाल सांगलीच्या कारागृहात बंदिवान झाला.

जेल मध्ये असतानाम, जे काही दिवस शिक्षा  भोगली त्या दिवसांत तावुन सुलाखुन निघालेल्या सोन्यासारखा लालमधे आंतरिक बदल झाला. तो इतका झाला की चक्क जेल मध्ये असतानाच त्याच्या हातुन जेल मधील डझनभर झाडे तुटण्यापासुन वाचली. इलेक्ट्रीकच्या तारांना लागत असल्याने ही भली मोठी झाडे तोडण्याचा निर्णय कारागृह प्रशासनाने घेतला. व त्याप्रमाणे ते काम सुर होणार इतक्यात लाल जेलर साहेबांना म्हणाला की साहेब ही झाडे कापु नका, आपण त्याच्या तेव्हड्याच फांद्या फक्त छाटु ज्या वीजेच्या तारांला लागतात. पण जेलर साहेबांना ही कल्पना जरी आवडली असली तरी ती प्रत्यक्षात करण्यासारखी नाही याचीदेखील त्यांना कल्पना होती. त्यामुळे जेलर साहेबांनी झाडे तोडली जाणारच असे ठरविले. कारण ही झाडे खुपच ऊंच होती. एका अर्थाने हे सारे महान वृक्ष होते. कदाचित शेकडो वर्षे ते ठामपणे त्याच जागी उभे असतील. लाल ला ही अडचण जशी समजली तसे लाल ने जेलर साहेबांना कळवले की लाल स्वतः झाडांवर चढुन फांद्या छाटण्याचे काम करील, ते ही पुर्णपणे त्याच्या स्वतःच्या जबाबदारीवर. जेलर साहेबांनी यावर विश्वास ठेवुन होकार दिला. ही घटना २००१ ची आहे.

हल्लीच म्हणजे डिसेंबर २०२० मध्ये लाल जेव्हा या कारागृहाच्या बाजुने , खानभागच्या रस्त्याने जात होते तेव्हा त्यांना ती सारी झाडे दिसली. म्हणजे लाल ने जे काही केले त्यामुळे ते महावृक्ष अजुनही दिमाखात उभे आहेत. त्याम्च्या अंगाखांद्यावर शेकडो हजारो पक्ष्यांची घरटी आहेत. शेकडो लोकांना सावली देणारी ही झाडे आजही जिवंत आहेत याचे बहुंशी श्रेय लाल ला जाते.

तुरुंगातील शेवटच्या दिवशी त्याला घरी नेण्यासाठी त्याची पत्नी आणि दोन्ही मुली आल्या. त्या चिमुकल्या दोन्ही मुलींना पाहुन, लाल ने मनाचा निश्चय केला की पुन्हा वाममार्गाला लागायचे नाही. पुढे काय करायचे, कुठे जायचे, घर कसे चालवायचे असे काहीही माहित नव्हते पण मनाचा निश्चय मात्र पक्का होता. म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग असतोच. मार्ग नसला तरी ही सृष्टी तुमच्या निश्चयामुळे तुमच्यासाठी मार्ग तयार करतेच. काहीसे असेच झाले पुढे.

स्वतःच्या गावी वाट्याला आलेल्या थोड्याशा शेतात काम सुरु केले. सोबतीला शेळीपालन सुरु केले. अपार कष्ट केले. पण हाताची आणि पोटाची जुळवणी करताना परवड व्हायचीच. आर्थिक बाजु अजुन कच्ची होत गेली. अशातच एका ओळखीतील एका सदगृहस्थाचे पुण्याजवळील पानशेत येथे एक फार्महाऊस असुन त्या फार्म हाऊस ची देखभाल, राखण, तेथे वृक्षारोपण अशा कामांसाठी या गृहस्थाला एका माणसाची गरज होती. लाल ने लागलीच हो म्हंटले व २००३ मध्ये लाल कुटुंबासमवेत पुण्याजवळील पानशेत येथे येऊन राहु लागला.

