निसर्गशाळा – मागे वळुन पाहताना

आज सकाळी सकाळी फेसबुक ने सात वर्षांपुर्वीची एक आठवण दाखवली. खरतर ही आठवण फक्त सातच वर्षांपुर्वीची नाही तर मागील अनेक वर्षांची आहे.

तेव्हा केवळ मित्र-मित्र आम्ही गेलो वेल्ह्यातील आपल्या जागेत निसर्गसहलीसाठी. त्यावेळी निसर्गशाळा येथे अक्षरशः एकही पक्के टॉयलेट देखील नव्हते. एखादा साधा सुधा निवारा देखील नव्हता. झाडे देखील नव्हती. बांबु नव्हते. काही म्हणजे काही नव्हते. केवळ एक ओसाड माळरान होते.  त्यावेळी अजिबात वाटले नव्हते की निसर्गशाळा ही कल्पना व अनुभव सर्वांना इतकं आवडेल.

साधारण २५ वर्षांपुर्वी यशदीप मी ट्रेक करायचो तेव्हा आम्हाला रानावनांत कॅम्प करावे लागायचे. तेव्हा कॅम्प करणे म्हणजे एखादे मंदीर, शाळा, व्हरांडा शोधुन त्यात मुक्काम करणे असेच होते. सह्याद्रीमध्ये पावसाळ्याव्यतिरिक्त कॅम्प करण्यासाठी टेंट ची गरज क्वचितच असायची. आणि अगदी एखाद्या ट्रेकला असली तरीही आम्ही विद्यार्थी असल्याने आम्हाला टेंट वगेरे चोचले परवडणारे नव्हते. आता टेंट जसे अगदी सहज पणे विकत मिळतात तसे पुर्वी मिळायचे देखील नाहीत. पण रानावनांत मुक्काम करण्याचे ते अनुभव आयुष्यभर लक्षात आहेत आमच्या आज देखील.

साधारणपणे २००९ मध्ये पहिल्यांदा निसर्ग पर्यटनाचा एखादा उपक्रम सुरु करण्याचा विचार मनात आला. त्यावेळी मुळशीतील लहान मुला-मुलींसाठी एकेक दिवसांच्या सहलींचे आयोजन केले देखील. त्या उपक्रमास खुप चांगला प्रतिसाद मिळाला. लहान मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी निसर्गशाळा मध्ये एक परिपुर्ण असा निसर्गाभ्यासक्रम देखील बनविण्यास मी सुरुवात केली व काहीसा बनविला देखील. मुला-मुलींसाठी अशा प्रकारचा परिपुर्ण अभ्यासक्रम तयार करणे व तो राबविणे हे मुख्य ध्येय होते. या कार्यक्रमामुळे मुलांमध्ये अनेकविध गुणांचा विकास होणार याची खात्री होती. प्रत्येक मुलाच्या शारीरीक, मानसिक व भावनिक विकासाचा आलेख देखील या अभ्यासक्रमात तयात होणार होता. खरतरं निसर्गशाळा मला जी हवीये ती अशी पाहिजे. नोकरी-व्यवसाय करीत करीत निसर्गशाळा मी सुरु केली होती त्यामुळे त्याकडे म्हणावे तसे लक्ष देता येत नव्हते त्यामुळे निसर्गशाळा देखील हवी तशी वाढत नव्हती.

वर्ष २०११ मध्ये सर्वात पहिला कॅम्प आम्ही घेतला वेल्ह्यात, पालक आणी मुले यांसोबत. सर्वांना तो कॅम्प खुप आवडला. तरीही निसर्गशाळा ख-या अर्थाने सुरु झालेली नव्हतीच. माझ्या ध्येयापासुन मी अजुनही दुरच होतो. कालांतराने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि वेल्ह्यातील इतर कामांमध्ये मी गुंतून गेलो. ही इतर कामे मला अजिबात न आवडणारी होती पण ती करणे क्रमप्राप्त होते. काळ पुढे सरकत होता. व्हॉट्सॲप अवतरले आणि जुने मित्र पुन्हा व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये एकत्र येऊ लागले. असाच एक ग्रुप जो मी स्वतः बनविला तो म्हणजे माझे सी-डॅक चे मित्र. या मित्रांपैकी डझनभर पुण्यामध्येच स्थायिक झालेले. व्हॉट्सॲप वरील गप्पा-टप्पा होता होता सर्वांचे ठरले की आपण सहलीसाठी एकत्र प्रत्यक्ष भेटायचे.  मी सर्वांना म्हंटले के चला आपण वेल्ह्याला जाऊयात, आपल्याच जागेत मुक्कामी सहलीसाठी. सर्वांनी दुजोरा दिला आणि निसर्गशाळेची ही दुसरी सहल ठरली. त्यावेळी निसर्गशाळेत माळरानाशिवाय अन्य काहीच नव्हते. पावसाळ्यातच केवळ सुंदर, विलोभनीय दिसणारी निसर्गशाळा उन्हाळ्यात हकास व्हायची. झाडे नव्हती, हिरवे छत्र अजिबात नव्हते. एकही साधे पत्र्याचे छप्पर देखील नव्हते. टॉईलेट नव्हते..नव्हे नव्हे एक टॉईलेट होते पण ते असे की एक कमोड केवळ दुरवर ठेवले होते व त्याला पोतेरे बांधुन आडोसा केलेला होता. इतकेच काय पण प्रत्यक्ष जागेत जाण्यासाठी रस्ता देखील नव्हता. मोटारकारी रस्त्यालाच पार्क करुन आम्ही सर्व साहित्य घेऊन निसर्गशाळेत गेलो होतो. कुनाल देशमुख, मंगेश मुरुडकर, सचिन गव्हाने, मनिष सहा आणि हेमंत ववले असे पाच जण होतो आम्ही तेव्हा. हेच ते माझे मित्र आहेत की ज्यांनी माझ्या निसर्गशाळेच्या संकल्पनेचे मनापासुन कौतुक केले आणि मला वेळोवेळी प्रोत्साहन दिले. मित्रांना पहिला अनुभव मनापासुन आवडला. हे सर्व ओळखीचे होते, आपले होते त्यामुळे शुण्य सोई सुविधांमध्ये देखील मित्रांनी पुनःपुन्हा येण्याचा विचार मांडला. 

