गडलक्ष्मी – महाराष्ट्राचे गडवैभव

Forts of Shivaji Maharaj

ज्याला आपण सह्याद्री म्हणतो, तो खरतर गुजरातमधील डांग पासुन कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या, आठ हजार चौरस किमी, असलेल्या एका लांबललचक आणि गगनचुंबी पर्वंतांच्या रांगेतील, महाराष्ट्र राज्यात मोडणारा भाग होय. या संपुर्ण पर्वतरांगेस पश्चिमघाट म्हटले जाते.पश्चिम घाट भारतीत एकुण सात राज्यात व्यापलेला आहे. जगभरात असे एकुण आठच सर्वात जुने पर्वत आहेत, त्यातील एक म्हणजे आपला सह्याद्री. जगातील सर्वात उंच पर्वत असणा-या हिमालयापेक्षा ही जुना असा आपला सह्याद्री, अनेक बाबींमुळे नेहमीच चर्चिला जातो. सह्याद्रीतील जैवविविधता, त्या जैव विविधेतेला असणारे धोके, अगदी दुर्मिळ असे शेकडो आणि फक्त सह्याद्रीमध्येच सापडणारे सरीसर्प आणि उभयचर हे देखील नेहमीच सह्याद्रीबाबतीत आकर्षणाचे बिंदु आहेत. एकुण ३२५ अशा प्रजाती आत्तापर्यंत सापडल्या आहेत की ज्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालेला आहे. नवनवीन बेडकांच्या, काजव्यांच्या, सापांच्या, किटकांच्या प्रजाती देखील सापडत आहेत व अजुन बरेच काही सापडावयाचे बाकी आहे. या विषयी सविस्तर पुन्हा कधीतरी वाचुयात.

 

आज आपण सह्याद्रीतील अनमोल रत्नांची सविस्तर माहिती घेणार आहोत. सह्याद्रीतील ही अनमोल रत्ने म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन शिवकाळात व त्याही पुर्वी राज्य रक्षण व संवर्धनासाठी बांधलेले किल्ले. आपले म्हणजे महाराष्ट्राचे वैभव, महाराष्ट्राची गडलक्ष्मी.

आपल्यापैकी अनेकजण किल्ले भटकंती साठी जात असतात. भटकंती सर्वांनाच आवडते व त्यातही सह्याद्रीतील भटकंती म्हणजे राकट दणकट असा मर्दानी खेळच, की जो सह्याद्रीच्या मावळ्यांनाच जमतो. पण आपल्या हल्लीच्या मावळ्यांना खरच गडकिल्ल्यांवरील अवशेषांविषयी माहिती आहे का? चला तर मग या लेखामध्ये आपण जाणुन घेऊयात गडकोटांविषयी सर्वकाही.

कोणताही किल्ला पहायला आपण गेलात तर त्या किल्ल्यावर आपणास अवशेष दिसतात. व आपण त्यांना ‘अवशेष ‘ असे म्हणुन लगेच मोकळे होतो. अवशेषच आहेत पण कशाचे? किल्ल्याच्या अंगाखांद्यावर आपल्या पुर्वजांनी जी काही बांधकामे केली आहेत त्यांचे स्पष्ट आणि विशिष्ट हेतु होते. व प्रत्येक हेतु निहाय बांधकामाचे स्वरुप बदलायचे. व त्यावरुनच त्यांना वेगवेगळी नावे पडली. आपणास येवुन जाऊन तटबंदी, बुरुज, धान्यकोठार, मंदीर इत्यादी नावेच माहिती असतात. आज आपण पाहुयात गडाच्या कोणत्या बांधकामास काय म्हणायचे खुद्द शिवाजी राजे व त्यांचे मावळे.

खरतर सह्याद्रीतील द-याखो-यांची, गडकिल्यांची दुर्गमता हिच त्या गडांची खरी ओळख, परंतु डोंगर नुसते दुर्गम असले, उंच असले तरी या दुर्गांची बांधणी करताना इतरही ब-याचशा गोष्टी लक्षात घेतलेल्या दिसून येतात. जसे की आसपासची भौगोलिक रचना, स्थान – निश्चिती ,संरक्षणात्मक बाजू, गडाची बांधणी, संरक्षण,मानवाच्या मूलभूत गरजा, इ. अनेक बाजू विचारात घेऊनच दुर्गबांधनी केली जात असे. महाराष्ट्रातील इतिहासाबरोबरच इथल्या दुर्गांची दुर्गबांधणी हा एक अभ्यासाचाच वेगळा विषय आहे.वेगवेगळ्या कालखंडात इथे अनेक राजवटी नांदल्या, आणि या वेगवेगळ्या कालखंडात इथे भरपूर गडकिल्यांची उभारणी केली गेली. किल्ले उभारताना वेगवेगळ्या दृष्टीकोनातून, कल्पकतेने निरनिराळे प्रयोग राबवून या दुर्गांची उभारणी केल्याचे आपल्याला दिसून येते.

आज महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा विचार केला तर, या अफाट सह्याद्री मध्ये प्रत्येक डोंगराआड, शिखराआड, एखादा लहानसा, मोठा तटबंदीने वेढलेला डोंगर /गड आपले लक्ष वेधून घेतो, इथे उंच डोगरमाथ्यावरील गिरिदुर्ग आहेत, इथे घनदाट अरण्यातील वनदुर्ग आहेत, इथे भक्कम तटबंदीने वेढलेले कणखर भुदुर्ग आहेत आणि इथेच सागराच्या लाटांचे तडाखे झेलत त्याच्याशीच गुजगोष्टी करणारे जलदुर्गही आहेत. इतकी वैविध्यपूर्ण, वैभवशाली दुर्गसंपत्ती असलेला हा महाराष्ट्र. गडकिल्यांबरोबरच इथे भक्कम तटाबुरूजांचे वैभवशाली वाडे-राजवाडे, गढ्या, विहिरी, बारवा, समाध्या, गावांच्या वेशी, पुरातन मंदिरे, आदी भरभरून ऐतिहासिक ठेवा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या रचनेच्या आणि बांधकाम शास्त्राच्या दृष्टीने अभ्यासनीय आणि अनमोल असाच आहे.

तर अशा या विविध गडकोटांचे उपयोग काय? वापर काय? फायदा काय? इतके वेगवेगळे गड बांधले कसे? गडावर अवशेष काय? असे अनेक प्रश्न आपल्याला गडकिल्यांसंबंधी पडतात आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि त्याकाळी या किल्यांना असणारे महत्व याची उत्तरे शिवछ्त्रपतींच्या आज्ञापत्रात मिळतात ….

” संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग.
गडकोट म्हणजे राज्याचे मूळ
गडकोट म्हणजे खजिना.
गडकोट म्हणजे सैन्याचे बळ
गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी..
गडकोट म्हणजे आपली वसतीस्थळे.
गडकोट म्हणजे सुखनिद्रागार
किंबहुना गडकोट म्हणजे आपले प्राणसंरक्षण..

किती सार्थ, सर्मपक वर्णन आहे हे, आज्ञापत्रील गडकिल्यांविषयी असणा-या या ओळीच आपल्याला शिवकाळातील गडकोटांचे महत्त्व सांगून जातात,राज्याच्या संरक्षणासाठी, आक्रमण काळात ,राज्यसंरंक्षणाच्या दृष्टीने, या किल्ल्यांचा खूप मोठा उपयोग झाला आहे.म्हणूनच एकप्रकारे गडकोट राज्याचा खजिना होते,राजलक्ष्मी होते. प्राणापलिकडेही जपलेले आणि बांधलेले हे गडकिल्ले पवित्र होते, वंदनीय होते. या अशा गडकिल्यांचा अभ्यास करताना, काहीशी अचंबित करणारी, आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे दुर्गबांधनी. बेलाग उंच कड्यांवर बांधलेले हे किल्ले त्याकाळच्या दुर्गस्थापत्यशास्त्राचा आदर्शवत नमुनाच ठरतात. कधी बेलाग कड्यांशी गुजगोष्टी करत उभी असलेली तटबंदी दिसते,तर कधी उत्कृष्ट, बेलाग बांधकामे डोळ्यांचे पारणे फेडतात. परंतु या अशा एखाद्या डोंगरावर प्रत्यक्ष गडबांधणी करणे म्हणजे काय करणे? एखादा डोंगर बघून भरभक्कम तटबंदी रचने म्हणजे दुर्ग बांधनी करणे कि रहायला एखादे वाडे-हुडे बांधणे म्हणजे दुर्गबांधनी ? असे आहे का? तर निश्चितच नाही, तर याबद्दलही काही दृष्टीकोन अवलंबलेले दिसतात. नैसर्गिक, मानवनिर्मित, भौगोलिक, बाबींचा प्रामुख्याने विचार केलेला दिसतो. याबाबतही शिवछ्त्रपतींचे बोल आपल्याला खूप काही सांगून जातात. ..रायगडाच्या पाहणीवेळेस महाराज म्हणतात

“…..राजा खासा जाऊन पाहाता,गड बहुत चखोट.कडे तासिल्याप्रमाणे दीड गाव उंच पर्जन्यकाळी कडियावर गवतही उगवत नाहीपाखरू बसू म्हणेल तर जागा नाहीतक्तास जागा हाच गड करावा.

म्हणजे हा डोंगर नैसर्गिक दृष्टीनेच किती दुर्गम, संरक्षीत आहे. गडाचे कडे नैसर्गिकच चखोट आहेत, बेलाग हेत. किल्ले बांधनी करताना डोंगर फक्त उंच असून चालत नाही तर त्याची भौगोलिक नैसर्गिक दुर्गमता ही तितकिच महत्वाची हे आपल्याला दिसून येते. एखादा किल्ला बांधण्यापुर्वी केलेली तिथल्या ठिकाणची पाहणी आणि गड बांधन्यास भौगोलिक दृष्ट्या तिथली योग्य असणारी जागा,आणि सध्या रायगडकडे पाहिल्यास या प्रसंगातून महाराजांचा दुरदृष्टीपणा आपल्या ध्यानी येतो. आता एखाद्या डोंगरावर प्रत्यक्ष दुर्गबांधनी करणे म्हणजे तटबंदी ,इतर गरजेची निरनिराळी बांधकामे, या गोष्टी आल्याच. तसेच काही मानवी गरजा बाकीच्या गोष्टी आल्याच , त्यातली त्यात प्राथमिक आणि अतिशय महत्वाची गोष्ट आणि गरज म्हणजे पाणी हे आवश्यकच…. तर याबाबतीत
आज्ञापत्र काय सांगते…

“…..गडावर आधी उदक पाहून किल्ला बांधावापाणी नाही आणि ते स्थळ तो आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी खडक फोडून तळीटाकी पर्जन्यकाळपर्य॔त संपूर्ण गडास पाणी पुरेल अशी मजबूत बांधावीगडावर झराही आहेजसे तसे पाणी पुरतेम्हणून तितकीयावरीच निश्चिंती  मानवीकि निमित्य कीझुंजामध्ये भांडियाचे आवाजाखाली झरे स्वल्प होतात आणि पाणियाचा खर्च विशेष लागतो,तेव्हा संकट पडते याकरीता
जखिरीयाचे पाणी म्हणून दोन चार टाकी तळी बांधावीत्यातील पाणी खर्च  होऊ  द्यावेगडाचे पाणी बहुत जतन राखावे.

कोणत्याही डोंगरावर गड उभारणी करताना पहिली प्राथमिक गरज,पाहणी आणि शोध म्हणजे तेथे पाण्याची तपासणी
करून, योग्य सोय करून पाणीसाठा पाहूनच पुढील कामास सुरवात व्हावी. हे या मागचे मुख्य धोरण. प्रथमता पाणी ही मुख्य प्राथमिकता.पाणी उपलब्ध झाले की पुढील गोष्टींना कोणतीही अडचण येत नसावी.

