…चला आपण सह्याद्री होऊयात!

आपल्या सह्याद्रीची ओळख म्हणजे त्याचे बेलाग सुळके, अतिखोल द-या ,श्वास रोखायला लावणारे कातळ कडे. सह्याद्रीची ओळख म्हणजे सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर उभारलेले, गगनचुंबी अभेद्य गडकोट. सह्याद्रीची ओळख म्हणजे इथली हजारो वर्षांची महान संस्कृती. सह्याद्री ची ओळख म्हणजे याच संस्कृतीतुन जन्माला आलेले एक लोकोत्तर नर-रत्न – छत्रपती शिवाजी. सह्याद्री ची ओळख म्हणजे शिवाजी राज्यांच्या सोबत, कधी कधी त्यांच्याही पुढे जाऊन, प्राणांची बाजी लावणारे सह्याद्रीचे लाखो करोडो सुपुत्र म्हणजे मावळे. सह्याद्रीची ओळख म्हणजे त्याच्या अंगाखांद्यावर उगम पावुन, पुर्व दिशेचा लाखो-करोडो हेक्टरचा प्रदेश सुपीक करणा-या नद्या. सह्याद्रीची ओळख म्हणजे कातळ कड्यांवरुन बेधुंद होऊन, खोलवर द-यांमध्ये उड्या घेणारे, स्वतःला झोकुन देणारे हजारो धबधबे. सह्याद्रीची ओळख म्हणजे इथला मोसमी, बहारदार पाऊस. सह्याद्रीची ओळख म्हणजे…

https://youtu.be/7uPBKxODeh0

सह्याद्रीची ओळख नव्याने माझ्या सारख्या भटक्याला अगदी रोज होत असते. जेव्हा जेव्हा मी निसर्गात, सह्याद्रीच्या राकट प्रांगणात जातो तेव्हा तेव्हा, मला सह्याद्री नव्याने ओळख होत असते. सह्याद्री नित्य-नुतन जरी मला वाटत असला तरीही, मित्रानो माहितीये का तुम्हाला की सह्याद्री जगातील सर्वात वयोवृध्द डोंगररांगांमधील एक आहे. सुमारे १५ करोड वर्षांचा आहे बरका आपला लाडका सह्याद्री. म्हणजे १५ करोड वर्षांपुर्वी सह्याद्री (दख्खन पठारासहीत) आशिया खंडाशी जोडला गेला. त्यापुर्वी म्हणजे अंदाजे ४० करोड वर्षांपुर्वी पृथ्वीवर एकच भुखंड होता. मागील शतकातील एक भु-शास्त्रज्ञ आल्फ्रेड वेगेनेर यांनी त्यांचे सगळे आयुष्य खंडांतराच्या (खंडांतर हा मी योजलेला शब्द आहे याला इंग्रजी मध्ये Continent Drifting असे म्हणतात) अभ्यासासाठी वेचले. वेगेनेर यांनी पृथ्वीवरील सर्वात जुन्या, एकमेव असलेल्या भुखंडाला पॅंजेया/पॅंगईया म्हणजे संपुर्ण पृथ्वी असे नाव दिले. साधारण पणे ४५० करोड वर्षापुर्वी, अंतरिक्षामधील धुळ, वायु व इतर अंतरीक्षीय घटकांमुळे पृथ्वीची निर्मिती झाली. त्याच दरम्यान सुपरनोव्हा म्हणजे महाभयंकर विस्फोटामुळे, पृथ्वीचे तापमान वाढुन, धुळीने तयार झालेला तो गोळा वितळला. त्यालाच आपण ज्वालामुखी म्हणतो. हा ज्वालामुखीच जसजसा प्रवाही झाल त पासुन प्रत्यक्ष खडक, पर्वत, डोंगर तयार झाले तेव्हा पृथ्वीवर एकच भुखंड तयार झाला. एकच असलेला हा भुखंड काही काळाने तुटला व अनेक छोटे-मोठे भुखंड वेगवेगळे होऊन पृथ्वीवर विखुरले गेले. खरतर हा खुप मोठा विषय आहे. याविषयी आपण कधीतरी पुन्हा सविस्तर माहिती घेऊ .

खालील व्हिडीयो पहा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल, सह्याद्री व हिमालय कसा अस्तित्वात आला. वर मी सह्याद्रीस वयोवृध्द म्हणालो याचे कारण असे की, हिमालय पर्वत रांग की जगातील सर्वात उंच पर्वतरांग आहे, ती भारतीय उपखंडाची व आशिया खंडाची धडक झाल्यानंतर अस्तित्वात आली आहे. हिमालयाचा जन्म त्या मानाने खुप अलीकडचा आहे. म्हणुनच सह्याद्रीस मी वयोवृध्द डोंगर असे म्हणतो.

