जेम्स डगलस यांच्या नजरेतुन सह्याद्री, मावळे व शिवाजी महाराज

या देशाचे भूमिपुत्र हे खरोखर गिर्यारोहण कलेतील आमचे गुरु आहेत किंवा आमच्यापेक्षा भारी आहेत ! त्यांची चिकाटी, त्यांचे हृद्य व फुफ्फुस यामधील रग पाहून आम्हास त्यांचा हेवा वाटतो. दमछाक आणि थकवा हे शब्द जणू त्यांना माहीतच नाहीत. आम्ही जेथुन प्रवेश केला होता त्या प्रवेशद्वाराशी आलो त्यावेळी एक शिपाईगडी दिसला. तटावरील उंच टोकावर तो सहजपणे उभा होता. त्याचे बोलणे-चालणे सभ्य होते.

James Douglas

असे लिहिले आहे जेम्स डगलस या इंग्रजी प्रवाशाने. हा प्रवासी भारतात आला होता एकोणिवासाव्या शतकाच्या शेवटास. म्हणजे तो येऊन आता सव्वाशे वर्षे झाली. त्याने भारतात अनेक ठिकाणी प्रवास केला. त्यातही त्याला विशेष स्वारस्य होते ते सह्याद्रीच्या खांद्यावरील उत्तुंग किल्ल्यांमध्ये. हे नुसतेच किल्लेच त्याच्या आकर्षणाचा, आश्चर्याचा विषय नव्हते मित्रांनो. सह्याद्रीच्या द-याखो-यातील जे जे म्हणुन त्याला दिसले त्या त्या सर्वच गोष्टींमध्ये त्याने काहीना काही अदभुत पाहिले. अदभुत अनुभवले. जेम्स डगलस ने त्याच्या प्रवासाचे वर्णन त्याच्या बुक ऑफ बॉम्बे या पुस्तकात संग्रहीत केले आहे. जेम्स डगलस एक अभ्यासु होता. लेखक होता. आणि कविमनाचा देखील होता. इतिहासामध्ये कल्पनाविलास करण्यात तो कुशल होता. त्याच्या शब्दांना धार आहे. त्या शब्दांमध्ये वजन आहे. तोरणा प्रवासाचा मराठी अनुवाद वाचताना मला मुळ इंग्रजी भाषेतील लिखाण वाचण्याची उत्कठ इच्छा झाली. आणि मला ते मिळाले देखील. या पुस्तकाची लिंक खाली दिली आहे.

वर जे वर्णन केले आहे श्रीमान जेम्स यांनी ते आहे सह्याद्रीच्या मावळ्यांचे. गिर्यारोहण हा साहसी खेळ म्हणुन  युरोप, अमेरीकेमध्ये त्या काळी नव्यानेच उद्यास आला असावा. अर्थातच हा खेळ खेळणे कुणाचेही काम नाही. हा खेळ शिकावा लागतो. यातील बारकावे शिकावे लागतात. चढाई कशी करावी, उतराई कशी करावी, दगड-धोंड्यांना पकड कशी करावी, निसरड्या, घसरड्या मातीच्या अगदी अरुंद पायवाटेवरुन न पडता चढावे , उतरावे कसे याचे धडे गिरवावे लागतात. पायवाटेच्या एका बाजुला उत्तुंग बेलाग कडा व दुस-या बाजुला पाताळा पर्यंत जाईल इतकी खोल दरी असताना देखील शरीर, मन, बुध्दी यांची एकतानता साधत आरोहण कसे करायचे यासाठीचे विशेष वर्ग घेतले जातात. पण जेव्हा जेम्स डगलस या माणसाने सह्याद्रीतील मावळे पाहिले तेव्हा त्याला या मावळ्यांचा व मावळ्यांचा अतुलनीय साहसाचा हेवा वाटला. एखाद्या सरळसोट उंचच उंच कड्याच्या माथ्याकडे नुसते पाहिले तरी नजर ठरत नाही. पण या मातीतील मावळे अशाच एखाद्या टोकावर अगदी सहजपणे उभा राहतो व त्या कठीण प्रसंगी देखील त्याच्यातील सुसंस्कृत पणा , सभ्यपणा, शालिनता तो विसरत नाही. जेम्स महाशयांना सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर राहणा-या या मावळ्यांचे फारच अप्रुप!

त्याच्या इतिहासातील काव्यविलासाची ओझरती झलक देखील तुम्हाला मी देतो. एक स्कॉटिश लोकगीत आहे की ज्यामध्ये धाडसी, शौर्य व धैर्य संपन्न माणसाचे वर्णन येते. या लोकगीतामध्ये जेम्स महाशयांनी काही शब्द बदलले. व हे बदलले लोकगीत चक्क शिवाजी महाराजांना अर्पण केले.

As I was walking all alone

Atween a castle and a wa’

O there I met a wee wee man

And he was the least I ever saw

His legs were half an ellwand lang

And think and thimber was his thie

Atween his brows there was a span,

And Atween his shoulder there was three,

He took up a muckle slane

And flang’t as far as I could see,

Though I had been a glant born

I could hv lift it my knee..

O wee wee man, you are wonder strong|

शिवाजी महाराजांचे जे काही वर्णन त्याने ऐकले, वाचले असेल त्यावरुन राजांची शरीरयष्टी सामान्य होती असे त्याला ज्ञात होते. पण सामान्य किंवा सामान्य पेक्षा थोडी कमी उम्ची असलेल्या या माणसाचे कर्तॄत्व मात्र गगनचुंबी होते, अफाट होते या बाबत मात्र जेम्स महाशयांना यत्किंचितही शंका नव्हती.

Shivaji Maharaj’s Picture in his book

एके ठिकाणी श्रीमान डगलस म्हणतात की एकेकाळी येथे वावरलेल्या शिवाजीचे दर्शन झाले असते तर? हा विचार त्याच्या संवेदनशील, कविमनास स्पर्शुन गेला. शिवाजी राजे जर भेटले असते तर त्या स्कॉटिश लोकगीतात केलेल्या बदला सहीत शिवाजी महाराजांस ते लोकगीत ऐकवले असते असे जेम्स म्हणतात. शिवाजी राजांस भेटण्यास दोन शतके उशिर झाल्याची खंत देखील त्याच्या लिखाणातुन जाणवते.

सह्याद्रीच्या कातळ कड्यांचे दर्शन झाल्यावर सजहच त्याला सुचले.

की कुणी या कातळकड्यांच्या उसळणा-या लाटा तासुन बनविल्या असतील बरे? असे कोण आहे की ज्याने या कातळ सदृश्य पुराण-पुरुषांचा माथा कोरुन त्यांचे शिरपेच बनविले आहे? असे कोण आहे की ज्याने या खोल, रुंदच रुंद, अंतहीन कपारी, कंदरे, गुहा खोदल्या असतील? ह्म्म्.. दगडांच्या लाटा निर्माण करणा-या महान वादळाचा कर्ता मी आहे, होय मीच आहे!

अहाहा, काय हा कल्पनाविलास! काय ही काव्य प्रतिभा व काय तो साक्षात्कार झाला असेल श्री डगलस यांना या सह्याद्रीचा. सह्याद्रीचे दर्शन सर्वांनाच होते खरे, पण त्याचा साक्षात्कार होण्यासाठी त्याच्याशी नाळ जोडण्यासाठी, त्याच्याशी एकरुप होण्यासाठी, त्याच्या कुशीत विसावण्यासाठी आपल्या व्यक्तित्वावर असलेली सर्वच विशेषणे, आभुषणे त्यागावी लागतात. नम्रता, शालिनता अंगी बाणावी लागते. वाळलेल्या पानाप्रमाणे अहंकार गळुन पडावा लागतो. उत्तुंग सह्याद्रीची अनुभूती घ्यायची असेल तर आपल्या व्यक्तित्वामध्येदेखील उत्तुंगपणा आणावा लागतो. जो जितका महान तितकीच त्याची अनुभूती, त्याचा साक्षात्कार देखील महान! श्री जेम्स डगलस निसर्गप्रेमी, मनुष्यप्रेमी म्हणुन नक्कीच महान होते.

जेम्स डगलस यांनी शिवाजी महाराज, सह्याद्री , सह्याद्रीतील निवासी, इथले रहिवासी यांचे जे वर्णन केले आहे ते मुळातुनच वाचण्याजोगे आहे.

हे पुस्तक डाऊनलोड करुन वाचण्यासाठी कृपया इथे क्लिक करा.

जेम्स डगलस यांचे हे पुस्तक अद्याप मला पुर्ण वाचावयाचे आहे. या पुस्तकातुन तात्कालिन महाराष्ट्र, भारत असा असेल याची जाणिव होईल. इतिहासाचा अभ्यास करणा-या मंडळींस हे पुस्तक उपयोगाचे आहे.

हेमंत सिताराम ववले

निसर्गशाळा, पुणे

Facebook Comments

Share this if you like it..