तर या झाल्या गडबांधणी मधील सुरवातीच्या काही महत्वाच्या बाबी..गडाची भौगोलिक रचना, गडाची नैसर्गिक, स्वनिर्मित संरक्षीत बाजू आणि पाणी….
निनाद बेडेकर सरांसोबत ट्रेक करण्याचे मला भाग्य मिळाले लहान असताना. राजगडाच्या बांधणीमध्ये किती दगड लागला असावा याचा अंदाज गणितीय पध्दतीने निनाद बेडेकर सरांनी बांधला आणि त्यातुन एक अफाट माहिती समोर आली ते म्हणजे राजगड बांधकामासाठी तीन लक्ष टन दगड वापरला गेला. इतके दगड खुद्द् किल्ल्यावर नव्हतेच, शक्यच नाही, मग आले कुठून, आणले कुणी, आणले कसे असे प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्यांच्या व्याख्यानात त्यांनी एक गम्मतशीर पत्र व्यवहार प्रसंग सांगितला आहे.  कान्होजी जेध्यांचा एक मुलगा उत्तरेत मोहिमेवर असताना त्याला तिकडेच नियुक्त करण्यात आले. महाराज तेव्हा हयात असावेत. कान्होजी जेध्यांच्या मुलाला म्हणजे बाजी सर्जेराव (सर्जेराव – सर्जेराव ही त्यांना मिळालेली पदवी बरका!) ज्या मुलखाची जबाबदारी होती त्या मुलखात अजुन उत्तरेतुन काही राजपुत पुंडाई करीत , त्रास देत. जेध्यांच्या मुलाने (अर्थात तो त्या वेळी मोठा मनसबदार अधिकारी होता स्वराज्यतील) पत्र्य व्यवहार करुन त्या राजपुतांना विनंती केली की असे विनाकारण त्रास देऊ नका. पण त्रास सुरुच राहिला. निनाद बेडेकरांनी सांगितल्याप्रमाणे , जेधे राजपुतांना खालील प्रमाणे चक्क धमकी देत आहेत, जेधे म्हणतात की राजपुतांनो तुम्ही जर माझे ऐकणार नसाल, माझी माफी मागणार नसाल तर नाईलाजाने मला तुमची तक्रार शिवाजी राजियांकडे करावी लागेल आणि ते चिडले की मग तुम्हाला मुसक्या लावुन राजगडावर दगडं-धोंडे वहायला कायमचे घेऊन जातील. या धमकीनंतर पुढे काय घडले ते जरी आपणास ठाउक नसले तरी शिवाजी राजांचा दबदबा हिंदुस्थानात किती होता याचा प्रत्यय येतो. दुसरी माहिती अशी समजते की शिवाजी महाराज गड-बांधणीसाठी राजकिय, युध्द कैद्यांचा सर्रास वापर करुन घ्यायचे. किंबहुना गडंबाधणी ही देखील एखादी शिक्षाच असावी त्या स्वराज्यात असे वाटते.

यानंतर प्रत्यक्ष गडबांधणी मधील काही महत्वाच्या बाबी जसे की तटबंदी, बुरूज, माची, दरवाजे, वाडे, घरे, कोठारे, मंदिरे इ. अनेक गोष्टी. ज्या गडाला एक गडाचे परिपूर्ण स्वरूप देतील. याही प्रत्येक गोष्टीतून दुर्गबांधनीतील कल्पकता आणि विविध प्रयोग वेगवेगळ्या गडांवर आपल्याला आढळून येतात.

आज महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आणि सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर असणारे गडकिल्ले प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय. सद्यस्थितित हे गडकिल्ले पडझड झालेल्या अवस्थेत असले, तरी पुर्वी अगदी ते वैभवसंपन्न होते. किल्ला पाहता -पाहता जर अभ्यासला तर त्याचे मर्म मनाचा ठाव घेते, आणि हे गडकिल्ले पाहताना अभ्यासाचा विषय म्हणजे या गडांची दुर्गबांधनीच. गिरिदुर्ग असो,भुदुर्ग किंवा जलदुर्ग अशा अनेक गडावर असंख्य वेगवेगळ्या कल्पना गडबांधनी
करताना अंमल केल्या गेल्या, तट, बुरूज , माची, फांजी, खंदक, जंग्या, चर्या इ. ब-याच दुर्गबांधनीतील गोष्टी
गडकिल्ले भटकंती करताना अज्ञभिन्न असल्याने पाहण्याचे राहून जातात.काही समजतात काही समजत नाहीत. अशाच गडबांधनी मधील काही ज्ञात-अज्ञात महत्त्वाच्या ठराविक संज्ञांचा थोडक्यात आढावा घेऊया.

प्रकार  गडाचे असे प्रकार पडतात.

1) भुदुर्ग – नावाप्रमाणेच ,सपाट जमिनीवर, मोकळ्या जागेत, तटबंदी, खंदक इ गोष्टींनी वेढलेला गड भुईकोट या प्रकारात मोडतो. उदा : चाकण ,परांडा ,नळदुर्ग इ.

2) गिरीदुर्ग – उंच डोगरांगामध्ये एखाद्या डोंगराच्या, पर्वताच्या शिखरावर, माथ्यावर बांधलेला गड म्हणजे गिरीदुर्ग होय. उदा: रायगड, तोरणा, राजगड इ.

3) जलदुर्ग – पुर्णपणे पाण्याने वेढलेल्या खडकावर, बेटावर, समुद्रात पाण्यामध्ये बांधलेला तटबंदीयुक्त किल्ला
म्हणजे जलदुर्ग होय. उदा : सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, जंजिरा इ.

4) वनदुर्ग – घनदाट अरण्याने, झाडीने वेढलेले दुर्गम गड वनदुर्ग या प्रकारात मोडतात. उदा: वासोटा.

5) जोडकिल्ले – एकाच डोंगरावर,वेगवेगळ्या शिखरावर,जवळपास असलेले गड जोडकिल्ले म्हणून ओळखतात. उदाः पुरंदर -वज्रगड, चंदन-वंदन. यासंदर्भात आज्ञापत्रात उल्लेख सापडतो.

एका गडासमीप दुसरा पर्वत,किल्ला असू नयेअसल्यास तो सुरूंग लावून गडाचे आहारी आणावाजर शक्य नसेल तर बांधून ती जागा मजबूत करावी.

 

गडावरील विविध स्थापत्य रचना म्हणजेच बांधकामे नक्की कोणती होती? हे आता आपण एकेक करुन पाहुयात.

 गडाची तटबंदी – कोणत्याही गडाची तटबंदी म्हणजे एकप्रकारे गडाचे चिलखतच …. ,प्रामुख्याने गडाची तटबंदी
ही त्याच्या भौगोलिक रचनेवर अवलंबून असते परंतु जास्त करून तटबंदी एकसलग गडमाथ्यावर आपल्याला दिसते परंतु इथे शिवनिर्मित गडाचे एक वैशिष्ट्य सांगावे वाटते शिव -निर्मित गडावर प्रामुख्याने तटबंदी ही पायथ्यापासून अर्ध्या टप्प्यांवर दिसते. तटबंदी प्रामुख्याने विटा, माती, दगड इ. वस्तूंचा वापर करून उभारली जात असे.

गडावरील टाक्या खोदताना निघणारा दगड प्रामुख्याने या कामी येत असे. तटाची मजबुती ही गडाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची गोष्ट. तोफांचा, नैसर्गिक गोष्टींचा आघात सहन होईल इतपत ती अभेद्य करण्याचा प्रयत्न होई. तटाची उंची, जाडी, रूंदी ही प्रत्येक ठिकाणी गरजेनुसार उभारली जाई. बांधकाम करताना मजबुतीकरता प्रामुख्याने चुन्याचा वापर होई. तटबंदीचा वापर जास्त करून डोंगराच्या कमकुवत बाजूकडे प्रामुख्याने होतो, जिथे नैसर्गिक दुर्गमता आहे तिथे तटबंदीची गरज भासत नसे. उदाहरणार्थ रायगडची तटबंदी ..

