पदभ्रमण आणि किल्ल्यांवरील मुक्कामांचे विधीनिषेध

ट्रेक कसे करावे? काय आहेत ट्रेकिंगचे अद्याप न लिहिलेले नियम?

१९९४ मध्ये सुरु झालेले आमचे ट्रेकिंग आणि गडकिल्ले भटकंतीला आपोआपच आळा बसला, जेव्हा मी आय टी क्षेत्रामध्ये गेलो. सन २००२ पर्यंत छोटे छोटे ट्रेक तरी करीत असायचो कधी मित्रांसोबत तर कधी विद्यार्थ्यांसोबत. पण नंतर मात्र अजिबातच जमले नाही. करीयरच्या ओघामध्ये गडवाटा जणु अनोळखीच झाल्या. त्यानंतर २०१२ मध्ये एकदा, टेकमहिंद्रा मध्ये नोकरीत असताना हरिश्चंद्र गड करण्याचा योग आला. वैयक्तिक फिटनेस नव्हताच. त्यापुर्वी मी हरिश्चंद्रगड ४-५ वेळा सर केला होता विविध वाटांनी. पण यावेळी आमच्या ग्रुपमध्ये सर्वात शेवटचा, थकलेला गडी मीच होतो. कसाबसा गड चडुन मी गडावर, मुक्कामाच्या गुहेशेजारी पोहोचलो. पावसाळ्याचे दिवस होते. गडावर जणु जत्राच होती. किमान चार पाचशे लोक किल्ल्यावर मुक्कामाला असतील असे ती गर्दी पाहुन वाटले. आम्हाला मुक्कामाला जागाच मिळेना. कशीबशी एक छोटीशी गुफा शोधली व त्यात मुक्काम केला.

वर्ष २००२ , तिकोणा किल्ला, पुणे जिल्हा

 

Our Upcoming Events

Dec 12
Dec 13

दुस-या दिवशी सकाळी सकाळी गडावर जे दृश्य पाहिले ते पाहुन, मनोमन पुन्हा त्या गडावर जायचेच नाही असे ठरवले. जे काही लोक मुक्कामाला होते त्यापैकी अक्षरशः एकाला देखील गड-किल्ल्यांचे विधीनिशेष माहित नव्हते. मल=मुत्र विसर्जन तस पाहता अगदी स्वाभाविक व नैसर्गिक क्रिया आहे. पण त्या दिवशी गडावर लोकांनी अक्षरशः जागा मिळेल तेथे, उघड्यावर मल विसर्जन करताना पाहुन खुपच विचलीत झालो. आपण गड-किल्ल्यांवर जातो कशासाठी? सह्याद्रीच्या विराट रुपाचे दर्शन घेऊन आपलेही जीवन असेच उन्नत व स्थिर करण्याची प्रेरणा कित्येकांना या ट्रेकिंगमधुन मिळत असते.

Hemant Vavale - Camping near Pune
वेल्ह्यातील गोप्या घाटाच्या माथ्यावर - वर्ष २००७

पण जेव्हा गड-किल्ल्यांच्या मस्तकांवर अशा प्रकारे कुठेही मलमुत्राचा अभिषेक होत असेल व त्यामुळे दुर्गंधी व घाण पसरत असेल तर अशा सह्याद्रीतील स्वर्गाकडे जाण्याचे इच्छा कधी होणारच नाही

आपण किल्ल्यांवर जातो कशासाठी, सुंदर निसर्गाचा अस्वाद घेण्यासाठी कि सुंदर असलेल्या निसर्गाला विद्रुप, घाणेरडा करण्यासाठी?

मागील महिन्यामध्ये राजगडाचा बालेकिल्ला वणव्यात जळाला. आणि दरवर्षी हे असे होतच असते. मी दरवर्षी राजगड, तोरणा या किल्ल्यांना जळताना पाहतो. आणि अगतिक होऊन पुढे निघुन जातो. गड किल्ल्यांवर ही जी आग लागते त्याचे कारण देखील निसर्गाच्या अलिखित नियमांची माहिती नसणे हे आहे. किल्ल्यावर मुक्काम केल्यावर दगडांच्या चुलीवर स्वयंपाक करावा लागतो. कित्येकदा शेकोटी पेटवली जाते. या चुल व शेकोटी मुळेच जास्त करुन किल्ल्याच्या डोंगरांना आग लागते. ज्या गड किल्ल्यांकडे आपण दैवत म्हणुन पाहतो, छत्रपती शिवरायांचे अधिष्टाण म्हणुन गड-किल्ल्यांना आपण वंदन करतो, ज्या गड–किल्ल्यांच्या अंगभुत नैसर्गिक सौंदर्याकडे पाहुन आपण मोहीत होतो, त्याच किल्ल्यांना आपणामुळे वणवा लागतो. वणवा लागल्यामुळे निसर्गाचे जेवढे नुकसान होते तेवढे अन्य कशानेही होत नाही. मागील पावसाळ्यात जर एखादे रोपटे जन्माला आले असेल तर फेब्र-मार्च पर्यंत वीतभर तरी वाढलेले असते. त्या रोपट्यास यापुढे पाण्याची देखील आवश्यकता नसते. त्याची मुळे जमिनीत खोलवर गेलेली असतात. पण अशातच जर वणवा लागला तर ते ठामपणे, ऊन वारा अंगावर घेणारे रोपटे वणव्यात अक्षरशः होरपळुन जाते. आणि दरवर्षी अगदी हेच होतेय. त्यामुळेच आपणास किल्ल्यांवर नवीन झाडे, वृक्ष तयार झालेले दिसत नाहीत. सह्याद्रीमध्ये भटकंती करताना जर तुम्हाला वणवा पेटलेला दिसला तर त्वरीत १९२६ (1926) या फॉरेस्ट हेल्पलाईन वर फोन करुन वर्दी द्यावी.

दौलताबाद किल्ल्यास लागलेल्या वणव्याचा फोटो

आपण किल्ल्यांवर जातो कशासाठी, सुंदर निसर्गाचा अस्वाद घेण्यासाठी कि सुंदर असलेल्या निसर्गाला विद्रुप, घाणेरडा करण्यासाठी? त्याचे नुकसान करण्यासाठी?

गड-किल्ल्यांवर प्लास्टीकचे खच सापडतात. दारुच्या बाटल्या सापडतात. काय हे?

काही निस्सीम निसर्गप्रेमी – दुस-यांनी केलेला कचरा साफ करताना

मग प्रश्न असा येतो की किल्ल्यांवर जास्त लोक जाण्यायेण्याने मलमुत्र विसर्जन किल्ल्यांवर होणारच, वणवे लागणारच, प्लास्टीकचे ढिग तयार होणारच तर काय लोकांनी किल्ले भटकंती करुच नये? अवश्य करावी. पण ती करताना खालील गोष्टींचे भान अवश्य ठेवावे. या लेखात मी जे पुढे लिहिणार आहे ते आजवर अलिखित नियम होते निसर्गाचे. निसर्गाचे विधीनिषेध होते. आपण सर्वांनी याचे काटेकोरपणे पालन करणे खुप आवश्यक आहे.

तुम्हाला ट्रेकिंगची आवड आहे? तुम्ही गडकोटांचा अभ्यास करता? तुम्हाला सह्याद्रीची भटकंती करायला आवडते? तुम्ही एखादा ट्रेकिंग ग्रुप चालवता? तुम्ही विविध ट्रेक ऑर्गनाईज करता? यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर हो असेल तर इथुन पुढ तुम्ही जे काही वाचणार आहात ते वचन तुम्ही स्वःतस सह्याद्रीला द्या. सह्याद्री नुसता दगड धोंड्याचा बनलेला नाहीये. त्यात चैतन्य आहे. त्याकडे शौर्य आहे, तो संवेदनशील आहे, तो रौर्द्र आहे, त्याकडे एक स्वतंत्र नवनिर्माणाची क्षमता आहे. सह्याद्री जिवंत आहे. व तुम्ही जर सह्याद्रीस वचन दिले तर सह्याद्री आनंदुन जाईल.

१. गड-किल्ल्यांवर, ट्रेकिंगला जाताना प्लास्टीक नेणे बंद करावे. आपला जो काही कचरा तयार होईल , तो आपण माघारी घेऊन यावे. कित्येकदा हॉल्स किंवा अशाच प्रकारच्या चॉकलेटचे रॅपर्स पायवाटांवर दिसतात. आपण किमान त्यात आणखी भर घालु नये.

ट्रेक कसे करावे? काय आहेत ट्रेकिंगचे अद्याप न लिहिलेले नियम?

२. सह्याद्रीचा कप्पा तयार करा. ज्येष्ट ट्रेकर श्री आनंद पाळंदेच्या डोंगरयात्रा नावाच्या, पुस्तकामध्ये त्यांनी एक खुप मुल्य असलेले वाक्य लिहिले आहे. “निसर्गातुन चालताना पावलाच्या ठश्यांशिवाय मागे काही ठेवु नका व सुखद आठवणींवाचुन काही नेऊ नका !”. मी यापुढे जाऊन आवाहन करतो सर्व ट्रेकर्सना कि चुकुन किल्ल्यावर काही प्लास्टीक सापडलेच, तर त्यातील थोडेतरी आपणासोबत शहरात घेऊन यावे. यासाठी आपल्या ट्रेकिंगच्या सॅक मध्ये एक खास कप्पा करावा, सह्याद्रीसाठी. व प्रत्येक वेळी किल्ल्यावरुन थोडा का होईना कचरा कमी करावा.

प्रफुल्लता प्रकाशनचे, आनंद पाळंदेंनी लिहिलेले पुस्तक डोंगरयात्रा

३. दगडाची चुल करताना, ती चुल मोकळ्या मैदानात करु नये., गवताच्या मैदांनापासुन, दुर अंतरावर चुल करावी. चुल पेटवण्याच्या अगोदरच चुलीच्या चारही बाजुंचे सर्व गवत काढुन घ्यावे. शेकोटी बाबतीत देखील असेच करावे. शक्य झाल्यास, हल्ली चुल करणे टाळावे. हल्ली अगदी छोटे छोटे , ने आण करण्यास सोपे व वजनाने हलके गॅस वर चालणारे स्टोव्ह सहज ऑनलाईन उपलब्ध होतात. शक्यतो त्यांचा वापर करावा. यामुळे आपण वृक्षतोडी देखील टाळु शकतो.

सह्याद्रीमध्ये भटकंती करताना जर तुम्हाला वणवा पेटलेला दिसला तर त्वरीत १९२६ (1926) या फॉरेस्ट हेल्पलाईन वर फोन करुन वर्दी द्यावी.
आजुबाजुचे गवत काढुन मगच चुल पेटवावी

