काट्या-कुट्यांची शाळा; निसर्गाची शाळा !

शनिवारची सकाळ शाळा असायची व शाळेतुन घरी आले की गाय व तिची दोन वासरांना घेऊन रानांत त्यांना चारावयास नेणे हा माझ्यासाठी एक सक्तीचा कार्यक्रम होता. शनिवारी अर्धा दिवस सुट्टी असुन ही कधी त्या सुट्टीची मजा घेता येत नसायची. आणि मजा म्हणजे काय तर टिव्ही पाहणे किंवा पोरांसोरांसोबत गावभर हिंडणे. आम्ही जास्त वेळ टीव्ही पाहिलेले माझ्या वडीलांना अजिबात आवडत नसे. आणि आम्ही गाव कोळपणे आईला आवडत नसे. यातुन मुलांना वाचवण्यासाठी कदाचित एक सोपा मार्ग म्हणुनच की काय त्यांनी घरी गाय आणुन बांधली. नव्याचे नऊ दिवस प्रमाणे आम्ही खुप आवडीने सगळे करायचो. पण हळु हळु समजायला लागले की आमचा टिव्ही पाहण्याचा कार्यक्रमच गायीने खाऊन टाकला आहे. आणि “ मुलगा ” म्हणुन हे काम मलाच करावे लागायचे.

कधी कधी रानात, गाय वळताना सोबतीला दुसरे कुणी गुराखी नसले तर फारच एकटे एकटे वाटायचे. वय लहान आणि गर्द रान चहुकडे. त्यात आमची गाय तर अगदीच भन्नाट. तिच्या गळ्यात भला मोठा लोढणा असुन देखील ती दिवसातुन एकदा तरी शेपुट वर करुन उधळायची. कधी डोंगराकडे जायची, कधी एखाद्याच्या शेतात जायची तर कधी नदीच्या दिशेलाच पळायची. एकदा का उधळली तर तिला तिच्या वासरांचे देखील भान नसायचे. खिल्लार जातीची बारमाशी गाय होती आमची. असेच एकदा त्या उधळलेल्या गाईचा पाठलाग करताना, मी डोक्यापेक्षा जास्त उंच गवतामध्ये घुसलो. गवत एवढे उंच वाढलेले असल्याने समोरचे काहीच दिसत नव्हते. त्या गवताची पाती देखील धारधार होती. गाईच्या घुंगरांचा आवाज अगदी १०-१५ फुटांवर येत होता. त्या गवताच्या रानाच्या आणखी थोडे पुढे एका शेतक-याची झेम्डुची शेती होती. गाय जर त्या शेतात गेली तर बेकार शिव्या खाव्या लागतील आणि उगाच घरी भांडणे येतील अशा भीतीने मी एकच लक्ष्य डोळ्यासमोर ठेवुन झपाझप पाय उचलत होतो. त्या काळी पायात घालायला बुट वगेरे असले नखरे नसायचे. पायात एक साधी चप्पल होती. स्लिपर म्हणायचो आम्ही तसल्या चपलेला. खालुन निळ्या व वरुन पांढ-या रंगाचे सोल व व निळ्याच रंगाचे बंद. त्यातही डाव्या पायाचा बंद, सोलच्या भोकातुन निसटुन कधी बाहेर याची खात्री नव्हती कारण तो बंद खालच्या बाजुने झिजला होता. त्यामुळे झपाझप पाय टाकताना सुध्दा स्लीपरचा बंद निघणार नाही याची काळजी घ्यायची होती.  अशा पध्दतीने, कधीही निसटु शकणारी स्लीपर पावसाळ्यात पायात घालुन गुरे वळणे हे एक कसबच होते. व आपोआपच ते माझ्या सारख्या अनेकांनी आत्मसात केले होते.

आता गायीच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज अगदी जवळ जवळ येत होता. पाच दहा पावले चाललो की गायीचा कासरा हाताला लागेल. मग मी तिला पकडेल, कदाचित एखाद दोन फटके देखील देईल पाठीत. सगळा राग काढेल. आणि ओढत ओढत सरळ घरी घेऊन जाऊन बाबुजींना मस्तपैकी या बेदररकार गाईची तक्रार करुन, गाय विकणे किंवा पुन्हा मामाला देऊन टाकणे कसे योग्य आहे हे समजावुन सांगेन अशा सगळ्या थिअ-या मी मनातमनात बनवत असतानाच,  मला माझ्या डाव्या पायाला काही तरी जबरद्स्त टोचले. वीज चमकावी तशी वेदनेची लहर माझ्या तळपायापासुन, माझ्या मेंदु पर्यंत गेली. वाढलेल्या गवतामुळे मला नेमके समजले नाही काय होत आहे ते. पण पाय जागचा हलवणे देखील अवघड झाले क्षणार्धात.

