पर्यावरण पुरक वस्तु की जीवन?
इकोफ्रेंडली हा शब्द आजकाल परवलीचा शब्द झाला आहे म्हणजे आजकाल आपण पाहतोय कित्येक उत्पादीत वस्तुंना, अन्न पदार्थांना इकोफ्रेंडली हा टॅग किंवा विशेषण लावले जात आहे. हल्ली वस्तु पर्यावरण पुरक बनत आहेत. हे खुप चांगले आहे. पण काय तुम्हाला माहिती आहे का निव्वळ वस्तु पर्यावरण पुरक बनवुन भागेल अशी वेळ आता नाही राहिलेली. आता वेळ आली आहे कुटूंबे पर्यावरण पुरक बनण्याची. उभे जीवनच पर्यावरण पुरक बनण्याची व बनविण्याची. थोड नवीनच वाटतय ना? आणि थोडं कठीण किंवा काहींना तर अशक्य देखील वाटत असावं. चला तर मग आज आपण भेटुयात पर्यावरण पुरक जीवन ते देखील शहरी जीवन जगण्याचा मनापासुन प्रयत्न करणा-या एका गृहिणीला. ही गृहीणी माता आहे, पत्नी आहे आणि विशेष म्हणजे ती कुशल व्यावसायिक देखील आहे.
कदाचित काहीशे वर्षांपुर्वी अथवा हजारेक वर्षांपुर्वी भारतात राहणारे प्रत्येक ग्राम अथवा नगरवासी कुटूंब आणि कुटूंबातील प्रत्येक सदस्याचे जीवन पर्यावरण पुरकच असेल. त्याकाळात पर्यावरण तज्ञ नसतीलच बहुधा तरीही प्रत्येक घर पर्यावरणाला पुरक असे जीवन जगत असेल. हे इतके ठामपणे सांगता येऊ शकते कारण अश्या पर्यावरण पुरक जीवनाची काही लक्षणे अजुनही खुप दुर्गम भागात असणा-या वाड्या / पाड्यांमध्ये दिसतेच.
आधुनिक काळात खरेच असे पर्यावरण पुरक जीवन जगता येऊ शकते का?
पण आधुनिक काळात खरेच असे पर्यावरण पुरक जीवन जगता येऊ शकते का? आणि जर शक्य असेल तर असे कुणी खरच केलं आहे का? करीत आहे का?
भारतात आणि जगात देखील आज अशी अनेक उदाहरणे आहेत, कुटूंबे आहेत की ज्यांनी शहरी जीवन सोडुन गावखेड्यांकडे जाणे निवडले आहे. निसर्गाशी मिळते जुळते घेऊन, गरजा कमी कमी करीत, कधी कधी स्वतःचे अन्न स्वतः पिकवुन, अशी मंडळी स्वतःचे आयुष्य सुखाचे करीत आहेत. अनेक वर्षे शहरी जीवनाची सवय असताना निसर्गात जाऊन राहणे, तिथल्या परिस्थितीशी जुळवून घेणे, अनेक अडचणींना तोंड देणे, त्यांवर मात करणे हे खुपच जिकिरीचे आणि जिद्दीचे काम आहे. कदाचित सर्वांना हे जमणार नाही, जमतदेखील नाही. बरोबर ना?
सामान्य की असामान्य?
महात्मा गांधी असो वा बाबा आमटे असो यांना ते जमले, त्यांनी केले, आजही अनेक जण आहेत की जे असे करीत आहेत. पण झाली असामान्य व्यक्तिमत्व असलेली माणसे. अश्या एकेका माणसाच्या असामान्य कर्तृत्व मोठे आहे यात शंका नाहीच. पण अश्या एकेका माणसाच्या मोठ्या कर्तृत्वापेक्षा आजच्या काळात जास्त गरज आहे ती म्हणजे सामान्य माणच्या छोट्या छोट्या गोष्टींची. या गोष्टी छोट्या छोट्या असल्या तरीही सामान्य माणसांच्या सहज आवाक्यातील असल्याने एकुण परिणाम एका महान व्यक्तिच्या कर्तृत्वापेक्षा खुप मोठा, खुप परिणामकारक आणि दिर्घकाळ टिकणारा असु शकेल.
व्यक्तिरेखा - सौ शीतल तळेकर

कदाचित हीच गोष्ट समजली , उमजली असेल आपल्या आजच्या लेखातील सामान्य असुनही असामान्य ध्येय उराशी बाळगलेल्या , पुणे शहरात राहणा-या एका गृहीणीला. त्यांचे नाव आहे सौ शीतल तळेकर.
कोविड-१९ आणि त्यामुळे जगात उडालेली धांदल, मृत्युचे तांडव , लॉकडाऊन हे सारे आपल्या सर्वांच्या आयुष्यात इतके अचानक आले की त्यावेळी कित्येकांना सावरता आलेच नाही. एक दिवस असा येईल की आपण आपल्याच घरात बंदीवासात राहु अशी कल्पना कुणी स्वप्नात देखील केली नसेल. कोविड१९ ने आपले जग अक्षरशः उलटे पालटे केले, आपले जगणे बदलुन टाकले, आपलं हसणं, रडणं देखील बदलल. आप्तेष्टांच्या अचानक जाण्याचे अनेकांच्या पायाखालील जमीन सरकली ती अजुनही तशीच आहे. कित्येक जण जीवन आणि मृत्युच्या सीमारेषेपर्यंत जाऊन आले. अनेकांनी त्याही काळात मनुष्यातील दानव पाहिला आणि अनेकांनी मनुष्यातील देवत्व देखील अनुभवले. कित्येकांना या जीवनाची क्षणभंगुरता तात्काळ लक्षात आली आणि कित्येकांना मनुष्याची अगतिकता समजली. कुणी काय तर कुणी काय असे अनेकविध अनुभव सर्वांनीच घेतले.
पहिल्याच लॉकडाऊन मध्ये जेव्हा अनेकजण लॉकडाऊन डायरीच्या हॅशटॅग खाली सोशल मीडीयवर पोस्ट लिहित होते तेव्हा शीतल वेगळ्याच विचारात होती. टीव्ही वर बातम्या येत होत्या की लॉकडाऊन मुळे प्रदुषण कमी झाले, शेदोनशे किमी अंतरावरुन हिमशिखरे दिसु लागली इत्यादी तेव्हा शीतल खोल विचारात होती की मनुष्याने उभे केलेले हे कार्यकलाप, हे व्यापार, हे औद्योगिकीकरण, हा चंगळवाद, हा भौतिक उपभोक्तावाद, वापरा आणि फेका संस्कृती हे सारेच खरतर कारणीभुत आहे मनुष्याच्या जीवनाचा एकुणच दर्ज्या खालावण्यासाठी. मनुष्याचे जीवन उन्नत होण्याऐवजी या सा-यांमुळे मनुष्याचेच जीवन सुमार आणि निकृष्ट होत चालले आहे. याला म्हणतात रीयलायझेशन म्हणजेच उपरती, अनुभूती!
अशी उपरती अनेकांच होत असते, लॉकडाऊन च्या काळात देखील झाली, त्यापुर्वीही व्हायची , आत्ताही होत असेलच. पण शीतलचे वेगळेपण हे आहे की शीतल तात्काळ या उपरतीप्रमाणे काम करण्याचा, जीवन जगण्याचा संकल्पच नुसता केला नाही तर त्यासाठीचा मार्ग देखील ठरवला. शीतल आणि तिचे कुटूंब पुणे शहरातील उच्चभ्रु उपनगरात वास्तव्यास आहेत. पती एका कॉर्पोरेट मध्ये मॅनेजर आहेत तर दोन मुली शालेय शिक्षण घेत आहेत. मोठी सहाव्या इयत्तेत शिकते तर धाकटी पहिल्या इयत्तेत.
लॉकडाऊन सुरु असताना अनेकजण विविध टास्क करुन सोशल मीडीयवर पोस्ट करीत होते तेव्हा शीतल याच सोशल मीडीयावर इको-लिव्हिंग विषयी माहिती घेण्यात व्यस्त होती. अनेक ऑनलाईन कम्युनिटीज ती सदस्य बनली, अनेक डॉक्युमेंटरीज तिने पाहिल्या. इथुन पुढे एकेक वस्तुच इकोफ्रेंडली घेण्यापुरते आपले पर्यावरण प्रेम न ठेवता आपल जगणच, आपलं जीवनच हळुहळू इको-फ्रेंडली कसे करता येईल यासाठी विचार करण्यास तिने सुरुवात केली.
प्रॉब्लेम स्टेटमेंट
अनेक पर्यावरण प्रेमी, तज्ञ लोक व्याख्यानात औद्योगिकरणास दोष देतात निसर्गाच्या –हासाला पण हे औद्योगिकरण अनेकांच्या आयुष्यातुन काही कमी होत नाही. येनकेन प्रकारेन औद्योगिकरण आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे वाहनांने केली जाणारी ये-जा. ही ये-जा मुख्यत्वे करुन घर ते कामाचे ठिकाण अशी असते किंवा घर ते मुलांची शाळा अशी असते. आठवड्यातुन एखाददोन वेळेस भाजीपाला खरेदीसाठी तर महिन्यातुन एखाददोन वेळेस किराणा भरण्यासाठी. एव्हाना शीतलला कार्बन फुटप्रिंट म्हणजे काय हे समजले होते आपण स्वतः , आपणा स्वतःकडुन कार्बन फुट-प्रिंट होणारच नाही किंवा कमीत कमी होईल यासाठीचे पहिले पाऊल उचलले ते म्हणजे घर निवडले शाळा आणि पतीचे ऑफीस अश्या दोन्हीही ठिकाणांच्या जवळ. हे कुटूंब केवळ एवढेच करुन थांबले नाही, तर शाळा आणि घर ही ये-जा त्यांनी हळुवार चक्क सायकल ने देखील सुरु केली. दररोज सकाळी नवरा-बायको आपापली सायकल घेतात , मुली देखील त्यांच्या सायकल्स घेतात आणि हे चौघे ही निघतात पॅडल मारत शाळेकडे. मुलांना शाळेत सोडण्यासाठी जाण्याचा हा प्रकार कदाचित तुम्हाला नवीनच वाटला असेल,. बरोबर ना? पण हे खरय आणि हे कुटूंब सातत्याने असे अगदी दररोज करीत आहे. रोज सायकल चालवण्याच्या व्यायामामुळे आरोग्याचे अनेक लाभ या चौघांनाही झाले आहेत, होत आहेत. हे म्हणजे दुधात साखरे सारखेच झाले की नाही?
शीतलशी गप्पा मारताना एक शब्द नव्याने मला समजला . तो म्हणजे ‘कॉन्शीअस लिव्हिंग’. त्यालाही अधेमध्ये शीतल – इको हे विशेषण लावताना देखील मी ऐकले. ‘इको कॉन्शीअस लिव्हिंग’. मराठीत सांगायचे झाले तर याला ‘पर्यावरण दृष्ट्या सतर्क जीवन’ असे म्हणता येईल. ही सतर्कता म्हणजे नक्की काय बरे? शीतल सांगते की आपले कोणत्याही वागण्याने, वर्तनाने, कृतीने पर्यावरणाचे नुकसान तर होत नाही ना याविषयी सजग असणे म्हणजे कॉन्शीअस लिव्हिंग. खुप छोट्या छोट्या गोष्टी शीतलकडुन समजतात की ज्या आपण नेहमी खुपच लाईटली घेतो म्हणजे दुर्लक्षितो.
एक नेहमीच्या वापरातील उत्पादन म्हणजे घरातील टॉयलेट क्लीनर, भांडी घासण्यासाठीचा साबण, अंगाचे साबण इ. तुम्ही म्हणाल यात काय विशेष सजग राहण्यासारखे? गम्मत पहा आपण म्हणजे प्रत्येकजण , जो जो बाजारातील रसायन युक्त क्लीनर वापरतात, त्याचे पाणी जे आपल्या बाथरुम, भांड्यांच्या सिंक मधुन बाहेर जाते त्यात मोठ्या प्रमाणात मनुष्याला हानिकारक रसायने असतात, पेस्टीसाईड्स असतात. हे सारेच्या सारे आपण म्हणजे आपण स्वतः, कोणतीही रासायनिक फॅक्टरी नाही तर आपण, अगदी सामान्य माणसे दररोज आपल्या नद्यांमध्ये, नाल्यांमध्ये, जमिनीमध्ये सोडत आहोत. जलप्रदुषण, भुमीप्रदुषण आपण करतो आहोत. एका आख्ख्या बिल्डींग मध्ये वास्तव्य करणा-या शेकडो कुटुंबांमुळे एका कारखान्याने होते तेवढे प्रदुषण आपण स्वतःस सामान्य म्हणवुन घेणारी माणसे करीत आहोत. हे खुप भीषण आहे. आपले अन्न, आपले जल, आपल्या नद्या , आपले समुद्र आपणच विनाशाकडे घेऊन चाललो आहोत. असे करण्यात आपला प्रत्येकाचा वाटा आहे. प्रत्येकाचे योगदान आहे. हे प्रदुषण जमीनीतील सुक्षजीवांना घातक आहेत, हे प्रदुषण , रसायने आपल्याच अन्नात शेतीमालाच्या धान्याच्या रुपाने येत आहे, जलचरांना मारक आहे. सर्वांनाच घातक असलेले, विनाश करणारे, कित्येक सजीवांचे जीवन संपविणारे हे कृत्य म्हणजे साक्षात पाप आहे, महापाप आहे. आपण सारेच या पापाचे भागीदार आहोत. आजपर्यंत अज्ञानामुळे मी करीत आलो पण आज मला समजले माझ्या अश्या छोट्या छोट्या गोष्टी , कृती इतक्या भयंकर आहेत आणि तरीदेखील मी उद्यादेखील असेच करणार असेल तर माझ्यासारखा निर्ढावलेला गुन्हेगार मनुष्य अजुन कुणीच नाही असे समजावे.
कृतीशील म्हणुनच प्रेरक शीतल
तर शीतल मात्र जेव्हा अश्या क्लीनर्स विषयीचे वास्तव समजले तेव्हापासुन म्हणजे लॉकडाऊन सुरु असल्यापासुनच इको फ्रेंडली क्नीनर्स वापरण्यास सुरुवात केली आणि आजही वापरीत आहे. मी शीतलला विचारले की इकोफ्रेंडली उत्पादने महाग असतात ते सामान्यांना परवडणार कशी बरे? त्यावर शीतलने जे सांगितले हे खुप महत्वाचे आणि डोळ्यांत अंजन घालणारे आहे. ती म्हणाली की स्वस्त मिळते म्हणुन तुम्ही विष आणणार का घरात? तेच विष भाम्ड्यांना लावणार का? तेच विष नदीनाल्यांमध्ये सोडणार का? आणि पुढे जाऊन आजारपणावर लाखो खर्च करणार का? अत्यंत तार्किक कारण मिळाले माझ्या तर्कबुध्दीला. हे विष नुसते आपल्या शरीरालाच आजारी, मरणप्राय बनवीत नाही तर हे आपल्या जनुकांवर देखील प्रभाव अपायकारक परिणाम करतात ज्यामुळे जन्माला येणा-या पिढ्या देखील महाधुर्धर रोग घेऊनच जन्माला येतील नव्हे नव्हे असे व्हायला सुरुवात देखील झाली जे लहान मुलांना होणा-या असाध्य आजारांमध्ये दिसत आहे. किती छोटी ती गोष्ट भांडी कपड्यांची पावडर, संडास साफ करण्याचे लिक्विड पण परिणाम पहा किती भयावह आहेत. शीतलशी बोलल्यावर किंबहुना तिचे ऐकल्यावर मला देखील उपरती झाली आहे अशी मला खात्री आहे आणि आवश्यक ते बदल मी देखील करणार असा मी निश्चय केला आहे.
कृतीशील म्हणुनच प्रेरक शीतल
असेच शीतलच्या दैनंदीन जीवनातुन कपड्यांविषयी माहिती समजली की जिचा आपण अद्याप स्वप्नात देखील विचार केला नसेल. कपडे विकत घेताना शक्यतो खादी म्हणजे कॉटनचे घ्यावे, त्यावर रबर प्रिंट कधीही असु नये, चमकदार टिकल्यांची नक्षी असु नये, पॉलिस्टर तर घेऊच नये कारण हे सगळे वापराने ह्ळुहळू अतिसुक्ष्म तुकडे सोडतात की ज्यांचे विघटन होत नाही आणि पुन्हा आपल्याच जल-वायु ला प्रदुषित करतात. किती हा सुक्ष्म विचार! हेच काय तर कपडे किंवा अन्य कसलीही खरेदी करण्यापुर्वी शीतल हजारदा विचार करते की खरोखरीच आपणास त्या वस्तुची गरज आहे का? भलेही ते वस्तु इको फ्रेंडली असो वा नसो गरज नसताना ती वस्तु खरेदी करणे शीतल टाळते. घरात कमीत कमी फर्निचर, कमीत कमी शोभेच्या वस्तु किंवा अजिबातच नाही, प्लास्टीक योग्य उपयोगाचेच तेवढे आणि ते देखील वर्षानुवर्षे वापर करता येईल असे घेतले जाते. ते म्हणजे काय तर रेनकोट इत्यादी. शीतलचा हा इको-कॉन्शीअस लिव्हिंगचा प्रवास सुरु होऊन दोन वर्षे झाली आणि तिने तिचा हा विचार घरातील प्रत्येक सदस्यापर्यंत पोहोचवला आहे. मुली वयाने छोट्या असल्या तरीही गरज नसताना खरेदी करणे या मुलींना देखील चुकीचे वाटु लागले आहे. अनावश्यक खरेदी टाळुन घर सुटसुटीत राहते, हवा खेळती राह्ते, घराचे ‘संग्रहालय’ होत नाही, आवरसावर सोपी होते असे अनेक लाभ शीतल अनुभवते आहे. जंक फुड आता हे कुटुंब स्वप्नात देखील खात नाही. शक्य तितके साधे राहणे करणे , पर्यावरणा आपल्यामुळे अजिबात त्रास होणार नाही किंवा कमीत कमी त्रास होल याची काळजी घेणे हा विचार घेऊन सुरु झालेला हा प्रवास आता मिनिमलीझम कडे सुरुये. या सगळ्यात शीतल व कुटूंबाचा अजुन एक मोठा फायदा होतोय तो म्हणजे अनावश्यक खर्च न करण्यातुन वाचलेली रक्कम आता ते पर्यटनासाठी खर्च करतात.
जबाबदार म्हणजेच Responsible Tourism

यांचे पर्यटन देखील अनोखे आहे. सर्वप्रथम हे कुटूंब पर्यटनासाठी देखील इको टुरिझम ला जास्त पसंती देतात. पर्यटनाला कुठे ही गेले तरी यांचेसोबत , त्यांनी केलेला कचरा पुन्हा शहरात माघारी आणण्याची त्यांनी स्वतःला सवय लावुन घेतली आहे. कुठे ही बाटलीबंद पाणी ते विकत घेऊन पीत नाहीत. जिथे जातील तेथील स्थानिक पाणी बिनधास्त पितात, अगदीच पाणी जार गढुळ वगेरे असेल तर एक पोर्टेबल पाणी फिल्टर जो नेहमी प्रवासात सोबत असतो तो वापरतात. बाटलीबंद पाणी पिणे म्हणजे त्या बाटलीचे मायक्रो प्लास्टीक देखील स्वतःच्या पोटात घेणे आणि आवडीने आपल्या मुलाबाळांना पाजणे हे देखील पाप आहे हे तुम्हाला अद्याप समजले असेलच.
एक ना अनेक छोट्या छोट्या गोष्टीतुन आपण स्वतःस, स्वतःच्या जवळच्या माणसांना विनाशाकडे एकेक पाउल पुढे घेऊन चाललो आहोत आणि आपणास आपल्या या महापापाची पुसटशी कल्पना देखील नाहीये.
एक असामान्य माणुस व्यक्तिमत्व खुप मोठे काम करतो पण त्यापेक्षा अनेक सामान्य माणसे मिळुन सध्या वसुंधरे, भुमातेला , आपल्या आप्तेष्टांना नुकसान पोहोचवीत आहेत, हे नुकसान एका असामान्य महान व्यक्तिच्या खुप मोठ्या कामापेक्षा लाखपटीनी जास्त आहे, दुरुस्त करण्यापलीकडे आहे. त्यामुळे असामान्य महान व्यक्तिमत्वे होण्यापेक्षा, महान पर्यावरण निर्माण होण्यापेक्षा शीतल सारखे व तिच्या कुटूंबासारखे कॉन्शीअस लिव्हिंग करणारे सामान्य माणसे अनेक निर्माण होणे सोपे आहे व अधिक परिणामकारक आहे.
पाणी - वापर आणि जबाबदारीचे निर्वहन
पाणी हा पर्यावरणाचा अत्यंत महत्वाचा घटक आहे, त्यामुळे आपल्यामुळे जलप्रदुषण होणार नाही याची काळजी तळेकर कुटूंब आवर्जुन घेते. पाणी बचत करण्यासाठी देखील घरातच त्यांनी काही युक्त्या केल्या आहेत. नळाला एक वेगळ्या प्रकारचा आणखी एक छोटा नळ लावला आहे ज्यातुन स्प्रे सारखे पाणी येते. शीतल म्हणते असे केल्याने पाण्याची नव्वद टक्क्यापर्यंत बचत होते. कपडे धुण्यासाठी देखील वापरले जाणारे पाणी बचत करण्यासाठी कमीत कमी कपडे धुणे, अगदीच उन्हाळ्यात घाम येतो म्हणुन मग दुपारचे कपडे आणि संध्यकाळचे कपडे वेगळे असे हे कुटूंब करते बाकी हिवाळा पावसाळा शक्यतो दुपारचे आणि संध्याकाळचे कपडे वेगवेगळे घालण्याची त्यांची सवय आता मोडली आहे. मुलांना देखील अंघोळ करताना कमीत कमी पाणी वापरण्याची सवय लागावी म्हणुन एक युक्ती शीतल केली आहे. आंघोळ करताना एक ते शंभर अशी मोजणी करीत करीत , शंभर मोजेपर्यंत आंघोळ झाली पाहिजे असा सवय लावली आहे. खरतर कोण घरात किती पाणी वापरतो याचा काहीच हिशेब नसतो आणि कुणी विचारायला पहायला देखील येत नाही. तरीही स्वयंस्फुर्तीने असे काही करणे हा देखील खुप मोठा गुण आहे या कुटूंबाकडुन शिकण्यासारखा.
पर्यावरण पुरक पालकत्व

‘पर्यावरण पुरक पालकत्व’ हा असाच एक नवीन पायंडा यांनी पाडलाय. मुलांनी टिव्ही वर काय पहावे काय पाहु नये, सोशल मीडीयावर देखील मुलांनी काय पहावे काय पाहु नये याबाबतीत देखील हे पालक अत्यंत सतर्क म्हणजे कॉन्शीअस आहेत. स्वतःला कंटेंट क्रियेटर म्हणवुन घेणा-यांना शीतल प्रश्न विचारते की तुम्ही जे डान्स , अथवा विनोदाचे, बीभत्सतेचे रील्स आणि कंटेंट बनविता त्यातुन मानवतेसाठी आणि एकुणच पर्यावरणासाठी काय योगदान आहे? याचा विचार सोशल इन्फ्लुएंसर लोकांनी अवश्य केला पाहिजे. मुलांना असल्या सोशल इन्फ्लुएंसर लोकांपासुन वाचवणे हे प्रत्येक पालकाचे आता कर्तव्य आहे. मुलांना पर्यावरण , वाईल्ड लाईफ , कला-कुसर, हस्त कारागीरी आदींविषयी माहिती मिळेल, ज्ञान मिळेल अशा डॉक्युमेंटरीज पालकांनी दाखवल्या पाहिजेत. त्याही आधी पालकांनी मुलांसमोर आदर्श स्वतःच्या वर्तनातुन ठेवले पाहिजे यावर शीतलचा जास्त भर असतो. पालकांनी देखील समाजात सुरु असलेल्या अनिष्ट गोष्टींपासुन स्वतःला वाचवले पाहिजे. बाबा आमटे किंवा अन्य कुणीही व्यक्ति जी असामान्य कार्य करते ती आपणास आवडते पण त्या व्यक्तिप्रमाणे भलेही समाजासाठी नाही, पर्यावरणासाठी पण केवळ स्वतःसाठी जरी आयुष्यात योग्य ते बदल केले तरी देखील खुप सकारात्मकता आपापल्या आयुष्यात येईल. मनुष्याला या अश्या गोष्टी करण्यापासुन कर्मप्रवृत्त होण्यापासुन थांबवण्याचे काम मात्र समाजाचा रेटा करतो. मित्रमंडळी करतात म्हणुन आम्हीही तसेच केले पाहिजे नाहीतर आपण कमी दर्ज्याचे जीवन जगतो आहोत की काय असा न्युनगंड आपणच करुन घेतलेला असतो. जे जंक फुड चक्क विष आहे आपण तेच खातो आणि वर म्हणतो की आम्ही कधी कधीच खातो, अरे पण खातोच कशाला, ते चांगले नाही हे माहिती असुनदेखील खातोच कशाला, कुटुंबाला खाऊ घालतोच कशाला? कशाला म्हणजे कारण असतो ट्रेंड. असे अनेक ट्रेंड बनत असतात, नवनवीन येत असतात. आपण ठरविले पाहिजे की या ट्रेंड च्या प्रवाहात आपण आणि आपले कुटूंब वाहवत नाही गेले पाहिजे.
हे पालक मुलांना घेऊन बीज संकलनाचे काम करतात फावल्या वेळात, कधी ट्री प्लांटेशन ड्राईव्ह मध्ये सहभागी होतात.
स्त्रियांची भुमिका

मी विचारले, “शीतल तु एक आधुनिक स्त्री आहेस, माता आहेस, पत्नी आहेस, उत्तम फोटोग्राफर आहेस तर एवढ्या सगळ्या भुमिका निभावत असताना तु तुझ्यासारख्याच अन्य स्त्रियांना काही सांगु इच्छिते का?”
यावर शीतलने सांगितले की स्त्री मग ती आई असो, पत्नी असो, बहिण असो वा मैत्रिण असो, तर स्त्री मध्ये प्रचंड ऊर्जा आहे आणि समाजाला प्रभावित करण्याची प्रचंड क्षमता आहे. समाज घडविण्याचे कार्य स्त्री करते भलेही आजकाल तत्वतः असा भेद राहिलेला नसला तरीही मुलांसोबत जास्त वेळ आईचाच जातो. यामुळे साहजिकच तिचा प्रभाव मुलांवर अधिकच असतो. तीच पहिली गुरु आहे. तीच पहिला आदर्श आहे मुलांचा त्यामुळे तिने जर स्वतःच्या जीवनात ‘इको – कॉन्शीअस लिव्हिंग’ ला स्थान दिले तर नक्कीच पुढच्या पिढीमध्ये हे गुण आपोआप येतील. शीतलच्या या सल्ल्याचे मुर्तिमंत उदाहरण शीतल स्वतः आहे.

एक सामान्य कुटूंब काय करु शकते?
शहरातील कुटूंबाना जर पर्यावरणासाठी, स्वतःच्या आरोग्यासाठी खरच काही चांगल आणि ठोस करायच असेल तर सुरुवात कशी केली पाहिजे आणि नक्की काय काय केले पाहिजे ? शीतल सांगते सर्वप्रथम घरातील क्लीनर्स म्हणजे टॉयलेट क्लिनर, भांडी, कपड्यांचे पावडर साबण जर रसायन युक्त असेल तर सर्वात प्रथम तुम्ही ते बदला. इकोफ्रेंडली उत्पादने वापरण्यास सुरुवात करा. दुसरे महत्वाचे काम तुम्ही करु शकता ते म्हणजे आपले कपडे वापरण्याची आणि विकत घेण्याची सवय बदलणे. कपडे देखील इकोफ्रेंडली घ्यावेत म्हणजे टेरीकॉट, पॉलिस्टर, सिंथेटिक कपडे घेऊ नयेत. खादी म्हणजे कॉटन घ्यावेत, कमीत कमी वेळा धुवावेत, गार पाण्यात धुवावेत, सांभाळुन वापरावे. तसेच पादत्राणांविषयी देखील आहे. अनेक वर्षे एकेक जोड वापरा, जुना झाला, रंग उडाला म्हणुन निव्वळ नवीन घेऊ नका. त्याची उपयुक्तता संपल्यावरच नवीन घ्या कारण पायताणांचा रीसायकलिंग अजुनही आपल्याकडे होत नाहीये. सारी पायताणे पृथ्वीवर इतस्तत विखुरलेली आहेत. ती जर इकोफ्रेंडली असतील तर त्यांचे विघटन होईल पण जर नसतील (हल्ली नसतातच) तर हजार हजार वर्षे होऊन देखील त्यांचे विघटन होत नाही. ह्ळु हळु सेंद्रीय अन्न वापरात आणण्यास सुरुवात करा. हे सगळे करीत असताना इको कॉन्शीअसनेस वाढवीत नेणे आणि माईंडफुल नेस देखील आत्मसात करणे गरजेचे आहे. मॉडर्न मिनिमलीस्ट होऊ शकता.
सुरुवात कशी करावी या सा-यांना?
मग मी शीतल विचारले की हे सगळे तुम्ही कसे केले?
शीतलने सांगितले की इको-कॉन्शीअस लिव्हिंग काय एका दिवसात किंवा आठवड्यात होण्यासारखी गोष्ट नाहीये. यासाठी सातत्याने जाणीवपुर्वक प्रयत्न करावे लागतील. काही गोष्टी आपण विसरु शकतो किंवा आचरणात यायला उशीर लागु शकतो तर अश्या किंवा अन्य कोणत्याही गोष्टी ज्या तुम्हाला करायच्या आहेत त्याची यादी बनवा, एकेक कागद तुम्ही नेहमी ज्या आरश्यात पाहता त्या आरश्याला चिकटवा म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला ते टास्क दिसेल, आठवण. आज नाहीत उद्या, नाहीत पुढील हफ्त्यात, नाहीत पुढील महिन्यात, कधीतरी तुम्ही ते टास्क पुर्ण करणारच. आणि जोपर्यंत पुर्ण होणार नाही तोपर्यंत तो कागद आरश्याच्या काचेवरुन काढायचाच नाही.
गेली दोन वर्षे शीतल आणि तिचे कुटूंब हे सर्व करीत आहे तरीही शीतलचे म्हणणे आहे की शहरात राहुन १००% इकोफ्रेंडली जीवनयापन शक्य नाहीये पण अधिकाधिक इकोफ्रेंडली करण्यासाठी प्रयत्न मात्र आपण १००% केले पाहिजे.
वारसा
आई कडुन कलात्मकता आणि वडिलांकडुन ‘साधी राहणी-उच्च विचारसरणी’ चा वारसा घेतलेली शीतल पतीच्या खांद्याला खांदा लावुन कुटुंब, समाज आणि पर्यावरण घडवण्यासाठी, टिकवण्यासाठी काम करते आहे. ती जगावेगळ खरतर काहीच करीत नाही पण वेगळ्या पध्दतीनं करते आहे. तिच्या या कामामुळे आपसुकच घरात आरोग्य नांदते आहे, तिच्या चित्ती समाधान आहे, पतीची खंबीर साथ तिला सतत मिळत गेली आहे.
काळाची गरज
पर्यावरणाचे काम करण्यासाठी पर्यावरणवादी व्हायची गरज नाहीये. नाही गरज जंगलात जाऊन राहण्याची. अजिबात गरज नाहिये मोठमोठी व्याख्याने देण्याची आणि ऐकण्याची. गरज आहे ती सर्वसामान्यांना पर्यावरण बाबतीत सतर्क-सजग करण्याची म्हणजे अनेकानेक सामान्य माणसे असामान्य काम करुन पर्यावरण संरक्षण सर्वधन करतील. आपण नेहमीच म्हणतो की अरे मी एकट्याने केल्याने काय फरक पडणारे? यावर शीतल म्हणते आरोग्य तर एकट्याचे चांगले होईल, कुटुंब आपलेच निरोगी होईल? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पर्यावरणासाठी आपण काहीतरी ठोस करीत असल्याचा आनंद आणि समाधान आपणास मिळेल. त्यामुळे एकट्याने असो किंवा दुकट्याने हे काम तर केलेच पाहिजे. पुढच्या पिढीला इंजिनियरींग, मेडिकलचे शिक्षण एकवेळ नाही दिले तरी चालेल पण त्यांना श्वास घ्यायला शुध्द हवा, पिण्यास रसायन्मुक्त पाणी आणि खाण्यास विषमुक्त अन्न आपण दिलेच पाहिजे, आणि हे जर आपण नाही देऊ शकलो तर आपण तोच अपराध उराशी घेऊन मरणार काय? मरताना समाधान, माईडफुल जर आपण झालो पाहिजे तर आता हे काम करावेच लागेल.
अजुन काही पैलु तिचे

शीतलच्या फोटोग्राफीविषयी, इकोसोशल विषयावर पोस्ट विषयी, तिच्या इतरांना मदत करण्याच्या निर्मळ भावनेविषये लिहिण्यासारखे अजुन खुप काही आहे. खुपच मोठा होत चाललाय लेख, वाचकांच्या अमुल्य वेळेचा विचार करुन आवरते घेताना शीतलच्या कार्यकलापावर अन्याय होतोयेस कुठतरी मला वाटतय खर. पण वाचकांना जर शीतल विषयी अजुन खुप काही जाणुन घ्यायचे असेल, तिच्याकडुन समजुन घ्यायचे असेल तर तुम्ही अवश्य शीतलच्या इन्स्टाग्राम हॅंडलला फॉलो करा.
लेखन-विराम
आशा करतो आजच्या पर्यावरण दिनानिमित्त मी लिहिलेला हा लेख तुम्हाला आवडला असेल, शीतल कडुन प्रेरणा घेऊन आपापल्या परीने शक्य तितके काम चला आपण सारे करुयात. निरोगी शरीर, निरोगी कुटूंब, निरोगी समाज आणि निरोगी पर्यावरण हे सारे आपण ठरवले तर साध्य होऊ शकते, आवश्यकता आहे ती फक्त सर्वसामान्यांनी इको-कॉन्शीअस लिव्हिंगचा अंगीकार करण्याची, कार्बन फुटप्रिंट कमी करण्याची आणि निसर्गाला पर्यावरणाला कसलेही नुकसान न करता आनंदाने जीवन गाणे गात राहण्याची.
धन्यवाद
आपलाच
हेमंत ववले
९०४९००२०५३
Share this if you like it..