बालपणातच जंगलकडु (बाळकडु म्हणतात ना तसे जंगलकडु) मिळालेले असल्याने लाल ने फार्महाऊस चे रुप पालटुन टाकले. छोट्याशा जागेत त्यांनी पन्नास झाडे लावली व जगविली. लाल चे मालक एक अभ्यासु तसेच पर्यावरणाविषयी आस्था असणारे गृहस्थ. त्यांना वृक्ष संवर्धन, वृक्षारोपण, देवराई, दुर्मिळ देशी वृक्षांचे संरक्षण व संवर्धनाची आवड आहे. फार्म हाऊस च्या या मालकाने केवळ स्वतःचे फार्म हाऊसच सांभाळले असे नाही तर पानशेत परीसरात पर्यावरण संरक्षण, संवर्धनासाठी देखील सेवाभावी वृत्तीने कार्य सुरु केले होते. या कामामध्ये बंधारे बांधणे, त्यासाठी ग्रामस्थांना प्रेरीत करणे, देशी झाडांच्या बिया गोळा करणे, त्यांची रोपे बनवणे, जनजागरण करणे अशी अनेक कामे फार्म हाऊस चे मालक स्वतः करायचे. लाल च्या कामामुळे, त्यांच्या स्वभावामुळे , त्यांच्या आवडीमुळे मालकांनी लाल ला या सर्व कामात सहभागी करुन घेतले. लाल आता नुसता लाल राहिला नाही. तो आता लालासाहेब झाला होता. पानशेत पंचक्रोशीत क्वचितच एखादा गावकरी असेल जो लालासाहेब यांना ओळखत नसावा. लालासाहेब फार्म हाऊसच्या त्या मालकाचा प्रतिनिधीच होऊन गेला. इच्छा तिथे मार्ग म्हणतात ते अगदी तंतोतंत खरे ठरले. लालासाहेबांना आता पर्यावरण संरक्षण, संवर्धनाची ओढ लागली. त्यामुळे साहजिकच त्यांनी मालकाने सांगितलेली, मार्गदर्शन केलेली ही सारी कामे प्रसंगी स्वतः हातात छन्नी हतोडा, थापी घेऊन केली. .

पानशेत येथील एका छोट्या गावात बंधारा बांधताना लालासाहेब

लालासाहेब त्यांच्या या मालकाचे वर्णन खुपच समर्पक शब्दांत करतात.

ते म्हणतात “सह्याद्रीच्या भटकंती मध्ये मालकासोबत अनेकवेळा प्रवास करावा लागला त्यामुळे मालकाला माझ्यातील हुन्नर दिसला. त्यांनी मला अनेक प्रयोग करण्याची मोकळीक दिली. मी पर्यावरण्याच्या कामाला वाहुन घेतल्याने त्या मालकांनी माझ्या कुटुंबाच्या राहण्याची सोय केली तसेच मुलींच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी देखील त्यांच्या स्वतःच्या खांद्यावर घेतली. मालक-नोकर नाते संपुन पालक-पाल्य असे नाते कधी जन्माला ते कळलेच नाही.

लालासाहेबांच्या या मालकाचे, नव्हे नव्हे पालकाचे नाव काय आहे माहित आहे का मंडळी? यांचे नाव आहे शेडबाळे..

पाचवीच्या वर्गात कानशिलात मारुन लालासाहेबांची शाळा बंद होण्याला आणि जीवन प्रवास भलत्याच अंधा-या दरी मध्ये जाण्याला निमित्त ठरणारे शेडबाळे सर आठवतात का तुम्हाला?

नाही नाही, हे ‘ते’ शेडबाळे नाहीत बरका! हे आहेत श्री धनंजय शेडबाळे. धनंजय शेडबाळे हे नाव पर्यावरण प्रेमींसाठी नवीन नाही. पुण्यातील देवराई संस्था तसेच पिंपरी चिंचवड मधील स्वांतत्र्यवीर सावरकर मंडळ निसर्ग मित्र विभागाचे अध्यक्ष तसेच अनेक सभांमध्ये पर्यावरण या विषयावर मार्गदर्शन करणारे तसेच कृतीही करणारे धनंजय शेडबाळे निसर्गाप्रती अतीसंवेदनशील आहेत.

एका शेडबाळे नावाच्या व्यक्तिचे निमित्त होऊन आयुष्य उध्दस्त झाले तर दुस-या शेडबाळे नावाच्या व्यक्तिचे निमित्त होऊन आयुष्या घडले. परीसाचा स्पर्श व्हावा आणि लोखंड देखील सुवर्ण व्हावे तसे लालासाहेब माने, शेडबाळे यांच्या सहवासात घडत गेले.