सह्याद्रीच्या पुरातन असण्याच्या खाणाखुणा आपणास सह्याद्रीच्या कातळाकड्यांकडे पाहुन दिसतात. नुकताच मी, साल्हेर सालोटा या गडांना भेट देऊन आलो. यातील सालोटाचे कातळ कडे तुटण्याच्या मार्गावर आहेत. एखादा हलका भुकंप देखील सालोट्याचा भुगोल बदलुन टाकेल. अशीच काहीशी अवस्था आपणास सह्याद्री उत्तुंग सुळक्यांची झालेली दिसते.

 

आपल्या मुळशी वेल्हे तालुक्याचा पश्चिम भाग म्हणजेच मावळ भाग हा सह्याद्रीचाच भाग होय. मुळशीतील ताम्हिणी म्हणजे हंगामी पावसासाठी भारतातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण आहे. तशीच अवस्था  भोर – वेल्ह्यातील मावळ पट्ट्याची आहे. कित्येक ठिकाणी पर्जन्यमापकाची उपलब्धता नसल्याने वास्तविक पर्जन्यमान कुठे किती होते याची माहिती मिळत नाही. पण मावळ पट्ट्यात तीन-तीन चार महिने सुर्यनारायणाचे दर्शन होत नाही.

https://www.facebook.com/MulshiTehsil/videos/2482329861830460/

काहीशे वर्षांपुर्वीपर्यंत इथे वर्षावने होती. ही जंगले इतकी घनदाट होती की उन्हाळ्यामध्ये देखील सुर्यकिरणे जमिनीवर पडत नसत. किर्र्र झाडी, महाकाय वृक्ष, तितक्याच मोठाल्या, जाडजुड, पुरातन वेली हे सारे सह्याद्रीला एका विशिष्ट ऊंचीवर नेऊन ठेवते. सह्याद्रीतील किल्ले हे जितके उत्सुकतेचा विषय आहे तितके जास्त कुतुहलाचा विषय आहे सह्याद्रीतील वनसंपदा. या वनसंपदेमध्ये, दरी-खो-यात, नद्या-नाल्यांत, कातळ-कड्यांवर, धबधब्यांवर, मोकळ्या माळरानांवर एक आख्खी सजीवसृष्टी गेली लाखो वर्षे जगत आहे, हे आपणास ठाऊक आहे काय? नाचणारा बेडुक नावाची एक बेडकाची प्रजाती आहे, ही प्रजाती किमान सात लक्ष वर्षांपासुन सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर नांदते आहे. सरीसृप, उभयचर, जलचर अशा अनेक प्रजाती इथे लक्ष-लक्ष वर्षांपासुन नांदत आहेत. मनुष्यास या सर्वांविषयी जेवढे ज्ञान आहे त्याच्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त ज्ञान आपण अजुन मिळवायचो आहोत. आपण अनभिज्ञ आहोत.

भारताच्या एकुणच हवामानावर परिणाम करणारा मॉन्सुन म्हणजे मोसमी पाऊस भारतात पडतो याचे कारण फक्त आणि फक्त सह्याद्री आहे. एकेकाळी सजीव सृष्टीसाठी नंदनवन असणारा सह्याद्री वर्तमानात सजीवांसाठी शाप ठरत आहे. सजीव म्हणताना मी यांत मनुष्यास देखील मोजले आहे. आज भलेही अज्ञान, दुर्लक्ष इत्यादी कारणामुळे मनुष्यास वाटत असेल की तो सुरक्षित आहे, पण वस्तुस्थिती तशी नाहीये. व याचे संकेत युनेस्को द्वारे काही वर्षांपुर्वी दिले गेले आहेत. जगातील आठ जागतिक वारसा असलेल्या स्थळांच्या यादीमध्ये सह्याद्रीला स्थान देण्यात आले आहे.

सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर कित्येक सजीव नांदताहेत मित्रहो. फुले येणा-या वृक्ष-वनस्पतींच्या एकुण ७४०२ प्रजाती सह्याद्रीमध्ये आहेत. फुले न येणा-या वनस्पतींच्या अंदाजे १८०० प्रजाती आहेत.सस्तन प्राण्यांच्या १३९ प्रजाती आहेत. पक्षांच्या ५०८ प्रजाती आहेत. १७९ उभयचर, ६००० किटकांच्या प्रजाती, २९० गोड्यापाण्यातील माश्यांच्या प्रजाती आहेत. इथल्या जंगलांची आणखी एक खासियत अशी आहे की, ही जंगले सदाहरीत आहेत. झाडा-झुडूपांच्या इतक्या प्रजाती आहेत की काही झाडांची पाने जरी काही काळापुरती गळली तरी एकुण जंगल मात्र हिरवेगारच दिसते. तुम्हाला हे पहायचे असेल तर याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात केलेल्या कोकण दिवा या ट्रेकचा व्हिडीयो अवश्य पहा.

सह्याद्री आणि मॉन्सुन चे जसे नाते आहे तसेच नाते सह्याद्री व दुर्मिळ होत असलेल्या प्रदेशनिष्ट (Endemic) प्रजातींचे आहे. जागतिक दृष्टीने पाहिले तर नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातीपैकी ३२५ प्रजाती सह्याद्रीमधील आहेत. ही अत्यंत दुखःद गोष्ट आहे. या ३२५ प्रजातींमध्ये २२९ प्रजाती वृक्ष-वनस्पतींच्या, ३१ प्रजाती सस्तन प्राण्यांच्या, १५ पक्ष्यांच्या, ४३ उभयचर, ५ सरपटणारे व एक मासा आहे. यापैकी ५१ प्रजाती कदाचित त्यांच्या अखेरच्या काही पिढ्यांमध्ये आहेत.

निसर्गाशी मानवी नाते, काहीशे वर्षांपुर्वीपर्यंत तरी सौहार्दाचेच होते असे मी म्हणु शकतो. याचे कारण असे की, मावळ भागातील काही लोकरिती मनुष्य व निसर्ग यातील सौहार्द दाखवणा-या आपणास पहावयास मिळतात. उदा – जेव्हा जुन जुलै मध्ये पावसाला सुरुवात होते, तेव्हा मोठ्या नद्या, धरणांतील मासे अंडी सोडण्याकरीता, नदीच्या उगमस्थानाकडे पोहण्यास सुरुवात करतात. नदीच्या प्रवाहाच्या उलट दिशेने ते पोहतात. हजारो वर्षे मावळात राहणा-या मावळ्यांना, माश्यांच्या या प्रवासाविषयी माहिती अगदी पुर्वापार आहे. असे उलट दिशेने पोहणारे मासे पकडणे व खाणे खुपच सोपे काम आहे. तरीही मावळातील मंडळी, अंडी सोडण्यासाठी प्रवाहाच्या उलट दिशेने जाणारे मासे पकडत नाहीत व खात ही नाहीत. हेच मासे जेव्हा, अंडी सोडतात व पुनः प्रवाहासोबत पोहण्यास सुरुवात करतात तेव्हा, विशिष्ट पध्दतीचे बांबु व लाकडी जाळे तयार करुन मासे पकडले जातात.  विशिष्ट पध्दत अशासाठी म्हणायचे की, जाळ्यातील एकेका अटकावाचा आकार एवढा असतो की यात विशिष्ट वयाचाच, विशिष्ट आकाराचाच मास अडकेल. व लहान मासे, की जे अजुन पुर्ण वाढलेले नाहीत ते पुन्हा नदी-धरणात जातात. म्हणजे नैसर्गिक प्रजनन प्रक्रियेवर फारसा परिणाम न करताही मावळातील सुज्ञ लोक मांसाहार करीत होते. आजही अशा पध्दती आपणास पहावयास मिळतात. हे नाते देखील, वाढत्या शहरीकरणामुळे , दुर्मिळ होत चाललेल्या प्रजातींसारखेच, नष्ट होण्याचा मार्गावर आहे. व हेच खरे कारण आहे, सह्याद्रीच्या होत असलेल्या –हासाचे. असो.

मासे पकडण्यासठी वापरण्यात येणार विशेष जाळ यास बांधण म्हणतात

मासे पकडण्यासठी वापरण्यात येणार विशेष जाळ यास बांधण म्हणतात

पुणेकर मंडळी विशेषतः मुळशीकर, वेल्हेकर खरतर खुपच भाग्यवान लोक म्हणावे यांना. कारण त्यांना सह्याद्रीमध्ये वास्तव्य करण्याचे भाग्य लाभले. सह्याद्रीच्या पानापानांत, कणाकणांत सृष्टीच्या गुढतेचे गुंजन स्वर सदैव सुरु आहेत, आपणच कधी कान लावुन ते ऐकत नाही.

सह्याद्रीला आपल्या कुबड्यांची गरज नाहीये संवर्धनासाठी.आपण सह्याद्री वाचवणारे ते कोण? यकश्चित क्षुद्र मनुष्यमात्र आपण, आणि सह्याद्री पहा किती अवाढव्य, दयाळु, दाता, आश्रय आहे की ज्याच्या अंगाखांद्यावर आपण, आपले पुर्वज हजारो वर्षांपासुन खेळले, बागडले, नांदले, विस्तारले. सह्याद्रीनेच आपल्या शेकडो पिढ्यांना सांभाळले आहे.

चला तर मावळ्यांनो, आपण आपल्या मायबाप सह्याद्रीला उपद्रव करणे थांबवुयात.

आमचा हा लेख तुम्हाला आवडला असेल तर अवश्य शेयर,फॉरवर्ड करा.

आपला

हेमंत सिताराम ववले

निसर्गशाळा, पुणे.

Facebook Comments

Share this if you like it..