अनेक समस्यांचे एक समाधान – जा बाहेर जाऊन खेळ
जा बाहेर जाऊन खेळ हे आपल्या आई वडीलांचे वाक्य आपल्यापैकी अनेकांना नक्कीच आठवत असेल. आता एक पालक या नात्याने तुम्ही तुमच्या मुलांना वरील जादुई आज्ञा दिल्याचे तुम्हाला आठवते आहे का? अनेक जण सांगतात देखील असे अजुनही, पण बाहेर म्हणजे कुठे? असा मोठा प्रश्न पालक आणि पाल्य दोघांच्या पुढे असतो. पुर्वी आता जेवढी आहे तेवढी वाहनांची वरदळ नव्हती, पुर्वी आता जेवढ्या आहेत तेवढ्या मोठमोठ्या इमारती नव्हत्या. पुर्वी आता एवढी वाहनांची दिवसेंदिवस वाढत जाणारी संख्या नव्हती, पुर्वी संध्याकाळच्या वेळी आताएवढे प्रदुषण नव्हते, पुर्वी मुलांच्या अपहरणाची आताएवढी भीती नव्हती, खुप बदल झाले आहेत.
मला आठवते आहे, बाहेर जाऊन खेळ म्हंटल्यावर सगळे गाव – शिवारच आमचे प्ले ग्राऊंड व्हायचे. नदी वर तासन तास पोहणे, मधे-मध्येच तापी घेणे, नदीपात्रातुन झाडाझुडुपातुन वर-खाली जाण्यायेण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधणे, कधी बोर खायला रानवनात फिरणे, चिंचा आंबट लागल्या तरी गाभुळलेल्या चिंचा निवडुन निवडुन खाणे तर कधी जांभळांवर ताव मारायला घोळक्याने रानात जाणे. शेण्याल्लो, दगड्य्ल्लो, विटी दाम्डु, सुरपारंब्या , लपाछपी, टायरचा गाडा फिरवणे, एक ना अनेक “बाहेरचे कार्यक्रम” केलेले मला तरी आठवते आहे.

जा बाहेर जाऊन खेळ
सध्या एखाद्या संवेदनशील पालकास जर खरेच स्वतच्या मुलांसाठी “बाहेर जाऊन खेळ” असे म्ह्नावेसे वाटले तरी, हे खरच शक्य आहे का? शहरी भागातच नाही तर निमशहरी भागात देखील असे बाहेरचे खेळ खेळण्यासाठी जागा आहे का? ज्यांना आपण सध्या गाव म्हणतो अशा गावांमध्ये मुलांची संख्या लक्षणीय रीत्या कमी झालेली दिसते. याचे कारण पालकांचे शहरी तसेच निमशहरी भागात नोकरी व्यवसायाच्या निमित्तने झालेले स्थलांतर. आपल्या मुलांस शहरी मुलांना मिळणा-या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करण्याच्या अट्टहासापायी देखील अनेक गावाकडचे पालक शहरात येऊन राहत असलेले मी पाहीले आहे. या व अशा अनेक कारणांमुळे बाहेर जाऊन खेळ हे जादुई वाक्य उच्चारण्यास कोणताही पालक धजावेल असे चित्र सध्यातरी दिसत नाही. मग याचे परीणाम हेच दिसताहेत की मुल इलेक्ट्रॉनिक उपकरणांसोबत त्यांचे बालपण घालवीत आहेत व त्यांचे आईवडील जेवढे पारंगत नसतात तेवढे पारंगत ही मुले इलेक्ट्रॉनिक उपकरणे हाताळण्यात झालेली दिसतात. कालानुरुप तंत्रज्ञान अवगत झाले पाहीजे व त्यात पारंगत ही झाले पाहीजे हे जरी खरे असले तरी त्यांचे बालपण हिरावुन घेतल्यासारखे आपणास नाही का वाटत? मुलांना जंगली प्राण्यांविषयी आजकाल जास्त माहीती असु शकते, कारण