फार वर्षांपूर्वी तटबंदी ही लाकडी फळ्या किंवा मातीची असत. जसजशी प्रगती होत गेली तसतसा पुढे यासाठी दगड व विटांचा वापर सुरु झाला. काही ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीतीनुसार आपल्याला त्याठिकाणच्या तटातील वेगळेपणही दिसून येते, जसे की तटासाठी वापरलेल्या दगडातील फरक, तटाची उंची, बांधणी, रचना इ. गरजेनुसार काही तटांची तात्पुरती तर काही ठिकाणी कायमची मजबूत बांधणीही केलेली दिसून येते.

बुरुज – बुरुज म्हणजे मारा-गिरीकरण्याची एक मुख्य जागा. टेहळणीसाठी संरक्षणाच्या दृष्टीने गडाची महत्त्वाची बाजू.तोफा डागण्यासाठी गडाच्या आसमंतात टेहळणीसाठी बुरुज अतिशय महत्त्वाची जागा. तटबंदीमध्येच बाहेरच्या अंगाला याची वेगवेगळ्या आकारात मजबूत बांधनी केलेली असत. बुरूजाच्या बांधनीतही अनेक वेगवेगळे प्रकार कल्पकतेने राबवल्याचे दिसून येतात,यामध्ये गोलाकार, कोनांचा, पाकळ्यांच्या, दुमजली, चिलखती असे विविध प्रकारही आढळून येतात.बुरूज हे गडाचे प्रामुख्याने महत्त्वाचे अंग.बुरूज पडल्यावर अनेक किल्ले शत्रूच्या ताब्यात सहजतेने गेल्याचे अनेक उदाहरणे आपल्याला इतिहासात आढळून येतात.

तोरणा किल्ल्यावर पर्यटकांना गड वास्तु तसेच इतिहासा विषयी माहीती देताना हेमंत ववले

काही गडावर बुरूजांची संख्या जास्त असल्यास स्थान, ओळख निश्चितीसाठी त्यांना नावे दिलेली आढळतात जसे कि देवावरून, बुरूजांच्या रचनेवरून, गावावरून उदा: हत्ती बुरुज, फत्ते बुरुज, झुंझार बुरुज, शिरवले बुरुज, वाघजाई बुरुज इ.अशी नावे आज रोहीडा, पुरंदर, तोरणा आदी किल्ल्यावरील बुरूजांची उपलब्ध आहेत.

चिलखती बुरुज – हल्ल्याच्या दृष्टिने नाजूक ठिकाणी असे बुरूज असतात.गडाच्या दृष्टीने किती महत्वाचे आहे हे याच्या नावातच समजते. संरक्षणाच्या दृष्टीने गडाला घातलेले हे चिलखतच, आणि याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे राजगडची संजिवनी माची, अद्भूत, अविश्वासनीय, अकल्पनिय असे हे बांधकाम. नेहमीच्या बुरूजाला बाहेरून अजून एका बुरूजाचे संरक्षण म्हणजे चिलखती बुरूज… रायगडावरही असा चिलखती बुरुज आपल्याला पहायला मिळतो. शत्रूच्या हल्ल्यात चिलखती बुरुज तटबंदी ढासळलीच तर आतला बुरुज पूर्ण शाबूत रहावा अशी ही योजना. अतिशय संरक्षणात्मक आणि अप्रतिम अशी ही बांधणी.

चिलखती बुरुज – दुर्गराज राजगड

फांजी – तटबंदीवर भिंतीवरील आतील बाजूस सपाटी करण्यात येत असे त्याला फांजी असे म्हणतात. पहारेक-यांना गस्त घालण्यासाठी याचा उपयोग होत असे. फांजीवर पोचण्यासाठी ठिक-ठिकाणी तटबंदीवर सोपान बनवलेले
असतात.गस्त घालण्यासाठी, पहा-यावेळी सैनिकांना तटबंदी वर पहारा देण्यासाठी, फिरण्यासाठी याचा वापर होत असे. वेगवेगळ्या गडावर याच्या बांधणी,लांबी,रूंदयाच्या बांधणी,लांबी,रूंदी आदी गोष्टीतही विविधता आढळून येते.

 जंग्या/झरोके – किल्ल्याच्या तटाला आतील बाजूकडून बंदुकीचा, बाणांचा मारा शत्रूवर करण्यासाठी छिद्र, भोके असतात त्यांना जंग्या असे म्हणतात, याची दिशा प्रामुख्याने खालच्या बाजूस तिरपी असते, किल्ल्याच्या आतून शत्रूला बंदूक, बाणाने सहज टिपता येईल अशी याची रचना असते. तटाच्या आतूनच शत्रूला न दिसता शत्रूवर मारा करण्यास याचा अगदी योग्य वापर होई. गडावर प्रत्येक ठिकाणी ही रचना आपल्याला आढळून येते. तटबंदी आणि बुरूजांतील विविध प्रकार आजही आपण अनेक किल्ल्यांच्या, वाड्यांच्या तटा-बुरूजावर पाहू शकतो.

 चर्या – तटबंदीवर ,द्वारावर ,बुरूजांवर पाकळ्यासारखे,त्रिकोणी, पंचकोणी आकाराचे दगड बसवलेले असतात त्यांना चर्या असे म्हणतात. याच्या आड लपून शत्रूवर माराही करता येतो तसेच या मुळे किल्ल्याच्या सौंदर्यातही भर पडते. अशी वेगवेगळ्या आकारातील रचना किल्ल्यावर आढळून येते. उदा: राजगड – राजमार्ग

माची – माची म्हणजे गडाची पहिली सपाटीची जागा, बालेकिल्ल्या खालील लांब पसरलेले पठार, मुख्य गडापासून कमी उंचीची ही बाजू, आणि म्हणूनच संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची. माचीचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हटले तर संजिवनी, सुवेळा, झुंजार अशी काही ठळक उदाहरणे घेता येतील. माचीच्या भौगोलिक रचनेवरून त्याचा वापर केला जात होता.जसे की राजगडची पद्मावती माची. या माचीच्या प्रचंड विस्तारामुळे, सपाटीमुळे माचीवरच वाडे, सदर, कोठारे, तलाव व इतर इमारतींची बांधकामे पहायला मिळतात. राजगड हा किल्ला माचीच्या दृष्टीने परिपूर्ण असाच आहे या गडाला असणा-या तीनही माच्या दुर्ग-बांधनीतील अद्भूत नमुनाच आहेत..

Forts of Shivaji Maharaj
Rajgad Fort एकाच फोटोमध्ये दिसणा-या राजडाच्या तीन ही माच्या ब बालेकिल्ला

संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाची असणारी संजीवनी माची, सुवेळा माची संजीवनीचे दुहेरी तिहेरी तटबंदीचे बांधकाम, बुरुज, चिलखती बुरुज ह्या तीनही माच्या म्हणजे एक स्वतंत्र किल्लाच असे हे दुर्गबांधनीतील अद्भूत अचंबित करणारे
बांधकाम आपल्याला पहायला भेटते. प्रत्येक गडाला माची असतेच असे नाही.

