आपण म्हणतो की मनुष्य एक समाजप्रिय प्राणी आहे. सोशल स्पेसीज!
आपण खरोखर असे समाज-शील , समुहात राहणारे, एकमेकांना पुरक राहिलो आहोत का? एक मनुष्य म्हणुन खरतर प्रत्येकाने हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे.
परिस्थिती उत्साहवर्धक जरी नसली तरी अगदीच निराशावादी चित्र नाहीये हे मात्र नक्की. कारण मनुष्य जसा समाजशील आहे तसाच तो निसर्गातील इतर घटक, प्राणी यांच्याकडे पाहुन आजवर खुप काही शिकला आहे. सध्या शिकत आहे आणि भविष्यात देखील शिकत राहिल यात शंका नाही. पण त्यासाठी आपण निसर्गाशी जोडलो गेलो तरच हे शक्य होईल.
खालील व्हिडीयो मध्ये दिसणारे दृश्य सह्याद्रीमधील भटक्यांसाठी काही नवीन नाहीये मित्रांनो. ज्याने ज्याने एखाद-दोन जरी ट्रेक सह्याद्रीमध्ये केले असतील त्यांना हा मुंग्यांचा गड नक्कीच दिसला असेल. आम्ही ज्या डोंगर भटक्या ज्येष्टांकडुन ट्रेकींग करायला शिकलो त्यांच्या कडुन आम्हाला या रचनेला ‘गड-मुंगी’ म्हणतात असे समजले.
याची विशिष्ट रचना, की जी एखाद्या अभेद्य किल्ल्याच्या तटबंदीसारखी, वर्तुळाकार तटांची बनवलेली असते, ती खरतर वास्तु-स्थापत्या मधील एक अदभुत नमुना आहे. मध्यवर्ती एक द्वार असते, साधारण ३ इंच त्याच्या परिघ असेल. हेच या किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार होय. यातुनच आत-बाहेर ये-जा केली जाते. य द्वाराच्या ऊंची सर्वात जास्त असते. जमीनीपासुन साधारण आठ इंचापर्यंत उंची मुख्य द्वाराची असु शकते. त्या भोवताली एखाद्या पाकळ्यांप्रमाणे एका आड दुसरा, मग तिसरा मग चौथा असे तट, ऊंची कमी कमी असलेले बनवलेले असतात. जर असा गड एखाद्या उतारावर असेल तर चढाच्या बाजुने प्रत्येक तटाची ऊंची जास्त असते व उताराकडे ती कमी झालेली असते. या गडांची बांधणी या मुंग्या मुख्यत्वेकरुन पावसाळ्यामध्येच करतात. या बांधकामासाठी सभोवतालची माती मुंग्य गोळा करतात. एक मुंगी ती केवढी आणि तिच्या मुखामध्ये केवढे अशी माती, ती आणु शकणार बरे? इवलासा मातीचा कण प्रत्येक मुंगी घेऊन येते आणि वेगवेगळ्या तटांवर लावते. अभ्यासकांच्या मते, या मातीच्या कणामध्ये मुंग्या त्यांच्या तोंडातुन लाळ किंवा तत्सम द्रव मिसळुन, त्या मातीला चिकट पणा आणीत असाव्यात. या व्हिडीयो मध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल की ज्या तटांचे काम पुर्ण झालेले आहे ते तट चकचकीत, गुळगुळगुळीत आहेत. अगदी प्लास्टर केलेल्या भिंतीसारखेच. व बाहेरच्या तटांचे काम अद्याप सुरु असल्याने ते तट तुम्हाला थोडे खडबडीत दिसतील.
या विशिष्ट रचनेचे प्रयोजन काय असावे बरे? पावसाच्या पाण्यामुळे जमिनीखालील मुंग्याची वसाहत व्यवस्थित रहावी हेच या रचनेचे मुख्य प्रयोजन असावे असे वाटते. वेगवेगळ्या तटांच्या ज्या पाकळ्या आहेत त्या देखील, आणखी बाहेरच्या तटात उघडताना दिसतात. कदाचित पावसाचे पाणी जर पडले तर ते या तटीय रचनेमुळे बाहेर बाहेरच्या तटांत जाऊन शेवटी गडाबाहेर जावे यासाठीच या रचनेचा हेतु असावा.
आपल्याकडे मराठी भाषेत या मुंग्यांना वेगळे काही नाव आहे असे ऐकिवात नाही. इंग्रजी मध्ये या मुंग्यांची ओळख Pheidole sykesii अशी केली गेली आहे. या ओळखीमध्ये देखील अद्याप एकमत नाहीये. बायोडाव्हरसिटी लायब्रेरीच्या एका पुस्तकात या मुंग्यांचा उल्लेख सापडतो. या व्यतिरिक्त डोंगर भटक्यांना जर या गड-मुंग्या व त्यांच्या गडा विषयी अधिक माहिती असेल , भविष्यात उपलब्ध झाली तर अवश्य आम्हाला पाठवा. तुमच्या नावासहीत ती माहिती या पानावर संग्रहीत केली जाईल.
पहा गड-मुंगीचा हा व्हिडीयो.
आवडल्यास नक्की फॉरवर्ड/शेयर करा.
धन्यवाद
हेमंत सिताराम ववले
निसर्गशाळा
पुणे