दृष्टी प्रदुषण

camping near pune
निसर्गसौंदर्य हा हल्ली एक परवलीच शब्द झालेला आहे. प्रत्येकाला निसर्गसौंदर्य आवडते. सुंदर असलेल्या निसर्गात जायला आवडते, त्यात रमायला आवडते, त्याचे फोटो काढायला आवडते. हे निसर्ग सौंदर्य म्हणजे नक्की आहे तरी काय?
निसर्ग मुळातच सुंदर आहे. त्याला मानवी क्रुत्रिम उपायांची गरज नसते. उलट एखाद भुभाग सुंदर करण्यासाठी मानव जर काही करीत असेल तर ते म्हणजे त्या सुंदर निसर्गाचे विद्रुपीकरणच होय. निसर्ग सुंदर वाटतो, भासतो, अनुभवता येतो, दिसतो याचे कारण नुसते दृश्य स्वरुप असते असे नव्हे. तर त्या निसर्गामध्ये तेथील सर्व सजीव-निर्जीवांमध्ये एक सामंजस्य असते. हे सामंजस्य म्हणजे हारमनीच निसर्गाला सुंदर करीत असते.
म्हणजेच काय तर मानवी ह्स्तक्षेप जिकडे नाही तिकडे निसर्ग सुंदर आहे. निसर्ग शाळेच्या पाहुण्यामध्ये अनेकजण मला विचारतात की तुम्ही रस्त्याने जागोजागी निसर्गशाळेचे बोर्ड का लावित नाही. असे केल्याने तुमचे ठिकाण ग्राहकांना सापडणे सोपे होईल व तुमची जाहिरात देखील होईल. मी नेहमीच सर्वांना छान कल्पना आहे असे म्हणुन त्यांचे समाधान करतो. अगदीच कुणी इच्छुक असेल ऐकायला तरच मी माझ्या निसर्गसौंदर्याच्या कल्पनेला या बोर्ड व होर्डींग मुळे कसा बाध येतो हे सांगतो.
एक काळ होता, कोथरुड ओलांडुन, पिरंगुट कडे गाडी निघाली की, अप्रतिम निसर्गसौंदर्याचा अनुभव प्रवाश्यांना यायचा. सुंदर हिरवाई, डोंगर, नाले हे सगळे अगदी रस्त्यवरुन दिसायचे. आता चित्र बदलले आहे. एनडीये चौक ते मुळशी दहा हजारांच्या वर विविध फलक रस्त्याने लावले आहेत. यातील मोजके कायदेशीर परवानग्या घेऊन लावले आहेत, बाकी सारेच्या सारे बेकायदेशीर तर आहेतच पण त्याही पेक्षा जास्त ते परिसराला कुरुप करणारे आहेत. यात दुकांनाचे फलक, बांधकाम व्यावसायिकांचे फलक, नेत्यांच्या वाढदिवसांचे फलक, हॉटेलांचे फलक, हॉस्पिटल वाल्यांचे फलक, दवाखान्यांचे फलक, चिकन दुकानदारांचे फलक, स्वीट दुकानदारांचे फलक, टेलरचे फलक, ब्युटी पार्लरचे फलक, फलक फलक नुसते फलक. जिकडे पहाव तिकडे फलक. दुकानाचा , दुकानाच्या वर असलेला फलक एक वेळ आपण समजु शकतो, पण दिकानासमोरच, रस्त्यावरुन ये जा करणा-या वाहन चालकांना आणि प्रवाश्यांना सहज दिसावे म्हणुन, रस्त्याला काटकोनात, लोखंडी फ्रेम मध्ये उभे केलेले, वीजेच्या खांबावर बांधलेले, झाडांना लटवलेले, भिंतींवर लावलेले, असे सगळे फलक अजाणतेपणी, प्रत्येक प्रवाश्याला अशांत करतात. प्रवाश्यांना हे समजत देखील नाही की त्यांना जबरदस्तीने, अनावश्यक जाहीरातबाजीला बळी पडावे लागत आहे. आपण पाहिलेले प्रत्येक दृश्य आपल्या अंतर्मनामध्ये नोंदले जाते. ही नोंद अनावश्यक असते. हे सारे आहे दृष्टी प्रदुषण.
एखाद्या सुंदर निसर्गदॄश्यामध्ये, ज्यामध्ये कसलीही इमारत नाही, कसला ही कचरा नाही, प्लास्टीक नाही; जे काही आहे ते केवळ सगळे नैसर्गिक आहे. तर अशा सुंदर प्रदेशात मध्ये जर मी निसर्गशाळेचा बोर्ड लावला तर काय होईल? तर याने त्या नैसर्गिक सौंदर्याला बाध येईल. गाडीतुन प्रवास करीत असताना, आमच्या ग्राहकांना निसर्गसौंदर्याचा जो अनुभव घेता येतो, जे सौंदर्य पाहता येते ते सर्वांनाच आवडते. आणि आमच्या ग्राहकांशिवाय देखील हजारो लोक या रस्त्यांनी प्रवास करीत असतात. या सर्वांना निर्भेळ निसर्ग पाहता यावा, अनुभवता यावा ही आमची प्रांजळ भावना या मागे आहे. अर्थात माझ्या एकट्याने असा विचार केल्याने फार काही फरक पडेल असे अजिबात नाही. अन्य व्यावसायिक अगदी शे-दोशने मीटर अंतरावर त्यांच्या व्यवसायाच्या, रिसॉर्ट्स च्या जाहीरातीचे आणि दिशादर्शनाचे फलक लावतात. आणि हे सारे फलक निसर्गसौंदर्याला बाध आणतात. निसर्ग पाहायला येणा-या सर्वच पर्यटकांचा हा जन्म सिध्द अधिकार आहे. किमान आमच्या कडुन तरी या अधिकाराला बाध येणार नाही याची आम्ही दक्षता घेत असतो.
 
आणि राहिला प्रश्न दिशादर्शकांचा, तर त्यासाठी गुगल मॅपचा पर्याय आम्ही आमच्या सर्व ग्राहकांना व्यवस्थित समजावुन देतो. त्यामुळे आमचे ग्राहक, आमच्या कॅम्पसाईट पर्यंत न चुकता येतात. एखाद दुसरा चुकतो देखील. चुकण्याचे कारण सुचनांचे नीट पालन न करणे हे असते. गुगल मॅप जिथपर्यंत घेऊन येतो , तिथे आमचा एक बोर्ड, दिशादर्शनाच्या बाणासहित असतो. पण हा फलक कायमस्वरुपी नाही. हा फलक ग्राहक पोहोचण्याच्या काही तास आधी तिथे लावला जातो व अपेक्षित ग्राहक पोहोचले की तिथुन काढला जातो.
हा आमचा एक तोकडा प्रयत्न आहे, निसर्गसौंदर्य अबाधित राखण्याचा. अधिकाधिक लोकांनी /व्यावसायिकांनी से केले तर दृष्टी-प्रदुषण कमी होईल.
 
हेमंत ववले
९०४९००२०५३
निसर्गशाळा, पुणे
Facebook Comments

Share this if you like it..