बालेकिल्ला – बालेकिल्ला म्हणजे सोप्या भाषेत म्हटले तर किल्ल्यावर किल्ला, किल्ल्याची सर्वोच्च जागा. सर्वोत्कृष्ट उदाहरण राजगड चा अभेद्य बालेकिल्ला. इतर गडांपेक्षा सर्वात उंच असा राजगडचा बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्यावर प्रामुख्याने महत्वाच्या सदर, वाडे, राजवाडा इ अशा इमारती असत. बालेकिल्ल्यावरून आक्रमणाच्या वेळी थोड्या शिबंदीसह ही शत्रूला तोंड देता येई. प्रत्येक किल्ल्याला उंच बालेकिल्ला असेलच असे नाही.

महादरवाजा – गडाचा हा मुख्य दरवाजा, संरक्षणाच्या, गडाच्या दृष्टीने याची बांधनी, संरक्षण बाजू अतिशय महत्त्वाची, म्हणूनच शिवरायांच्या दुर्गबांधनीतील एक अद्भूत प्रयोग आपल्याला पहायला मिळतो, तो म्हणजे महादरवाजाची गोमुखी बांधनी. उदा-रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग आदी. दोन बुरूजांच्या कवेत अगदी शेवटपर्यंत न दिसता बेमुलाग पद्धतीने लपवलेली ही बांधणी. भक्कम बुरुज, अरूंद अधिक चढाच्या पाय-या ही काही खास वैशिष्ट्ये. शत्रूला अगदी शेवटपर्यंत न दिसता दोन भक्कम बुरूजांच्या मध्ये लपवलेली अशी ही गोमुखी बांधनी. दरवाजावर सतत पहारा तसेच संरक्षणाच्या दृष्टीने जंग्या झरोके अशी केलेली आढळते पहारेक-यांच्या सोयीसाठी देवड्यांची रचना दरवाजातच पहायला मिळते.गडाला महादरवाजा खेरीज एक, दोन असे वेगवेगळे दरवाजे असत.गडाचे महत्वाचे आणि मुख्य प्रवेशद्वार म्हणजे महादरवाजा.

दिंडीदरवाजा – मुख्य लाकडी दरवाजालाच असलेला एक लहान दरवाजा. जाण्या ऐण्यास, वापरण्यासाठी. रोजच्या वापरासाठी.

 अडसर – गडाचा लाकडी दरवाजा बंद केल्यानंतर, आतील बाजूने आडवे लाकूड लावून बाहेरून दरवाजा उघडता येऊ नये यासाठी केलेली सोय. याच्या खोबण्या आज किल्ल्यावरील दरवाजाच्या आत आपण पाहू शकतो.

खिळे – गडाच्या लाकडी व्दारावर बाहेरील बाजूने अणकुचीदार विविध आकाराचे खिळे बसविले जात. शत्रूने, हत्तीने द्वाराला धडका दिल्यावर याद्वारे दरवाजांचे संरक्षण होई.

नाळ – तटबंदीच्या दोन तटांमध्ये विशिष्ट अंतर ठेवून, बोळीसारख्या जागेची केलेली रचना म्हणजे नाळ होय. शत्रूची दिशाभूल करण्यासाठी व शत्रूला गांगरुन सोडण्यासाठी ही रचना विशेष उपयुक्त अशी. यासंदर्भात शिवछत्रपतींनी निर्मिलेल्या राजगडच्या संजीवनी माचीची नाळयुक्त तटबंदीची रचना विशेष पाहाण्यासारखी आहे. दोन तटबंदीमध्ये विशिष्ट अंतर सोडून याची वैशिष्ट्यपूर्णअशी रचना आहे.

 देवडी – मुख्य दरवाजामध्येच दरवा-ज्याच्या बाजूला असलेली, दरवाजावर तैनात असलेल्या सैनीकांच्या,पहारेक-यां-च्या बसण्याची, विश्रांतीची, पहारा देण्याची जागा, चौकी. तसेच सैन्याला रात्रीच्या विश्रांतीसाठी केलेली सोय.

 चौकी – गडावर येणा-या वाटांवर सुरक्षेच्या दृष्टीने पहा-याच्या चौक्या असत. येणा-या लोकांवर नजर ठेवणे, पाहणी करणे इ कामे चौकीवर नेमलेले चौकीदार, सैनिक करत.

 गस्त – गडावर सैनिकांनी रात्री दिवसा दिलेला सशस्त्र पहारा म्हणजे गस्त होय. ही गडाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची गोष्ट. विशिष्ट हत्यारबंद सैनिंकासह ठराविक वेळी पहारा, गस्त दिली जाई. वेगवेगळ्या वेळी ठराविक वेळी यासाठी पहारेकरी नेमले जात.

 नगारखाना – नगारखाना म्हणजे गडावरील विशिष्ट, कार्यक्रमाच्या, सुचनेच्या प्रसंगी, सुचना देण्यासाठी, इशा-याच्या वेळी नगारा, शिंग, तुतारी व इतर वाद्य वाजवण्याची सर्वोच्च जागा.

 सोपान मार्ग – तटबंदीवर, गडावर ठिकठिकाणी,ये जा करण्यासाठी असलेला दादर, जिना, पायरी मार्ग म्हणजे सोपान मार्ग. गडावर उंच ठिकाणी किंवा दरवाजा, बुरुज, तटबंदीवर ये जा करण्यासाठी याचा वापर होई.

 दरबार – राज्याच्या वाटचाली संदर्भात, विशेष सण ,समारंभ, कार्यक्रम गडावरील महत्वाच्या निर्णय प्रसंगी एकत्र सभा, चर्चा करण्याची जागा. राजधानी रायगडावर असा दरबार आपणास पहावयास भेटतो. या दरबारातील सर्वोच्च क्षण म्हणजे राज्याभिषेक सोहळा होय.

 मेट – गडावर चढून जाताना वाटेत घरे असलेली, वस्ती असलेली जागा म्हणजे मेट. गडावर जाणा-या वाटा, लोक यांवर लक्ष ठेवणे हे या मेटकरांचे काम. या मेटांना विशिष्ट अशी नावे असत, जसे रायगडावर आंब्याचे मेट, सावंतांचे मेट इ. मेटांची नावे आढळतात. यावरून यांची स्थाननिश्चिती होत असे. गडाच्या सुरक्षेच्या, संरक्षणाच्या दृष्टीने ही मेटे अतिशय उपयोगी. तसेच तोरण्याच्या पायथ्याला मेट पिलावरे,भट्टी, दास्तान वस्ती, इत्यादी मेट आहेत.

