पिंड ते ब्रह्मांड – अंतर्गामी प्रवास

जाणिव-नेणिव

आपण जाणतेपणी कित्येक क्रिया करीत असतो. म्ह्णजे आता मी टायपिंग करीत आहे, तुम्ही वाचता आहात. आपण ठरवुन किंवा आपणास आपण करीत असलेल्या क्रियेविषयी माहिती असते, जाणिव असते. रस्त्याने चालताना एखादा खड्डा आला तर आपण तो खड्डा चुकवण्यासाठी पर्यायी मार्ग शोधतो, पुढचे पाऊल कुठे टाकायचे ती जागा ठरवतो आणि मग खड्ड्यात पाय जाणार नाही अश्यापध्दतीने आपण पुढे मार्गक्रमण करतो. म्हणजेच काय तर आपण करीत असलेली कर्मे आपणास माहिती असतात, ती आपण का करतोय याचे आपणास ज्ञान असते, कार्यकारण भाव जागृत असतो. किंवा कधीकधी कर्म सुरु आहे याची जाणीव असते. सकाळी अंगठ्याला ठेच लागली पायाच्या तर आता तीन तासांनी त्या अंगठ्याला ठसठस जाणवते आहे. यालाच जाणिवेतील कर्मे, क्रिया असे म्हणता येईल. या शिवाय देखील आपण अनेक कर्मे, क्रिया करीत असतो की जी अजाणतेपणी होत असतात. उदा हे टायपिंग करीत असताना माझ्या डोळ्यांचे, पापण्यांची उघडझाप सुरु आहे, माझ्या बोटांनी मी कीबोर्ड वरील एखादे बटण किती गतीने व ताकदीने दाबायचे आहे याचे गणित सुरु आहे. माझे श्वसन सुरु आहे, रक्ताभिसरण सुरु आहे, माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी कार्यरत आहे, रक्त शुध्दीचे काम सुरु आहे तर कुठे अनावश्यक द्रव्ये, घटक यांना बाहेर काढण्यासाठी यंत्रणा काम करीत आहे. अंगठ्याला जी काही इजा झाली ती दुरुस्त करण्यासाठी शरीर काम करीत आहेच. याही पलीकडे अत्यंत सुक्ष्म अश्या क्रिया देखील सुरु आहेत की ज्या आपण जाणुन घ्यायच्या ठरवले तर आपणास अतीप्रगत अशी साधनेच वापरावी लागतील. वैद्यक विज्ञानामुळे, आपणास किमान हे आज माहिती तरी आहे की आपणास न समजता, आपल्या अजाणतेपणी, आपल्या नेणिवेत असंख्य कार्ये सुरु असतात. ही सारी कर्मे करणारी यंत्रणा म्हणजे आपले शरीर. शरीरातील भिन्न भिन्न अंगे, अवयव ही कामे करीत आहेत. शरीर कार्यरत ठेवण्यासाठी किंवा असेही म्हणता येईल की जिवंत ठेवण्यासाठी ही सारे अंगे, अवयव काम करतात. प्रत्येकाचे काम भिन्न आहे. प्रत्येकाची यंत्रणा भिन्न आहे. प्रत्येकाचे स्वतःपुरते कार्यकारण भिन्न आहे. ही सारी अंगे, अवयव भिन्न आहेत, त्यांचे कार्य, ध्येय भिन्न आहे. एक व्यक्ति म्हणुन मी जसा इतरांहुन भिन्न आहे अगदी तसेच माझा प्रत्येक अवयव माझ्याच इतर अवयवांहुन भिन्न आहे. ज्याप्रमाणे माझ्याकडे माझी निर्णयक्षम बुध्दी आहे अगदी तशीच निर्णय क्षम बुध्दी माझ्या प्रत्येक अवयवात आहे. माझ्यात असे जे काही आहे की ज्यामुळे मला वाटते मी आहे,माझे अस्तित्व आहे; त्यास तात्पुरते आपण चैतन्य म्हणुयात, हे चैतन्य माझ्या शरीरातील प्रत्येक अवयवामध्ये आहे, नव्हे नव्हे शरीरातील, प्रत्येक अवयवातील , प्रत्येक पेशीत आहे. या चैतन्यास आपण इंग्रजीमध्ये इंटेलीजेन्स म्हणता येईल. कोविड१९ च्य विषाणुची बाधा झाली तर आपल्या शरीरातील पेशी आपल्या परवानगीची वा आपल्या आज्ञेची वाट पाहत बसत नाहीत. आपल्या पेशी तातडीने निर्णय घेतात आणि खोकला आदींच्या रुपाने विषाणुला परतवुन लावण्यासाठी कामाला लागतात. अगदी असेच आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी एक स्वतंत्र अस्तित्व आहे. त्या अस्तित्वाकडे, त्या पेशीकडे विशिष्ट ध्येय आहे, विशिष्ट कार्य आहे.  अशी आपल्या शरीरात किती स्वतंत्र ‘अस्तित्वे’ आहेत, याचा थोडक्यात अंदाज घेण्याचा प्रयत्न करुयात. आपल्या रक्ताच्या एका थेंबामध्ये किमान पाच दशलक्ष पेशी असतात. शरीरात एका वेळी सहा ते सात लिटर रक्त असते तर आता विचार करा आपल्या केवळ रक्तामध्येच किती पेशी असतील याचे गणित तुम्ही करु शकता! अनगिणत, मोजदाद करता येणार नाही इतक्या अतर्क्य प्रमाणात , संख्येत पेशी आपल्या शरीरात आहेत व यातील प्रत्येक पेशी स्वतंत्र अस्तित्व, स्वतंत्र ध्येय, स्वतंत्र कार्य असलेली आहे.

एक मनुष्य म्हणुन आपले स्वतःचे जे अस्तित्व आहे, जाणिव आहे, चैतन्य बनलेले आहे की ज्यास आपण ‘मी’ म्हणतो त्या ‘मी’ ला शरीरातील इतक्या अतीसुक्ष्म क्रिया-प्रक्रियांची पुसटशी देखील कल्पना नसते. शरीरामध्ये अहोरात्र प्रत्येक पेशी आपापले काम करीत आहे, स्वतंत्र पणे करीत आहे. तरीही पिंडातील या सा-या कल्पनेच्या पलीकडे असलेल्या पेशीपेशींमध्ये कमालीचे सामंजस्य आहे, तारतम्य आहे. पिंडाचे अस्तित्व टिकवुन ठेवण्यासाठीचे हे ध्येय सगळ्या पेशीचे मिळुन बनलेले एक सामाईक ध्येय आहे. हे तारतम्य, सामंजस्य ज्या योजनेतुन आले आहे त्या योजनेचा हेतु म्हणजे पिंडाचे अस्तित्व टिकवुन ठेवणे, हे ध्येय आहे याचे ज्ञान/जाणिव कदाचित प्रत्येक पेशीला असेलच असे नाही.

जरा-मरण की जरा-मरण चक्र?

जन्म-वर्धन-मरण हे चक्र आहे की नाही हे आपणास पक्के ठाउक जरी नसले तरी जन्म, त्यानंतर शरीराचे वर्धन म्हणजे वाढणे, मग खंगणे, मग नाश पावणे हे पक्के आहे व याची देही, याची डोळा याचा अनुभव आपण घेऊ शकतोच. हे प्रत्यक्ष प्रमाण आहे. शरीर मग ते कुणाचेही असुदेत, ज्यास जन्म मिळाला तो वाढ होऊन कधी तरी विनाश पावणारच. पिंडांच्या पातळीवर हे होता असताना आपण पाह्तोय. आपल्या नात्यातील वयस्कर माणसे मृत्यु पावत आहेत तर कुठे तरी कुणाचा तरी जन्म ही होतोय, पाचवी, बारसे आदी कार्यक्रम देखील होतच आहेत. कुणाचे जाणे सुरुये तर कुणाचे तरी येणे ही सुरुये अव्याहत पणे.

ज्याप्रमाणे पिंडांच्या बाबतीत हे सुरुये अगदी तसेच पिंडातील प्रत्येक पेशीच्या बाबतीत देखील हे सुरु आहे. शरीरातील कोणतीही पेशी मनुष्याच्या आयुष्यभरासाठी शरीरात टिकुन राहु शकत नाही. सर्वाधिक काळ तग धरु शकते व कार्यरत असते अश्या पेशींचे जीवनमान १२० दिवसांचे असते असे जैववैद्यक शास्त्र सांगते. याचाच अर्थ असा की कोणतीही पेशी अमर नाहीये. पेशी जन्माला येणे- नाश पावणे देखील सुरुच आहे अव्याहतपणे. पेशींचे जाणे – येणे सुरुच आहे अव्याहत पणे.

जाणिवा अतिसुक्ष्म करता येऊ शकतात का?

पिंडातील प्रत्येक पेशी ज्याप्रमाणे जरा-मरण अनुभवते अगदी तसेच हा पिंड देखील अनुभवतो. पेशीच्या जन्मपुर्वी काय होते व नंतर काय राहिल हा गौण प्रश्न आहे. कारण आपण पेशीच्या स्तरावर जाऊन , पेशीशी तादात्म्य मिळवुन पेशीच्या जाणिवा अनुभवू शकणे कठीण आहे. कठीण आहे पण ते शक्य नाहीच असे नसावे. कारण मला पायाच्या अंगठ्याला लागलेली ठेच व मग त्या अंगठ्याची सुरु असलेली ठसठस मला जाणवत होती काही वेळापुर्वीपर्यंत. त्या पेशीच्या स्तरावर काय सुरुये याचे मला त्या वेळी ज्ञान होते. पण हे केवळ अपघाताने झालेले ज्ञान होय. मी जाणिवपुर्वक माझ्या अवयवांचा अनुभव घेऊ शकेल तेव्हा मला कदाचित समजेल की पेशी तयार होण्याआधी काय होते व नंतर काय राहिल. पिंडापासुन जर आपण अंतर्मार्गी प्रवास करु शकलो , आपल्या जाणिवा अधिकाधिक सुक्ष्म करु शकलो , अवयव होऊन त्या त्या अवयवाच्या क्रिया कलापांना जाणु शकलो , अवयवांच्याही पल्याड असलेल्या पेशींना जाणु शकलो, पेशींना समजुन घेऊ शकलो, त्यांचे क्रिया-कलाप अनुभवु शकलो तर आपणास ज्ञानाचे खुप मोठे भांडार मिळेल असे वाटते. क्वांटम फिजिक्सचा प्रवास याच दिशेने सुरु असावा असे मला वाटते. मी क्वांटम फिजिक्स वाचण्याचा जाणुन घेण्याचा अनेकदा प्रयत्न केला खरा पण मला तो विषय जड गेला, काहीही समजले नाही म्हणुन मी, “क्वांटम फिजिक्सचा प्रवास याच दिशेने सुरु असावा असे मला वाटते” असे म्हंटले. तर भारतीत परंपरा म्हणते की पिंड एकुण चार देहांचा बनलेला आहे म्हणजे चार स्तरावर पिंडाची अनुभूती घेता येऊ शकते. ते चार देह म्हणजे स्थुल, सुक्ष्म, कारण आणि महाकारण देह. मनुष्याच्या जाणिवा इतक्या सुक्ष्म स्तरापर्यंत गेल्यावर त्यास कारण म्हणजे त्या त्या पेशींचे ध्येय काय हे समजु शकेल काय? तर महाकारण म्हणजे पेशी स्तरावर असताना पिंडाच्या असण्याचे महा-कारण समजु शकेल काय? भारतीय पुराणांचा विषय देखील अनुभूतीच्या पातळीवर येणारा नसल्याचे त्याविषयी देखील पक्के मत बुध्दी बनवु शकत नाहीये. तुम्हाला काय वाटते?

ब्रह्मांडाकडची वाटचाल देखील करुयात लवकरच.

हेमंत ववले

निसर्गशाळा, पुणे

Facebook Comments

Share this if you like it..