माझी गाय शोधण्याची धडपड थांबली आणि त्या उंचच उंच गवतामध्ये मी कसाबसा, माझ्या उजव्या पायावर माझा तोल सांभाळुन उभा राहिलो. डावा पाय थोडा उचलुन पाहीले आणि मी ओक्साबोक्सी रडायला लागलो. माझी ती निळी पांढरी चप्पल लालभडक झाली होती. माझ्या स्लीपरच्या, उगाळलेल्या सोल मधुन एक भला मोठा बाभळीचा काटा माझ्या डाव्या पायाच्या अंगठ्याच्या थोडे वर तो निघाला होता. त्याचे अनकुचीदार टोक मला स्पष्ट दिसत होते. चक्क काटा आरपार घुसला होता. पायात काटा मोडणं वेगळं आणि अशा पध्दतीने आरपार घुसनं वेगळं. सुरुवातीस असे वाटले की काटा नुसताच टोचला आहे.

त्या रानामध्ये माझे मोठमोठ्याने रडणे ऐकायला कोणीच नव्हते. माझे सांत्वन करायलाही कोणीच नव्हते. माझ्या पायात आरपार घुसलेला तो काटा काढायला देखील कुणीच नव्हते. तरीही माझे रडणे-ओरडणे सुरुच होते. वेदना आणि रक्तस्त्राव काही थांबत नव्हता. काट्याला हातही लावता येईना. चप्पल त्या काट्यामुळे माझ्या पायाला जणु खिळा ठोकल्यासारखी चिकटलेली होती. लांब, टणक, टोकदार अशा या काट्याला एक वेगळे नाव देखील आहे, मला नेमके ते नाव आता आठवत नाही.

एकीकडे आमच्या त्या गायीविषयी राग प्रचंड वाढत होता तर दुसरी कडे माझे वेदनेमुळे बोंबा मारणे वाढत होते. बाबुजींचा म्हणजे माझ्या वडीलांचा खुप म्हणजे खुपच राग त्यावेळी आला. नको नको ते विचार मनात आले. एकुलता एक , नवसाचा मुलगा असुनसुध्दा त्याला अशी कामे करायला लावतात म्हणुन माझ्या मनात त्यांच्या विषयी चीड निर्माण झाली.

रडत रडत, ओरडत ओरडत मी खाली बसुन, पुर्ण ताकतीने माझ्या चपलेत व पायात आरपार घुसलेला तो काटा काढला. रडणे सुरुच होते. गायीच्या घुंगरांचा आवाज अजुनही येतच होता. त्या आवाजाने पुन्हा एकदा त्या झेंडुच्या शेताची आठवण झाली. घरी भांडणे येऊ नयेत म्हणुन मला गायीला लवकरच पकडले पाहिजे याची जाणीव झाली. पायातुन काटा काढल्यामुळे रक्ताची धार वाढली असताना देखील मी, पुन्हा रडत-रडतच गायीच्या घुंगरांच्या आवाजाच्या दिशेने गेलो. तिला बांधलेला कासरा दिसला तसा उडी मारुन तो पकडला. आणि लंगडत लंगडत मोकळ्या मैदानात गायीला घेऊन आलो. तिला एका झुडुपाला बांधुन मी मग दगडी पाला शोधुन त्याच रस पायाला खालुन वरुन लावला. थोडा वेळ तिथेच बसुन, आई-वडील आणि गायीविषयी प्रचंड राग-क्रोध मनात शिजवुन घरी जाण्याची तयारी केली. थोडेच अंतर चालल्यावर समजले की माझ्या पायाच्या वेदना कमी झाल्या आहेत. आता मी सहज पणे डावा पाय देखील टेकवु शकतो. पण पाय दुखला नाही तर आई-बाबुजींना कसे समजणार मी कसल्या दिव्यातुन आलो आहे ते म्हणुन घराच्या थोडे जवळ पोहोचल्यावर पुन्हा लंगडण्याचे नाटक करीत घरापर्यंत गेलो. ओरडुन आईला गाय बांधण्यास सांगितले गोठ्यात. नाटक कंपनी सुरुच होती. आईला विश्वास बसला की निम्मे काम झाल्यासारखे असल्याने मी नाटकावर जोर दिला. आईचा विश्वास बसला एकदाचा.

संध्याकाळी बाबुजी घरी आले आणि आई ने त्यांना सांगितले काय काय झाले ते. आमची हिम्मत व्हायची नाही कधी तक्रारी करायची बाबुजींकडे. आई म्हणजे आमचा वकील. पण न्यायमुर्तींवर कसलाही प्रभाव नाही. ठिके बघु काय करायचे ते, एवढेच म्हणुन त्यांनी विषय संपवला.

गाय काही मामाकडे गेली नाही. माझे गाय वळायला जाणे देखील थांबले नाही. आहे तसेच सर्व काही सुरु राहिले.

आता जेव्हा मी तो प्रसंग आठवतो तेव्हा मला समजते की बाहेर हिंडणे फिरणे, आणि ते ही कसल्याही सुपरव्हिजन शिवाय, या गोष्टींनी आमच्या पिढीला एका अर्थाने घडवले.

आता मी देखील पालक आहे. एक पालक म्हणुन मी जेव्हा मझ्या बालपणीचा हा प्रसंग आठवतो तेव्हा मला जाणवते की आव्हाने, संकटे यांना सामोरे जाऊन, तोंड देऊन जिंकायचे असेल तर मुलांना संकटांपासुन दुर ठेवणे म्हणजे त्यांच्या वाढीसाठी, विकासासाठी बाधा निर्माण करणे होय. मी इयत्ता सातवीत शिकत होतो तेव्हा. आणि त्या वयात नकळत माझ्यावर एक संस्कार झाला. तो म्हणजे माझे दुखाने रडणे ऐकण्यासाठी दुसरे कुणी नसेल तरी ‘मी’ स्वतः सजग पणे ते ऐकले पाहिजे. माझे सांत्वन करायला दुसरे कुणीही नसले तरी , माझे सांत्वन मीच केले पाहिजे. माझ्या पायात आरपार घुसलेला तो काटा काढण्यासाठी दुसरे कुणीही नसले तरी मीच तो काटा कसेही करुन काढला पाहिजे. आज मी हे सारे शब्दांत सांगतोय. त्यावेळी मला कदाचित हे शब्द माहित नसतील ही. माझे कसल्याप्रकारचे शिक्षण सुरु आहे हे देखील मला माहित नव्हते. हा एक भन्नाट धडा मी शिकतोय याची देखील मला कल्पना नव्हती.

पालकत्व नावाची गोष्ट हल्ली शिकावी आणि शिकवावी लागते. पण पुर्वी ते उपजत होते. त्या वयात मला बाबुजींचा राग यायचा पण आता समजतय की ते देखील एक शिक्षणच होते. सजग होते की नाही याची मला कल्पना नाहीये पण या आणि अशा अनेक प्रसंगातुन मुल्य शिक्षण होत होते. “ ये जपुन, पडशील, लागेल” अशा काळजीचा सुर असलेल्या आई-वडीलांच्या हाका/आवाज आमच्या कानावर कधीच आले नाहीत.

आणि आजच्या नवीन पालकांमध्ये नेमका याच गोष्टीचा प्रकर्षाने अभाव आहे. मुलांना बाहेर बागडु द्या. त्यांना संकटे काय असतात ते समजु द्या. त्यांची संकटे देखील त्यांच्या वयाइतकीच छोटी असतात, पण ती सोडवल्यावर दिर्घकालीन संस्कार मात्र मोठे होत असतात.

पण हल्लीच्या शहरी जीवनामध्ये, वाहनांच्या , इमारतींच्या जंगलांमध्ये निसर्गात मुलांना भटकायला नेणार तरी कुठे? आणि त्यांच्य नकळत त्यांच्यामध्ये उच्च मानवी मुल्यांची रुजवात होताना त्यांचे निरिक्षण कोण करील? निसर्गातुन चारित्र्य निर्माण होऊ शकते, पण व्यवस्थित आराखड्यांच्या मदतीने हे करणार कोण?

तर यासाठी आहे निसर्गशाळा. लवकरच आम्ही घेऊन येतोय मुला-मुलींसाठीचा एक खास सर्वांगिण कार्यक्रम की ज्यामध्ये त्यांच्या शारीरीक, मानसिक, भावनिक, बौध्दिक क्षमतांचा पुर्ण विकास घडुन येईल. मुलांच्या या विकासाचे व्यवस्थित मोजमाप, निरीक्षणे, नोंदी केल्या जातील. व्यक्तित्वाचा विकास तर होईलच, पण सोबतच निसर्ग-पर्यावरण संरक्षण-संवर्धनाची जाणीव असलेले जबाबदार नागरिक देखील हि मुले बनतील.

आपला

हेमंत सिताराम ववले

निसर्गशाळा, पुणे.

www.nisargshala.in

Facebook Comments

Share this if you like it..