अशी सर्व कामे करता करता २००७ उजाडले. लालासाहेबांची एकुणच सर्व मेहनत पाहुन फार्म हाऊसच्या मालकाने लालासाहेबांचा कल व कष्ट करण्याची धडपड पाहुन त्यांना संपुर्ण आयुष्य पर्यावरण संरक्षण-संवर्धनाचे काम कसे करीत राहता येईल याचा विचार सुरु केला. लालासाहेबांना देवराई या संस्थे/NGO  मध्ये कामास घेतले व याच क्षेत्रात काम करण्याची पुर्ण मोकळीक दिली.

दरम्यानच्या काळात निगडी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाने निसर्ग मित्र विभागाची स्थापना करुन हरित घोरावडेश्वर प्रकल्प सुरु केला होता. या विभागाचे अध्यक्ष म्हणून धनंजयसरच होते. त्यामुळे या प्रकल्पाची सुरवात करताना झाडांची निवड करणे, झाडे उपलब्ध करणे, वाहतुक करणे, खड्डे व चर खणणे या सगळ्या कामात लालासाहेबांना सहभागी होता आले. पायथ्यापासून डोंगरावर कावडीने खांद्यावर पाणी वाहुन नेऊन रोपांना घातले.

त्यानंतर हळु हळु घोरावडेश्वर डोंगरावर वृक्षारोपण करणे व त्या झाडांची जपणुक करणे हे जणु पिंपरी चिंचवड करांचे एक जनआंदोलनच झाले. २००८ मध्ये उघड बोडका असलेला हा डोंगर आज त्याच्या अंगाखांद्यावर चक्क दहा हजार झाडे मिरवित आहेत.

हरित घोरावडेश्वार डोंगर प्रकल्प – पुर्वी आणि आत्ता

या डोंगरावर लालासाहेब यांनी स्वतःच्या हाताने कित्येक झाडे लावली आहेत. शेकडो जणांना अशाप्रकारे झाडे लावण्यासाठी प्रेरणा व मार्गदर्शन केले आहे. या झाडांना पाणी देण्यासाठी चक्क खांद्यावर पाणी वाहुन नेले आहे. नंतर त्यांच्यातील गवंडी, प्लंबर जागा होऊन डोंगरवर झाडांना पाणी देण्यासाठी कायमस्वरुपी सोय त्यांनी केली. स्वतःच्या हाताने केली. स्वतःच्या कष्टाने केली. अनेकदा उन्हाळ्यात या डोंगराला लागलेल्या वणवे लालासाहेब यांनी अन्य निसर्गमित्रांच्या मदतीने विझवले आहेत. जाळरेषा काढल्या आहेत.

पायाला भिंगरी बांधल्यासारखे लालासाहेब फिरले. त्यांना स्मार्टफोन, व्हॉट्सॲप, सोशल मीडीया हे सारे नवीन आहे. त्यांचा पहिला स्मार्ट फोन देखील त्यांनी श्री धनंजय शेडबाळे यांच्या कडुन पुरस्काराच्या रुपात मिळवला. तो देखील २०१४ मध्ये. विविध झाडा-झुडपांचे, बियांचे फोटो काढवे लागत असल्याने, त्यांची ही गरज समजुन घेऊण शेडबाळे सरांनी लालासाहेब यांना उत्कृष्ट कामाचे बक्षीस म्हणुन हा फोन दिला होता.

लालासाहेब माने हे नाव देखील आता पर्यावरण संरक्षण-संवर्धन क्षेत्रात मोठे नाव होत आहे ते काही असेच नाही मित्रांनो. लालासाहेब व धनंजय शेडबाळे यांची जोडी व अन्य अनेक निसर्गमित्र मंडळी यांच्या सहका-याने लालासहेबांनी अनेक भीमपराक्रम केले आहेत.

याच काळात त्यांना पर्यावरणाविषयी शास्त्रीय माहिती मिळावी यासाठी मंडळाने जिविधाच्या प्रशिक्षणाला पाठवले.

