काजवे म्हणजे काय? ते चमकतात कसे? त्याचे जीवनचक्र कसे असते? काजवे खातात काय?

निसर्गशाळेच्या एका सहलीमध्ये छायाचित्रकार डॉ. हिमांशु पांडव यांनी टिपलेले काजव्यांचे छायाचित्र

काजवे म्हणजे काय?

संपुर्ण ज्ञात सृष्टीमध्ये काही मोजकेच जीव आहेत की जे स्वयं प्रकाशमान आहेत. आणि काजवा हा त्यातील किटक प्रजातीमधील एक छोटासा जीव. यांचे असणे म्हणजे एका निरोगी, सुदृढ, परिपुर्ण, जैववैविध्य असलेल्या पर्यावरणाचे लक्षण होय.  जीवशास्त्राच्या भाषेत काजव्यास Lampyridae असे म्हणतात. खर तर काजवे जगभर आढळतात. तरीही त्यांचे अब्जावधींच्या संख्येने वास्तव्य उष्णकटीबंधीय प्रदेशात असते. त्यांच्या चमकण्याचे अनेक कारणे असु शकतात. पुनरुत्पादन आणि भक्ष पकडणे हे त्यातील दोन मुख्य कारणे आहेत.

पश्चिम घाटात दिसणरा काजवा असा आहे

Click here to read article in English

जगभरात वैज्ञानिकांस काजव्यांच्या २००० पेक्षा जास्त प्रजाती आजतागायत सापडल्या आहेत. साधारणपणॅ जिथे मुबलक प्रमाणात पाणी, जंगल आणि मोठाले वृक्ष असतील अशा वातावरणामध्ये काजवे वाढतात. काजव्यांच्या पुनरुत्पादन साखळी मध्ये, काजव्याची पिल्ले की जी सुरुवातीस अळी सारखी असतात, त्या पिल्लांना अशा वातावरणात मुबलक अन्न मिळते.

काजव्यांचे जीवनचक्र

समागमानंतर काही दिवसांनी, मादी काजवा अंडी घालते. ही अंडी जमिनीमध्ये किंवा जमिनीच्या अगदी थोडेसे खाली लपवली जातात. अंदाजे ३ ते ४ आठवड्यात, या अंड्यांमधुन अळी बाहेर येतात. या अळ्या म्हणजेच भविष्यातील काजवे.

नुकताच मी निसर्गशाळा कॅम्पसाईटच्या गवताळ मैदानात काजव्याची अळई/अळी पाहीली. पिवळसर रंगाच्या या अळीच्या पोटाच्या/शरीराच्या शेवटच्या कप्प्याला प्रकाशित होणारा भाग दिसत आहे. खालील विडीयो पहा.

जोपर्यंत ह्या अळया, प्रौढ काजवे बनत नाहीत तोवर यांचा आहार प्रामुख्याने गोगलगाय असतो. गोगलगाय असे आपण ढोबळमानाने म्हणतो यातही अनेक जाती-प्रजाती आहेत. कवच असलेल्या आणि कवच नसलेल्या मुख्य दोन. काजव्यांच्या अळ्या या दोन्ही प्रकारच्या गोगलगायांना खातात. एखाद्या अळईचे काजव्यामध्ये रुपांतर झाल्यावर मात्र काजवे पाने फुले फुलातील परागकण इत्यादी खातात. म्हणजे अळई असताना लुसलुशीत मांसाहार करणा-या अळ्या पौढ काजवे झाल्यावर मात्र चक्क शाकाहारी बनतात. पण सगळेच काजवे असेच काहीतरी खातात असे नाही. काही प्रौढ मादी काजवे चक्क दुस-या प्रजातीच्या नर काजव्यांना देखील गट्टम करतात. आहार प्रजाती व तेथील पर्यावरणावर अवलंबुन असतो.

वर्षभर काजवे काय करतात?

सह्याद्रीचा विचार केला तर आपणास सह्याद्री मध्ये अनेक प्रकारच्या प्रजातीचे काजवे दिसतील. यातील खुप मोठ्या संख्येने जे दिसतात ते पाऊस पडायला सुरुवात झाली की नाहिसे होतात. कोणत्याही काजव्याच्या अळीचे काजव्यात रुपांतर झाल्यानंतर, त्याअ प्रौढ काजव्याचे आयुष्य साधारण दोन ते तीन आठवड्यांचेच असते. आपण जर कधी मे महिन्याच्या शेवटास किंवा जुन च्या पहिल्या आठवड्यात ट्रेक ला गेलो असेल तर आपण लाखोंच्या संख्येने काजवे चमकताना पाहिलेले आठवत असेल. पण हे काजवे जुनच्या मध्यानंतर नाहिसे होतात. हो अगदी सर्वच्या सर्व. नर आणि मादी देखील. जुनच्या पहिल्या आठवड्यात यांचा विणीचा हंगाम सुरु होतो. त्यानंतर मादी ने अंडी  दिली की काजवे एकतर पावसाच्या तडाख्याने मरतात किंवा दुस-या एखाद्या किटक किंवा पक्षाचे भक्ष बनतात.