४. ट्रेकिंगचा सदस्य संख्या नेहमी ८ पेक्षा जास्त होऊ द्यायची नाही. यामुळे जो कोणी म्होरक्या असतो, त्याला सर्वांवर लक्ष ठेवणे सोपे जाते. व अपघात टाळले जातात. मोहीमेचा एक म्होरक्या नक्की असावा. त्याचा शब्द शेवटचा असावा. काही बाबतीत सदस्यांचे मतभेद होऊ शकतात. पण म्होरक्या जो काही निर्णय घेईल तो सर्वांनी अमलात आणण्याची तयारी सदस्यांची असावी. म्होरक्या अनुभवी, इतिहास-भुगोलाविषयी माहिती असलेला, त्यातल्यात्यात जाणकार असावा. सर्वानुमते म्होरक्या ठरवणे, प्रत्येक ट्रेकच्या सुरुवातीच झाले पाहिजे. असे केल्याने सर्वच सदस्य म्होरक्याच्या नजरेच्या टप्प्यात राहतील व अपघात होण्यास प्रतिबंध बसेल. जास्त सदस्य संख्या असेल तर पुढे चालणारा व शेवटी चालणारा यांच्या मध्ये खुप मोठे अंतर पडते. आम्ही ट्रेकींगला सुरुवात केली तेव्हा म्होरक्या सोबतच प्रत्येक वाटचालीच्या वेळी सर्वात पुढे चालणारा जबाबदार मावळा व शेवटी चालणारा जबाबदार मावळा देखील नेमण्याचा प्रघात आनंद पाळंदे, गुलाब सपकाळ प्रभृतींनी घालुन दिला होता. आम्ही अजुनही ही प्रथा पाळतो. 

Camping helps you be a leader

Trekking helps you be a leader

५. स्थानिक बाल-वृध्दांना विनाकारण, त्यांच्यावर दया, करुणा येऊन कसलीही आर्थिक, वस्तुरुपात मदत करु नये. त्यांचे जीवन आपल्यपेक्षा शंभर पटींनी चांगले असते. शुध्द हवा, शुध्द पाणी, स्वःतच्या शेतातील शुध्द धान्य आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शुध्द विचार त्यांचे कडे आहेत. आलेला प्रत्येक ट्रेकर त्यांच्यासाठी पाहुणा असतो. व ते यजमान असतात.त्यामुळे यजमानाला यजमानाचा मान द्या. त्यांच्याशी अदबीने वागा, बोला. त्यांना आपल्या दया व करुणेची गरज नाहीये. गरज आपल्याला लागते त्यांची कधीतरी. स्थानिकांकडुन त्यांच्या घरी, चुलीवर बनवलेले जेवण विकत घेऊन जेवा, व त्याचा मोबदला त्यांना द्या. वाटाड्या म्ह्णुन स्थानिकांना तुम्ही थोडा का होईना रोजगार देऊ शकता. अगदीच हौस असेल मदत कार्य करायची तर, आपल्या सोबतच काही छोटी छोटी गोष्टींची पुस्तके ठेवा, व लहान मुलांना आवर्जुन भेट द्या. त्याही पेक्षा पुढे जाऊन तुम्ही भविष्यात देखील त्या गावाशी संपर्क ठेऊन, त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणखी काही करता येईल का ते पहावे. पण अन्य कसलीही तात्पुरती मदत करु नये. या मदतीने (उदा-मुलांस बिस्कीटे देणे) स्थानिकांचा दृष्टीकोण ट्रेकर्सविषयी बदलु शकतो. खाऊ वाटणारे ट्रेकर्स चांगले व न देणारे वाईट अशी त्यांची मनोभुमिका आपणच तयार करीत असतो. हो अगदी आपण जेवायला बसलो असेल तर आपल्यासोबतच आपल्या ताटातच त्यांनी जेवायला काही हरकत नाहीये. पण उगाचच दये पोटी, वस्तु, खाद्यपदार्थ इत्यादीचे वाटप करणे कुणाच्या ही काहीही हिताचे नाही.

६. नोंदवहीचा वापर करणे, आपल्या ट्रेकचा वृत्तांत लिहिणे व जतन करुन ठेवणे. किल्यांवरील अवशेष, वास्तुंचे निरीक्षण करणे व नोंदी करणे. यामुळे आपण कदाचित दडलेल्या इतिहासाचे नवीन पान लिहु शकतो. यामुळे आपल्या वारश्यामध्ये थोडीतरे भर नक्कीच पडेल. कोणती झाडे, वेली, वनस्पती दिसल्या याच्या नोंदी ठेवा. शक्य झाल्यास सोशल मीडीयावर पोस्ट करा. कदाचित तुम्हाला मिळालेली माहिती इतरांसाठी नवीन असेल व त्यामुळे सह्याद्रीचे नवीन रुप सर्वांसमोर येऊ शकते.

