वृक्षमहर्षी – श्री धनंजय मिसाळ

पर्यावरण संरक्षण, संवर्धनाचे जिवंत उदाहरण म्हणजे धनंजय मिसाळ !

माझ्या सारख्या निसर्गाविषयी आवड असणा-या माणसाला निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यास आवडते. पण हा निसर्ग व त्याचे दिवसेंदिवस होत असलेले पतन, -हास मला पहावत नाही. दरवर्षी डोंगररांगांना लागणारे वणवे ही मुख्य समस्या आहे पर्यावरणाच्या –हासाची असे मला वाटते. आणि बाराही महिने निसर्गाच्या सहवासात, प्रत्येक आठवड्याच्या शेवटी मी घालवतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा असे वणवे लागलेले पाहतो तेव्हा मनामध्ये प्रचंड राग, चिड येते. काय करावे हे समजत नाही. माणसांच्या पर्यावरणाप्रती अडाणीपणाची किव येते. पण समोर पेटलेले रान व त्यातील आगीचे डोंब इतके भयंकर आणि वेगवान असतात की त्या वेळी अगतिक होऊन, जड अंतःकरणाने हे वणवे पाहण्याखेरीज काहीच पर्याय समोर नसतो. जणु आपल्याच एखाद्या आप्तेष्टाची चिता जळताना मी पाहतोय इतका मी तुटुन जात असतो. आणि हे चित्र फेब्रुवारी ते मे महिन्या अखेर पर्यंत अगदी दररोजच दिसते. मी खुप हताश होतो व परिणामी पर्यावरण संरक्षण-संवर्धन सारख्या शब्दांचा देखील तिटकारा वाटु लागतो. माझ्या सोबत असे झाले आहे मागील अनेक वर्षांमध्ये. मग वाटायचे होऊ दे काय व्हायचेय ते. मला एकट्याला थोडीच धोका आहे याचा? सगळा समाज या अति गंभीर अशा समस्येकडे कानाडोळा करतोय तर मी तरी का म्हणुन उगाचच दुःखी कष्टी होऊ हे सारे पाहुन? होऊ दे ना काय व्हायचेय ते? आणखी ही एक विचार मनात यायचा तो म्हणजे माझ्या एकट्याच्या काही करण्याने काही बदल होईल असे वाटत नाही व दिसत ही नाही. कशाला मग उगाचच जीवाचा आटा-पिटा करायचा.

अशाप्रकारच्या पोस्ट त्यांच्या फेसबुक वर नेहमीच दिसतात

पण जेव्हा फेसबुक वर श्री धनंजय मिसाळ या अवलियाची भेट झाली व त्यांच्या विविध पोस्ट मी पाहिल्या तेव्हा माझ्या मनावर आलेले ते उदासिनतेचे , निष्कर्मण्यतेचे मळभ हळु हळु दुर व्हायला लागले. माझ्या एकट्याच्या प्रयत्नाने परिवर्तन होईल की नाही मला माहित नाही पण धनंजय मिसाळ यांच्या प्रयत्नांनी मात्र सकारात्मक बदल होताना, माझ्या स्वतःच्या मानसिकतेमध्ये मी अनुभवले आहे.

कोण आहेत हे धनंजय मिसाळ?

गेली दिड दोन वर्षे या व्यक्तिशी फेसबुकच्या माध्यमातुन संपर्कात आहे. फेसबुक वरील दुर्मिळ झाडे व वनस्पती या ग्रुप मध्ये आमचे ओळख झाली. या व्यक्तिच्या फेसबुक वरील पोस्टस पाहता मला आधी वाटायचे की या माणसाने पर्यावरण रक्षणाचे कार्यच आपले जिवित कार्य, जीवन ध्येय म्हणुन घेतले आहे की काय? एखाद्या पर्यावरण बचाव संस्थेमध्ये ते काम करीत असावेत व त्यामुळेच त्यांयाकडुन एवढे जास्त कार्य होत आहे असे ही मला वाटायचे!