त्यांच्या मरण्याचे आणखी काही कारण आहे का याचे संशोधन अजुन व्हायचे आहे. प्रौढावस्थेमधील काजवा नक्की किती दिवस जगतो याबाबतील अभ्यासकांमध्ये अजुनही मतभेद आहेत. पण आपल्या सह्याद्रीचा विचार केला असतात हे मात्र नक्की, की आपल्याकडील काजव्यांचे जीवनमान एक वर्षा पेक्षा थोडेसे जास्त असते. त्याही जीवनमानामध्ये, काजवा जास्त काळ अळई च्या रुपात घालवतो व शेवटचे काही आठवडे तो पुर्ण विकसित असा काजवा होऊन पंखाच्या सहाय्याने उडाण घेतो.

एका साध्या मोबाईल मध्ये शुट केलेला हा विडीयो पहा. तज्ञ फोटोग्राफर्स अधिक चांगले शुटिंग करु शकतील. तुमच्या मोबाईल स्क्र्रन चा ब्राईटनेस वाढवुन विडीयो पहा.

काजवे चमकतात कसे काय?

काजव्यांमध्ये नर आणि मादी दोघे ही चमकतात. आपण जे काजवे झाडावर, हवेत उडताना पाह्तो ते नर काजवे असतात. तर मादी काजवे शक्यतो जमीनीवर असतात व ते योग्य त्या नर काजव्याची वाट पाहत असतात. आपला सुयोग्य साथीदार ओळखण्यासाठी काजवे त्यांच्या चमकण्याच्या, प्रकाश उत्सर्जित करण्याच्या क्षमतेचा उपयोग करतात. मादी काजवे देखील जमीनीवरुन लुकलुकताना दिसतात. मादीच्या चमकण्याच्या पध्दतीमुळे नर काजव्याला मादी कुठे आहे ते समजते. कधीकधी काही दुस-या जातीचे काजवे देखील मादीच्या लुकलुक करण्याच्या पध्दतीची नक्कल करुन नर काजव्यास आकर्षित करुन घेतात व्व एकदा का नर काजवा जवळ आला की त्याला खाऊन टाकतात.


मृगाचा किडा किंवा गोसावी किडा म्हणजेच रेड वेल्वेट माईट व त्यांच्या जीवनचक्राविषयी रोचक माहिती जाणुन घेण्यासाठी इथे क्लिक करा. या किड्यांची प्रणयबाग विशेष आहे.


पण काजवे चमकतात तरी कसे? काजव्या मध्ये पोटाच्या शेवटच्या दोन घड्यांमध्ये , आतल्या बाजुने पोटात ल्युसीफेरीन नावाचे एक रसायन असते. ल्युसीफेरेज नावाचे उत्प्रेरक देखील असते. त्यांच्या पोटाला छिद्र असतात, ज्यातुन ऑक्सिजन पोटात जातो. त्या प्राणवायुची रसायनासोबत, उत्प्रेरकाच्या उपस्थितीमध्ये प्रक्रिया होऊन, प्रकाश उत्सर्जित होतो. जरी प्रकाश तयार होत असला तरी हा प्रकाश मंद असल्याने थंडच असतो. त्याचे तापमान खुपच कमी असते. तर अशी प्रकाश निर्माण करण्याची क्षमता फक्त प्रौढ काजव्यांअध्येच असते असे नाही तर काजव्यांच्या अळयांअध्ये देखील अशी रचना असते की ज्यामुळे त्या अळयादेखील प्रकाशमान होतात. वरील एका विडीयो मध्ये तुम्हाला आपल्याच कॅम्पसाईटवरील एक काजव्याच्या अळीचा विडीयो मध्ये प्रकाश उत्सर्जित करणारी अळी दिसेल.

अमेरिकेमध्ये, या सगळ्या ज्ञानाचा उपयोग करुन, प्रयोगशाळेमध्ये या रसायनांद्वारे प्रकाश निर्माण करता येईल का या विषयी संशोधन सुरु आहे.


पुण्याच्या जवळ काजवे पाहण्यासाठी कुठे जाल?

