रंग खेळण्यासाठी नैसर्गिक रंग कसे बनवावेत?

नैसर्गिक रंग कसे बनवायचे?

पार्श्वभुमी

वसंत ऋतु येतो तशी ही धरा नानाविध रंगांत रंगुन जाते. त्यातही सर्वात जास्त मोहक रंग असतो तो केसरी, पिवळा, लालभडक. हे सारे रंग निसर्गामध्ये विविध वृक्षांच्या फुलांचे असतात. याच्याच आधारे आपण रंगपंचमी, होळी, धुलवड अशा सणांमध्ये आवर्जुन पुर्वापार याच फुलांपासुन बनविलेला रंग वापरला जायचा. जंगलेच्या जंगले अशा विविध रंगांच्या फुलांनी पुर्वी बहरुन जायची. एका गावाचे नाव तर चक्क अशाच एका झाडाच्या जंगलामुळे चक्क प्लासी पडले. प्लासी आठवतेय का? प्लासीची लढाई, इ.इ..प्लासी हा इंग्रजांनी केलेला पलास/पलाश या शब्दाचा अपभ्रंश आहे. तर मुद्दा असा की आपल्या दुर्दैवाने व आपल्या कर्मदारिद्र्याने आपण आपले हे वैभव गमावुन बसलो आहोत. दशकांच्या अमर्याद वृक्षतोडीनंतर मोजकीच काय ती झाडे शिल्लक आहेत. नेमक्याच काळात (फेब्रु,मार्च,एप्रिल) वाळलेल्या सुकलेल्या रानावनातील गवताला अनावधानाने अथवा मुद्दामहुन पेटवुन दिले जाते. यामुळे या वृक्षांच्या नवनवीन रोपांची वाढच होत नाही. परिणामी जेवढे मोठे वृक्ष आहेत तेवढेच काय ते आता शिल्लक आहेत. या अस्सल देशी वृक्षांची संख्या वाढण्यासाठी आपण प्रत्यक्ष झाडे नाही लावली तरी चालणार आहे पण निसर्ग स्वतःच जी नवनिर्मिती करीत आहे त्यात वणवा, उत्खणन आदी द्वारे ह्स्तक्षेप जरी नाही केला तरी निसर्ग आपोआप पुन्हा एकदा बहरुन येईल.

असो, आजचा आपला विषय आहे या वसंत ऋतुमधील होळी, रंगपंचमी, धुलवड आदी सणावारांमध्ये रंग खेळण्याच्या व नैसर्गिक रंग बनविण्याच्या विधी विषयी जाणुन घेणे.

रंग का खेळायचा?

सर्वप्रथम आपण हे जाणुन घेऊयात की रंगपंचमी व एकुणच वसंतोत्सवात रंग का खेळतात?
वसंतोत्सव ज्याप्रमाणे नव्या पालवीची चाहुल देतो त्याचप्रमाणे तो तप्त होत जाणा-या उष्म्याची देखील जाणीव करुन देतो. रानवने लाल, पिवळ्या, केसरी फुलांनी बहरलेली असतात. निसर्गातील हा रंगोत्सव भारतीय जनसामान्यांनी देखील संस्कृतीमध्ये आत्मसात केला नाही तरच नवल. रंगांच्या छटा जशा निसर्गात असतात तशाच आपल्या जीवनात देखील असाव्यात. रंगीबिरंगी होणे म्हणजे स्वतःला विसरुन जाणे. इतरांच्या रंगात रंगुन जाण्यासाठी आपल्या मनाची तयारी करणारा हा सण आपणास विनम्र करतो. इतरांच्या आयुष्यात रंग भरण्याचे महान काम करण्यासाठी आपण नेहमी तत्पर असावे. किती महान विचार आहे ना हा?

हा झाला एक (तत्वज्ञान व दर्शन) भाग तर दुसरा महत्वाचा भाग ऋतुमानाशी मिळते जुळते घेण्याचा संदेश देण्याचा आहे. उन्हाळा सुरु होत बदलतल्या तापमानाशी जुळते घेण्यासाठी रंग खेळण्याची प्रथा पुर्वापार सुरु आहे. होळी पोर्णिमे पासुन सुरु होणारा या सणाचा समारोप रंगपंचमीला होतो.

