भग्न कैलासगड व माझी कारवीशैय्या

जुनी आठवण..जुने मित्र

अठरा ते वीस वर्षांपुर्वीचा बाका प्रसंग. कैलासगड तेव्हा फारसा कुणाला ठाउक नव्हता. मी देखील अगदी ओघवत कुठेतरी वाचल होत त्या विषयी. मी ज्या तालुक्याचा रहिवासी आहे त्याच तालुक्यात असुनदेखील अद्याप हा किल्ला पाहण्याचा योग काही आला नव्हता. माझे पिरंगुट-पौड परिसरातील तीन चार मित्र मंडळींना घेऊन एकदा कार्यक्रम पक्का केलाच.

कडाक्याची थंडी आणि भटकंतीचा अचानक ठरलेला बेत

कैलासासारखा उंच कैलासगड
कैलासासारखा ऊंच मुळशीतील कैलासगड

हिवाळ्याचेच दिवस होते. आम्ही दुचाकी गाड्या घेऊन, सर्व साहित्य घेऊन मुळशी धरणाला अर्धा वेढा मारुन, वाघवाडीत गाड्या सोडल्या. दुचाकीवरील तो प्रवास देखील सदैव लक्षात राहण्यासारखाच होता. छातीइतक्या उंच वाढलेल्या गवतामधुन गाड्या हाकीत आम्ही कसेबसे पोहोचलो होतो वाघवाडीला. गम्मत अशी की तेव्हा गावातील अनेक लोकांना कैलासगड विचारुन देखील कुणालाही सांगता आले नाही. कित्येकांनी तर ‘पयल्यांदाच’ ऐकतोय असे हावभाव करीत, कशाला आले इकड मरायला डोंगर द-यांमध्ये अशी मनातमनात खिल्ली देखील उडवली. वाट माहिती नसल्याने आम्हाला माहिती घेण्यास उशिरच झाला. चढाई सुरु करेपर्यंत दुपारचे दोन वाजुन गेले होते. सोबत पत्रकार मित्राने जेवणासाठी आणलेली विशेष तयारी होती. वर पोहोचे पर्यंत आम्हाला चार वाजले. उंचावर गारवा खुपच जाणवु लागला. स्वयंपाक करणे अगत्याचे होते. त्यासाठी सरपण गोळा करणे, चुल लावणे, पेटवणे, स्वयंपाकासाठी कांदा कापणे अशी कामे वाटुन घेतली आम्ही कामाला लागलो. माझ्या सरपण आणण्याचे काम आले, मी भटकत भटकत लाकडे काड्याकुड्या गोळा केल्या आणि शक्य तितका गड ही पाहुन घेतला. तेव्हा गड भग्नावस्थेत होता. (आताही फार काही बदल झालेला नसेल म्हणा.) एका भुयार, गुहा सदृश्य स्थळापाशी आम्ही बस्तान मांडले. बाजुलाच पाण्याचे एक टाके देखील होते. ते नावालाच टाके होते. चहुबाजुंनी मातीचे लोट त्यात पडले होते, गवत, झुडपे प्रचंड वाढली होती. कधी काळी ते टाके असावे इतक्याच काय त्या खाणाखुणा दिसत होत्या, नाहीतर आता ते एक छोट तळं झालेलं होत.

विशेष जेवणाचा बेत

चुल पेटली, स्वयंपाक सुरु झाला. स्वयंपाक कधी एकदाचा होतोय आणि कधी विशेष जेवणावर तुटून पडतोय असे सर्वाम्ना झालेले. या सर्व गोंधळात दोन अडीच तास कसे गेले समजलेच नाही. विशेष मेनुवर ताव मारुन, ढेकर देऊन झाल्यावर आम्हाला भान आले व प्रश्न पडला की आता माघारी कसे जायचे? अंधार पडला होता. टॉर्च नव्हत्या, वाट माहिती नव्हती ; काय करावे असा प्रश्न पडला. माघारी गेले’च’ पाहिजे असे म्हणणारे असामान्य लोकही आमच्यासोबत होते. त्यांच्या ‘च’ ला उत्तर एकच होते व ते म्हणजे इथेच गडावर’च’ मुक्काम’च’ करणे. दुसरा पर्यायच नव्हता. त्यामुळे त्या असामान्य मित्रांना समजावुन सांगण्याची गरज पडलीच नाही. नाइलाजाने तिथेच मुक्काम करावा लागणार होता हे सर्वांना समजले. पोट तर भरले होते. पाण्याची सुविधा होतीच. अडचण केवळ एकच होती ती म्हणजे अंथरुण पांघरुण , थंडीचे कपडे, कानटोप्या असे काहीही कुणीही आणले नव्हते. रात्र अशा अवस्थेत काढणे मोठे अवघड काम आम्हाला करायचे होते. आम्ही जिथे चुल होती तिथेच, डोंगराच्या आडोश्याला झोपण्याचा निर्णय घेतला. बर ते काही मोकळे मैदान नव्हते. उंचच उंच झाडे, झुडपे, गवत असे सर्व तिथे होते. डोंगर उतार होताच. कशीबशी आम्ही चुल व बसण्यासाठी जागा बनविली होती. आता तेवढ्याश्या जागेत सर्वांना मुक्काम करायचा होता, झोपायचे होते. झोपण्यासाठी जमिनीवर आडवे पडता येईल अशी जागादेखील नव्हती. त्यामुळे तीच चुल पेटती ठेवुन रात्र जागुन काढणे हाच पर्याय सर्वांसमोर होता.

