मागील भागात आपण पृथ्वी तसेच आपल्या सह्याद्रीच्या जन्माची माहिती घेतली. आपण हे जाणुन घेतले की ही पृथ्वी निर्जीव नसुन एक महाकाय सजीव आहे. यास इंग्रजीत सुपर ऑर्गॅनिझम म्हणता येईल.

मागील भागात एका वाक्यामध्ये आपण हिमालय अपवाद असे म्हंटले होते. हिमालय अपवाद कशासाठी आहे बरे? आठवत नसेल किंवा अद्याप पहिला भाग वाचला नसेल तुम्ही तर इथे क्लिक करुन अवश्य़ वाचा.

मागील काही दिवसांत आपण उत्तर भारतातील पुरजन्य स्थितीच्या अनेक बातम्या पाहिल्या, वाचल्या. एकुण सतरा राज्ये या पुराने प्रभावित झाली. आपणा सर्वांना बातम्यांमधील काही दृश्ये पाहुन नक्की असेच वाटले असेल की या प्रकृतीपुढे मानवी इच्छा आकांक्षा विकास सर्व काही झुठ आहे. अगदी खेळण्याच्या पत्त्यातील घरे पडावीत वाहुन जावीत तशी माणसांनी घरे नद्यांच्या पुराच्या प्रलयंकारी प्रवाहात वाहुन गेली. रस्तेच्या रस्ते वाहुन गेले. अवघ्या काही तासांतच होत्याच नव्हतं झालं. एखाद्या कुटूंबाने पिढ्या दर पिढ्या घेतलेल्या मेहनतीने, कष्टातुन कमावलेल्या पैशातुन उभी केलेली स्थावर मालमत्ता एका दिवसात नाहीशी झाली. मागील वर्षी जोशीमठ या ठिकाणी देखील अशीच स्थिती निर्माण झाली होती, नव्हे यापेक्षा मागील वर्षीची घटना खुपच जास्त भयावह होती. हिमालय अशा घटनांमधुन काही इशारा तर देत नाही ना? दरडी कोसळणं हिमालयात सातत्याने सुरु आहे. नदी नाल्याम्च्या काठावरील इमारती कागदाच्या वाटाव्यात अशा वाहुन जाताहेत..हिमालयात हे नित्याचेच झाले आहे. काय असेल कारण याचे?

महाराष्ट्राची वीस जुलै ची सकाळ देखील अशीच एक तीव्र वेदनादायी बातमी घेऊन उजाडली. एक अख्खं गाव, चाळीसेक घरांचे एक गाव, दोनेकशे लोकांची वस्ती असलेले एक गाव, आपापल्या घरात रात्रीच्या झो[एत असलेले एक गाव अचानक एका डोंगराखाली दडपले गेले. माळीण पेक्षा या घटनेची तीव्रता जरी कमी असली तरी भौगोलिक दृष्ट्या दोन्ही घटना सारख्याच आहेत. पुर्वी तळीये, रायगडवाडी या दुर्घटना देखील वेदनादायी होत्या.  दरड कोसळणे या क्रियापदाने या घटनांची तीव्रता लक्षात येणार नाही. डोंगर कोसळणे असा शब्द प्रयोग आता आपणास करावा लागेल. या घटनांमध्ये अजुन एक साम्य आहे ते म्हणजे डोंगर कोसळताना मातीचे प्रचंड मोठे ढिगारे उताराच्या दिशेने खाली घसरले व शतकांच वारसा असलेल्या वाड्या वस्त्या उध्वस्त झाल्या. मनुष्यहानी झाली. अनेक कुटूंबांचे आधार संपले, जीवाभावाची नाती संपली.

हिमालय आणि सह्याद्रीमध्ये घडणा-या दुर्घटना काय सारख्याच आहेत? दोन्हींची कारणे तीच आहेत असे आपणास प्रथमदर्शनी वाटु शकते. दरडी कोसळल्यानेच अश्या घटना घडतात. हिमालयातील भुस्सखल आणि सह्याद्रीतील भुस्सखल यातील मुळ कारणांत खुप मोठा फरक आहे. तो आपण समजुन घेतला पाहिजे.

