चंद्रमाधवीच्या प्रदेशातील संगीत रजनी

चंद्रमाधवीच्या प्रदेशातील संगीत रजनी

उमेश शिंदे यांचं संगीतावरील प्रेम , निसर्गावरील प्रेम आणि निसर्गशाळेवरील प्रेम म्हणजे निसर्गशाळेत संगीत रजनी कार्यक्रमांची सुरुवात होणं आणि हे अश्या कार्यक्रमांची मालिकाच निर्माण होणं होय. त्यात आम्हाला साथ देणारे अनेक जण आहेत की जे अत्यंत प्रतिकुल परिस्थीतीमध्ये देखील अशी आव्हाने लिलया पेलतात. हो निसर्गशाळेत अश्या कार्यक्रमांचे आयोजन करणे म्हणजे आव्हानच आहे. शहरापासुन खुप दुर, दळणवळण सुविधांचा अभाव, बेभरोश्याचं मनुष्यबळ, संसाधनांची कमतरता, अश्या अनेक संकटांना तोंड देत आपण आज ठामपणे म्हणण्याच्या योग्यतेचे झालो आहोत की आपण अभिजात संगीत कार्यक्रमांचे आयोजन निसर्गात करु शकतो . अजुन एक महत्वाची गोष्ट यानिमित्ताने अधोरेखित करावीशी वाटते आहे ती म्हणजे आमच्या या संकल्पनेला म्हणजे ‘निसर्गाच्या कुशीत संगीत’ संकल्पनेला रसिकश्रोत्यांनी देखील उचलुन धरले व इतक्या दुर असे संगीत ऐकण्यासाठी शहरातुन रसिक श्रोते येऊ लागले, निसर्गात राहु लागले, संगीताचा स्वर्गीय आनंद घेऊ लागले.

कार्यक्रम ठरला..

मागील महिन्यात एक दिवस अचानक उमेश शिंदे यांचा मेसेज आला, त्यात गायत्री सप्रे-ढवळे यांच्या एका गाण्याच्या व्हिडीयोची लिंक होती. उमेशने अस काही पाठवलं म्हणजे मला जाम टेंशन येतं. टेंशन याच की आता पुन्हा नेहमीपेक्षा जास्त वेगाने, दुपटी-तिपटीनं कामाला लागायच असतं. अर्थातच हा वेग एकंदरीतच चांगला असतो. कधीकधी गाडी अशी टॉपस्पीड वर,सर्व क्षमतांचा कस लावत चालवावी, याने आपल्या क्षमतांचा विकास होतो अशा दृष्टीनेच मी यासर्वांकडे पाहतो.
कार्यक्रम ठरला, दिनांक ठरली, कार्यक्रमाची रुपरेषा ठरली, नेहमीप्रमाणे जबाबदा-यांचे वाटप झाले. साधारण एक महिना हातात होता. लोकांपर्यंत माहिती पोहोचवणे आणि प्रत्यक्ष जमीनीवर सर्व सोयी निर्माण करणे अश्या दोन्ही आघाड्यांवर काम सुरु झाले.

कार्यक्रम थीम

प्रत्यक्ष कार्यक्रमाची संकल्पना म्हणजे थीम देखील भन्नाट, आगळीवेगळी अशी ठरली, ती म्हणजे अभंगवाणी आणि गझल यांचे सादरीकरण. दोन भिन्न टोकाचे  वाटतात ना हे दोन्ही संगीत प्रकार? अभंगवाणी सोबत चक्क गझल ! कसे होईल, काय होईल, रसिकांना आवडेल की नाही असे अनेक प्रश्न होते की ज्यांची उत्तरे एक महिन्यानंतरच मिळणार होती. कार्यक्रमाच्या माहितीचा प्रसार ऑनलाईन आणि प्रत्यक्ष फलक इत्यादी लावुन देखील शहरभर माहिती पोहोचवण्याचे काम आम्ही केले. तिकडे नव्याने स्टेज बनवले गेले. यात आम्ही एक नवीन कसब शिकलो. आम्ही चक्क आहे त्या, जेवढी उपलब्ध आहेत त्या साधनांचा उपयोग करुन केवळ एका दिवसात, चार मजुरांच्या मदतीने स्टेज, ते देखील हवे तेव्हा लावता येईल आणि हवे तेव्हा काढता येईल असे, स्टेज सज्ज कसे करावे हे कौशल्य सिध्द केलं. वॉशरुम एरियाचा मेक ओव्हर, स्वच्छता, निसर्गाला अनुरुप सुशोभीकरण इ अनेक गोष्टी घडत होत्या.

अखेर तो दिवस उजाडला..

प्रत्यक्ष कार्यक्रमाचा दिवस उजाडला तेव्हा रसिक श्रोत्यांच्या नावांच्या यादीमध्ये १०७ जण होते. इतक्या लोकांना सुविधा देण्यासाठी आम्ही सज्ज होतोच. साडेतीन वाजण्याच्या सुमारास लोकांचे येण सुरु झालं. एकेक करीत करीत साडेचार – पाच पर्यंत सर्वजण पोहोचले. पार्किंग फुल्ल झाले. सोबत स्थानिक अनेक ग्रामस्थ देखील कार्यक्रमाला आले होते. उन्हाचा चटका जसा कमी झाला तसे मनिष नावाच्या एका अवलियांने सर्व पाहुण्यांना एक तासाच्या अवधी मध्ये चक्क बालक करुन टाकले. सर्वजण एकमेकांत इतके मिसळले आणि आपण मोठे म्हणजे वयाने मोठे, हुद्द्याने मोठे आहोत याच विसर सर्वांना पडला. भान विसरुन आबाल वृध्द नाचले, गायले, खेळले, धावले…  अहाहा, काय ती मज्जा ! खालील विडीयो म्हणजे त्या गम्मत जम्मत मधील केवळ एक झलक आहे.

चला तर मग जाऊयात संगीत सफरीवर..

मग सुरु झाली संगीत रजनी. गायत्री सप्रे-ढवळे आणि कुमार करंदीकर यांनी रसिक श्रोत्यांना एका वेगळ्याच विश्वात , स्वर्गीय सुखाची रेलचेल असणा-या चंद्रमाधवीच्या प्रदेशात नेण्याचा जणु चंगच बांधला होता जणु. हा प्रवास, चंद्रमाधवीच्या प्रदेशाकडे जाण्याचा हा प्रवास संगीत सुरांचाच नुसता नव्हता बर का ! या प्रवासात गायत्रीजी आणि कुमारजी यांच्या सुरांचे पंख तर होतेच सोबत दिशा देण्याच काम, वैखरीविद्येत निष्णात असलेल्या, ज्यांच्या जीभेवर साक्षात सरस्वतीचा वास आहे, ज्यांना शब्दांचे मनोहारी मनोरे उभारता येतात, यांच्या उच्चारांमध्ये कमालीची स्पष्टता आहे ; अश्या स्नेहल दामले यांच्याकडे होतं. या स्वर्गीय सुखाला शब्दांत बांधण्याचे, श्रोत्यांच्या मनात फुललेल्या भाव-भावनांना शब्दांत व्यक्त करुन, मिळणा-या आनंदाला प्रत्येकाच्या मनःपटलावर ठळकपणे कोरण्याच काम स्नेहल दामले यांनी केलं. अर्थातच इतर वाद्यवृंद, गायक-गायिका आणि स्नेहल दामले हे समीकरण इतक चपखल, स्वाभाविक आणि नैसर्गिक वाटत होतं की या समुहामध्ये कुणीही एकेकजण, वेगवेगळा व्यक्त होतच नव्हता.सर्वजणांचे मिळुन एक मोठे व्यक्तित्व तयार झालेले, आधीचे तयार झालेले अनुभवास आले.  कार्यक्रम सुरु झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच या मोठ्या व्यक्तित्वाचा, सामाईक व्यक्तित्वाचा अविभाज्य भाग बनले आलेले सर्व श्रोते. व्यष्टी, स्वतंत्र, एकेक शरीरे जरी असली तरी सर्वांचे मिळुन समष्टी मन बनले. गाणारे आणि ऐकणारे दोघांत भेद राहिलाच नाही. निसर्गाच्या कुशीत, शीतल चंद्रप्रकाशात , चमचम करणा-या तारांगणाखाली हे सगळे जे काही घडत होते ते निव्वळ अद्भुत होते.