पहारा – गडाच्या मुख्य जागा सोडून अवघड, अनघट खळग्याच्या जागा असत अशा ठिकाणी खबरदारी म्हणून पहारे नेमले जात. अशा खळग्यांना विशिष्ट नावे व पहारेकरी असत. पहारेकरी संख्या त्या त्या भागानुसार असत. रात्रीची गस्त घालणे हे यांचे मुख्य काम. उदा: रायगड – महाद्वाराचा खळगा, निवडुंगीचा खळगा, हिरकणीचा खळगा
इ.

घेरा – एका विशिष्ट गडाचा घेरा म्हणजे त्या गडाच्या पायथ्याशी,आसपास असलेली सर्व गावे, सर्व मुलुख, बाजूला परिसर म्हणजे त्या गडाचा घेरा होय.  उदा –घेरा सिंहगड

गुहा – अनेक गडावर आपल्याला गुहा आढळून येतात काही नैसर्गिक तर काही मानवनिर्मित… संरक्षणाच्या दृष्टीने सुद्धा याचा वापर गडासाठी होत असे. काही ठिकाणी काही विशिष्ट साधनसामुग्री साठविण्यासाठी ही याचा वापर होई.

भुयारे – गडावरून आपत्कालीन वेळी शिताफीने, गुप्तरितीने निसटण्यासाठी बाहेर पडण्यासाठी जमिनितून खोदून, बांधकाम करून केलेले मार्ग. आज गडावर सहसा अशी जागा आढळून येत नाहीत. तर काही ठिकाणी नैसर्गिक स्थितिमुळे बुजलेल्या अवस्थेत आढळतात.

 नेढे– नेढे म्हणजे गडाला, कड्याला एखाद्या ठिकाणी नैसर्गिकपणे आरपार पडलेले विशिष्ट आकाराचे छिंद्र, भगदाड. उदा : राजगड, रतनगड इ.

राजगडाच्या सुवेळा माचीचे नेढे.

चोरदिंडी – “….किल्ल्यास एक दरवाजा थोर अयब आहेयाकरिता गड पाहून एकदोनतीन दरवाजे तशाच चोरदिंड्या करून ठेवाव्यात्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे  दिंड्या चिणून टाकाव्या. शिवछ्त्रपतींच्या आज्ञापत्रातानुसार किल्ल्यास मुख्य दरवाजा खेरीस दुसरे दरवाजे, चोरदिंड्या असाव्यात. यानुसार आपल्याला किल्ल्यावर असे दरवाजे तटबंदीमध्ये, गडाच्या अपरिचित बाजूला, दुर्गम ठिकाणी याची बांधनी आढळून येते.एखाद्या संकटाच्या वेळी, अडचणीच्या वेळी निसटून जाण्यास याचा उपयोग होई.

चुन्याचा घाणा – गडाच्या बांधकामामध्ये प्रामुख्याने चुन्याचा वापर होत असे. यासाठी चुना दळण्यासाठी घाण्याचा वापर केला जाई, घाण्याच्या सहाय्याने चुना गडावरच बनवला जाई. यामध्ये गुळ, भाताचे तूस, पाणी इ. पदार्थांचे मिश्रण दगडी जात्याने बैलांमार्फत फिरवले जात असे. असे घाणे आज आपल्या-ला रोहिडा, तिकोणा, विसापूर, विजयदुर्ग अशा गडांवर पहायला भेटतात.

तोफा – किल्ल्यातील संरक्षणासाठी लढाऊ दृष्टीने अविभाज्य घटक. तोफा या साधारण ओतिव, घडीव आणि बांगडी प्रकाराच्या पहायला मिळतात. ओतिव म्हणजे धातू वितळवून साच्यात ओतून तयार केलेली तसेच घडीव म्हणजे नावाप्रमाणे घडवलेली. गडा-वर गडाच्या आवाक्यानुसार तोफा असत याच्या आकार व्यासावर मा-याचा टप्पा ठरतो. तोफा या प्रामुख्याने मिश्र धातूच्या बनवल्या जात जसे की लोखंडी, पंचधातू, पितळी इ. प्रत्येक तोफेची मारा करण्याची क्षमता वेगवेगळी असते.

शिबंदीची घरटी – गडावर आवश्यकतेनुसार शिबंदीची व्यवस्था असत .यामध्ये सर्व अधिकारी, सेनापती, व इतर सैन्य् सर्वांच्या राहण्याची व्यव-स्था केलेली असत. रायगडावर सर्व शिबंदी ही जगदीश्वराच्या पुढील भागात असे. आज आपण त्या घरांचे चौधरे तेथे पाहू शकतो.प्रत्येक गडावर त्याच्या आवाक्यानुसार शिबंदी/सैन्य संखेनुसार ठेवले जाई.

टाके/तलाव – गड बांधताना सुरवातीला पाणी पाहूनच काम चालू होई..तलाव खोद-ताना निघालेला सर्व दगड तटबंदी व इतर बांधकामासाठी वापरला जाई प्र-त्येक गडावर आपल्याला अनेक टाकी तलाव विशिष्ट नावाने पहायला
मिळतात.कोणत्याही किल्ल्यावर पाणी ही महत्त्वाची गरज आहेच, तो कायमस्वरूपी असावा तसेच गडावर सर्व शिबंदीला लागेल एवढे पाणी हवेच त्यासाठी काही ठिकाणी खोदून तर काही ठिकाणी बांधीव तलाव टाकी, विहिरी गडावर निर्मिले जात. गडाच्या महत्वाच्या गरजांच्या दृष्टीने पाणी ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.

बंधारा – गडावरील पाणलोटाच्या ठिकाणी बांध घालून पावसाळ्यातील पाण्याचा साठा केला जाई. गडावर अतिरिक्त पाणी साठा यामुळे उपलब्ध होई. गडावरील विविध कामांसाठी, पिण्यासाठी, वापरासाठी या पाण्याचा वापर केला जाई.

सदर – सदर ही गडाची अतिशय महत्त्वाची जागा , यावरूनच कामकाजाचे, न्यायाचे अतिशय महत्वाचे निर्णय, बैठका, न्यायनिवाडे केले जात. मह्त्वाचे कार्यक्रम सदरेवर भरवले जात. सदर ही गडानुसार बालेकिल्ल्यावर, माचीवर अशा वेगवेगळ्या प्रकारे आढळून येते. यामध्ये राजसदर, किल्लेदाराची सदर, तटसरनौबताची सदर इ. प्रकारही आढळून येतात.

राजवाडा – गडावर राजाच्या, राजकुटुंबाच्या राहण्याची केलेली विशेष सोय. शिवरायांच्या राजवाड्यांचे अवशेष आज आपण रायगड, राजगड अशा गडावर पाहू शकतो. आपल्या सर्वांसाठी पवित्र, वंदनीय अशी जागा.

ध्वजस्तंभ / निशाण – किल्ल्यावर राज्य करणा-या, नांदणा-या, राजवट करणा-या साम्राज्याचे, स्वराज्याचे निशाण लावण्याची जागा. प्रामुख्याने उंच ठिकाणी बुरूजावर असे.

धान्यकोठारे – गडावरील धान्य साठविण्याची जागा. गडावरील कुवतीनुसार धान्य साठवण्यास विविध कोठारे
असत. गडावरील लोकांच्या उपजिविकेसाठी धान्य साठा अतिशय महत्त्वाची गोष्ट. उंदीर, किडा-मुंगी, वाळवी, पाऊस
यांचा उपद्रव होणार नाही अशा पद्धतीने कोठारे बांधली जात. उन ,वारा पाऊस इ गोष्टींपासुन वाचण्यासाठी भक्कम
अशी रचना केली जाई.

दारूकोठारे – हा गडावरील अतिशय महत्त्वाचा साठा, गड लढविण्यास तोफांसाठी दारूसाठा ही अतिशय महत्वाची गोष्ट. दारूकोठारे प्रामुख्याने मुख्य वस्तीपासून दूर असत.याची विशिष्ट प्रकारची भक्कम अशी बांधणी केली जाई. किल्ला फार काळ झुंजत ठेवण्यासाठी, पाणी आणि धान्यसाठ्याबरोबरच, दारूसाठाही विशेष काळजीने जपला
जाई. वरील तीन गोष्टी गडावर जेवढ्या मुबलक प्रमाणात तेवढाच जास्त काळ गडावरून शत्रूशी तोंड देता येई. याबाबत ही आज्ञापत्रात उल्लेख आढळतात जसे की…..

दारूखाना घराजवळ घराचे वारियाखालें नसावा.सदरेपासून सुमारांत जागा पाहून भोंवतें निर्गुडी आदिकरून झाडाचें दाट कुसूं घालून बांधावा.तळघर करावें तळघरात गच्च करावात्यांत माच घालून त्या घरीं दारूचे बस्तेमडकी ठेवावी.बाण होके आदिकरून मध्यघरात ठेवावे.सरदी पावों  द्यावीआठ पंधरा दिवसी हवालदारानें येऊन दारूबाणहोके आदिकरून बाहेर काढून उष्ण देऊन मुद्रा करून ठेवीत जावें.दारूखान्यास नेहमी राखणेस लोक ठेवावेत्याणी रात्रंदिवस पाहरियाप्रमाणें जागत जावें.परवानगीविरहित आसपास मनुष्य येऊं  द्यावे.

खलबतखाना – गुप्त वाटा-घाटी चर्चा करण्याची संरक्षीत जागा. महत्वाच्या मोहीमेचा, नियोजनांचा आढावा घेण्यासाठी, खासगी चर्चेसाठी असलेली जागा. गुप्त हेरांकडून, जासूसांकडून आलेल्या माहीतीची गुप्त रितीने चर्चा करण्याची संरक्षित खाजगी जागा.

शस्त्रागार – गडावरील सर्व शस्त्रसामग्री ,लढाईसाठी लागणारे सर्व शस्त्रे साठा ज्यामध्ये, ढाल तलवारी, बंदूका, चिलखत, भाले, पट्टे, इ सर्व महत्त्वाची, गरजेची शस्त्र शस्त्रास्त्रे ठेवण्याची जागा.

वस्त्रागार – गडावर आवश्यक असणारी, विविध  कारणांसाठी लागणारी, सर्व प्रकारची शाही वस्त्रे ठेवण्याची जागा शेले, कमरपट्टे, गादी, तक्के, लोड, पडदे सर्व कापड, वस्त्र इ .

मंदिरे – दैनंदिन पुजेसाठी आवश्यक असणारी , विविध देवदेवतांची, नानाविध प्रकारची सुरेख बांधणीतील मंदीरे प्रत्येक गडावर आपल्याला नक्कीच आढळतात, वेगवेगळ्या देवदेवतांची मंदीरे गडावर असत. याखेरीज गडावर विशिष्ट ठिकाणी कोरलेली देवदेवतांची शिल्पे, शिलालेख, अशा भरपूर गोष्टी अजूनही गडांवर आढळतात.

जवाहिरखाना/कोषागार – जड-जवाहिर, हिरे, मानके, दागिने अशी मौल्यवान वस्तू ठेवण्याची जागा. स्वराज्यातील सर्व मौल्यवान ऐवजी, कर रूपाने, लुटीच्या रूपाने मिळालेला सर्व ऐवज, सुरक्षित ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यासाठी केलेली सोय.

दफ्तरखाना – सर्व प्रकारचे चालणारे कामकाज, परस्परांमधील पत्रव्यवहार, खाजगी दस्ताऐवज, गडावरील सर्व ऐतिहासिक कागदपत्रे, पत्रे, नोंदी, दस्ताऐवज, ठेवण्याची सुरक्षित जागा.

 टांकसाळ – वेगवेगळ्या साम्राज्याची, स्वतःची दैनंदिन व्यवहारातील नाणी, शिक्के इ चलने तयार करण्याचा कारखाना. शिवकालीन शिवराई, होन अशी स्वराज्याची मौल्यवान नाणी पाडण्याचा कारखाना, टांकसाळ रायगडावर
होती.

शौचकुप – साडेतीनशे वर्षांपूर्वी गडावर निर्मिलेला वैज्ञानिक प्रयोग. प्रत्येकाने अभ्यासावा असा प्रयोग. अनेक शिवकालीन गडावर शौचकूपांची रचना केलेली आढळते, वाड्यांमध्ये, घरांमध्ये, पहारेक-यांसाठी तटबंदी मध्ये असे शौचकुप आढळून येतात. पहारेक-यासांठी खास तटबंदी मध्येच अशी रचना केलेली पहायला भेटते. उदा: रायगड, राजगड, सिंधुदुर्ग, प्रतापगड, शिवनेरी, तोरणा इ.

अंधारकोठड्या – गुन्हा केलेल्या गुन्हेगारांना, फितूरांना, आरोपींना, शिक्षा म्हणून कैंद्यांना कैदेत ठेवण्याच्या, डांबून ठेवण्याच्या संरक्षीत कोठड्या.

पागा – गडावर येणारे घोडे, प्राणी यांच्या राहण्यासाठी, त्यांना बांधण्यासाठी केलेली निवा-याची सोय.