अर्थातच पुणे शहरात काजवा दिसणे म्हणजे दिवसा तारे दिसण्यासारखे आहे. पण तुम्हाला जर खरच काजवे पहायचे असतील तर पुण्याच्या जवळ नक्की कुठे गेले म्हणजे काजवे पाहता येईल? हे आपण आता समजुन घेण्याच्या प्रयत्न करुयात.

पुण्याच्या अगदी चारही दिशांना , जिथे जंगल आहे अशा ठिकाणी तुम्ही गेलात तर तुम्हाला काजवे पाहता येतील. काजवे पाहण्यासाठी तुमची अंधारात तास दोन तास चालण्याची तयारी असायला हवी. अगदी जवळच्या जवळ जायचे असेल तर मुळशी गाठा. मुळशीतील अंधारबन, गोठे गावाच्या मागील जंगल, भांबर्डे गाव, घनगड किल्ला जंगल परीसर इ ठिकाणी काजवे नक्की आढळतात.

त्या व्यतिरिक्त, पवन मावळात तुंग किल्ला परीसर, लोणावळा परीसर इ ठिकाणी काजवे पाहता येतील. वेल्हे तालुका तर काजव्यांसाठी अजुनही नंदनवन आहे. इथे मढे घाटाखालील जंगल, भोर्डीची देवराई, पिशवीचा राठ, कोलंबीचा राठ अशा ठिकाणी काजव्यांचे थवेथवेच्या दिसतात. वेल्हे तालुक्यामध्येच आमची कॅम्पसाईट आहे.

पण लक्षात ठेवा…

काही महत्वाच्या सुचना

 • काजवे पहायला जायचे म्हणजे ज्या परीसरात जाणार आहे त्या परीसरातील खडा-न-खडा माहिती असणे आवश्यक आहे.
 • कारण भटकंती अंधारातच करावी लागते.
 • तुम्हाला परीसराची माहिती नसेल तर अनोळखी ठिकाणी काजवे पहायला जाणे टाळावे.
 • अकारण मोठाले टॉर्च लावु नका.
 • काजवे ज्या ठिकाणी असतील त्यापासुन गाडी किमान ५०० मीटर अंतरावर पार्क करा.
 • आरडा-ओरडा अजिबात करु नका.
 • काजवे पहायला गेल्यावर, तुमच्या मार्गदर्शकाच्या सांगण्यानुसार आपली योग्य-सुरक्षित जागा शोधुन काजव्यांचे चमकणे शांत पणे पाहत बसा.
 • किमान २०-३० मिनिटे तरी तुम्ही शांत पणे काजवे पहावेत. व झाल्यावर तसेच शांतपणे आपापल्या गाडीच्या दिशेने,  न बोलता, टॉर्च न लावता चालत यावे.

कळावे,

आपलाच

हेमंत ववले

Mobile / Whatsapp – 9049002053

hemantvavale@gmail.com

Author of this article is the owner of nisargshala enterprise and runs this enterprise to offer real, raw nature experiences to city dwellers in a controlled and safe way. People from city can come to campsite with family and friends to get connected with mother nature. With the help of varied activities like camping, rappelling, waterfall rappelling, trekking, hiking, one with nature you can have the bond with mother nature reestablished. The campsite is 70 kms from Pune toward southwest; in Velhe Taluka of Pune district. Please visit homepage for more information.


Video – A Firefly’s Life

काजव्यांचे जीवनचक्र एका गाण्यात दाखवण्यात आले आहे. अर्थात हा या मध्ये दिसणारे काजवे आपल्या भागातील नाहीत. पण गाण्याच्या रुपात हे पाहताना ऐकताना गम्मत वाटते. मुलांना हे सारे विशेष करुन आवडेल.

Facebook Comments

Share this if you like it..

5 thoughts on “काजवे म्हणजे काय? ते चमकतात कसे? त्याचे जीवनचक्र कसे असते? काजवे खातात काय?

  1. Hemant Post author

   Thanks Ajit. Our next camping trip to see fire flies is on 2nd of June. You ca call me on 9049002053 for more information

 1. मालन

  छान माहिती आहे.पुस्तकी ज्ञानाला पुरेसे स्व अनुभवाची पण जोड हवीच असते.अध्ययन अध्यापन प्रक्रिया प्रभावी होण्यासाठी विद्यार्थ्यांना निसर्गाशी नाते जोडून घ्यावा हवे.नक्कीच त्यासाठी योग्य मार्गदर्शन करणारे शिक्षक हवे….. निसर्ग ..ह्वा शिवाय दुसरा उत्तम गुरू नाही….सर्वींना मातीशी नाते जोडत यायला हवे……. तशी तुमची निसर्गशाळा 👍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *