वणवा करतोय निसर्गाचे सर्वाधिक नुकसान

वणवा टाळा.
वणवा टाळा.

वणवा टाळा.

ऑस्ट्रेलियातील वणव्याची बातमी अजुन ताजी आहे, त्यात भस्मसात झालेल्या वन्यजीवांची मढी अजुनही धगधगत असतील, काळ्याकुट्ट राखेचे आच्छादन अजुनही तेथील भुभागावर असेल, ज्यांच्या घरातील माणसे देखील यात मेली त्यांच्या घरात सुतक अजुनही असेल, क्रंदन अजुनही असेल ! अत्यंत दुर्दैवी, वाईट घटना घडली. असे व्हावयास नको होते, असे आपणाला म्हणजे येथे पुणेकरांना देखील वाटले असेल नक्कीच कारण आपण देखील संवेदनशील आहोतच. हळहळ आपण देखील केली असेलच, बरोबरना!

ऑस्ट्रेलिया खुप दुर आहे हळ्व्या मनाच्या भारतीयांनो ! आपल्या महाराष्ट्रात दरवर्षी वणव्याने सह्याद्री जळतोय! अविरत जळतोय. आपणास आपल्या सह्याद्रीच्या या धगधगत्या चितेविषयी कधी हळहळ वाटली आहे का? ऑस्ट्रेलियातील वणव्यापेक्षाही भयानक वणवे आपल्याकडे लागताहेत, दरवर्षी लागताहेत, दरवर्षी लावले जाताहेत. ऑस्ट्रेलियातील वणव्यात कित्येक करोडो वन्यजीव जळुन गेले, वाईटच आहे हे. पण थोडा विचार करा, आपल्याकडे सतत लागणा-या वणव्यांमुळे आपण कधी वन्यजीवांची वाढच होऊ दिली नाही करोडोम्च्या संख्येत. तितकेच किंबहुना त्यापेक्षा जास्त वन्यजीव आपण जाळले आहेत मागील कित्येक दशकातील वणव्यांच्या रुपात.

ही भुमाता जिच्या पोटी आपण जन्म घेतला, तिची मनुष्याव्यतिरिक्त ही अनेक संताने आहेत. की जे आपले बांधव आहेत. म्हणजे वृक्ष, वेली, प्राणी,सरपटणारे प्राणी, किडे, मुंग्या, असे असंख्य जीव या भुमातेच्या अंगा खांद्यावर खेळत, बागडत असतात. त्याचप्बरोबर हे असंख्य जीव आपले निसर्गचक्र नीट राखण्याचे काम ही माणसापेक्षा जास्त चांगल्या पध्दतीने करीत असतात. मग माणुस का निसर्गचक्रामध्ये हस्तक्षेप करीत आहे?. डोंगराला आग लावल्यामुळे आपण आपल्याच पायावर कु-हाड मारीत आहोत.
दरवर्षीच्या पावसाळ्यात उगवलेली लाखो रोपे माणसाच्या वणवा लावण्याच्या अविचारामुळे होरपळुन मरतात. परीणामी झाडाची संख्या वाढत नाही, हिरवे छत्र लुप्त होत आहे. दरवर्षी काही पर्यावरण प्रेमी मंडळी मोठ्या उत्साहाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम करतात. पण ह्या वणव्यामुळे जेवढी झाडे लावली जातात त्याच्यापेक्षा हजारपट जास्त झाडे मरतात. निसर्ग स्वतःची काळजी घेण्यासाठी सक्षम आहे, माणसाने फक्त वणवा लावण्यासारख्या गोष्टींपासुन स्वतःला परावृत्त करणे गरजेचे आहे.

आग लावणा-या माणसांकडे फेसबुक नसते, व्हॉट्सऍप नसते, ऍम्ड्रॉईड फोन नसतो, त्यामुळे तुमच्या माझ्या सारख्यांचे (म्हणजेच हा संदेश वाचणा-यांचे) काम आहे की आपाअपल्या गावात अशा प्रत्येक व्यक्ति पर्यत हा संदेश तोंडी पोहोचवावा,शेतकरी, गुराखी,कातकरी,आदी लोकांना याबाबत जागरुक करणे गरचे आहे. कारण ते लोक आपल्या पेक्षा जास्त जवळ असतात निसर्गाच्या, निसर्गाच्या कुशीत असतात, त्यामुळे जसे वृक्ष वेली, प्राणीमात्राम्चे सर्वाधिक नुकसान होते,तसेच शेतकरी, गुराखी, आदीवासी बांधवांचे देखील खुप नुकसान होते, व संपुर्ण पर्यावरणाचे होणारे नुकसान तर सगळ्या चराचर, प्राणीमात्रांना , इकोसिस्टमला भोगावे लागते आहे.

