मार्च महिन्यामध्ये रात्री साधारण आठ नंतर पुर्व क्षितिजावर दिसणारी कर्क राशी, खरतर उगवते दिवसाऊजेडीच, पण सुर्यप्रकाशामुळे आपण पाहु शकत नाही. पण जसा अंधार पडायला सुरुवात होते तसे आकाशातील इतर सर्व ता-यांप्रमाणे, कर्क राशी सुध्दा आपण पाहु शकतो. रात्री ८ च्या सुमारास पुर्ण अंधार पडल्यावर, आकाशातील सिंह राशी (मागील लेखामध्ये आपण या विषयी पाहीले आहे) च्या थोडेसे वर आपणास कर्क राशी दिसते. आकाशामध्ये कर्क तारकसमुह नक्की कसा दिसतो ते खालील चित्रात पहा. आज रात्री म्हणजे ११ मार्च रोजीचे सायंकाळ ७-५५ वाजताचे आकाश असे दिसेल.
सिंह राशी ओळखता येणे खुप सोपे आहे. तुम्हाला एकदा हा सिंह समजला तर तो आकाशामध्ये अगदी कुठे ही असला तरी चटकन ओळखता येऊ शकतो. सिंहाचे तोंड ज्या दिशेला आहे अगदी त्याच दिशेला सिंहाच्या वर आपणास कर्क म्हणजे आकाशातील खेकडा दिसेल. खालील आकृती पहा.
भारतीय नक्षत्रांच्या यादीतील पुनर्वसु तील एक चतुर्थांश भाग, पुष्य पुर्ण नक्षत्र व आश्लेषा पुर्ण नक्षत्र अशा तीन नक्षत्रांचा समावेश कर्क या तारकासमुहामध्ये येतो.
वरील चित्रात दिसणा-या लघुलुब्धक व पुनर्वसु यांच्या मधील जो एक आभासी मार्ग आहे यास आकाशाचे महाद्वार म्हंटले जाते. कारण आपल्या सुर्यमालेतील सर्व ग्रह, चंद्र व स्वःत सुर्य याच कक्षेमधुन पुर्वेकडुन पश्चिमेकडे फिरत असल्याचा भास आपणास होतो.
पुनर्वसु-लघु-लुब्धक (कॅनिस मायनर) हे ओळखणे सोपे आहे तसेच सिंह ओळखणे देखील सोपे आहे. या दोहोंच्या मध्ये असलेला कर्क हा तारकासमुह त्यावेळी पुर्व आकाशामध्ये दिसणा-या इतर ता-यांच्या तुलनेमध्ये खुपच फिकट व अस्पष्ट दिसतो. त्यामुळे कर्क राशी पाहण्यासाठी नुसते प्रकाश प्रदुषणापासुन दुर जाणे गरजेचे असतेच, त्यासोबतच आकाशामध्ये चंद्राचा अभाव देखील खुप गरजेचा असतो. त्यामुळे या महिन्यामध्ये जर तुम्हाला कर्क, त्यातील सर्व नक्षत्रांसहीत नीट पहायचे असेल तर २४ मार्च नंतरच्या रात्री, चंद्रोद्य होईपर्यंत आपण कर्क अगदी स्पष्ट पाहु शकतो.
कर्क म्हणजे खेकडा. याला आधुनिक खगोलामध्ये आणि पाश्चात्य ज्योतिषामध्ये कॅन्सर (Cancer) असे म्हणतात. विशेष म्हणजे कर्क हा भारतीया वाटणारा शब्द मुळात भारतीय नसुन कर्किनस या पाश्चात्य शब्दावरुन घेतला आहे. आपणास लक्षात असेलच की, भारतीय ज्योतिषशास्त्र ही जी शाखा आहे, ती मुळची भारतीत नसुन, इसवी सनाच्या अंदाजे चौथ्या=पाचव्या शतकामध्ये भारतामध्ये ती ग्रीकोरोमन संस्कृतीमधुन आलेली आहे.
परंतु, नक्षत्रांचा अभ्यास व त्यानुसार कालनिर्णय, ऋतुनिर्णय व कृषिनिर्णय करणे ही भारताची मुळ खगोल शाखा अतिप्राचीन अशी आहे. माझ्या मागील अनेक चित्तरकथांमध्ये, मी या विषयावर सविस्तर लिहिले आहेच.