Categories:

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हुप्प्या – The Symphony of Emotions
A Team outing with a difference @ Nisargshala
Blog posts & Event Alerts

Recent Articles
 • In Astronomy, STar gazing
  निसर्गशाळा येथे दहा इंच व्यासाचा मुख्य आरसा असलेली दुर्बीण आहे. यातुन आपण गुरुचे उपग्रह पाहु शकतो, गुरु ग्रहावरील वादळ पाहु शकतो, अनेक दुरस्थ तारे, तारकापुंज पाहु शकतो, चंद्र तर इतका सुंदर आणि स्पष्ट दिसतो की त्यावरील खड्डे नसुन महाकाय विवरं आहेत, दया आहेत, त्यांना खोल असे कडे आहेत. एकदा आपल्याकडे एक खगोल निरीक्षक त्यांची १६ इंच व्यासाची दुर्बीण घेऊन आले होते , त्यातुन त्यांनी मला चंद्रावरील अश्याच एका विवराचा कडा दाखवला. हा कडा पाहताना मला हरिश्चंद्र गडावरील कोकणकडा आठवला. लौकरच आपण म्हणजे निसर्गशाळा बारा इंच व्यास असलेली अजुन प्रगत अशी दुर्बीण घेणार आहोत. […]
 • In Environment
  महाराष्ट्राची वीस जुलै ची सकाळ देखील अशीच एक तीव्र वेदनादायी बातमी घेऊन उजाडली. एक अख्खं गाव, चाळीसेक घरांचे एक गाव, दोनेकशे लोकांची वस्ती असलेले एक गाव, आपापल्या घरात रात्रीच्या झो[एत असलेले एक गाव अचानक एका डोंगराखाली दडपले गेले. माळीण पेक्षा या घटनेची तीव्रता जरी कमी असली तरी भौगोलिक दृष्ट्या दोन्ही घटना सारख्याच आहेत. पुर्वी तळीये, रायगडवाडी या दुर्घटना देखील वेदनादायी होत्या. दरड कोसळणे या क्रियापदाने या घटनांची तीव्रता लक्षात येणार नाही. डोंगर कोसळणे असा शब्द प्रयोग आता आपणास करावा लागेल. या घटनांमध्ये अजुन एक साम्य आहे ते म्हणजे डोंगर कोसळताना मातीचे प्रचंड मोठे ढिगारे उताराच्या दिशेने खाली घसरले व शतकांच वारसा असलेल्या वाड्या वस्त्या उध्वस्त झाल्या. मनुष्यहानी झाली. अनेक कुटूंबांचे आधार संपले, जीवाभावाची नाती संपली. […]
 • In Environment
  म्हणजेच काय तर आपला भारत आणी भारतातील प्रत्येक पर्वत (हिमालय अपवाद) तितकाच जुना आहे जितके पृथ्वीचे वय आहे. येथील मातीचा कण न कण असा का झाला याचे कारण या मातीने इतक्या करोडो वर्षाम्च्या अनुभवातुन हे शिकले आहे की या सुर्यमंडलात, या अवकाशात तग धरायची असेल तर त्यासाठी कसे स्वतःमध्ये बदल केले पाहिजेत. […]
 • In Environment
  पर्यावरण हा शब्द आपल्या कानी पडला की काही जण थोडं थबकतात, काही जणांच्या भुवया थोड्या उंचवतात, काही जणांचे कान अजुन जास्त सतर्क होतात तर काही जणांना काहीही समजतच नाही काय ऐकलं ते म्हणजे नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे असे काही जणांच्या बाबतीत घडत असते. […]
 • In Music, Tourism
  मग सुरु झाली संगीत रजनी. गायत्री सप्रे-ढवळे आणि कुमार करंदीकर यांनी रसिक श्रोत्यांना एका वेगळ्याच विश्वात , स्वर्गीय सुखाची रेलचेल असणा-या चंद्रमाधवीच्या प्रदेशात नेण्याचा जणु चंगच बांधला होता जणु. हा प्रवास, चंद्रमाधवीच्या प्रदेशाकडे जाण्याचा हा प्रवास संगीत सुरांचाच नुसता नव्हता बर का ! […]