वर ज्या अपवादाचा उल्लेख केला त्या अपवादाकडे आता आपण वळुयात पुन्हा. हिमालयाची निर्मिती कधी आणि कशी झाली असावी? साधारण वीस करोड वर्षांपुर्वी गोंडवन म्हणजेच पॅंजिया या महाभुखंडाचे विभाजन होऊन एकेक खंड इतस्तत हळुवार दुरदुर सरकत गेले, काही अधिक गतीने तर काही कमी गतीने. हे विभाजन वीस कोटी वर्षांपुर्वी सुरु झाल असल तरी ते अजुनही सुरुच आहे. या प्रक्रियेमध्ये भारतीय उपखंड आशिया खंडाला येऊन चिकटला, नव्हे नव्हे धडकला. धडकण्याच्या या क्रियेतुन हिमालयाची निर्मिती झाली. आता यातील अजुन एक बाब आपण विसरता कामा नये ती म्हणजे ही धडकण्याची प्रक्रिया संपलेली, थांबलेली अजिबात नाहीये. हे धडकणे, सरकणे अजुनही सुरु आहेच. प्रतिवर्षी आठ ते नऊ इंच इतके हे सरकणे सुरु आहे. तांत्रिक भाषेत यास टॅक्टोनिक प्लेट्सचे सरकणे असे म्हणतात. आशिया खंडाची प्लेट आणि भारतीय उपखंडाची प्लेट एकमेकांस अजुनही धडकत आहेत, सरकत आहेत. याचाच परिणाम हिमालयाची उंची अजुनही वाढत आहे. गेल्या साडेपाच कोटी वर्षांपुर्वी हिमालय बनण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे आणि ती अजुनही सुरुच आहे. एका अर्थाने हिमालयाचे वय साडेपाच कोटी वर्षे आहे असे आपण म्हणुन शकतो. निसर्गशाळा येथे जर कधी हा विषय निघाला तर मी आवर्जुन हिमालयास सर्वात तरुण पर्वत म्हणतो. तरुण आहे म्हणुनच हिमालय अजुनही अस्थिर आहे. इंग्रतीत यासाठी एक खास शब्द आहे तो म्हणजे व्ह्ल्नरेबल. भुगर्भीय हालचाली अजुनही हिमालयात सुरुच आहेत. हिमालयातील डोंगररांगा, पठारे अजुनही बनताहेत, आकार घेताहेत. आज जे रुप, आकार असेल उद्या कदाचित त्यापेक्षा काहीतरी वेगळा असेल. पर्वताच्या स्थिरीकरणाची ही प्रक्रिया अजुन संपलेली नाहीये. पर्वताची ही स्थिती समजुन न घेताच आपण हिमालयात विकास कामे सुरु केली. पर्यटन उद्योगाला चालना मिळावी म्हणुन रस्ते वीज सुविधा वाढवल्या. सेकंड होम, हॉलिडे होम च्या नावाखाली बेसुमार कॉंक्रिटीकरण हिमालयाच्या त्याच्य अस्थिर अंगाखांद्यावर सुरु झाले. परिणामी हिमालयाने थोडी जरी हालचाला केली की आपल्या या इमारती क्षणात ढासळतात. हिमालय हालचाल का करील? कारण तो अजुनही वाढतच आहे. म्हणुन हालचाल होणारच. उन्नत होत राहणारच आणि अविचाराने आपण उभे केलेले इमले असे ढासळत राहणारच.

मग सह्याद्रीचे काय?