या प्रशिक्षणानंतर श्री. शेडबाळे सरांचा ज्या ज्या संस्थांशी संबध होता सर्व ठिकाणी लालासाहेबांना जोडून दिले व काम करण्याची पुर्ण मोकळीक दिली. त्यामुळे आठवड्यातील सातही दिवस ते याच कामात रमु लागले.

केवळ घोरावडेश्वर डोंगरापर्यतंच हे काम थांबले नाही. पुण्याच्या पश्चिम पट्ट्यात फिरुन दुमिळ होत चाललेल्या शेकडो प्रजातीच्या झाडा-झुडपांचे, वेलींचे संरक्षण त्यांनी बीज गोळा करुन व त्यापासुन रोपे बनवुन केले आहे. देशी वृक्ष आपल्या भौगोलिक वैशिष्ट्यांसाठी, हवामानासाठी, जैवविविधतेसाठी पुरक असल्याने ते वाचले तरच सह्याद्री वाचेल. देशी वृक्ष वाढले तरच सह्याद्री बहरेल अशी धारणा पक्की असल्याने तयार केलेली रोपे पुन्हा दुर्गम भागातील शेतक-यांमार्फत लावली जात आहेत. ही रोपे शेतक-यांस मोफत देण्यात येतात. देवराई संस्था हे काम करते पण या कामात प्रत्यक्ष सहभाग व शेतक-यांस मार्गदर्शन असते ते लालासाहेब माने यांचे. जिथे झाडे लावायची आहेत तिथे ती झाडे जगतील का, खड्डे किती मोठे, खत काय द्यावे, काळजी कशी घ्यावी असे सर्व मार्गदर्शन लालासाहेब प्रत्यक्ष शेतक-याच्या जागेवर जाऊन करतात. सह्याद्री पर्वत रांगेत लालासाहेब फिरुन दुर्मिळ वनस्पतींच्या बियांचे संकलन करुन रोपवाटिका तयार करीत आहे. सध्या एकुण ५८ प्रकारची रोपे लागवडीसाठी तयार असून यामध्ये अंग्लया, चुक्राशिया , फनसाडा, रान जायफळ, कुकेर, महावेल गारंबी, महावेल अरणो, क्रेशा ई. चा समावेश आहे. तर एकुण   १०३  प्रकारच्या बिया यावर्षी जमा केल्या असून यावर्षी त्या लावणार आहे. यासाठी ग्रीन एक्स्प्रेस व निसर्ग मित्रांची लालासाहेबांना मोठी मदत झाली.

लालासाहेबांनी पाणी फौंडेशन, नाम फौंडेशन सोबत देखील काम केले आहे व करीत आहेत. लालासाहेवांचा स्वभाव इतका साधा आहे की सर्वजणांचे त्यांच्याशी जमतेच. यातुनच नाना पाटेकर, सयाजी शिंदे, मकरंद अनासपुरे आदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ कलाकारांशी देखील लालासाहेबांची गट्टी जमली.

मकरंद अनासपुरे यांच्या सोबत कार्यक्षेत्रात

मकरंद अनासपुरे यांच्या सोबत कार्यक्षेत्रात

पवना नदीतील प्रदुषण रोखण्यासाठी दरवर्षी निघणा-या जलदिंडीमध्ये लालासाहेब सहभागी होतात. याच जलदिंडी दरम्यान कधीतरी बोलुन दाखवलेली त्यांची पवना माईच्या उगमावर गोमुख बांधण्याची कल्पना , लालासाहेबांच्या प्रत्यक्ष हाताने सत्यात उतरली. त्यांच्या हाताने बनलेल्या गोमुखातुन पवनामाई अवतीर्ण होऊन मावळास तसेच पिंपरी-चिंचवड परीसरास सुजलाम-सुफलाम करते आहे.

यासोबतच प्लास्टिक मुक्ती अभियान अंतर्गत जनजागरण, प्लास्टिक संकलन व त्यानंतर त्यावर पुनर्प्रक्रिया आदी कामे देखील नियमितपणे सुरु आहे. अनेक सोसायटीमध्ये कचरा वर्गीकरण, खतप्रकल्प, रेनवॉटर हार्वेस्टिंग ची कामे लालासाहेबांच्या उपस्थितीमध्ये पुर्ण झाली आहेत.

लालासाहेब माने यांचा पवनामाई जलमित्र अभियान, वर्ल्ड फॉर नेचर  व पिंपरी चिंचवड पालीका आदी संस्थांनी पुरस्कार देऊन गौरव केला आहे.

ज्येष्ठ सिने अभिनेते राहुल सोलापुरकर यांच्या हस्ते एक पुरस्कार स्वीकारताना श्री लालासाहेब माने

लालासाहेब एक अत्यंत साधे सरळ व्यक्तिमत्व आहे. आपल्या कामाचा गाजावाजा करणे त्यांना जमत नाही. ते मितभाषी आहेत, बोलके नाहीत. पण एकदा का एखाद्या माणसाचा अंदाज आला तर मात्र मनमोकळेपणाने गप्पा मारतात. त्यांच्याकडील ज्ञानाचे ते मुक्तहस्ताने वाटप करीत असतात. कुणीही कितीही छोती  अथवा मोठी शंका विचारली तरी ते तितक्याच आत्मीयतेने त्या शंकेचे निरसन करतात. एखादे वेळी त्यांचे उत्तर नसले तर नम्रपणे ‘मला माहिती नाही, पण माहिती घेऊन नक्की कळवतो’ असे म्हणतात.

पर्यावरणाची चिंता करणारे खुप जण आहेत. पण त्याच्याही पुढे जाऊन प्रत्यक्ष कृती करणारे कमी आहेत. त्यातीलच एक म्हणजे लालासाहेब माने. अत्यंत बोली भाषेतील त्यांचे पर्यावरनासाठी प्रत्यक्ष काम करुन कमावलेले ज्ञान पर्यावरण अभ्यासात पीएच डी मिळवलेल्या एखाद्या तत्वज्ञा पेक्षा तसुभर ही कमी नाहीये.

मराठी, हिंदी तसेच दक्षिणेतील अनेक भाषांमधील ज्येष्ठ सिनेकलाकार सयाजी शिंदे यांचेसोबत श्री लालासाहेब माने

मराठी, हिंदी तसेच दक्षिणेतील अनेक भाषांमधील ज्येष्ठ सिनेकलाकार सयाजी शिंदे यांचेसोबत श्री लालासाहेब माने

“कोणतेही महान काम तुमच्या हातुन होण्यासाठी तुम्हाला कोणत्याही विद्यापीठातुन पीएच डी घ्यावी लागत नाही”, हे या लेखाच्या सुरुवातीचे वाक्य शतप्रतिशत सत्य आहे याची एव्हाना तुम्हास प्रचिती आली असेलच.

आज जागतिक पर्यावरण दिवस आहे. आज पर्यावरणाचे नुसते गोडवे गाण्यापेक्षा, पर्यावरणासाठी रक्ताचे पाणी करणा-या लालासाहेब माने यांचे व  यांच्या सारख्या अनेक विभुतींचे जीवन अभ्यासावे. त्यातुन प्रेरणा घ्यावी. आपापल्या परीने जमेल तितके, जमेल तसे पर्यावरणाच्या संरक्षण-संवर्धनाचे काम आपल्या प्रत्येकाच्याच हातुन घडण्याची प्रेरणा आपणा सर्वांस या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मिळावी. अशी प्रेरणा आम्हाला तसे्च अनेकांना मिळावी म्हणुन दरवर्षी पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन आपण निसर्गसंवर्धनाचे काम करणा-या सामान्यांतील असामान्य लोकांचा, निसर्गमित्रांचा, वृक्षमहर्षींचा जीवनप्रवास, पर्यावरण, निसर्गसंवर्धनाचे काम लेख/कथेच्या रुपात मांडण्याचा निश्चय केला आहे. हे दुसरे वर्ष आहे.
पुन्हा एकदा जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा व आपल्याही हृद्यात निसर्गप्रेमाचा दिवा पेटावा, एका दिव्याने दुसरा, मग तिसरा आणि मग हजारो लाखो लोक या धरतीमातेच्या प्रेमात आकंठ बुडावेत, तिचीही काळजी घ्यावी, तिला काय हवे  काय नको ते पहावे,पुरवावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करुन लेखणीस विराम देतो.

हेमंत ववले

निसर्गशाळा, पुणे

Facebook Comments

Share this if you like it..