साध्या सोप्या नैसर्गिक पध्दतीने उपवन कसे बनवता येऊ शकते?

प्रत्येकालाच प्रपंच आहे, दैनंदिन कामे आहेत. कुटूंबाला देखील वेळ द्यावाच लागतो. मित्र मंडळी, नातेवाईक असे सगळे असताना या निसर्गासाठी वेळ काढणे कठीण होऊन. आपण एकतर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी वेळ काढतो नाहीतर काही विरंगुळा करुन वेळ घालवतो. निसर्गासाठी नक्की काय करता येईल याचे नेमके दिशादर्शन नसते. किंवा असले तरी तज्ञ ज्ञान नसते. यामुळे अनेकदा इच्छा असुनसुध्दा आपण पावसाळ्यात एखाद दोन झाडे लावण्यापलीकडे जास्त काही करु शकत नाही. यातुन फार फार तर समाधान मिळते.
अधिक परिणामकारक काम ते देखील स्वतःकडे उपलब्ध वेळेमध्येच कसे करता व त्यासाठी फार विशेष ज्ञान किंवा कौशल्य देखील लागणार नाही असे ठोस काम कसे करता येईल बरे?

तुमच्या कडे स्वतःची , एखाद्या शाळेची, संस्थेची अथवा सामाजिक, सरकारी जागा असेल व त्या जागेत तुम्हाला छोटेसे उपवन करण्याची इच्छा असेल तर ते कसे करता येऊ शकते? काय यासाठी खुप कौशल्य अथवा ज्ञान, अनुभव असावा लागतो का?

तर नाही. हे काम अगदी सोपे आहे. यासाठी निसर्गाचेच अनुकरण करावयाचे आहे. आम्ही आमच्या कॅम्पसाईट वर हे काम नेमके कसे करीत आहोत हे समजुन घेण्यासाठी खालील विडीयो पहा. यात काम करता करता मी माहिती देखील सांगितली आहे.

आमच्या भागात आहेत पण आमच्या जागेत नाहीत अशा झाडांची रोपे, बिया मृग नक्षत्रात लावणे. ग्रामीण भागात असे म्हंटले जाते की या नक्षत्रात लावलेली फांदीसुध्दा जीव धरते, बहरते. याचा अनुभव आम्ही घेतला आहे. फांद्या लावुन जगणा-या वड, पिंपळ, पिपर, पिपरन अशा अनेक झाडांच्या फांद्या आम्ही लावल्या व निसर्गाने त्या जगवल्या. या वर्षी अधिकच्या वीसेक फांद्या लावल्या. रानात फिरुन कोकम, भेरली माड, हिरडा, अहिन, रायवळ आंबा, फणस, जांभुळ, अळु, करवंद अशी अनेक झाडांच्या बिया देखील लावल्या. गावात फिरताना अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेने, घरांच्या बाहेर उगवलेली फणसाची, आंब्याची रोपे दिसतात आम्ही ती गोळा करुन आणतो व आमच्या परिसरात लावतो. उन्हाळ्यात पाणी देण्याची गरज नाही. ज्या जागेत उपवन बनवीत आहोत त्यात आम्ही उत्पन्नासाठी बांबु देखील लावले आहेत. पुढेजाऊन बांबुंना देखील या झाडांचा खुप फायदा होऊन, उत्पन्न वाढेल. गाई-गुरांना चरण्यास आम्ही मनाई करीत नाही. यामुळे देखील नैसर्गिक रित्या शेणखत-गोमुत्र जमिनीला मिळते. तसेच वणवा न लागु दिल्याने मागील वर्षीचा पाला-पाचोळा, गवत याचे देखील या पावसात चांगले सेंद्रीय खत आपोआप बनते. याची लक्षणे गांडुळांचा वावर वाढण्यात दिसतात तसेच विविध अळंबी देखील उगवल्या आहेत. आमच्याकडे काजव्यांचा वावर देखील अधिक प्रमाणात जाणवु लागला आहे.

यात करण्यासारखी कामे म्हणजे वणवा रोखणे व स्थानिक झाडा-झुडपांची रोपे-बिया लावणे. व मग निसर्ग आपोआप या रोपांना जगवण्याचे, वाढवण्याचे काम करतो. सविस्तर माहिती, झाडांची नावे वगैरे तुम्हाला विडीयो मध्ये समजेल.

तुमचा अभिप्राय, काही सुधारणा सांगावयाच्या असतील तर अवश्य सांगा.

धन्यवाद

हेमंत ववले’

निसर्गशाळा, पुणे

Facebook Comments

Share this if you like it..