हिमालयाच्या अगदी विपरीत स्थिती आहे सह्याद्रीची. सह्याद्री प्राचीनत्व किमान वीस कोटी ते साडेचारशे कोटी वर्षांपर्यंत माहे जाते. सह्याद्री नुसताच स्थिरावलेला पर्वत नाही तर आता तो उतारवयात आहे. सह्याद्री एक वृध्द पर्वत आहे. याचाच अर्थ सह्याद्री पुढील काही कोटी वर्षांमध्ये उन्नत नाही तर अवनत होणार आहे. सह्याद्रीचे निर्माण होणे आणि पुनश्चः धुळ माती, अणुरेणु मध्ये परिवर्तित होणे महान नैसर्गिक योजनेचा भाग आहे, त्याला आपण बदलु शकणार नाही. आपण मात्र आपल्या वर्तनाने सह्याद्रीचा विनाशाची क्रिया अजुन गतीमान करीत आहोत सध्या. हिमालयात जसा अविचार सुरु आहे अगदी तसाच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त अविचार आपण सह्याद्रीत करीत आहोत. सह्याद्रीला आतातरी आपण समजुन घेतले पाहिजे. पिढ्यानपिढ्या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर वस्ती केलेल्या आदीवासी वनवासी बांधवांना वेळीच सुरक्षित स्थळी पुनर्वसित केलं पाहिजे. सह्याद्रीच्या उबदार कुशीतुन दुर राहणं औघड जरी असलं तरी हे करणं आता अगत्याचं आहे.

सह्याद्रीच्या अतीसंवेदनशील भागाला संरक्षित घोषित केलं पाहिजे, इथला भुगोल त्याच्या निहित वेळेपुर्वीच बदलु नये म्हणुन प्रयत्न केले पाहिजेत. या प्रयत्नांत विशेष काही करण्याची खरतर गरज नाहीये. सह्याद्रीला वाचवण्यासाठी काही करु इतके आपण मोठे नक्कीच नाही. पण आपण सध्या करीत असलेला हस्तक्षेप नक्कीच बंद करु शकतो. सह्याद्रीचे लचके तोडणं थांबवललं पाहिजे. फार्म हाऊस प्लॉटींगच्या नावाखाली सर्रास सह्याद्रीला रक्तबंबाळ केलं जातय. रस्ते बनवण्यासाठी खुप मोठ्या प्रमाणात डोंगर खणती लावली जातं आहे.रिसॉर्ट्स बांधण्यासाठी बेसुमार सपाटीकरण सुरु आहे. सरकारी धोरणं, नियमावली आहेत पण त्या नियमांची अंमलबजावणी ज्यांनी केली पाहिजे त्याच कायद्याच्या अमंलदारांच्या आशीर्वादाने सह्याद्रीचे लचके तोडले जात आहेत. झाडुन सगळे कारकुन कोतवाल तलाठ्यापासुन ते तहसीलदार, जिल्हाधिकारी, आमदार खासदार मंत्री संत्री सगळेच या सह्याद्रीचा वेळेपुर्वीच बळी देण्याच्या महापापात सहभागी आहेत.

पृथ्वी निर्जीव नाहीये आणि ही सह्याद्री देखील निर्जीव डोंगर नाहिये. सह्याद्रीच्या मातीचा प्रत्येक कण तयार व्हायला करोडो वर्षे लागली आहेत. जेसीबी सारख्या यांत्रिकी राक्षसांचा वापर सह्याद्रीच्या मुख्य घाटमाथ्यावर हल्ली अगदी नित्याचा झालेला आहे. घाटमाथ्यावर या दानवांच्या वावरावर कायमची बंदी घातली पाहिजे. वणवे थांबवले पाहिजेत. मातीची धुप थांबवली पाहिजे. स्थानिक झाडझुडप वेली निर्बंधपणे वाढु दिले पाहिजेत. आपल्या असण्याचे कारण सह्याद्री आहे. सह्याद्री नसेल तर इथे पाऊस नसेल, नद्या नसतील, आपली धरणे नसतील, नदी काठांवरील आपली तीर्थक्षेत्रे नसतील, छोटी छोटी गावे नसतील, नगरे, शहरे नसतील. काहीही नसेल.  त्यामुळे सह्याद्रीचा घाटमाथा जतन करणे मनुष्यासाठी महत्वाचे, गरजेचे आहे. मनुष्याला सह्याद्रीची गरज आहे, सह्याद्रीला मनुष्याची अज्याबात गरज नाही. सह्याद्री समृध्द झाला तर मनुष्य समृध्द होईल, सह्याद्रीचे पतन झाले तर मनुष्याचे पतन नक्की आहे.

चला मित्रांनो आपण सर्वांनी मिळून एक संकल्प करुयात, सह्याद्री ला समजुन घेऊयात, सह्याद्रील उमजुन घेऊयात.


Facebook Comments

Share this if you like it..