उष्ट्रखाना – उष्ट्रखाना म्हणजे उंटशाळा, उंट या प्राण्यांची बांधण्यासाठी केलेली सोय. हे प्रामुख्याने भुदुर्गांमध्ये असत.

पिलखाना /हत्तीशाळा – गडावर असलेल्या, सैन्य दलात असलेल्या हत्तींना राहण्याची, निवा-याची केलेली सोय, जागा.

तालीमखाना – तालीमखाना म्हणजे मल्लशाळा .पैलवान मल्लांचा आखाडा तालीम.

अंबरखाना – गडावर धान्य साठविण्यासाठी बांधलेली इमारत.

कडेलोट कडा – कैद्यांना, फितुरांना, गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी गडावरील एक राखीव जागा कडा. शिक्षा सुनाविल्यानंतर कैद्यांचा अशा ठिकाणाहून कडेलोट केला जाई. उदा: रायगडचा टकमक कडा , शिवनेरी कडेलोट कडा.

शिल्पे – प्रत्येक किल्ल्यावर प्रवेशद्वारावर, तटावर, मंदिरावर आपल्याला विविध प्रकारची शिल्पे आढळून येतात. जसे कि हत्ती, शरभ, सिंह, गंडभेरूड असे प्राणी तसेच दरवाजावर ,तटावर देव-देवता गणेश, मारूती इ. देवतांची पाना फुलांची विविध शिल्पे आढळतात. वेगवेगळ्या उद्देशाने, वेगवेगळ्या साम्राज्याची ओळख, ताकद दर्शविण्यासाठी कोरलेले विशिष्ट आकाराचे, चित्रांचे दगड.

शिलालेख– अनेक गडावर वेगवेगळ्या भाषेचे शिलालेख कोरलेले असतात. शिलालेख हे प्रामुख्याने उठावाचे किंवा खोदिव अक्षराचे असतात, शिलालेखातून किल्ल्यांचा, बांधकामाचा विविध राजवटींचा ऐतिहासिक उल्लेख, दस्तावेज आपल्याला मिळतो. किल्ल्यांची बांधणी, पुनर्बांधणी, डागडुजी काही ऐतिहासिक व्यक्तींचे उल्लेख, गडाबद्दलचा इतिहास, तेथील राजवटीची ओळख अशा महत्वपूर्ण गोष्टींची माहीती शिलालेखांच्या माध्यमातून कळते.

 जोते/चौथरा – गडावरील वास्तूंचा, घरांचा पाया. घडीव मजबूत दगडांनी बांधून यावर वरील बांधकाम केले जाई.

 समाधी –  गडावर, गडाच्या पायथ्याशी, गावांमध्ये, शुरविरांच्या ,राजघराण्यातील व्यक्तींच्या स्मरणार्थ उभारलेली
छत्री.

 सतीशिळा – सती गेलेल्या स्त्रीच्या स्मरणार्थ केलेले शिल्प. पतिच्या मृत्यूनंतर त्यांच्या चितेमध्ये सती गेलेल्या स्त्रीच्या स्मरणार्थ एका दगडी शिळेवर विशिष्ट आकाराचे शिल्प कोरले जात ज्याला सतीशिळा असे म्हणतात. साधारण सतीशिळा गडावर तसेच अनेक गावांमध्ये, परिसरात आढळून येतात. यामध्ये त्या प्रसंगाचे प्रतिकात्मक चित्र
कोरले जाई.

वीरगळ – वीरगळ म्हणजे वीरपुरूषांच्या स्मरणार्थ उभारलेला स्तंभ, युद्धात, संग्रामात, युद्धभुमीत वीरमरण आलेल्या, धारातिर्थी पडलेल्या सैनिकाच्या, वीराच्या स्मरणार्थ दगडी शिळेवर विशिष्ट शिल्पांच्या आधारे कोरलेला दगड वीरगळ म्हणून ओळखला जातो. यामध्ये वीराच्या पराक्रमावरून, लढाईच्या वर्णनावरून वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळी माहिती सांगणारे वीरगळ कोरले जात. असे बरेचसे दुर्लक्षित विरगळ आज अस्ताव्यस्त अवस्थेत किल्ले, गावे इ ब-याच ठिकाणी दुर्लक्षित स्थितीत पडून आहेत. वीरगळी प्रामुख्याने यादव शिलाहार काळात तयार झाल्या. शिवकाळात वीरगळींची जागा स्मृतिशिळांनी घेतली.

खंदक – शत्रूला किल्ल्याभोवती भिडता येऊ नये यासाठी किल्ल्याभोवती विशिष्ट खोलीचा, वेगवेगळ्या दृष्टीने, खोदलेला संरक्षीत चर म्हणजे खंदक होय. खंदक हा प्रामुख्याने भुईकोट किल्ल्याभोवती खोदला जातो. भुईकोट
किल्याभोवती खंदक खोदून एकप्रकारे किल्ल्याला संरक्षीत केले जाते. शत्रूला सहजपणे किल्ल्याला भिडता येऊ नये या साठी केलेली ही खास योजना, खंदकामध्ये पाणी, मगरी, साप असे प्राणी सोडले जात, जेणेकरुन एक-प्रकारे भुईकोट किल्ल्याभोवती हे सुरक्षाकवच होते. खंदकावरून जाण्यायेण्यासाठी काढता घालता येणारा पूल बसविला जाई. उदा:किल्ले चाकण , यशवंतगड इ.

तळखडे – गडावरील लोकांच्या राहण्याच्या दृष्टीने गडावर घरांचे, वाड्यांचे बांधकाम केले जाई. यासाठी प्रामुख्याने दगड, लाकूड आणि विटा यांचा वापर केला जात असे. घराच्या, वाड्याच्या दगडी चौथ-यावर उभे लाकडी खांब व त्यावर इतर बांधकाम अशी रचना असे. आज गडावरील या अवशेष रूपी घरांच्या चौथ-यावर आपल्याला विशिष्ट् प्रकारचे दगड किंवा खुणा दिसतात, यांना तळखडे असे म्हणतात. वाडा बांधताना या विशिष्ट आकाराच्या कोरलेल्या नक्षीदार दगडावर,तळखड्यांवर वाड्याचे लाकडी खांब रोवले जात, उभे केले जात. यामुळे या लाकडी खाबांना एकप्रकारे ओल, किड इ. गोष्टींपासून संरक्षण मिळे.

तुम्ही एखाद्या गडावर जाणार असाल तर इथुन पुढे किल्ल्यावरील असे वर सांगितलेले सर्व अवशेष अवश्य पहा. त्याच्या नोंदी करा. काय ठाउक तुमच्या अशा करण्यामुळे किल्ल्यांच्या बांधणीतील काहीतरी नवीन माहिती पुढे येऊ शकेल.

 

Facebook Comments

Share this if you like it..