माझी चिकाटी व माझे झोपेवरील प्रेम

त्यातही ‘पयल्यांदाच’ असे जंगलात आलेले असामान्य असामी देखील सोबत असल्याने बिबट्या तर नाही ना येणार?, तरस तर नाही येणार?, वाघ असतो का इकडे, कोल्हे माणसाला खात नाही ना? एखादा साप आला चुलीच्या उबेला तर? आणि साप चावलाच तर? असे अनेक प्रश्न नावडीने, काळजीने चर्चेसाठी बोर्डावर आपोआपच आले. मला झोप येत आहेसे मला जाणवु लागले. बाकी कुणीही झोपण्याच्या मुड मध्ये नव्हतेच. मला झोप येते आहे हे जरी खरे असले तरीही मला झोपण्यासाठी पुरेशी जागाच नसल्याने मी कसाबसा जागा होतो. थोड्यावेळाने अक्षरशः डुलकी येऊन बसल्याबसल्या पडणारच होतो. झोप अनावर झाल्याने मी झोपेसाठी जागा कशी मिळवावी, कुणाला उठवावे, कुणाला सरकावयास सांगावे, काय करावे असे चिंतन करता करता मला बाजुला दुपारी आमच्याच सोबत्यांनी तोडुन बाजुला फेकुन दिलेली उंचच उंच कारवी दिसली. चांगल्या दोन तीन डझनभर ताज्या काठ्या आणि त्याला अजुनही न सुकलेली भरदार गच्च हिरवी पाने होती. मी त्वरीत उठलो, सर्व कारवी जमा केली आणि एकावर एक रचली व पाचेक मिनिटांनी माझा कारवीचा बेड तयार झाला. अगदी तॄणशैय्या जरी नसली तरी हलता झुलता हवेशीर वेडावाकडा असा माझा तो बेड सज्ज होता. माझा हा सर्व पराक्रम सुरु असताना सोबतची मंडळी मात्र मला वेड्यात काढण्यात कसलीही कसर सोडत नव्हते. मी मात्र एकाच ध्येयाने प्रेरीत होऊन माझ्या कामावरुन लक्ष अजिबात विचलीत होऊ दिले नाही. हसणा-यांकडे, निंदकांकडे दुर्लक्ष करुन मी माझे ध्येय गाठले होते. मी बेडवर अंग टाकले तसे त्या हवेशीर बेडची उंची कमी झाली. कारवीच्या काड्या-काड्यांमधील अंतर माझ्या वजनाने कमी कमी होत होते, काही काही काड्या तुटण्याचे देखील आवाज येत होते. माझ्यावर हसणारे आता माझ्या फजितीचा परमोच्च बिंदु पाहण्यासाठी आतुर होते. मी मात्र अजुनही ठाम होतो. अंग इकडे तिकडे सरकावीत, कधी कमरेने तर कधी कोप-याने कारवीच्या काड्यांना बाजुला सारीत , दोन तीन प्रकारे पहुडण्याचे प्रयत्न करुन शेवटी मला माझी ती आदर्श स्थिती सापडलीच जीमध्ये मला बेडची, कारवीची एकही काठी, फांदी रुतत नव्हती. मिश्किल पणे हसुन सर्वांना गुड मोठ्य आवाजात म्हणुन मी झोपी जाण्यासाठी डोळे मिटले. सकाळी जाग आली तेव्हा मित्रांनी सांगितलं की गुड म्हंटल्यानंतर अवघ्या पाचचं मिनिटांत तु घोरायला लागला होता.

पहिले Encounter कारवी सोबत

तर त्या रात्री कारवीशी माझी पहिल्यांदाच इतकी जास्त जवळीक झाली. कारवी मला तेव्हापासुनच खरतरं इतकी प्रिय झाली. यापुर्वी कारवी पाहिली होती, तीविषयी माहिती होती, पण जिव्हाळ्याचे संबंध पहिल्यांदाच इतके आले की आयुष्यभर कारवी आता कायमची लक्षात राहिली आणि तिच्याविषयी सातत्याने नवनवीन साक्षात्कार घडत गेले. मागील काही वर्षांत तर दर आठवड्याला कारवी पाहतोय. कारवीचे जीवनचक्र अगदी जवळुन पाहिले, अनुभवले, अनेकदा निसर्गशाळेच्या पर्यटकांना कारवी विषयी माहिती दिली. आज देखील कारवी विषयी लेख लिहावा म्हणुन सुरुवात केली लेखणीला पण कारवीशैय्या व बोचणा-या थंडीमधील ढाराढुर झोपेचा प्रसंगानेच खुप फुटेज खाल्ले. पुढील लेखात चला आपण जाऊयात कारवीच्या विस्मयकारी दुनियेच्या सफरीवर.

ट्रेकचे सांगाती – त्याकाळचा राजकारणी महेश ठोंबरे, उद्योजक शशीकांत धुमाळ, वैभव सदावर्ते, इलाही, पत्रकार विनायक गुजर आणि काही असामान्य लोक

कळावे,

 

हेमंत सिताराम ववले

निसर्गशाळा, पुणे

Facebook Comments

Share this if you like it..