दुरवर दिसते आहे ते म्हणजे त्यावेळचे पहिले शौचालय. आणि मोकळे गवताळ रान जे यात दिसते आहे त्याऐवजी आता बांबुची बेटे आहेत.
वीज नाही, रस्ता नाही, पिण्याचे बाटलीतील पाणी ही नाही. अशा स्थितीतील आमचा हा पहिला कॅम्प

माझे गावाकडील मित्र अनिल चोंधे, अरविंद कुडापणे, राजाभाऊ , नंदु , आबा हे देखील पुढे या प्रवासात सामील झाले. माझा आत्मविश्वास वाढला. व्यावसायिक सहकारी मित्र कौशल ने आर्थिक पाठबळ पुरवण्यासाठी तयारी दर्शविली. सुरुवातीस दोन टॉईलेट्स बांधले. 

एक ॲस्बेस्टॉसच्या शीट्स १२ बाय १२ फुटांची एक खोली तयार केली. आता जिथे किचन आहे तेथेच ती खोली होती. आणि तेथुन पुढे सुरु झाला निसर्गशाळेचा खरा निरंतर प्रवास. महिन्यातुन दोन तीन – दोन तीन ग्रुप येऊ लागले. पुढे यशादिप पुन्हा भेटला आणि कॅम्पसाईट ला माझ्या सोबत आला. यशदिपचा अनुभव माझ्यापेक्षा तसुभर जास्तच आऊटडोअरमधला. सर्वत्र फिरुन आम्ही जागेचा, डोंगर द-यांचा सर्व्हे केला. कुठे काय करता येईल याचा अंदाज घेतला. ट्रेकिंगचा अनुभव कसा व कुठे द्यायचा हे ठरविले. धाडसी खेळ रॅपलिंग कुठे कसे करता येईल हे ठरवुन रॅपलिंग ची कसरत देखील केली. 

EX Serviceman अनिल चोंधे

नोव्हेंबर २०१६ मध्ये www.nisargshala.in ही वेबसाईट बनविली. या वेबसाईटच्या माध्यमातुन नावनोंदणी करण्याची सोय ठेवली. नोव्हेंबर २०१६ मध्ये आमच्याकडे वेबसाईटच्या माध्यमातुन आलेले पहिले पर्यटक आमचे कायमचे मित्र झाले. रितेश ठकार सहकुटूंब आमचेकडे पहिल्यांदा आले नोव्हें २०१६ आणि तेव्हापासुन ते अनेकदा आले. निसर्गशाळेच्या सोशल मीडीयावरील पोस्ट्स पाहुन रितेश आवर्जुन कौतुक करतो आणि त्यांच्या मित्र-परिवारात पुढे पाठवतो देखील.

रितेश ठकार, आमच्या सर्वात पहिल्या व्यावसायिक कॅम्प मध्ये सहकुटूंब सहभागी झाले

निसर्गशिक्षणातुन व्यक्तिमत्वाचा विकास खरतर हे निसर्गशाळेचे मुख्य ध्येय आहे की अजुनही दुरच आहे. लहानग्यांसाठी निरंतर अभ्यासक्रम बनवुन तो चालवणे आणि त्यांच्या सर्वांगिण विकासाचे साक्षीदार होणे हे देखील झालेले आपणास पहायचे आहे.

तुर्त निसर्गपर्यटनातुन निसर्ग संस्कार हे ब्रीद घेऊन निसर्गशाळा काम करीत आहे. डोंगर द-यांमध्ये राहण्याचा आनंद घेणे हे केवळ ट्रेकर मंडळीनाच शक्य होते. पण निसर्गशाळेमुळे असा निसर्गात राहण्याचा, निसर्गाचा अनुभव घेण्याचा, निसर्गाच्या कुशीत विसावण्याचा, निसर्गाशी एकरुप होण्याचा एक यशस्वी कार्यक्रम आम्ही दिला व देत आहोत.

हा प्रवास सोप्पा नक्कीच नव्हता व पुढेही सोपा नसेल. हितचिंतक, मित्र सोबतीला असतील तर कितीही दुस्तर असला मार्ग तरीही आपण तो लीलया पादाक्रांत करुच यात शंका नाहीये.
मित्र-सहका-यांचे मनापासुन आभार कारण केवळ त्यांच्यामुळेच हे शक्य झाले. त्यांचे वेळोवेळी मिळणारे प्रोत्साहन उभारी देते.  तसेच निसर्गशाळेचे पर्यटक अश्या सर्वांचे मनापासुन आभार की ज्यांनी अशा आगळ्या-वेगळ्या पर्यटनासाला प्रतिसाद दिला.
अजुनही बरच काही आठवतय..ते पुन्हा कधीतरी 🙂 

आपला

हेमंत ववले

मागील आठवड्यातील निसर्गशाळा व परिसराची काही छायाचित्रे

मावस भाऊ संजय हाक मारेल तेव्हा मदतीला उभा असतो
Facebook Comments

Share this if you like it..