७. मोठ्या (कमीदेखील टाळावे) आवाजात गाणी लावु नयेत. नाचगाणे होऊ नये. त्याऐवजी गाण्यांच्या भेड्या खेळता येईल. वेगवेगळे मैदानी खेळ खेळावेत.

८. ट्रेकच्या म्होरक्याच्या परवानगी शिवाय, न ठरलेल्या कोणत्याच गोष्टी करु नये.

९. आता सर्वात महत्वाचा विषय तो म्हणजे मल-मुत्र विसर्जनाचा. यासाठी अगदी मुलभुत निसर्गाचा नियम आहे. तो जरी सर्वांनी पाळला तरी खुप झाले. कुत्रा-मांजर ज्या प्रमाणे मल विसर्जनांनंतर, विष्टा मातीने झाकुन टाकते, अगदी तीच पध्दत सर्वांनी वापरावी. शक्य असेल तर मल विसर्जन करण्यापुर्वी एखादा छोटास खड्डा करावा व त्यात विष्टा करावी. झाल्यावर एक दोन पावले पुढे सरकुन, मग पाण्याने स्वच्छता करावी. हे झाल्यावर मातीने विष्टा झाकावी. म्होरक्याने प्रत्येक सदस्याला याविषयी सविस्तर माहिती प्रत्येक ट्रेकच्या दरम्यान द्यावी. सतत आठवण करुन द्यावी. ट्रेकला मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यावर म्होरक्याने स्वःत थोडी माहिती घेऊन, गड फिरुन मल-विसर्जनाची जागा निश्चित करावी, जे पायवाटा, मंदीरे, गुहा, बुरुज, तटबंदी, वास्तु यापासुन दुर असेल व सुरक्षित देखील असेल. शक्यतो पाण्याच्या प्रवाहापासुन, टाक्यांपासुन दुर, व आपल्या मुक्कामाच्या जागे पासुन उताराच्या दिशेला शौचाची निश्चित करावी. जागा निश्चिती झाल्यावर सर्वांना त्यानुसार सुचना द्यावी. शौच धुण्यासाठी सदस्य जी पाण्याची बाटली नेतात, काही लोक ती बाटली तिथेच सोडुन देतात. असे कुणीही करु नये अशा सुचना म्होरक्याने आधीच द्याव्यात. आपण जी बाटली नेतो, कशी काय बरे घाण होईल आपण त्यातील पाण्याने स्वःतची संडास धुतली तर? ज्यांना स्वःतच्या विष्टेची व स्वःतच्या बाटलीची घाण वाटते, ट्रेकिंग त्यांच्यासाठी नसते. त्यांनी खुशाल घरी बसावे. सह्याद्री तुम्हाला आमंत्रण द्यायला आला नव्हता.

१०. पाऊसकाळामध्ये आवर्जुन स्थानिक झाडाझुडुपांच्या बिया गड-किल्ल्यांवर जमिनीखाली चारएक बोटे खाली पुराव्यात. व पुन्हा कधी त्या गडावर जाणे झाले तर अवश्य आपण लावलेल्या बीजापासुन जर झाड रोप आले असेल तर त्याच्या सोबत सेल्फी काढावा. 

११. अलीकडील काही वर्षांमध्ये पावसाळ्यामध्ये ट्रेकिंग करणा-यांची संख्या शंभरेक पटींनी वाढलेली आपणास दिसते.पर्यटन वाढ होणे हे आर्थिक विकासाचे, प्रगतीचे लक्षण आहे. हजारोंच्या संख्येने तरुण तरुणी अंधारबन, देवकुंड येथे अक्षरशः झुंबड उडवुन देतात. तरुणाईला साद देणारा सह्याद्री साद देण्यसोबत आव्हान देखील देत असतो. याच आव्हानांतुन नसते पराक्रम, धाडस करणा-याची संख्या, सेल्फी आणि रील स्टारची संख्या लक्षणीय रीत्या वाढलेली आपण पाहतो आहोत. एखाद्या धबधब्यासोबत एका विशिष्ट कोनातुन व्हिडीयो बनवता यावा यासाठी जीवावर उदार होणारे बहादर आपण पाहतोय. हे अतीआगाऊ, अतीशहाणे एकीकडे तर दुसरीकडे ट्रेकींगला ट्रॅकींग म्हणणारे व लिहिणारे देखील खुप वाढले आहेत. सह्याद्री सर्वांचे स्वागतच करतो पण सह्याद्रीचे , ट्रेकिंगचे अलिखित नियम माहिती नसताना जर कुणी चुक केलीच तर त्याला क्षमा इथे नसते. मागील दोन महिन्यांमध्ये (ऑगस्ट २०२३ मध्ये ११ वा मुद्दा समाविष्ट केला आहे) धबधबे, धरणे, टाकी, किल्ले असे सर्वत्र अनेक अपघात झाले आणि अनेकांनी जीव गमावले. याला जबाबदार कोण? सह्याद्री? अज्जिबात नाही. याला जबाबदार जीव गमावणारे स्वतः आहेत, कारण त्यांनी सह्याद्री समजुन घेतलाच नाही. इंस्टाग्राम वर रील पाहुन ट्रेकिंग ला आलेले हे तरुण नाहक स्वतच्या प्राणास मुकले. अगदी १५ ऑगस्ट च्या दिवशी देखील आपल्या राजगडावर एकाने आणि त्याच्याच बाजुला असलेल्या भाटघर जलाशयात दोघांनी जीव गमावले. हे मृत्यु दुर्दैवी आहेत, असे होऊ नये. यासाठी आपण म्हणजे किमान ज्यांचे सह्याद्री प्रेम आहे अशा सर्वांनी जमेल तसे इतरांस सह्याद्री साक्षर करणे गरजेचे आहे.

आम्ही देखील मागील पाच दिवस अनेक निसर्गप्रेमींना निसर्गपर्यटनाचा अनुभव आणि आनंद दिला. त्या पैकी एक प्रसंग सांगतो. आम्हाला घनगड किल्ल्यावर जायचे होते. किल्ल्यावर जाण्याचा बेत दोन महिने आधीच ठरला. दरम्यान आठ दिवसांपुर्वी घनगडाच्या बालेकिल्ल्यावर जाणारी चढी पायवाट ढासळल्याचे मला समजले. त्यामुळे तिथे गेल्यावर मी सर्वांना समजावुन सांगितले की वर जाणे धोकादायक आहे, फॉल झाला तर अरेस्ट करण्यासाठीची सुरक्षा यंत्रणा आपल्याकडे नाहीये व तसे तज्ञ मनुष्यबळ देखील नाही, सर्वांना मी सांगितलेले समजले आणि कसलाही आग्रह, हट्ट न करता आम्ही बालेकिल्ला सर न करताच खाली उतरलो. यात कमीपणा किंवा जिंकणे हारणे असे काहीही नसते. सह्याद्री आपणास त्याचे बेलाग कडे दाखवुन आव्हान देतो खरा पण चुकुनही आपण स्वतः सुरक्षा साधनांशिवाय सह्याद्रीला आव्हान देऊ नये.

मला सुचलेले, माझ्या अनुभवातुन, ज्येष्टांच्या अनुकरणातुन मी वरील काही नियम लिहिले आहेत. यापेक्षा अधिक काही तुम्हाला सुचवायचे असेल तर अवश्य कमेंट मध्ये लिहा. मी तुमच्या नावासहीत मुळ लेखामध्ये तसे बदल करुन लिहिन.