ग्रीकोरोमन पुराणांमध्ये या खेकड्याची अत्यंत छोटीशी कथा येते. सिंहाची चित्तरकथेमध्ये आपण पाहीले की हरक्युलीस ला १२ अशक्यप्राय अशी कामे सांगितली जातात. त्यातील पहिले काम असते हायड्रा नावाच्या एका सर्पास मारणे.( आकाशातील सिंहाच्या चित्तरकथेमध्ये हायड्रा विषयी वाचण्यास व चित्रफीत पहावयास मिळेल. वाचण्यासाठी इथे क्लिक करा). हायड्रा कडुन हरक्युलीस मारला जावा यासाठी हायड्राच्या मदतीला हेरा नावाची एक देवता खेकड्यास पाठवते. खेकडा हरक्युलीस च्या पायाचा चावा घेऊन पाय तोडण्याचा प्रयत्न करतो पण हरक्युलीस एकाच लत्ताप्रहारामध्ये खेकड्याचे कठीण कवच फोडुन, खेकड्यास मारुन टाकतो. व नंतर हायड्राला देखील यमसदनास पाठवतो. स्वर्गातील देव, झीऊस खेकडा व हायड्रा च्या या बलिदानाला पुरस्कार म्हणुन दोघांनाही आकाशामध्ये स्थापित करतो.
प्राचीन इराक मध्ये अनेक संस्कृत्यांचा विकास झाला होता. यातील एक म्हणजे खल्दी. खल्दी सभ्यतेच्या अनुयायांच्या अनेक धारणांपैकी एक धारणा खुपच प्रसिध्द आहे. ती म्हणजे, कर्क तारकामंडळ म्हणजे मनुष्याचे पृथ्वीवर येण्याचे द्वार आहे. स्वर्गातील आत्मे याच दारातुन पृथ्वीवर, मनुष्य योनी मध्ये प्रवेश करतात.
प्राचीन भारतीय साहित्यामध्ये कर्क म्हणजेच खेकड्या विषयी विशेष कथा कुठेच मिळत नाही. आधी सांगितल्याप्रमाणे कर्क ही १२ राशींपैकी एक असल्याने व राशी पध्दती ज्योतिषाचा भाग असल्याने भारतामध्ये कर्क किंवा अन्य कोणत्याच राशीच्या प्राचीन कथा दिसत नाहीत. पण या राशीमधील सर्व नक्षत्रांविषयी अभ्यास भारतीय लोक हजारो वर्षांपासुन करीत आले आहेत.
भारतामध्ये आकाशातील तारकासमुहांना विशिष्ट नावे दिली आहेत. ही नावे उगाचच दिलेली नाहीत. जसे पुनर्वसु म्हणजे पुनः धनवान होणे, पुष्य म्हणजे पुष्प=फुल किंवा शुभ, ऋगवेदामध्ये यास तिष्य असे ही म्हंटले गेले आहे. बौध्द जातककथांमध्ये तिष्यचा अपभ्रंश तिस्स अनेकदा वापरला गेलेला आहे. आश्लेषा म्हणाजे आलिंगणकर्ती !
पांडुरंग वामन काने लिखित “धर्म शास्त्र का इतिहास” मध्ये त्यांनी नक्षत्रांच्या समर्पक नावांविषयी लिहिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पुनर्वसु असे नाव पडण्याचे कारण कदाचित असे असावे की त्या काळामध्ये धान्याचे बीज शेतामध्ये पेरले जातात व त्यांना अंकुर देखील येतो. पुष्य नाव पडण्याचे कारण असे की या काळात भाताच्या रोपांना फुलोरा आलेला असतो. अश्लेषा नाव पडण्याचे किंवा ठेवण्याचे कारण असे की या काळात भाताची पाती उंच डोलदर वाढुन,डुलत असतात सोबतच एकमेकांच्या गळ्यात पडत असतात.
पुष्य नक्षत्रांच्या बाबतीत आणखी एक गमतीशीर गोष्ट आहे. ती म्हणजे, एखाद्या चंद्रविरहीत रात्री जर तुम्हाला, नुसत्या उघड्या डोळ्यांना हे दिसले तर समजायचे की तुमची दृष्टी निर्दोष आहे.
पुष्य नक्षत्र ओळखण्याची पध्दती देखील सोपी आहे.
वरील पैकी पुनर्वसु मधील खालचा तारा, लघुलुब्धक व पुष्य नक्षत्राचा जे वर्तुळांकीत तारा आहे यांचा त्रिकोण केला, व वर्तुळांकित ता-याच्या डावीकडे थोडेसे वर पाहीले असता, अगदी निरखुन पाहीले असता, तेही आकाशात चंद्र नसताना पाहीले असता आपणास पुष्य नक्षत्र दिसते. खालील आकृती पहा.
पुष्य नक्षत्र कापसाच्या पुंजक्याप्रमाणे भासते उघड्या डोळ्यांना. आणि छोट्याशा जरी दुर्बिणीमधुन पाहीले तरी आपणास पुष्य नक्षत्रामध्ये असंख्य तारे दिसतात.
भारतीयांना या अगदी अस्पष्ट अशा तारकापुंजाचे ज्ञान हजारो वर्षांपासुन आहे. गॅलिलिओ ने १६ व्या शताकामध्ये दुर्बिणीमधुन पाहीले असता त्याला या तारकापुंजामध्ये ३६ तारे असल्याचे दिसले. वर्तमानामध्ये आधुनिक विज्ञानामुळे आपणास समजले आहे की या तारकापुंजा मध्ये साडेतीनशे पेक्षा जास्त तारे आहेत. या पुष्य नक्षत्राचे पृथ्वीपासुन अंतर ६०० प्रकाशवर्षे इतके आहे. आधुनिक विज्ञान या तारकापुंजास एम-४४ असे संबोधतो.
साधारण इंग्रजी भाषेत यास बी-हाईव्ह म्हणजे मधमाशांचे पोळे म्हणतात कारण तारकागुच्छ दिसतो अगदी तसाच. प्राचीन ग्रीक व रोमनांना हा तारकापुंज गाढवांना खाऊ खालण्याच्या भांड्यासारखा दिसला. त्यांच्यानुसार बाजुचे दोन तारे म्हणजे दोन गाढव आहेत व त्याच गाढवांवर बसुन डायनोसिस व सायलेनस हे दोघे टायटन्स विरुध्द युध्द करण्यासाठी गेले.
या तारकापुंजामध्ये २०१२ साली संशोधकांना दोन ग्रह देखील आढळले. हा शोध महत्वाचा मानला गेला कारण त्यावेळेपर्यंत नुसतेच ग्रह आढळले होते पण हे दोन ग्रह आपल्या सुर्यासारख्याच दोन वेगवेगळ्या ता-यांची प्रदक्षिणा करताना आढळणे म्हणजे एक वैशिष्ट्येपुर्ण शोध होता.
या व्यतिरिक्त, या नक्षत्रामध्ये एम-६७ नावाचा आणखी एक तारकापुंज आहे की जो आपल्यापासुन २७०० प्रकाशवर्षे इतका दुर आहे. आश्लेषा नक्षत्रापासुन थोडेसे डावीकडे म्हणजे उत्तरेकडे हा तारकापुंज अगदी फिकट दिसतो. दुर्बिणीमधुन पाहिल्यास यात ५०० च्या आसपास तारे असल्याचे समजते.
यानंतर आपण पाहु कर्क तारकासमुहामधील आणखी एका नक्षत्राविषयी. याचे नाव आहे आश्लेषा. भारतीय नक्षत्र यादीतील हे नववे नक्षत्र असुन, पुष्यपासुन थोडेसे दक्षिणेकडे आणि अर्धा घर खाली हे आहे. हेच आहे हायड्रा सापाचे डोके. आठवतो ना हायड्रा साप हरक्युलीस च्या गोष्टीतील?
आश्लेषा नक्षत्रामध्ये पाच तारे असुन यातील सर्वात तेजस्वी तारा आश्लेषा तारा म्हणुन ओळखला जातो. अगदी आधुनिक खगोलशास्त्रात देखील या ता-यास आश्लेषा हेच नाव आहे. हायड्रा साप इथुन सुरु होऊन आग्नेय आकाशामध्ये दुरवर पसरलेला आहे. आधुनिक खगोलींच्या ८८ तारकापुंज्यांच्या यादीमध्ये हायड्रा हा सर्वात मोठा तारकापुंज आहे. खालील चित्र पहा
हायड्रा मध्ये एकच सर्वसाधारण तेजस्वी तारा दिसतो त्यास अल्फार्ड म्हणतात. व बाकीचे १६ मंदकांती तारे अहेत. अल्फार्ड हा नारंगी आणि खुप मोठा तारा आहे. आणि आपल्या सुर्यापेक्षा ४० पटीने मोठा आहे. या एकुण १७ ता-यांपैकी १३ ता-यांभोवती प्रदक्षिणा करणारे ग्रह आहेत.
अल्फार्ड ता-याच्या बाजुला थोडे दक्षिणेकडे आणि अर्धा घर खाली, नुसत्या डोळ्यांना न दिसणारे कृष्णविवर आहे. चंद्र एक्स रे ऑब्जर्वेटरी द्वारे २००९ मध्ये या ब्लॅक होलचे एक्स-रे फोटो काढले गेले.
हायड्रा सर्प म्हणजे हा तारकासमुह जिथे संपतो,. तिथेच एक आकाशगंगा देखील आहे जिला Southern Pinwheel Galaxy या नावाने ओळखले जाते. ही द्वीकेंद्री वर्तुळाकार आकाशगंगा पृथ्वीपासुन १५ दशलक्ष प्रकाशवर्षे इतकी दुर आहे. हिला सदर्न पिनव्हील आकाशगंगा म्हणण्याचे कारण असे की, ही सप्तर्षीमधील पिनव्हील आकाशगंगेसारखी भासते.
हबल स्पेस टेलीस्कोप मधुन घेतलेले हे या आकाशगंगेचे छायाचित्र
अशा प्रकारे आपण कर्क तारकासमुहामधील पुनर्वसु,पुष्य व आश्लेषा व हायड्रा संबंधी माहिती घेतली.
भेटुया पुन्हा, एका नवीन आकाशातील चित्तरकथेसोबत.
आपला
हेमंत सिताराम ववले,
निसर्गशाळा, पुणे