The Earth Laughs in Flowers.
Who can estimate the elevating and refining influences and moral value of flowers with all their graceful forms, bewitching shades and combinations of colors and exquisitely varied perfumes? These silent influences are unconsciously felt even by those who do not appreciate them consciously and thus with better and still better fruits, nuts, grains, vegetables and flowers, will the earth be transformed, man’s thought refined, and turned from the base destructive forces into nobler production. One which will lift him to high planes of action toward the happy day when the Creator of all this beautiful work is more acknowledged and loved, and where man shall offer his brother man, not bullets and bayonets, but richer grains, better fruit and fairer flowers from the bounty of this earth
I will be the gladdest thing under the sun! I will touch a hundred flowers And not pick one
सह्याद्रीतील फुले काहीतरी सांगतात, काय आपण ते ऐकु शकतो?
धन्वंतरी पुजनामध्ये खाली मंत्र म्हंणण्याचा प्रघात आपल्याकडे आहे. श्रीमत भागवतामध्ये (३/१५/१९) मध्ये सदर श्लोक पहायवयास मिळतो.
सेवंतिका बकुल चंपक पाटलाब्जै
पुन्नाग जाती करवीर रसाल पुष्पै:|
बिल्वप्रवाल तुलसी दल मालतीभिस्त्वां
पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद
यात अनेकविध फुले तसेच वनस्पती, वृक्षांचा उल्लेख येतो. व या व अशा प्रकारच्या फुलांच्या समर्पणाने जगदीश्वर प्रसन्न (प्रसन्न म्हणजे आनंदीत) होतो. अशा आशयाचा हा श्लोक आहे. याचा अर्थ फुले समर्पण भाव जागा करु शकतात असा होतो.
लहान मुलांच्या निरागस, निर्लोभ स्वभावाला अनेकदा आपण फुलांची उपमा देतो. इथुन तिथुन सगळ्या संस्कृत्यांमध्ये फुलांना अनन्य साधारण महत्व आहे. सांप्रदायिक असो वा अन्य काहीही प्रसंग असो. फुले मनुष्य जीवनाचा अविभाज्य असा घटक आहे. भारतीय संस्कृती मध्ये तर सोळा संस्कार पैकी जवळ जवळ सगळ्याच संस्कारांमध्ये फुलांना अनन्य साधारण महत्व आहे. अगदी गर्भाधाना पासुनते अगदी अग्नीसंस्कारापर्यंत सगळीकडेच फुले खुप महत्वाची भुमिका पार पाडतात. भुमिपुजन असो वा वास्तुशांती की गृहप्रवेश..फुले सगळीकडेच. हेच काय तर फुलांच्या अभावी जर मंत्राद्वारे भगवंताची प्रार्थना करायची असेल तर त्या मंत्रांना नुसते मंत्र न म्हणता मंत्र पुष्पांजली म्हणतात.
आस्तिक असो वा नास्तिक फुलांनी सर्वांना मोहुन टाकलेले दिसते.
युगल प्रेमाच्या आविष्कार अभिव्यक्तिसाठी फुलांच्या इतके प्रभावी माध्यम अजुनही आधुनिक विज्ञानाला सापडले नाही.
कुणास शुभेच्छा द्यावयाच्या असतील तरीही भेटवस्तु सोबत आपण पुष्पगुच्छ देतो. अगदीच भेटवस्तु शक्य नसेल तर फुल न फुलाची पाकळी तरी देतोच. श्रीमंत असो व गरीब फुले साथ सर्वांनाच देतात. फुलांचे मानवी जीवनातील महत्व अनन्यसाधारण आहे यात दुमत नसावे. असो.