गायत्रीं या नावातच साक्षात सरस्वती आहे की जी संगीताची देखील देवता आहे. गायत्रीजींचं गाणं म्हणजे रसिक श्रोत्यांसाठी अभुतपुर्व अशी पर्वणी होती. गाताना त्यांच्या आवाजातील चढ-उतारांच्या लहरीवर श्रोत्यांचं मन अक्षरशः हिंदोळे घ्यायचं. अनाकलीय तरीही मनाला शांत करणारी नजाकत त्यांच्या कंठामध्ये आहे. कुमार करंदीकरांना चे गाणे ऐकताना मला असे वाटत राहिले जी मी साक्षात कुमार गंधर्वांनाच ऐकत आहे. जीवनातील अनेक अनुभवातुन तावुन सुलाखुन निघालेले सार त्यांच्या स्वरांमधुन व्यक्त होत होते. त्यांचा आवाज एकीकडे आपणास शांत करीत होता तर दुसरीकडे कमालीचे आश्वस्त करीत होता. धीरगंभीर तरीही स्वतःचा , स्वतःच्या अंतर्मनाचा वाटावा असा कुमारजींचा आवाज ऐकणा-या मनात कायमचे घर केल्याशिवाय राहत नाही.

आम्ही श्रोते म्हणुन जो अनुभव घेतला तो शब्दांत व्यक्त करता येण्यासारखा नाहीये. शब्दांच्या पलीकडे असणारा हा अनुभव कदाचित गायकांना देखील आलाच असेल याची मला पक्की खात्री आहे.  
चंद्रमाधवीच्या प्रदेशातील ही संगीत मैफील अपेक्षेपेक्षा खुपच चांगली झाली असे मला वाटते. एक सामान्य  श्रोता, ज्याला संगीतातील फार काही कळत नाही अश्या माझ्यासारख्या माणसाला ही चंद्रमाधवीच्या प्रदेशातील संगीत रजनी खुपच आवडली. अपेक्षा आहे तुम्हाला देखील आवडली असेलच.

इतक्या भन्नाट कार्यक्रमानंतर सर्वांना अतिशय चवदार पुणेरी जेवणाची ( बेदाणे असलेल्या शि-यासोबत ) मेजवानी मिळाली. पुण्यातील प्रसिध्द आचारी श्री मंगेश पुजारी आणि त्यांच्या टीम ने ही जबाबदारी घेतली. जेवणानंतर सर्वांनी दुर्बिणीतुन चंद्र पाहिला आणि काही जण पहाटे आकाशगंगा पाहण्यासाठी उठले तेव्हा आकाशगंगा पाहिली आणि शनीग्रह देखील पाहिला. सकाळी सर्वांनी आम्ही जे जंगल बनवीत आहोत ते पाहिले.

धन्यवाद

कळावे
हेमंत ववले,
निसर्गशाळा, पुणे

अरेच्या , संगीत रजनीच्या कार्यक्रमाचा लेख आणि झालेल्या कार्यक्रमाचे एकही रेकॉर्ड इथे लेखात कसे नाही बरे?
तुम्हाला देखील हे संगीत, ही मैफील ऐकायवची असेल तर आजच निसर्गशाळेच्या युट्युब ला सबस्क्राईब करा इथे क्लिक करुन

Facebook Comments

Share this if you like it..