Categories:

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हुप्प्या – The Symphony of Emotions
A Team outing with a difference @ Nisargshala
Blog posts & Event Alerts

Recent Articles
 • In Astronomy, STar gazing
  निसर्गशाळा येथे दहा इंच व्यासाचा मुख्य आरसा असलेली दुर्बीण आहे. यातुन आपण गुरुचे उपग्रह पाहु शकतो, गुरु ग्रहावरील वादळ पाहु शकतो, अनेक दुरस्थ तारे, तारकापुंज पाहु शकतो, चंद्र तर इतका सुंदर आणि स्पष्ट दिसतो की त्यावरील खड्डे नसुन महाकाय विवरं आहेत, दया आहेत, त्यांना खोल असे कडे आहेत. एकदा आपल्याकडे एक खगोल निरीक्षक त्यांची १६ इंच व्यासाची दुर्बीण घेऊन आले होते , त्यातुन त्यांनी मला चंद्रावरील अश्याच एका विवराचा कडा दाखवला. हा कडा पाहताना मला हरिश्चंद्र गडावरील कोकणकडा आठवला. लौकरच आपण म्हणजे निसर्गशाळा बारा इंच व्यास असलेली अजुन प्रगत अशी दुर्बीण घेणार आहोत. […]
 • In Environment
  महाराष्ट्राची वीस जुलै ची सकाळ देखील अशीच एक तीव्र वेदनादायी बातमी घेऊन उजाडली. एक अख्खं गाव, चाळीसेक घरांचे एक गाव, दोनेकशे लोकांची वस्ती असलेले एक गाव, आपापल्या घरात रात्रीच्या झो[एत असलेले एक गाव अचानक एका डोंगराखाली दडपले गेले. माळीण पेक्षा या घटनेची तीव्रता जरी कमी असली तरी भौगोलिक दृष्ट्या दोन्ही घटना सारख्याच आहेत. पुर्वी तळीये, रायगडवाडी या दुर्घटना देखील वेदनादायी होत्या. दरड कोसळणे या क्रियापदाने या घटनांची तीव्रता लक्षात येणार नाही. डोंगर कोसळणे असा शब्द प्रयोग आता आपणास करावा लागेल. या घटनांमध्ये अजुन एक साम्य आहे ते म्हणजे डोंगर कोसळताना मातीचे प्रचंड मोठे ढिगारे उताराच्या दिशेने खाली घसरले व शतकांच वारसा असलेल्या वाड्या वस्त्या उध्वस्त झाल्या. मनुष्यहानी झाली. अनेक कुटूंबांचे आधार संपले, जीवाभावाची नाती संपली. […]
 • In Environment
  म्हणजेच काय तर आपला भारत आणी भारतातील प्रत्येक पर्वत (हिमालय अपवाद) तितकाच जुना आहे जितके पृथ्वीचे वय आहे. येथील मातीचा कण न कण असा का झाला याचे कारण या मातीने इतक्या करोडो वर्षाम्च्या अनुभवातुन हे शिकले आहे की या सुर्यमंडलात, या अवकाशात तग धरायची असेल तर त्यासाठी कसे स्वतःमध्ये बदल केले पाहिजेत. […]
 • In Environment
  पर्यावरण हा शब्द आपल्या कानी पडला की काही जण थोडं थबकतात, काही जणांच्या भुवया थोड्या उंचवतात, काही जणांचे कान अजुन जास्त सतर्क होतात तर काही जणांना काहीही समजतच नाही काय ऐकलं ते म्हणजे नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे असे काही जणांच्या बाबतीत घडत असते. […]
 • In Music, Tourism
  मग सुरु झाली संगीत रजनी. गायत्री सप्रे-ढवळे आणि कुमार करंदीकर यांनी रसिक श्रोत्यांना एका वेगळ्याच विश्वात , स्वर्गीय सुखाची रेलचेल असणा-या चंद्रमाधवीच्या प्रदेशात नेण्याचा जणु चंगच बांधला होता जणु. हा प्रवास, चंद्रमाधवीच्या प्रदेशाकडे जाण्याचा हा प्रवास संगीत सुरांचाच नुसता नव्हता बर का ! […]