आम्ही निसर्गशाळेच्या माध्यमातुन मागील दोन तीन महीन्यांमध्ये सह्याद्रीमध्ये अनेक पदभ्रमण व निसर्गसहलींचे आयोजन केले. तसे आम्ही नेहमीच करीत असतो. पण मागील दोन तीन महिन्यांचे विशेष असे आहे की वर जे फुल महात्म्य मी गायिले त्या फुलांचा साक्षात्कार , त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मला झाला. व फुलांचे नयनरम्य, मनोहर व देहभान हरवणारे रुप अनुभवास आले. माझ्या मागील काही लेखांमध्ये देखील ह्या फुलांच्या साक्षात्काराचा उल्लेख कमी अधिक झालेला आहेच. पण अगदी अलीकडच्या म्हणजे मागील आठवड्यातील निसर्ग सहलींमध्ये फुलांच्या फुलण्याचा परमोच्च काळच असेल वाटले.
तसे आपणास सह्याद्रीतील फुले म्हंटले की कास पठार आठवतेच आठवते. आणि का नाही आठवणार. कास पठार व त्यावरील पुष्पोत्सव आहेच मुग्ध करणारा. मागच्या आठवड्यातील सहलीमध्ये तर मी तोरणा किल्ला जांभळा झालेला पाहीला. तोरण्याचा पश्चिमेकडील कडा आणि आणि बुधला माची व तिचा उतार सगळेच्या सगळे जांभळ्या तेरड्याने रंगवले होते. अशी अनेक अतिसुंदर दृश्ये मला पहावयास मिळाली. माझे अजुन कास पठार पाहणे झालेले नाही. पुढच्या वर्षी नक्की जाणार कास ला. पण आमच्या निसर्गसहलीतुनच मला सह्याद्रीच्या ह्या फुलांच्या रंगबाजीचा साक्षात्कार झाला. हे ही नसे थोडके.
सह्याद्रीतील रंगांची उधळण लेखाच्या शेवटी असलेल्या लिंक वर क्लिक करुन पहा..
का बर देवाला फुले वाहीली जात असतील? का प्रियकर प्रियसीला फुल च देत असेल? का शुभेच्छा देताना फुलांचाच उपयोग केला जात असेल? फुलांना एवढे महत्व मानवी जीवनामध्ये का बर प्राप्त झाल असेल ?
हि रंगीबेरंगी फुले आपल्याला काही तरी सांगण्याचा प्रयत्न तर करीत नाहीत ना? नक्की काय संदेश मिळतो फुलांकडुन मानवास?
माझ्या आकलन आणि पृथ्थकरण करण्याच्या सीमीत क्षमतेवर मला वाटते की ही फुल दोन परस्पर विरोधी संदेश मानवास देतात. पहीला म्हणजे अनित्यता व दुसरा म्हणजे नित्यता.
अनित्यता – फुले फार कमी कालावधीत संपतात. म्हणजे ती फुले राहत नाहीत. सुकुन जातात. त्यातील सौंदर्य , सुगंध , रंग सगळे काही संपते. फुल म्हणुन जे काही अस्तित्वात असते ते संपते. तद्वतच आपण देखील परमेश्वराला भेटायला जाताना, जणु फुलांप्रमाणेच नश्वर असणारे सगळे काही जणु परमेश्वराचे चरणी अर्पण करुन जे कधी ही नष्ट होणार नाही असा ईश्वर जवळ करतो. हे करताना आपल्या मनी हा भाव उत्पन्न व्हायला हवा की आपण कितीही प्रयत्न केले तरी आज जे भौतिक सुख किंवा दुःख अस्तित्वात आहे ते उद्या नसणार आहे. जे काही आहे ते क्षणभंगुर आहे. व हे सारे क्षणभंगुर असणारे त्यागुन जे अविनाशी आहे असे परम तत्व, ब्रम्ह तत्व भाविकाने अंगिकारले पाहीजे असा संदेश ही फुल देत असावीत असे मला आताशा वाटु लागले आहे.
नित्यता – फुलामध्ये अफाट शक्ती आहे. ही शक्ती पुन्हा नव्याने सृष्टीची निर्मिती करीत असते. क्षणभंगुर असणा-या छोट्याशा मर्यादीत कालावधीमध्ये देखील, स्वतचे अस्तित्व सुप्त बीज अवस्थेमध्ये टिकवुन ठेवणे आणि योग्य संधी मिळताच पुन्हा नव्याने नव्या जगाला जन्म देणे ही देखील फुलांची कमाल आहे. मी काही वर्षा पुर्वी पाहीलेला एक ल्युसी नावाचा इंग्रजी सिनेमा पाहीलेला, मला आठवला. जे काही जीवनतत्व (बॉडी सेल्स) आपणा सर्वांमध्ये आहे ते देखील अशाच प्रकारे उत्तरोत्तर अधिकाधिक ज्ञान मिळविण्यासाठी प्रयत्नशील असते व हे ज्ञान मिळविण्यासाठी हे जीवनतत्व शरीराची मदत घेत असते. जीवंत राहण्यासाठी सकारात्मक परीस्थीती असेल तर हे तत्व वाढत राहते व ज्यावेळी परीस्थीती नकारात्मक होते त्यावेळी हे जीवनतत्व लाखो करोडो वर्षांचे ज्ञान जे पेंशींमध्ये असते ते ज्ञान टिकवण्यासाठी नवीन बॉडी सेल्स तयार करते म्हणजेच नवीन जीवशास्त्रीय शरीर तयार करते. यास प्रजनन असे म्हणतात. सिनेमा मुळातुनच पाहण्यासारखा आहे त्यामुळे इथे त्याविषयी जास्त लिहित नाही. पण जसे सिनेमामध्ये मानवी ज्ञान-विज्ञानाच्या पिढ्यानुपिढ्या संक्रमनाविषयी संकल्पना मांडली आहे त्याच प्रमाणे सर्व चराचरात देखील हाच प्रवाह दिसुन येतो असे मला वाटते.
स्वतचे अस्तित्व अपरंपार टिकवुन ठेवणे, जितके होईल तितके टिकवुन ठेवणे व त्यासाठी नवनवीन युक्त्या करणे, ज्ञान आत्मसात करणे, व टिकण्यासाठी आवश्यक ते सर्व करणे. पहा ना वटवृक्ष एखादा अगदी शे दोनशे वर्षे जुना असु शकतो. त्याच्या त्या जीवन काळामध्येच तो नवीन पिढी निर्माण करतो, नवीन फुले, बीजे तयार करुन. कारण त्या वृक्षास ( त्या जीवनतत्वास ) टिकायचे आहे. मला सह्याद्रीमध्ये दिसलेल्या त्या असंख्य पुष्प वनस्पतींचे आयुष्य साधारण एका वर्षाचे असते असे दिसुन येते. म्हणजे बीजापासुन रोप, त्याची वाढ व नंतर फुले आणि व पुन्हा बीज या चक्राला साधारणपणे एक वर्ष लागत. त्यामुळे या सर्व पुष्प वनस्पतींना वर्षायु असे देखील म्हणतात. पण खरच नीट विचार केल्यावर समजते की हे आयुष्य केवळ एका वर्षाचे नाहीये. हा एक खुप मोठा प्रवास आहे. जो अनंताकडुन अनंताकडे जातो. अनंत म्हणायचे कारण एवढेच आहे की आपल्या इंद्रीयगम्य ज्ञानाच्या कक्षेत ह्या प्रवासाची सुरुवात व शेवट, येत नाही. माणसाचे देखील यापेक्षा वेगळे ते काय असु शकते?
ह्या दिवाळीच्या निमित्ताने , आपण ही अनेकविध प्रकारे फुलांचा वापर करणार असु. प्रत्येक फुल आपणास हे दोन संदेश देत आहे. हे संदेश स्वीकारण्यासाठी आपण तयार आहोत का? प्रत्येक फुल आपणास नित्य आणि अनित्य अशी दोन्ही तत्वे सांगत आहे. काय आपण ती ऐकु शकतो?
Flowering in Sahyadri @ Camping near Pune