वणव्याविषयी एक गैरसमज आहे. तो काय आहे व त्यांच्याविषयी जाणुन घेऊयात.

वणवा लावल्यामुळे पुढच्या वर्षी गवत चांगले येते – मुळात वणवा लावल्यामुळे जमीनीची सर्वाधिक धुप होती. गवत जळुन गेल्याने, त्या गवताच्या मुळांनी माती धरुन ठेवलेली मोकळी होते. तसेच पहील्या पावसात ही माती वाहुन जाते. म्हणुन आपणास पहील्या पावसात डोंगरद-यांतुन वाहणारे पाणी गढुळ असल्याचे दिसते. याचाच आणखी एक दुष्परीणाम असाही होतो आहे की काही वर्षांनी आपली सर्वच्या सर्व धरणे निम्मी मातीने व निम्मी पाण्याने भरतील. पाणी साठा कमी होईल,परीणामी नागरी लोकसंख्येला पर्यायाने धरणक्षेत्रातील लोकांना अधिक भुरदंड पडेल. कारण पाणी कमी पडले की आणखी जास्त धरणांची आवश्यकता निर्माण होईल व पर्यायाने नवीन धरणे पावसाच्या क्षेत्रातच बांधली जातील व तेथील लोकांस(वेल्हा, मुळशी, मावळ, भोर) संसार पाठीवर लावुन दुस-या भागात धरणग्रस्त म्हणुन जावे लागेल.

वणवा का लागतो?

जाणीवपुर्वक वणवने (वणवा लावणे)

वर सांगितल्या प्रमाणे गैरसमजातुन जाणीवपुर्वक वणवा लावला जातो. हा वणवा लावणारे वर म्हंटल्याप्रमाणे अशिक्षीत किंवा कमी शिकलेले लोक, की ज्यांचा समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जास्त संपर्क येत नसतो. त्यामुळे ह्या व्यक्तिंपर्यंत “वणवा लावु नये” किंवा “वणवा लावल्याने आपलेच नुकसान होते” असे संदेश पोहोचत नाहीत. व हे लोक नेहमीप्रमाणेच “आपण चांगले गवत यावे म्हणुनच हे काम करतो आहोत” , “आपल्याशिवाय अन्य कुणालाच देणेघेणे नाही”, “आपण सर्वांवरउपकारच करतो आहोत” या भावनेने दरवर्षी न चुकता वणवा लावण्याचे महत्कर्म , कुणी ही न सांगता, कसल्याही प्रसिध्दीची अपेक्षा न ठेवता करीत असतात.

नकळत वणवा लागणे

घराशेजारील नको असलेले गवत, जाळ्या जळमाट काढण्यासाठी त्यांना जाळणे हा सर्वात सोपा उपाय ब-याचदा निमशहरी गावांतुन केला जातो. निमशहरी म्हणजे अशी गावे की ज्यांच्यापर्यंत शहरी संस्कारांचा संसर्ग झालेला आहे, पण ते संस्कारझेपले नाहीत. त्यांना शहरासारखी स्वच्छता हवी असते. व ती स्वच्छता मिळवण्याच्या नादात ते घराच्या आसपासचे गवत जाळ्या, वेली झुडपे जाळतात. हे जाळणे आवाक्याच्या बाहेर गेले, व वारा वाहत असेल योग्य काळजी घेतली नाही तर ब-याचदा ही आग पसरते व वणवा लागतो.

बीडी सिगारेट ओढणारे –

खरतर, बीडी सिगरेट ओढणा-या माणसांकडुन वणवा लागल्याचे मी आजपर्यंत पाहीले नाही. ही शक्यता देखील आहे. पण सिगरेट ओढणारी माणसाचे ओढलेली सिगरेट विझवण्यासाठीचे श्रम पाहील्यावर समजेल की या माणसांकडुन वणवालागण्याची शक्यता खुपच कमी आहे. तसे असेल तर यावर एक खुप सोपा उपाय राष्ट्रीय पातळीवर सरकारी-निमसरकारी-व्यक्तिगत स्तरावर हातात घेता येऊ शकतो. वणवा प्रवण परीसरातील सर्व टप-यांवर, आजुबाजुला चित्र जास्त, मजकुर कमी स्वरुपातील पोस्टर्स लावणे, स्वयंसेवी संस्थांनी समयाचे दान देऊन येणा-या जाणा-या सर्व बीडी – सिगरेट ग्राहकांचे प्रबोधन देखील करता येऊ शकते.

वाळलेली झाडे एकमेकांवर घासुन आग लागुन वणवा लागणे –

हा निव्वळ भ्रम आहे. भारतात तरी असे होणे शक्य नाही. ज्या डोंगरांवर गेली ५०-६० वर्षे वणवे लागुन लागुन एक ही झाडे नाही तेथे हे होणे शक्य नाही. व हिरव्या गर्द जंगलांमध्ये वणवा पसरत नाही.

जर आपण वणवा लावण्याचे थांबवु शकलो, तर त्याचे फायदे खालील प्रमाणे होतील

१. पावसाचे प्रमाण वाढेल
२. पावसाची अनिश्चितता कमी होईल
३. झाडे झुडपे वाढल्याने, पावसाचे पाणी जमीनीत खोलवर मुरेल व त्यामुळे तुमच्या विहीरी, बोअरवेल ला पाण्याची कमतरता होणार नाही.
४. वनौषधी ची वाढ देखील होईल. आपल्या भागात, हिरडा, गेळा, बेहडा, आवळा, कुडा,कढीपत्ता, शिकेकाई, रिठा, वावडींगी आणखीही अनेक प्रकारच्या वनस्पती आपल्या या डोंगरद-यात अमाप प्रमाणात वाढायच्या पुर्वी पण वणवा लावण्याच्या अविचाराने यातील कित्येक वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या वनस्पती म्हणजे आपल्या येथील लोकांस अर्थार्जनाचे एक वरदानच निसर्गाअने दिले आहे. आपण करंटे त्याला वणवा पेटवुन हे वरदानच झिडकारतो.
५. वनफळे व भाज्या – करवंदा पासुन मे महीनाभर दररोज किमान ३०० ते ४०० रुपये आपल्याकडील स्त्रिया कमावताना आपण मागच्या वर्षीच पाहीले.(शेणवड/बालवडच्या महीला). विचार करा, जर वणवा पेटला नाही व करवंदीच्या नव नवीन जाळ्या तयार झाल्या तर येत्या काही वर्षात , करवंद हा एक संघटीत व्यवसाय या रुपाने नावारुपास येईल. आळु, तोरण , फणस, जांभळं यांचे पर्यायही आहेत आपल्याकडे.वनभाज्या ..म्हणजे निसर्गाने आपल्याला दिलेली पार्टीच जणु…शेंडवेल,मुरुट आणखी ब-याच वन भाज्या आपणास जंगलात मिळतात. पण मित्रांनो जरा आपल्या आजी आजोबांस विचारुन पाहा बरे, की या भाज्यांचे प्रमाण पुर्वी किती होते व आता किती आहे? व या सा-यास कारणीभुत आहे हा वणवा..

Torna fort camping near pune

४ वर्षापुर्वीचा वणव्यात पुर्णपणे जळुन गेलेला तोरणा किल्ला – राजगड वरुन घेतलेले छायाचित्र

६. वन-आधारीत अर्थव्यवस्था – लाकुड, गवत,फळे, औषधे, स्वतपुरती निसर्गाने घेणे ठिक आहे. पण योग्य नियोजन करुन यातुन एक पर्यायी व्यपार उदीम देखील उभा राहु शकेल.
७. पर्यटन वाढ – जरा विचार करा, सध्या, मढे घाट, लिंगाणा इत्यादी ठिकाणे शहरातील लोकाम्साठी आकर्षण आहे. पण ते केवळ पावसाळ्यात. जर आपण आपला परीसर हिरवागार करु शकलो, वनराई बहरु देऊ शकलो, तर बारा महीने , तेराकाळ चालेल असा पर्यटन व्यवसाय देखील वाढेल. शहरात ड्रायव्हर, आचारी, वेटर अशी कामे करण्यापेक्षा आपण आपल्याच भागात उद्योग व्यवसाय करु शकता.

मित्रांनो, वणवा थांबवण्यात जर आपण यशस्वी झालो तर आपण स्तःतसोबतच निसर्गाचे देखील कल्याण करण्यात यशस्वी होऊ.

हेमंत ववले.

Facebook Comments

Share this if you like it..