तर प्रथा अशी आहे की, होळी पोर्णिमेला होलिका दहन करायचे. त्याच्या दुस-या दिवशी म्हणजे धुळवडीला होळीची राख व धुळ एकमेकांच्या अंगावर टाकुन, पाणी टाकुन धुळवड खेळायची व रंगपंचमी च्या दिवशी नैसर्गिक रंग (पाण्यात) एकमेकांच्या अंगावर टाकुन रंगपंचमी साजरी करायची. चला तर मग आपण माहिती घेऊयात की हे नैसर्गिक रंग कसे बनवायचे.

नैसर्गिक रंग कसे बनवायचे?

केसरी/भगवा

याच दिवसांत पळस (लाल/पिवळा) यांची फुले जमिनीवर पडलेली असतात. या जमिनीवर पडलेल्या फुलांच्या पाकळ्यांपासुन रंग बनवितात. त्यातल्या त्यात केशरी लाल रंग पळसपासुन मुबलक बनविलला जायचा कारण हा पळस मुबलक असायचा. पळसाची फुले (जमिनीवर पडलेली व गोळा केलेली) रात्रभर पाण्यात भिजत ठेवल्याने रंग तयार. खुप सोप आहे. ही फुले गोळा करण्याचे काम मात्र रंग खेळण्याच्या काही दिवस आधी करावे लागेल.
पळस या वृक्षाविषयी सविस्तर माहिती घेण्यासाठी कृपया इथे क्लिक करा

भेंडी पासुन पिवळा

याची पिवळसर फुले असतात. खाण्याची भेंडी वेगळी व हे झाड वेगळे. या झाडाची फांदी लावली तर ती जगते. रंग करण्यासाठी शक्यतो अर्ध्या उमलेल्या कळ्या जास्त उपयोगी असतात. ताज्या फुल-कळ्यांच्या ठेचुन, मग कापडाने पिळुन पिळुन हा रंग केला जातो. आम्ही लहानपणी असा रंग केला आहे.

सावर/सायर पासुन लाल

काटे सावरीची बोंडे आता जम धरु लागलेली असतात तर झाडाखाली जमिनीवर फुलांचा सडा पडलेला असतो. ही फुले आत्ताच जमा करुन वाळवुन(सावलीत) जर पाण्यात भिजत टाकली तर लाल् भडक रंग तयार होतो. ही फुले गोळा करण्याचे काम मात्र रंग खेळण्याच्या काही दिवस आधी करावे लागेल.

झेंडु पासुन रंग

झेंडुच्या पाकळ्या पाण्यात उकळुन घेतल्यास पाकळ्यांच्या रंगाप्रमाणे ओला रंग तयार होतो. याच पाकळ्या जर सुकवून पावडर केली तर सुका रंग तयार होतो.

हळदी पासुन रंग

हळदीपासुन ओला रंग करण्यासाठी हळद पाण्यात मिसळले की झाले. तुम्हाला सुका म्हणजे पावडर करायची असेल तर हळदी मध्ये बेसन मिसळावे.

डाळींब / जास्वंद लाल रंग

वाळवुन त्याची पावडर केल्यास लाल सुका रंग तयार होतो. तसेच डाळींबाचे दाणे पाण्यात उकळले तरी देखील छान लाल रंग तयार होतो.

बीटापासुन गुलाबी रंग

बीटाचे बारीक तुकडे करुन पाण्यात बुडवुन ठेवल्यास ओला गुलाबी रंग तयार. तर कोरड्या गुलाबी रंगासाठी गुलाबाची फुले सुकवून त्यांची पावडर करावी.

मेंदी

ओल्या हिरव्या रंगासाठी मेंदीची सुकलेल्या पानाची पावडर म्हणजेच मेंदी पाण्यात मिसळावी. पालक , कोथिंबीर पुदीना चांगले वाटुन घेऊन, अथवा मिक्सर मधुन काढुन पाण्यात मिसळल्याने ओला हिरवा रंग तयार होतो. कोरड्या हिरव्या रंगासाठी मेंदीच्या पाने सुकवून त्याची पावडर बनवुन घ्यावी.

नैसर्गिक रंगच का खेळावेत?