सतत अनेकांना रोप निर्मिती साठी प्रोत्साहन देऊन प्रत्यक्ष मदत करण्याचे काम ते करतात. नुसते प्रोत्साहन देऊन थांबत नाहीत तर प्रत्यक्ष मदत देखील करतात. फेसबुकच्या माध्यमातुन त्यांना भेटलेल्या शेकडो लोकांना, त्यांनी विविध देशी वृक्ष-वेलींच्या बिया पोस्टाने पाठवुन प्रत्यक्ष मदत केली आहे. त्यांना कोणत्याही झाडा-वनस्पतीच्या बिया सापडल्या की त्या संकलित करणे व इच्छुकांना पोस्टाद्वारे पाठवणे हे काम धनंजय मिसाळ सर गेली अनेक वर्षे करीत आहेत.

आज जागतिक पर्यावरण दिवस आहे. आज सोशल मीडीयावर या दिन विशेषाच्या शुभेच्छा, पर्यावरणाचे महत्व, पर्यावरणावरील संकटे, प्रदुषण, जंगलांचा –हास, जलवायु समस्या अशा एक ना अनेक गोष्टींविषयी पोस्टस, पोस्टर्स पहायला मिळतील. सोशल मीडीयाच्या वापरामुळे जसे अनिष्ट गोष्टी वेगाने प्रसारित होताहेत, त्याच प्रमाणे काही चांगले, इष्ट व समस्त विश्वाच्या कल्याणाच्या गोष्टी देखील आंतरजालावर प्रसारित होत आहेत. हे खुप चांगले आहे. यामुळे निसर्ग, पर्यावरणाप्रती जागरुकता निर्माण होण्यास मदत होईल यात शंका नाही.

सुरुवातीस त्यांच्या विषयी मला झालेला गैरसमज होता, हे नंतर मला त्यांच्याशी बोलल्या नंतर समजले. कारण हा मनुष्य चक्क तुमच्या-आमच्यासारखा, नोकरी करणारा, एक गृहस्थ आहे. आपल्याकडे जेवढे म्हणजे २४ तास असतात तेवढेच त्यांच्याकडे देखील आहेत. आपणास जशा अनेक गार्हस्थ समस्या, संकटे, आव्हाने आहेत तशीच त्यांनादेखील आहे. आपणास जशी प्रगतीची करीयरची स्वप्ने आहेत तशीच त्यांना देखील होती, आहेत! आपणास ज्या प्रमाणे दररोजची लढाई करावी लागते जगण्यासाठी, दुनियादारीमध्ये तशीच, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त किरकिर त्यांना रोज सहन करावी लागते. आपण जसे गरीब, शेतकरी कुटूंबातुन, दुर्गम ग्रामीण भागातुन आलेलो आहोत तसेच ते देखील आहेत.

ग्रामीण भागातुन आलेले श्री मिसाळ हे एक अभियंता आहेत. करीयरची सुरुवातीची ३ वर्षे त्यांनी पद्विका महाविद्यालयात व्याख्याता म्हणुन काम केले आहे. व त्यानंतर महावितरण या शासकिय आस्थापने मध्ये गेली १९ वर्षे नोकरी करीत आहेत. कनिष्ट अभियंता या पदापासुन सुरुवात करुन सध्या ते महावितरण मध्ये उपकार्यकारी अभित्यंता म्हणुन कार्यभार सांभाळत आहेत. आई व पत्नी यांच्या सोबत नांदुरा येथे त्यांचा निवास आहे.

त्यांच्या वडीलांची परंपरागत विड्याच्या पानाची शेती होती. शेतात, रानावनात फिरणे भटकणे त्याकाळातील अनेक मुलांसारखे त्यांनीही केले. निसर्गामध्ये मुक्त पणे भटकणे, हरवुन जाणे, मनमुराद आनंद लुटणे, फुले फळे तोडणे हे सगळे त्यांनी केले. पन्नाशीच्या घरातील अनेकांनी त्या काळामध्ये हे सारे केले असेलच. त्या रम्य आठवणींना उजाळा देताना आपण पुन्हा त्या भुतकाळात हरवुन जातो. पण धनंजय मिसाळांसारखे फारच कमी लोक असतात जे त्यांनी जगलेला भुतकाळ पुढच्या पिढ्यांना देण्यासाठी यथाशक्ति, जाणीवपुर्वक नेमाने काहीतरी करीतच असतात. त्यांना तोच रम्य भुतकाळ भविष्यकाळात देखील जगायचा आहे नव्हे ते जगतात. व पुढच्या पिढ्यांसाठी पर्यावरण रक्षण-संवर्धनाचे बाळकडु देत आहेत.

मिसाळ सरांना हे बाळकडु त्यांच्या आजी कडुन मिळाले. त्यांच्या बालपणी आजीने कडुनिंबाच्या बिया गोळा करुन, पाऊस सुरु होण्यापुर्वी शेताच्या बांधावर टोचलेल्या पाहिलेले चित्र त्यांच्या मनःपटलावर कायमचे कोरले गेले. बियांपासुन रोप-झाडे होऊ शकतात नव्हे होतातच याची खात्री विश्वास नकळतच त्यांच्या मनात तयार झाला. त्यांच्या शेतात पारिजात, गुलाब, कन्हेर, जाई-जुई, मोगरा, बेल, जांभळ, सिताफळ अशी वेगवेगळी झाडे होतीच. तेव्हापासुन बिया जमा करणे व लावणे ही आवड, हा छंद त्यांना जडला. बियांपासुन कोणती झाडे येऊ शकतात, कलमांपासुन कोणती झाडे येऊ शकतात या विषयीचे ज्ञान अगदी लहाण असल्यापासुनच त्यांना झाले.

त्यांनी लहाण असताना कडुनिंब, औदुंबर आदी झाडे लावली. आज त्याच रोपट्यांचे वृक्ष झालेले त्यांनी पाहिले. मिसाळ सरांचा छंद नुसता त्यांच्यापुरताच मर्यादीत राहिला नाही. त्यांचे लहान भाऊ देखील मिसळ सरांच्या या कामामध्ये त्यांना मदत करीत असतात. लहान भाऊ एक अभ्यासु शेतकरी आहेत व त्यांनी स्वतः हजारो झाडे लावली आहेत. मोठ्या भावाच्या ज्ञान व अनुभवातुन, छोट्या भावाने शेती करण्याचाच निश्चय करुन यशस्वीपणे शेती करीत आहे. अनेक शासकिय पुरस्कार देखील मिसाळ सरांच्या छोट्या भावाला मिळाले आहेत कृषि संदर्भात.

दहावीपर्यंतचे शिक्षण एका छोट्या खेडेगावत म्हणजे त्यांच्या जन्मगावातच (अकोली जहागीर) झाले. १२ वी अकोट येथे व शेगाव येथील अभियांत्रिकी महावियालयात त्यांनी अभियांत्रिकी पदवी घेतली.

रानावनापासुन जरी काही काळ शिक्षणामुळे लांब रहावे लागले तरी त्यांचा बालपणीचा छंद बिया गोला करुन लावण्याचा त्यांनी अव्याहत पणे सुरुच ठेवला. झाड लावीत जाणे, जगवीत जाणे हे त्यांच्या साठी अगदी सहज साध्य, स्वभाव सिध्द झाले. एखाद्या ठिकाणी झाडे लावण्यासाठी जागेचा अभाव असेल तर झुडुपवर्गीय झाडे लावणे, फुल-वेली लावणे व जगवणे त्यांनी केले.

शहाद्यामध्ये महावितरणच्या कार्यकक्षेत येणा-या ग्रामीण भागातील जनतेशी त्यांची नाळ जोडली गेली. क्षेत्र भेटी दरम्यान ज्या ज्या भागात ते जातात त्या त्या भागात जर एखादे अनोळखी झाड-वृक्ष-वेली दिसली तर स्थानिक वयस्कर लोकांकडुन त्याच्या विषयी माहिती घेणे, त्या झाडाचे बीज गोळा करणे व, ज्यांना हवे आहे त्यांना मोफत देणे असे काम ते अव्याहत पणे करीत आहेत. ज्या ज्या ठिकाणी त्यांची बदली झाली त्या त्य ठिकाणी त्यांनी त्या त्या कॅम्पस मध्ये अनेक झाडे लावली.