सह्याद्रीचे, गडकोटांचे पावित्र्य राखणे आपलेच काम आहे. व आपणच ते करावे. जे कोणी गडकोटांच्या संवर्धनाच्या कामामध्ये सहभागी होतात, त्यांच्यासाठी खालील व्हिडीयो. अवश्य पहा. जिथे संवर्धनाच्या कामासाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत, तेथे खालील प्रमाणे पर्यावरण पुरक संडासे उभारली जाऊ शकतात.

लेख अवश्य शेयर करा, आपल्या मित्र परिवारासोबत. सह्याद्री व गडकोटांच्या पावित्र्यासाठी. 

 

आम्ही केलेल्या एका ट्रेकचा विडीयो अवश्य पहा

सह्याद्रीतील सर्वात उंच किल्ला साल्हेर व सालोटाची भटकंती

 

निसर्गशाळा म्हणजे काय हे जाणुन घेण्यासाठी इथे क्लिक करा

कळावे

हेमंत ववले

९०४९००२०५३

(Author of these articles is a former teacher, IT professional, corporate trainer, content writer and he runs an enterprise near Pune, called as nisargshala. @ nisargshala, city dwellers from Pune, Mumbai,Hyderabad, Ahmedabad, Solapur come and spend time in real nature engaed in varied activities like camping, trail running, hiking, trekking, rappelling, waterfall rappelling, stargazing Stargazing Parties, BBQ. This place is good for families and especially good for kids as they get first hand experience of nature under expert guidance of HemantYashdeep and Sanjay)

निसर्गशाळेच्या या कोर्स विषयी तुम्हाला माहिती आहे का?

निसर्गपर्यटन म्हंजी काय रे भौ ?
पुढचा काळ अस म्हणता म्हणता ‘तो’ पुढचा काळ आलादेखील. आज समाज पर्यावरणाप्रती खुपच सजग होत आहे. त्यामुळे पर्यावरणास कसलीही हानी होऊ न देणा-या पर्यटन केंद्रांकडे, रीसॉर्ट्स कडे आजकाल पर्यटकांचा ओढा वाढलेला दिसतो आहे. अतिशय योग्य पध्दतीने , इको टुरिझम च्या मुळ तत्वांवर आधारीत विकसीत केलेल्या रीसॉर्ट्स, फार्म स्टे, होम स्टे इ मध्ये किमान एकेक महिना आधी बुकिंग करावे लागत आहे.
अतिशय सकारात्मक चित्र असताना दुसरीकडे मात्र एक असाही व्यावसयिक वर्ग आहे की ज्याचे अजुन लक्षच गेलेलं नाही. पर्यावरण पुरक म्हणजे नेमके काय याची पुसटशी देखील कल्पना अनेकांना नाहीये. ही माहिती नसल्याने अनेक रीसॉर्ट मालक, व्यावसायिक खुप मोठ्या संधीपासुन दुर आहेत.
मानवी उच्च-जीवनमुल्ये , स्थानिक संस्कृती आणि पर्यावरण संरक्षण संवर्धन यांची अत्युच्च दर्ज्याची सांगड म्हणजे निसर्गपर्यटन होय. यात जसा मनुष्य मग तो पर्यटक असो वा पर्यटन सेवा देणारा असो, त्या पर्यटन केंद्रात काम करणारा कर्मचारी असो वा एखादा स्थानिक मजुर , गवंडी असो, स्थानिक झाडं-झुडप असो , प्राणी जगत असो वा सुक्ष्मजीव जगत असो, निसर्गपर्यटनामध्ये सर्वांचेच हित साधले जाते.
निसर्गशाळा घेऊन आले आहेत निसर्गपर्यटनाचा एक सखोल, अनुभवसिद्ध असा अभ्यासक्रम, प्रशिक्षण . अधिक माहिती साठी कृपया खालील poster वर क्लिक करा.
Facebook Comments

Share this if you like it..