वाढत्या लोकंसख्येची गरज पुरवणे तसेच औद्योगिकीकरणामुळे, उत्पादन क्षम बनल्यामुळे तसेच केवळ पैसे देऊन रंग विकत मिळत असल्याने नैसर्गिक रंग रंगपंचमी अथवा होळीला वापरण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसते. पण हे कारखान्यांमधेय बनणारे रंग नैसर्गिक तर नसतातच उलट ते आरोग्यास हानिकारक देखील असतात. सहज लक्षात येतील असे त्वचा व केसांछे नुकसान तर होतेच होते पण दुरगामी कॅन्सर सारख्या रोगांना आमंत्रण देखील या रासायनिक रंगानी मिळते. याउलट आपण वर पाहिलेले नैसर्गिक रंग अपायकारक तर नाहीतच उलट ते लाभदायक देखील आहेत.

इतर काय काळजी घ्यावी?

आपण भलेही नैसर्गिक रंग तयार करुन खेळलो तरीही चुकून इतर कुणी आपल्या अंगावर रासायनिक रंग टाकले तरी देखील आपण इच्छा नसताना ही या अनिष्ठास बळी पडतो. यासाठी आपण थोडी काळजी घेतली तर बरे होईल. ती खालील प्रमाणे

  • जाड कपडे शक्यतो रंग खेळताना वापरावेत
  • पुर्ण बाह्या असलेले सदरे/टॉप वापरावेत
  • आपल्या त्वचेचा जो भाग उघडा आहे व रंग लागु शकतो त्या भागावर आधीच तेल अथवा व्हॅसलिन लावावे म्हणजे रासायनिक तत्वांपासुन काही अंशी आपल्या त्वचेचे रक्षण होईल.
  • रंग खेळुन झाल्यावर शक्यतो लागलीच थंडगार पाण्याने आंघोळ करावी व रासायनिक रंग जर त्वचेस लागलेला असेल तर तो धुवून काढण्याचा प्रयत्न करावा.
  • रंग खेळताना डोके/केस टोपीने झाकलेले चांगले
  • अनेकदा सांगुनही समजत नाही अशा रासायनिक रंग वापरना-या मित्र-मैत्रिणींपासुन या दिवसांत लांब राहणे हिताचे होय.
  • एकमेकांच्या आयुष्यात रंग भरण्याचे काम म्हणजे एकमेकांना आनंद देण्याचे काम अगदी दररोज करण्याचे आहे. त्यामुळे याच एका दिवशी रंग लावला तर फार काही मोठे होईल असे नाही. रंग लावणे, खेळणे हा सामाजिक कार्यक्रम अथवा उत्सव नाहीये. हा वैयक्तिक , कुटूंब, समुहाचा उत्सव आहे. त्यामुळे मर्यादीत सदस्य संख्येमध्ये या उत्सवाचा आनंद घ्यावा तोही ओळखीच्याच लोकांसोबत.
  • त्याही पलीकडे जाऊन जर तुम्ही रंग न खेळण्याचे ठरवाल तर अधिक चांगले कारण तुम्ही असे करण्याने अनावश्यक गोंधळ कमी करीत असता, पाण्याचा अपव्यय कमी करीत असता, स्वतःच्या तसेच इतरांच्या आरोग्यास अपाय होण्यापासुन तुम्ही वाचवीत असता. पुर्वी पाण्याचे दुर्भिक्ष असायचे. गावखेड्यांमध्ये उन्हाच्या झळा जाणवायच्या. आता तसे नाहीये. सिमेंट कांक्रीटच्या इमारतीमध्ये राहणारे ,काम करणा-या आपणास आता उन्हापासुन ‘असे’ वाचण्याची गरज नाहीये. परंपरा जिंवत ठेवण्याच्या नादात त्या परंपरांमध्ये दोष निर्माण होताहेत व आपण रंग न खेळल्याने त्या दोषांचे भागीदार किमान आपण तरी होणार नाही हे देखील समाधान यातुन मिळते आहेच. त्यामुळे रंग न खेळता निसर्गाची रंगपंचमी उघड्या डोळ्यांनी पाहिलेली, ती वृध्दींगत होण्यासाठी सातत्याने काहीना काही प्रयत्न करीत राहिलेले, एकेक व्यक्तिस वणवा का लावु नये यासाठी जागरुक केलेले कधीही बरे नव्हे का? अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे, या म्हणजे शेवटच्या मुद्यशी / मताशी सहमत असलेच पाहिजे असे नाही.

चला तर मग मंडळी खेळुयात निसर्गाची रंगपंचमी, नैसर्गिक रंगांनी. लेख आवडल्यास अवश्य शेयर फॉरवर्ड करा.

आपला 
हेमंत ववले
निसर्गशाळा
whatsapp – 9049002053

Facebook Comments

Share this if you like it..