त्यांच्या ऑफीस कॅम्पस मध्ये त्यांनी लावलेले झाड

निसर्गाविषयी त्यांचे मत देखील अगदी प्रांजळ आहे. ते म्हणतात,” मला ऑफीसच्या कामाचा किती जरी ताण असला तरी मी जर एखाद्या झाडाजवळ गेलो, निसर्गाच्या सानिध्यात गेलो तर नवी ऊर्जा मिळते. माझा सगळा ताण-तणाव दुर होतो. मनुष्याने किती जरी प्रगती केली तरी आजतागायत मनुष्यास प्राणवायु म्हणजे ऑक्सिजन निर्माण करील असे यंत्र बनविता आले नाही. प्राणवायु बनवणारे सर्वात प्रभावी यंत्र म्हणजे वृक्ष-वेली.”

मिसाळ सरांची आणखी एक खासियत आहे. पर्यावरण संवर्धनाची जी ज्योत त्यांच्या हृद्यात तेवत आहे, त्या ज्योतीतुन अनेकांच्या हृद्यात अशीच ज्योत लावण्याचे काम त्यांच्याकडुन आपोआप होत असते. त्यांचे कार्यालयीन सहकारी कर्मचारी, मित्र, नातेवाईक व सध्या फेसबुकच्या माध्यमतुन जवळीक निर्माण झालेले मित्र देखील त्यांच्या या कामात त्यांना मदत करतात. कुठे दुर्मिळ अनोळखी झाड दिसले तर आवर्जुन लोक त्याचे फोटो काढुन मिसाळ सरांना पाठवतात किंवा मिसाळ सरांना घेऊन जातात ते पहायला व बीज संकलन करायला. ते स्वतः ज्याप्रमाणे एक निसर्गमित्र आहेत त्याच प्रमाणे नकळतपणे त्यांनी त्यांच्यासारखे अनेक निसर्गमित्र तयार केले. त्यांच्या कॉलने मध्ये राहणारे बाल-गोपाळ देखील मिसाळ सरांना या कामी मोलाची मदत करतात, नव्हे मिसाळ सरांनी पुढची पिढी तयार करण्याचे काम देखील केले आहे. या मुलांना या लहान वयामध्येच अनेकविध वृक्ष वेलींच्या बाबतीत माहिती झालेली आहे. पुढे जाऊन ही मुले देखील असेच निसर्गमित्र बनणार यात शंका नाही.

हे काम करीत असताना अनेक लोक त्यांच्या कामाचे कौतुक करतात. ज्यांनी बिया मागविल्या, रोपे तयार केली, झाडे लावली, व जगवली त्या झाडा-रोपांचे फोटो लोक , मिसाळ सरांना पाठवतात. त्यांनी दिलेल्या बीजांपासुन तयार झालेली झाडांचे फोटो पाहुन व लोक घेत असलेली काळजी पाहुन मिसाळ सरांना अगदी भरुन पावल्यासारखे वाटते. त्यांच्या या कामातुन त्यांनी पिवळा पळस, पांढरी भुईरिंगणी सारख्या दुर्मिळ प्रजातींना पुनुरुज्जीवीत केले आहे.

लेखाच्या सुरुवातीसच मी माझा स्वतःचा नैराश्याचा अनुभव सांगितला. माझी निराशा मिसाळ सरांच्या या अविरत सुरु असणा-या कामाकडे पाहुन निघुन गेली. मला देखील काहीतरी सतत करण्याची प्रेरणा मिळाली. आणि माझ्या सारख्या अनेकांना देखील त्यांच्याकडुन प्रेरणा, ऊर्जा मिळाली असेल यात शंका नाही.

पण आपल्या मध्ये आणि त्यांच्यामध्ये एक मोठा फरक आहे व तो म्हणजे समस्या सोडविण्यासाठी स्वतःपासुन सुरुवात करण्याची त्यांची वृत्ती.

मी एकट्याने केल्याने काय फरक पडेल? बाकीच्या लोकांना काही फरक पडत नाही तर मी तरी कशासाठी स्वःतला त्रास करुन घेऊ? माझे एकट्याचेच नुकसान नाही होणार? सगळे जग पर्यावरणाचा –हास करायला निघाले आहे तिथे माझ्या एकट्याने केलेले काम ते काय उपयोगाचे?  अशा प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे आहेत व ती देखील खुपच सकारात्मक आहेत.

मी एकट्याने केल्यानेदेखील फरक पडतो. मी त्रास सहन केला तर कुठे तरी काहीतरी बदल नक्कीच होईल. मला त्रास झाला तरी चालेल पण पर्यावरण रक्षण-संवर्धनाच्या या कामात माझा हा खारीचा वाटा, कदाचित अनेकांचा फायदा करील. समाजामध्ये जे काही चांगले बदल झालेले मला आवडतील त्या बदलांची सुरुवात मी माझ्यापासुनच करणार!

हा फरक आहे त्यांच्यात आणि आपल्या सारख्यांत.

अगदी निस्वार्थपणे व कसल्याही प्रसिध्दीच्या मागे न लागता एवढे मोठे काम करणा-या या वृक्ष महर्षीकडुन निसर्गशाळेच्या वाचकांसाठी संदेश आहे का असे विचारले असता त्यांचा संदेश समजल्यावर त्यांच्या विषयीचा आदर आणखी जास्त वाढला. पर्यावरण रक्षण-संवर्धनामध्ये एवढे मोठे योगदान देणा-या या माणसाकडुन काहीतरी तात्विक, गहन अर्थ असलेला संदेश मिळेल असे मला वाटले होते. पण त्यांच्या या संदेशातुन त्यांचा साधेपणा आणखी जास्त अधोरेखीत होतो.

त्यांचा संदेश अगदी सोपा आहे. तो असा,” पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने एकतरी झाड लावुन जगवावे असे माझे मत आहे!”

किती प्रांजळ व कृतीमध्ये उतरवता येईल असा हा संदेश आहे. बरोबर ना?

आज आपण जागतिक पर्यावरण दिन साजरा करतोय. पण धनंजय मिसाळ सरांसाठी जीवनातील प्रत्येक दिवसच पर्यावरण दिवस आहे. व त्यांच्या जीवनयापनातुन तो सार्थ ठरतो सुध्दा.

धनंजय मिसाळ सरांकडुन तुम्हाला बीज हवे असतील या पावसाळ्यात लावण्यासाठी तर अवश्य त्यांच्याशी संपर्क साधा. बीज हवे असल्यास योग्य किमतीचे तिकीट लावलेला लिफाफा तुम्ही त्यांच्या पत्त्यावर पाठवुन द्या. त्या लिफाफ्यामध्ये बिया तुमच्या पत्त्यावर विनामुल्य येतील. त्यांचा पत्ता खालील प्रमाणे आहे.

धनंजय मिसाळ, महावितरण,

नांदुरा

जि बुलढाणा 443404

मो न 7875763496

तुम्हा सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा व आपणा सर्वांकडुन मिसाळ सरांच्या प्रांजळ अपेक्षेप्रमाणे एक तरी झाड लावुन जगवले जाण्यासाठी देखील शुभेच्छा.

श्री धनंजय रामदास मिसाळ या वृक्षमहर्षीस पुन्हा एकदा मानाचा मुजरा!

कळावे

आपलाच

श्री हेमंत सिताराम ववले

निसर्गशाळा, पुणे

टिप – आमच्या  निसर्ग, पर्यावरण, आकाशदर्शन, निसर्गपर्यटन व दृष्टिकोण या  विविध लेखांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी व्हॉट्सॲप वर संदेश पाठवा – Hemant Vavale – 9049002053

Facebook Comments

Share this if you like it..

One thought on “वृक्षमहर्षी – श्री धनंजय मिसाळ

  1. गणेश सुधाकर गणगे खैरा

    मिसाळ साहेब खुप चांगले अधिकारी असून ते नांदुरा तालुक्यामध्ये खूप छान कार्य करत आहे. त्यांच्या कार्याबद्दल त्यांचा सत्कार खैरा ता नांदुरा च्या वतीने करण्यात आले.???

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *