आपण आकाशातील चित्तरकथा वाचतोय. या चित्तरकथांचा हेतु वाचकांस आकाशदर्शनामधील काही मुलभुत ग्रह, तारे, तारकासमुह, नक्षत्रे इत्यादी समजावे. कधी आपला निरभ्र, स्वच्छ आकाशाकडे मान वर करुन पाहण्याचा योग आलाच तर या भव्य अवकाशाची भव्यता समजावी व आपला अहंकार गळुन पडावा. विश्वाच्या या न उलगडलेल्या कोड्याच्या प्रेमात आपण पडावे व जगण्यामध्ये प्रत्येक क्षणी आपण सजग असावे.
नुकतीच आपण दिवाळी साजरी केली. जमिनीवर फटाक्यांची आतषबाजी पाहिली. आता वेळ आली आहे आकाशातील दिवाळी बघण्याची. आकाशामध्ये होणारी ही दिवाळी आपणास अंतर्मुख करीत असते. या आतिषबाजी दिप्ती इतकी असते की संपुर्ण आकाशामध्ये, दृश्य अर्धगोलाकार आकाशामध्ये सर्वत्र हा प्रकाश सोहळा सुरु असतो.
असो. आज आपण आकाशातील चित्तरकथा पाहणार नसुन आकाशातील आतषबाजी कधी होते, कुठे होते याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत.
कवि राम गणेश गडकरींच्या लोकोत्तर प्रतिभेतुन साकारलेल्या एका कवितेमध्ये त्यांनी आकाशातील या दिवाळीचे वर्णन अतिशय भावविभोर शब्दांमध्ये केले आहे. ता-यांची बरसात उघड्या डोळ्यांनी पाहताना आपल्याअ मनाची अवस्था या कवितेच्या ओळींपेक्षा वेगळी होत नाही.
नाचत ना गगनात नाथा
ता-यांची बरसात नाथा ।
आणिक होती माणिक मोती
वरतुनी राजस रात नाथा ।
नाव उलटली नाव हरपली
चंदेरी दरियात नाथा ।
तीही वरची देवाघरची
दौलत लोक पाहात नाथा ।
कविच काय पण जीवन प्रवाहामधील सर्वच स्तरांवरील माणसांना क्षणभर का होईना स्तब्ध आणि अचंबित करणारी घटना म्हणजे आकाशातुन जमिनीवर पडणारा निखळता, तुटता तारा.
आठवतय का तुम्हाला कधी तुम्ही शेवटच्या वेळी असा निखळता तारा पाहिला होता? आणि असा तारा पडताना पाहुन आश्चर्यावेशामध्ये तुम्ही तो तारा सोबतच्या कुणाला तरी दाखवण्यासाठी ओरडलात, पण त्या सोबतच्या माणसांनी पाहण्याआधीच तो तारा लुप्त झाला. हो अगदी असेच होत असते प्रत्येकाच्या बाबतीत.
आकाशातुन जे काही जमिनीवर म्हणजेच पृथ्वीवर किंवा पृथ्वीकडे पडते आहे असे आपणास वाटते, त्यांना उल्का असे म्हंटले जाते. तुम्हाला कधी एखादीच उल्का पडताना दिसते, तर कधी कधी अनेक उल्का पडत असतात. आधुनिक खगोल शास्त्रींनी या उल्का पडण्याच्या घटनांचे नीट अवलोकन केले आहे व त्यावरुन आपल्या पृथ्वीच्या वातावरणात कोणत्या दिवशी, किती वाजता, कोणत्या गोलार्धामध्ये अंदाजे किती उल्का दर तासाला पडतील या विषयी अंदाज वर्तविले आहेत. एखादे वेळी जर अनेक म्हणजे तासाला ३० पेक्षा जास्त उल्का पडण्याचे अनुमान असेल तर या घटनेस उल्का वर्षाव म्हणतात. व अशा घटना वर्षभरात अनेकदा होत राहतात.
महाभारतामध्ये पांडवांच्या स्वर्गारोहनाच्या प्रसंगावेळी युधिष्टीर आणि भीमसेन या दोहोंतील संभाषणामध्ये उल्कावर्षावाचा उल्लेख आलेला आहे. पांडव विरुध्द अश्वथामा युध्दप्रसंगी देखील उल्कापातचा उल्लेख आलेला आहे. सोबतच वेदव्यासांनी लिहिलेल्या शिव-पुराणामध्ये देखील उल्कावर्षाव तसेच उल्कापात होण्याचा उल्लेख आलेला आहे. उल्का पात म्हणजे आकाराने खुप मोठ्या उल्का की ज्या जमिनीवर आदळतात. उल्कापाता मुळे पृथ्वीवर मोठ मोठे खड्डे देखील पडलेले आपण पाहतो. महाराष्ट्रातील लोणार येथील तळे उल्का पातामुळे झालेले एक नैसर्गिक तळे आहे.
तुटणारा तारा पाहत असताना मनातील आपण जी इच्छा करतो ती इच्छा पुर्ण होते असा प्रघात फार पुर्वी पासुन आहे. अगदी ख्रिस्तपुर्व काळापासुन अशाप्रकारचा समज समाजामध्ये, विविध संस्कृत्यांमध्ये रुढ झालेला दिसतो. ग्रीक तत्वज्ञ आणि ज्योतिषी टोलेमीने सांगितल्या प्रमाणे आकाशस्थ देवता ज्यावेळी पृथ्वीशी जोडले जाण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी आकाशामधुन पृथ्वीपर्यंत एक आकाशीय मार्ग तयार होतो. आकाशामध्ये एक पोकळी निर्माण होते व त्यापोकळीतुन देवता पृथ्वीचे संचालन करतात. या पोकळीतुन चुकुन एखादा तारा आला तर तो पोकळीमुळे तुटतो व पृथ्वीकडे झेपावतो. असे तारे तुटताना दिसले की समजावे आकाशातील देवतांचे पृथ्वीशी संबंध अधिक जास्त आहेत. व हेच लक्षण असते की देवता या वेळेत अधिक लक्षपुर्वक पृथ्वीवासीयाकडे पाहतात, त्यांचे ऐकतात व त्यांच्या इच्छा पुर्ण करतात. अर्थात ही केवळ दंतकथा किंवा पुराणकथा आहे. यात काहीही तथ्य नाहीये.
उल्का, उल्का वर्षाव व उल्कापात या तीन ही वेगवेगळ्या गोष्टी असल्या तरी त्यांचे मुळ एकच आहे. उल्कापिंड म्हणजेच उल्का कधी आकाराने अगदी एखाद्या शेंगदाण्याच्या आकाराच्या असु शकतात. इतक्या लहान आकाराच्या उल्का जेव्हा पृथ्वीच्या वातावरणामध्ये, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने खेचल्या जातात तेव्हा त्यांचे वातावरणाशी जोरदार घर्षण होते. या घर्षणाने ती उल्का जळताना दिसते. रात्रीच्या वेळी या जळण्यामुळे आकाशामध्ये अगदी काही निमिषांकरता एक प्रकाशरेषा आपणास दिसते. आणि या रेषेमुळेच आपणास, उघड्या डोळ्यांना समजु शकते की उल्का पडत आहे असे.
काही उल्का आकाराने मोठ्या असतात. त्यामुळे त्या जास्त वेळ पर्यंत जळताना दिसतात व आपण ती प्रकाशरेषा अगदी आकाशात खुप उंच सुरु होऊन जमिनीवर अगदी काही मीटर अंतरापर्यंत उमटलेली पाहु शकतो. अर्थातच या प्रकारच्या उल्का देखील जमिनीपर्यंत पोहोचण्याच्या आधीच जळुन भस्म होतात. पण या जळताना जर आपणास पाहण्याची संधी मिळाली तर या प्रकाशरेषेमध्ये अनेक रंग दिसतात. यालाच फायरबॉल म्हणजे आगीचे गोळे असे म्हणतात. आमच्या कॅम्पसाईटच्या परीसरात, डिसेंबर मध्ये होणा-या उल्का वर्षामध्ये असे अनेक आगीचे गोळे विविध रंग छटांमध्ये पहावयास मिळतात.
उल्का म्हणजे नक्की काय?
प्रगत प्राचीन भारतीयांना कदाचित उल्का म्हणजे काय आहे याविषयी ज्ञान होते. जेव्हा मोठ्या उल्का म्हणजे अशनी पृथ्वीवर आदळतात तेव्हा पृथ्वीवर आकांडतांडव होते. होत्याचे नव्हते होते. अशाच एका मोठ्या उल्कापातामुळेच पृथ्वीवरील डायनासोर या महाकाय प्राण्याचे अस्तित्व कायमचे नष्ट झाले. २०१४ या वर्षी रशियामध्ये उल्कापात झाला. या उल्कापातामध्ये हजारपेक्षा जास्त लोक जखमी झाले. अनेक गाड्या फुटल्या, इमारती पडल्या.
महाभारतामध्ये जेव्हा जेव्हा उल्कापाताचा उल्लेख आला आहे तेव्हा तेव्हा अशाच प्रकारच्या हाहाकारचे वर्णन देखील आले आहे. या विषयाला अनुसरुन प्राचीन भारतीय साहित्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
सतराव्या शतकापर्यंत युरोपीय लोकांना उल्का पडणे म्हणजे अपशकुन वाटायचा. कधीतरी एका अभ्यासकाने सिंह राशीतुन होणारा उल्का वर्षाव पाहिला. व त्यास असे वाटले की सिंह राशीमधुन कुणीतरी असे मोठ मोठे दगड पर्वत पृथ्वीकडे फेकत आहे. जणु कुणीतरी पृथ्व्वीवर हल्लाच केला आहे अशा प्रकारचा गैरसमज नव्हे समज युरोपात अगदी सतराव्या शतकापर्यंत होता. अठराव्या शतकामध्ये शास्त्रज्ञांनी विविध निरीक्षणांच्या आधारे काही निष्कर्ष काढले.
ज्याप्रमाणे आकाशामध्ये सुर्य, ग्रह आणि इतरही तारे आहेत, त्याच प्रमाणे आकाशामध्ये धुमकेतु देखील असतात. हे धुमकेतु इतर आकाशीय पिंडांच्या तुलनेत जास्त गतिमान असतात. धुमकेतुंची फिरण्याची कक्षा लंबवर्तुळाकार असते.
धुमकेतु फिरताना त्याचे मागे असंख्य छोटे छोटे खडे, दगड आणि धुळीचा एक पट्टा तयार होतो. या पट्ट्यास धुमकेतुची शेपटी असे म्हणतात. कधीकधी हे धुमकेतु सुर्याच्या जवळुन जातात. धुमकेतु पुढे निघुन गेल्यानंतर देखील त्याच्या शेपटातील हे खडे म्हणजेच उल्का सुर्याच्या कक्षेत आणि नंतर पृथ्वीच्या कक्षेत ओढले जातात. जोपर्यंत ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेमध्ये येत नाहीत तोपर्यंत त्यांचा आकार आहे तसाच राहतो. एकदा का ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत आले की त्यांची गति पृथ्वीकडे खेचले जाण्याची गति वाढते. जशी गति वाढते तसे पृथ्वीच्या वातावरणाशी घर्षणाने त्यांचा आकार लहान लहान होत जातो. घर्षणामुळे त्या जळतात व आपणास आकाशात निखळणारा तारा दिसतो. असे अनेक तारे दिसले किंवा दिसणार असतील त्यास उल्का वर्षाव म्हणतात.
उल्का वर्षाव पाहण्यासाठी काय तयारी करावी?
उल्का वर्षाव पाहण्यासाठी काही विशेष तयारीची गरज नसते. उघड्या डोळ्यांनी आपण उल्का वर्षाव पाहु शकतो. उल्का काय नुसत्या रात्रीच पडतात असे नाही. दिवसादेखील उल्का पडतात. पण दिवसा सुर्य प्रकाशामुळे आपणास दिसत नाहीत. त्यामुळे रात्री त्यातही चंद्र आकाशामध्ये नसताना, अधिक परिणामकारक पणे आपण उल्का वर्षाव पाहु शकतो. सोबतच गाव, शहरातील प्रकाशप्रदुषणापासुन दुर जाणे देखील गरजेचे आहे. कसल्याही प्रकारच्या प्रकाशप्रदुषणा पासुन दुर उल्कावर्षाव पाहताना अधिक मजेदार अनुभव येईल.
उल्का वर्षाव कधी पाहायचा?
पृथ्वीच्या वातावरणात दररोज निदान अडीच कोटी उल्का घुसत असाव्यात असा अंदाज आहे. उल्कांचा मोठा जमाव पृथ्वी-कक्षेतून जाऊ लागला की उल्कांचा वर्षाव झाल्यासारखे वाटते. पृथ्वीची कक्षा आणि उल्कांची कक्षा निश्चित आहेत. त्यामुळे आकाशातील ठरावीक विभागात, ठरावीक काळात उल्कावर्षाव होतात. ज्या नक्षत्रातून उल्कावर्षाव झाल्यासारखे वाटते त्या नक्षत्राला त्या उल्कावर्षावाचे उगमस्थान असे म्हणतात. पृथ्वीवर मोठ्या आकारमानात पडणाऱ्या उल्केला उल्कापात म्हणतात.
- ययाती(Pereus) नक्षत्रातून होणाऱ्या उल्का वर्षावाला Perseids (पर्सीड्ज) म्हणतात. दरवर्षी ऑगस्ट महिन्यातील १ ते २० तारखांमध्ये हे वर्षाव होतात. जोराचा वर्षाव १२ ऑगस्टला होतो.
- सिंह राशीतून होणाऱ्या उल्का वर्षावाला लिओनिड्ज(Leonids) म्हणतात. काळ दरवर्षी ११ ते २० नोव्हेंबर. जोराचा वर्षाव १२ तारखेचा.
- स्वरमंडळ (Lyra) तारकापुंजातून होणाऱ्या उल्का वर्षावाला लिरिड्ज(Lyrids) म्हणतात. दरवर्षी १६ एप्रिल ते २६ एप्रिल काळात हे उत्-स्वरंडळ उल्कावर्षाव होतात. यांचा जोर २१-२२ एप्रिलच्या रात्री असतो.
- देवयानीतून (Andromeda) होणाऱ्या उल्कावर्षावाला ॲन्ड्रोमीडस (Andromedus) म्हणतात. काळ दरवर्षी २४ ते २७नोव्हेंबर.
- मिथुन (Gemini) राशीमधून होंणाऱ्या उल्कावर्षावाला जेमिनिड्ज म्हणतात. काळ दरवर्षी ९ ते१४ डिसेंबर, कमाल वर्षाव १३ तारखेला मध्यरात्री.
- मेष (Aries) राशीतून होणाऱ्या उल्कावर्षावाला एरिड्ज म्हणतात. कालमर्यादा दरसाल ३० मे ते १४ जून. महत्तम ७ जूनला.
- डेल्टा ॲक्वेरी या ताऱ्याच्या जवळून होणारा उल्कावर्षाव : Delta Acqarids
उल्का वर्षाव पाहण्याचा अनुभव कसा असतो?
मागील वर्षी आम्ही पाहिलेला उल्का वर्षाव कसा होता, आमचा अनुभव कसा होता हे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
धन्यवाद.
हेमंत सिताराम ववले
निसर्गशाळा, पुणे

Shooting stars- १३ डिसेंबर
Register for this unique phenomenon, in which we will be watching a once in lifetime wonder of this vast Universe. Watching 100s of shooting stars falling from the sky, at an absolutely dark vicinity is a great experience. Date - 13 Dec 2020 - Time 6pm to 9am(14th Dec 2020)
Share this if you like it..
खूप उपयोगी माहीती मिळाली.
khup chhan
खुपच छान