जंगली जयगड, भैरवगड, प्रचितगड व रामघळ – डिसेंबर १९९९ चा जंबो ट्रेक

हेमंत व मी साधारणपणे एकाच वेळी ट्रेकींगला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात आम्ही पाळंदे प्रभृतींच्या सोबत अनेक ट्रेक केले. कालांतराने आम्हाला देखील शिंगे आली व थोरांच्या देखील आरोग्याच्या समस्या यामुळे आम्ही एकटेच (म्हणजे मोठ्या माणसांशिवाय) ट्रेक करायला सुरुवात केली. खरतर आमचे ते वय उमेदीचे होते. नवनवीन क्षितिजे ओलांडण्याचे होते. नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्याचे होते. तर ज्या थोरांसोबत आम्ही सुरुवात केली ट्रेकिंगला त्यांना हल्ली हल्ली मोठ्ठे ट्रेक्स करणे अवघड होऊ लागले होते. त्यांचे वय होत आले होते. तरीही कधी कधी त्यांच्या सोबत आम्ही वन-डे ट्रेक करायचोच.

पण आमची उर्मी आम्हाला शांत बसु देत नव्हती. वन-डे ट्रेक करुन आमचे भागत नव्हते. आम्हाला अधिक वेगळे काहीतरी करायचे असावयाचे. दोन मुक्कामांचे, तीन मुक्कामांचे ट्रेक, मोठ्यांशिवाय केल्यनंतर आमचा आत्मविश्वास वाढला. व आम्ही काहीतरी भन्नाट करायचे ठरविले. मग काय मी ट्रेकचा आराखडा तयार करुन हेमंत ला लॅंडलाईन वर फोन करुन सांगितला. त्या काळी मोबाईल नव्हते. लॅंडलाईन फोन वर देखील खुप वेळ बोलणे अवघड होई. त्यामुळे, आम्ही भेटुन योजना केली.

योजना मोठी होती. आम्ही चक्क पाच मुक्कामांचा ट्रेक करायच ठरविल. आमच्या या ट्रेक मध्ये सहभागी सदस्यांची संख्या अधिक वजा होत होत प्रत्यक्ष स्वारगेट एसटी स्टॅंड वर आम्ही चौघेच आलो होतो.

१. यशदिप श्यामकांत माळवदे

२. हेमंत ववले – सध्या आम्ही एकत्रच भटकंती करतो व निसर्गशाळा नावाने उपक्रम चालवतो

३. देवीदास ववले – त्याच्या गावी देवीदास सध्या शेती करीत आहे.

४. दिपक पिसाळ – दिपक बिग शॉट झाला. अमेरिकेत मोठ्ठा शास्त्रज्ञ आहे दिपक व कोरोना विषाणुवर औषध बनविण्याच्या कामात सध्या तहानभुक विसरुन, अहोरात्र झटत आहे.

आमच्या या ट्रेकची सर्व हकिकत मी तुम्हाला, नव्याने लिहुन नाही सांगणार आज. त्या काळात आम्ही प्रत्येक ट्रेकचा वृत्तांत वहीमध्ये लिहित असु, जेणेकरुन, पुन्हा कधी, कुणाला तिकडे जायचे झालेच तर त्यास क्षेरॉक्स काढुन पाने आम्ही देत असु.  या जंबो ट्रेकचा वृत्तांत देखील मी लिहुन ठेवला होता. कोरोनामुळे लॉकडाऊन स्थितीमध्ये असल्यामुळे जुन्या अडगळी मध्ये हा अमुल्य ठेवा सापडला. माझ्या स्वतःच्या हस्ताक्षरात, मी लिहुन ठेवलेली आमच्या ट्रेकची हकिकत अवश्य वाचा. तुम्हाला नक्की आवडेल.

ट्रेकचा आराखडा

पान क्र. १

 

पान क्रं. २

पान क्रं. ३

पान क्रं. ४

पान क्रं. ५

पान क्रं. ६

आमच्या या ट्रेकच्या आठवणी, या लॉकडाऊन मुळे पुन्हा ताज्या झाल्या. आज जसे दिजीटल कॅमेरे आहेत, मोबाईल कॅमेरे आहेत तसे तेव्हा नव्हते. आम्ही रोलच कॅमेरा वापरायचो, तोही माझ्या वडीलांचा. त्यामध्ये एकदा रोल टाकला की काळजीपुर्वक तो रोल किमान पाच सहा ट्रेकचे फोटो काढण्यासाठी करायचो आम्ही. या जंबो ट्रेकचे काही फोटो देखील मला सापडले की जे मी स्कॅन करुन इथे चिकटवीत आहे.

जंगली जयगड

प्रचित गडाच्या वाटेवर दिसलेला लाव्हारसामुळे उत्पन्न झालेला सडा – बसलेला दिपक व उभा असलेला देवीदास

अनेक ठिकाणी वाट अशी घनदाट अरण्यातुन होती

समर्थ रामदास स्वामींची रामघळ. हिचे वैशिष्ट्ये असे की या घळीच्या म्हणजे गुहेच्या तोंडावर धबधबा पडतो. आम्ही जेव्हा गेलो तेव्हा पाणी कमी असल्याने , आमच्या समोर जणु पाण्याचा पडदा आहे की काय असे वाटत होते.

भैरवगड येथील मंदीरासमोर . याच मंदिरामध्ये आम्ही मुक्काम केला होता.

ऐन उमेदीतील हेमंत

 

मित्रांनो, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आपण सर्व जण घरांत आहोत. या महाभयानक आजाराने सगळ्या जगाला ग्रासले आहे. या रोगास आपण नियंत्रणात आणु शकलो नाही तर मनुष्य जातीला याची खुप मोठी किंमत मोजावी लागणार आहे. याची किम्मत काय असु शकते हे आपण दररोज पाहतोय टीव्ही वर. चीन, इटली, अमेरीका या देशांमध्ये जे काही होत आहे ते भयंकर आहे. सगळ्या जगालाच या विषाणुने भयभीत केले आहे. व ही भीती अवाजवी नाहीये. आजच म्रुत्युमुखी पडलेल्यांची संख्या चोवीस हजांरांच्या पार गेली आहे. भले भले देश याला आळा घालण्यात अपयशी ठरताहेत. भारतात या विषाणुचे शेकडो रुग्ण सापडले आहे. पण भारतासाठी तरी वेळ अजुन गेलेली नाहीये. आपण सामाजिक दुरावा पाळणे काटेकोर पणे केले तर आपण या साथीच्या आजाराला आळा नक्की घालु शकतो. जागतिक आरोग्य संघटनेला देखील भारताकडून, भारतातील जनतेकडुन खुप मोठ्या अपेक्षा आहेत. जगाला रस्ता दाखवण्याचे काम आता आपणस करायचे आहे. सोबतच आपणास भारताला, आपल्या राज्याला, आपल्या शहराला, आपल्या वॉर्डाला, आपल्या वाडी-वस्तीला, आपल्या सोसायटीला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या कुटुंबास या आजारापासुन वाचवायचे आहे. आपण हे करु शकतो, आपण लाखो करोडो लोकांस वाचवु शकतो. पण असे करण्यासाठी आपणास केवळ एकच महान कार्य करायचे आहे, ते म्हणजे घरीच बसणे. दॅट्स इट!

आपणा सर्वांकडे भरपुर वेळ आहे. त्यामुळे वेळात वेळ काढुन असे म्हणण्यात काही अर्थ नाही. पण तुम्ही आमच्या या जंबो ट्रेकविषयीची हकिकत वाचलीत त्याबद्दल तुमचे आभार.

कळावे

आपला

यशदिप माळवदे

निसर्गशाळा, पुणे

 

 

Facebook Comments

Share this if you like it..