डिस्कव्हरी, नॅशलन जिओग्राफी सारखे वन्य जीवनाला समर्पित टीव्ही चॅनेल्स व त्यावरील एका पाठोपाठचे कार्यक्रम , मुलांना माहीतीच्या बाबतीत अद्ययावत ठेवतात. पण प्रत्यक्ष अनुभव कसा मिळणार? एखाद्या मोठ्या झाडाच्या खोडाला मिठी मारुन त्या झाडाशी गुजवार्ता करण्याची संधी आपण आपल्या मुलांस देतो आहोत का? पावसामुळे नद्यांना पुर येतात व त्यामुळे कधीकधी भोवरे तयार होऊन अभेद्य खडकांना रांजणासारखे मोठमोठे खड्डे कसे पडतात, हे कधी आपल्या मुलांना आपण दाखवले आहे काय? रानावनात फिरताना सापडलेल्या पक्ष्यांच्या लहान मोठ्या पीसांचा पेन करण्याची प्रेरणा आपल्या मुलांना मिळु शकते काय? निसर्गातले सौहार्द काय असते हे समजण्यासाठी आपण खरच कधी आपल्या मुलांस निसर्गात घेऊन जातो काय? कधी शिंपले सापडले तर त्यावर चित्रकारी करुन आधीच सुंदर दिसणा-या त्या शिंपल्यांना तुमची मुले अधिक सुंदर करण्याचा प्रयत्न करतील, पण आपण त्यांना अशा स्थळी कधी घेऊन जातो काय? असे खुप काही आहे जे प्रत्यक्ष अनुभवण्यापासुन आपण आपल्या पीढीला वंचित ठेवतो आहोत. परीणामी ही मुले पुढे जाऊन एकलकोंडी, निसर्गाशी नाळ तुटलेली, उपभोक्तावाद हेच जीवन समजणारी, व सर्व नैसर्गिक साधनसंपत्ती ही माणसाकरीतच आहे असे समजुन निसर्गास, पर्यावरणास धोका निर्माण करणारी घडत आहेत. प्लास्टीक कचरा नसलेले रस्ते, डोंगर नद्या कशा सुंदर दिसतात, हे आपण त्यांना दाखवीत नाही, परीणामी प्रत्येक नदी पुलावरुन नदीत प्लास्टीक कचरा फेकणारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे व नद्या शहरीभागात कचरा वाहीन्याच झाल्या आहेत. हे सर्व घडते आहे निसर्गाप्रती असलेल्या संवेदनशीलतेच्या अभावाने. अनेकानेक समस्यांचे मुळ आहे निसर्गाशी नाळ तुटणे.
निसर्गसहलींचे फायदे काय आहेत?
यातील अनेक समस्या सामाजिक आहेत तर काही व्यक्तिगत स्वरुपाच्या आहेत. उदाहरणच पाहायचे झाले तर, आपण नदीप्रदुषण, वायुप्रदुषण, वाढते जागतिक तापमान, इत्यादी समस्यांचे निराकारण करण्यासाठी तुमच्या मुलांस निसर्गाशी जोडा असे जर आपण सांगु जाऊ तर काही पालक म्हणतील यात माझ्या मुलामुलीस काय फायदा? कारण नदी प्रदुषण ही सामाजिक समस्या आहे व समाज/ सरकार त्याला जबाबदार आहे, त्यासाठी मी किंवा माझ्या मुलाने का म्हणुन काही करावयाचे? साहजिक आहे असा विचार करणे. असा विचार करण्याचे कारण असे आहे की पालकांस अद्याप निसर्गाशी नाळ जोडल्याने व्यक्तिगत पातळीवर किती प्रकारचे अनेकानेक फायदे मुला-मुलींस होऊ शकतात याच्या विषयी कल्पनाच नाही. तर मग काय आहेत हे फायदे आपल्या मुलांसाठी
- व्यक्तिमत्व धाडसी बनते
- नेतृत्व गुण विकसित होतात
- रिस्क ॲनॅलिसिस करण्याचे कौशल्य विकसित होते
- सामाजिक जबाबदारीचे भान होते
- सुप्त कलागुणांस चालना मिळते
- सृजनात्मक कौशल्य विकास होतो
- रचनात्मक कौशल्य विकास होतो
- अभिनव कल्पना शक्तीचा विकास
- विरंगुळ्यासाठी इलेक्ट्रॉनिक साधनांच्या वापरापासुन सुटका
- लठ्ठपणा एकलकोंडे पणासारख्या संभाव्य आजारांपासुन सुटका
- वैज्ञानिक दॄष्टीकोन तयार होण्यास मदत होते
- ग्रहगोल, तारांगण पाहील्यामुळे खगोलशास्त्र विषयी रुची निर्माण होते
त्यामुळे पालकांना हे सर्व समजले तर पालक आपल्या पाल्यांना निसर्गाशी जोडण्यासाठी नक्कीच तयार होतील. नव्हे ते मुलांस निसर्गात घेऊन जातील देखील. पण हे सगळे एकदम घडणार नाही हे लक्षात ठेवा. मोबाईल गेममध्ये आकंठ बुडालेल्या आजच्या पीढीस, म्हणजेच भावी जबाबदार नागरीकांस निसर्गाशी गट्टी करायला लावणे हे देखील एक कौशल्य आहे.
कसे कराल हे ?
- सुरुवातीस त्यांना त्याच्या इच्छेविरुध्द काही ही करायला भाग पाडु नका
- लक्षात असु द्या की “ तुला हे करावेच लागेल” किंवा “ सगळा भात खावाच लागेल” किंवा “होमवर्क लगेच कर” अशी आपणा जर “च” ची भाषा वापरली तर मुले बंडखोरी करतात. त्यामुळे निसर्गशी मैत्रीसाठी देखील “च” शी भाषा वापरु नये. कार्टुन, टिव्ही, व्हिडीयो मोबाईल गेम विषयी नकारात्मक भाषेचा उपयोग देखील टाळावा.
- टीव्ही बघणे व मोबाईल गेम खेळणे यासाठी कमी वयापासुनच काही नियम बनवा
- बाहेर जाऊन खेळ या जादुच्या छडीचा उपयोग करण्यापुर्वी वरील इलेक्ट्रॉनिक साधनांच्या वापराविषयी काही छोटे व सोपे नियम बनवा. उदा – फक्त रविवारी दोन तास कार्टुन पाहणे किंवा फक्त शनिवारी एक तास मोबाईलवर गेम खेळणे. आणि असे नियम मुलांच्या अगदी सुरुवातीच्या वयापासुनच घालुन दिले तर ह्या मुलांना या नियमांचे काही वाटणार नाही. पण असा नियम पाळताना “जा बाहेर जाऊन खेळ” असे म्हणायचे मात्र विसरु नका.
- मुलांस निसर्गशिबीरांत पाठवणे, घेऊन जाणे
- विविध संस्थांमार्फत घेण्यात येणारे समर कॅम्प्स, विंटर कॅम्प्स ला आवर्जुन आपल्या मुलांना पाठवा. स्काऊट बुट कॅम्प सारखे अनुभव घेताना मुलांना नक्कीच आवडेल.
- मुलामुलींस निसर्गात घेऊन जाताना हे नेहमी लक्षात ठेवा की ते आपल्या पेक्षा लवकर थकतात व त्यांना आपल्यापेक्षा लवकर भुक देखील लागते
- निसर्गात गेल्यावर जर मुले रडवेली झाली, त्रास द्यायला लागली तर याचा अर्थ असा घेऊ नका की त्यांना निसर्गाशी मैत्री आवडली नाही. याचा अर्थ असाही असु शकतो की भुकेच्या वेळी खाण व थकल्यावर आराम ह्या गोष्टी त्यांना मिळाल्या नाहीत.
- निष्कर्श – कमी वय असतानाच निसर्गात घेऊन जाणे सुरु करा व निसर्गभेटींचे सातत्य ठेवा .
अतिशय समर्पक व डोळ्यात अंजण घालणारा लेख.